ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्रे

सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात येत गेल्याने गावपातळीवर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. सोबतच फवारणीसाठीही ट्रॅक्टरचलित फवारणी किंवा धुरळणी यंत्रांचा वापर वाढत आहे.
ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्रे
ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्रे

रोग, किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी यंत्रांचा वापर केला जातो. रसायनांचा वापर हा फवारणी, धुरळणी किंवा धुक्याच्या स्वरूपात केला जातो. पिकांवर एकसमान व प्रभावी वापरासाठी सामान्यतः धुरळणी यंत्र किंवा फवारणी यंत्रांचा वापर होतो. फवारणी यंत्राचे मुख्य कार्य द्रावणाचे रूपांतर योग्य आकाराच्या लहान लहान थेंबांमध्ये करणे होय. लहान आकाराचा थेंबामुळे रसायनांचा अपव्यय न होता परिणामकारक फवारणी करता येते. अलीकडे ट्रॅक्टर आकार फळबागांच्या लहान होत गेला आहे. तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात येत गेल्याने गावपातळीवर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. सोबतच फवारणीसाठीही ट्रॅक्टरचलित फवारणी किंवा धुरळणी यंत्रांचा वापर वाढत आहे. ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्रांचे प्रकार ट्रॅक्टर माऊंटेड बूम स्प्रेअर एअर कॅरिअर स्प्रेअर १) ट्रॅक्टर माऊंटेड बूम स्प्रेअर हा एक हायड्रॉलिक ऊर्जा प्रकारातील स्प्रेअर आहे. स्प्रेअरचा पंप चालविण्यासाठी ट्रॅक्टरच्या पीटीओ पॉवरचा उपयोग केला जातो. यात बूम प्रणालीचा म्हणजेच एकाच डिलिव्हरी पाइपवर दोनपेक्षा अधिक नोझल्सचा वापर केलेला असतो. मूलतः ग्राउंड स्प्रे बूम आणि ओव्हरहेड स्प्रे बूम अशा दोन प्रकारचे स्प्रे बूम वापरले जातात. शेतातील उंच पिकांसाठी खालून वरच्या दिशेने फवारणी करण्याच्या उद्देशाने ओव्हरहेड स्प्रे बूम तयार केले आहेत. ग्राउंड स्प्रे बूमने कमी उंचीच्या पिकांमध्ये खालील दिशेने फवारणी केली जाते. पिकाची लागवड ट्रॅक्टरची रुंदी लक्षात ठेवून एका ओळीत करावी लागते. या स्प्रेअरमध्ये एक प्लॅस्टिकची टाकी, पंप असेंब्ली, स्ट्रेनरसह सक्शन पाइप, प्रेशर गेज, प्रेशर रेग्युलेटर, एअर चेम्बर, डिलिव्हरी पाइप, नोझल्सने बसवलेले स्प्रे बूम असे घटक भाग असतात. पूर्ण स्प्रेअर ट्रॅक्टरच्या ‘थ्री पॉइंट लिंकेज’ वर बसवता येतो. या स्प्रेअरमध्ये उच्च दाब आणि उच्च फेकण्याची क्षमता असलेले पंप वापरले जातात. दाबांनुसार नोझल्सची संख्या २० पर्यंत असू शकते. उपयोग : या प्रकारचा स्प्रेअर सोयाबीन, तूर, मूग, विविध धान्य पिकांसह फळबागांमध्ये फवारणीसाठी होतो. २) एअर कॅरिअर स्प्रेअर फळबागांमध्ये प्रभावी कीटक नियंत्रणासाठी झाडाच्या पूर्ण भागावर रसायनाचे एकसारखे वितरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या फवारणी प्रणालीमध्ये हवेच्या साहाय्याने संपूर्ण पिकांच्या सर्व भागांवर समान प्रमाणात फवारणी करता येते. विशेषतः वनस्पतींच्या पानांच्या खालील बाजूला अनेक किटकांचा प्रादुर्भाव किंवा रहिवास असतो. अशा ठिकाणीही फवारणी व्यवस्थित पोचू शकते. या फवारणी यंत्रामध्ये ब्लोअर (फॅन), केसिंग, डिफ्यूझर, केमिकल डिलिव्हरी पाइप, नोझल, प्रेशर रेग्युलेटर, गियर बॉक्स, प्रेशर गेज आणि डायफ्रम पंप इ. मुख्य कार्यरत घटक असतात. हे सर्व घटक एका दुचाकी ट्रॉलीवर बसवलेले असतात. ब्लोअर गिअर बॉक्स शाफ्टवर बसवतात. त्यात ट्रॅक्टरच्या पीटीओवर चालणारा डायफ्रम पंप बसवलेला असतो. याच पीटीओ ऊर्जेवर पंखादेखील फिरवला जातो. रसायनांच्या टाकीमध्ये एजिटेटरच्या साह्याने सर्व रसायन पाण्यासोबत योग्य प्रमाणात मिसळले जाते. पंपाद्वारे उच्च दाबाने रसायन हे पंख्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या सर्व नोझलपर्यंत पोचवले जाते. फॅन चालू झाल्यावर हवेच्या वेगामुळे नोझल मधून येणारे रसायनाचे थेंब खूप लहान आकारामध्ये विभागले जात हवेच्या प्रवाहासोबत मिसळले जातात. हवेच्या वेगामुळे पूर्ण झाडाच्या फांद्या आणि पाने हलतात. परिणामी पानाच्या दोन्ही बाजूस, अगदी झाडाच्या आतील पर्णसंभारामध्येही समप्रमाणात फवारणी पोचते. उपयोग : या प्रकारचा स्प्रेअर प्रामुख्याने फळबागांसाठी उपयुक्त आहे. डॉ. अमोल गोरे, ९४०४७६७९१७ (कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र तंत्रज्ञान संस्था, औरंगाबाद.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com