काटेकोर शेतीसाठी पिकातील तापमानाचा अभ्यास आवश्यक

काटेकोर शेतीसाठी सूक्ष्म वातावरणातील तापमान या महत्त्वाच्या घटकांच्या मापनासंबंधी या लेखामध्ये माहिती घेऊ.
काटेकोर शेतीसाठी पिकातील तापमानाचा अभ्यास आवश्यक
काटेकोर शेतीसाठी पिकातील तापमानाचा अभ्यास आवश्यक

पॉलिहाऊस, शेडनेट यासारख्या संरक्षित शेतीमध्ये पिकाच्या दृष्टीने योग्य असे हवामान ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. सर्वसामान्यपणे कोणत्याही पिकातील वातावरण, तापमान अचूकतेने मोजण्यासाठी योग्य त्या उपकरणाचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे. काटेकोर शेतीसाठी सूक्ष्म वातावरणातील तापमान या महत्त्वाच्या घटकांच्या मापनासंबंधी या लेखामध्ये माहिती घेऊ. प्रदेशातील हवामानाची माहिती ही विविध शासकीय व खासगी संस्थांमार्फत पुरवली जाते. मात्र, आपल्या पीक क्षेत्रांमधील सूक्ष्म वातावरण (मायक्रोक्लायमेट) ची नेमकी स्थितीही शेतकऱ्यांनी सातत्याने जाणून घेतली पाहिजे. पीक क्षेत्रातील वातावरण समजण्यासाठी, वातावरण घटक अचूकपणे मोजण्यासाठी काही यंत्रणा, उपकरणांची आवश्यकता असते. याद्वारे आपल्या पिकातील सूक्ष्मवातावरणाच्या नोंदी ठेवल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य वातावरण पुरवणे शक्य होऊ शकते. हवामानाच्या ‘थर्मामेटरी’ या शाखेमध्ये पीकक्षेत्रातील तापमानाचे मोजमाप व अभ्यास करण्यात येतो. त्याच प्रमाणे ज्या शाखेमध्ये वातावरणातील आर्द्रता किंवा वातावरणातील बाष्प याचे मोजमाप केले जाते, त्यास ‘हायग्रोमेटरी’ म्हणतात. थर्मामेटरीमध्ये आणि हायग्रोमेटरीमध्ये विभिन्न प्रकारचे थर्मामीटर आणि हायग्रोमीटर वापरले जातात. कधीकधी दोन्ही एकत्रित (थर्मो-हायग्रो मीटर किंवा हायग्रो-थर्मो मीटर) हेही वापरले जातात. या लेखामध्ये प्रामुख्याने विविध तापमापींची माहिती घेऊ. तापमानाच्या नोंदीसाठी उपकरणे ः नियंत्रित शेती पद्धतीमध्ये तापमान या सूक्ष्म वातावरणीय घटकाच्या मापनासाठी प्रामुख्याने पुढील प्रकारच्या तापमापी वापरल्या जातात.

  • साधा तापमापी, कमाल तापमापी व किमान तापमापी 
  • आर्द्र व शुष्क तापमापी 
  •  भू तापमापी 
  • भू तापमापी व आर्द्रता मापी
  • रोजच्या दैनंदिन सूक्ष्मवातावरणातील तापमान मोजमापासाठी वापरला जाणारा साधा अवरक्त तापमापी (इन्फ्रारेड थर्मामीटर) उपलब्ध आहे.
  • संशोधनासाठी किंवा उच्च नियंत्रित शेती पद्धतीमध्ये वापरला जाणारा अवरक्त तापमापी.
  • अवरक्त तापमापीचा शेतामध्ये वापर कसा करावा ? काही सहज हाताळता येणारे आणि आधुनिक तापमापी सुद्धा वापरता येतात. अलीकडे कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना शरीराचे तापमान घेणारा अवरक्त (इन्फ्रारेड) तापमापी माहिती झाला आहे. अशाच प्रकारचा इन्फ्रारेड थर्मामीटर (अवरक्त तापमापी) शेतातील किंवा संरक्षित पिकातील मोजण्यासाठी वापरला जातो. याद्वारे आपण संरक्षित अथवा अनियंत्रित शेतीमध्ये हवेचे किंवा वातावरणाचे तापमान मोजू शकतो. त्याच प्रमाणे जमिनीचे तापमान आणि पिकाचे तापमान यातील फरक मिळवू शकतो. तसेच पिकाचे तापमान आणि वातावरणातील हवेचे तापमान यातील फरक मोजावा. त्याच्या नोंदी ठेवल्यास आपले पीक पाण्यावर आले किंवा नाही, हे समजू शकते. आपले पीक पाण्याच्या ताणास बळी पडले आहे किंवा नाही हे काढता येते. पिकाखालील जमिनीचे किंवा शेतातील तापमान हे हवेतील तापमानापेक्षा अधिक असेल; अथवा पिकाचे तापमान हवेतील तापमानापेक्षा अधिक असेल तर आपल्या पिकाला पाणी देण्याची आवश्यकता असल्याचे समजावे. थोडक्यात, भू-तापमान म्हणजेच जमिनीचे तापमान, हवेतील तापमान आणि पिकाचे तापमान मोजण्याचा उपयोग आपल्याला पाणी व्यवस्थापनासाठी, पाण्याच्या पाळ्यांचे योग्य नियोजन करण्यासाठी होऊ शकतो. पिकातील दिवसाचे आणि रात्रीच्या तापमानात तफावत कमी असेल. म्हणजेच पिकाचे तापमान वातावरणातील तापमानापेक्षा अधिक असेल, सापेक्ष आर्द्रता अधिक असेल तर कीड व रोगांचा प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता असते. पिकातील कॅनोपीचे तापमान, पिकाचे तापमान आणि जमिनीचे तापमान मोजल्यास आपल्यास कीड व रोगाचा संभाव्य धोका आधीच समजू शकतो. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास खर्चात मोठी बचत होते. कारण कोणत्याही उपचारापेक्षा प्रतिबंधासाठी खर्च कमी येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीक वाचवता येते. प्रयोगातील निष्कर्ष ः प्रयोग १ः

  • आम्ही सन २०१४-१५ मध्ये परभणी येथील कृषी हवामानशास्त्र विभागामध्ये ओलिताखालील सोयाबीन पिकातील तापमानाचा अभ्यास केला होता. या प्रयोगामध्येही पिकातील तापमान मोजण्यासाठी ‘अवरक्त थर्मामीटर (इन्फ्रारेड थर्मामीटर)' वापरले होते. त्यातील निरीक्षणे पुढीलप्रमाणे ः
  •  मध्यरात्री ते सकाळी या वेळात हवेतील तापमान आणि पिकाचे तापमान जवळपास सारखेच राहते.
  •  सकाळपासून दुपारपर्यंत (विशेषतः तीन वाजेपर्यंत) पिकाचे तापमान कमी राहते; नंतर पिकाचे तापमान जवळपास हवेतील तापमानाइतके मध्यरात्रीपर्यंत राहते.
  • प्रयोग २ ः

  • सन २०१०-११ या वर्षात द्राक्ष (वाइन ग्रेप्स) पिकामध्ये “विविध पर्णभारानुसार पिकाच्या तीन स्तरांमधील सूक्ष्म वातावरणाचा अभ्यास करण्यात आला. यातील निष्कर्ष पुढील प्रमाणे -
  • पिकातील सर्वात खालच्या स्तरातील तापमान सर्वाधिक असून, सर्वात कमी तापमान पिकाच्या वरच्या स्तरातील (शेंड्याजवळील) आढळून आले.
  • जसजसा पर्णभार वाढत गेला, तसतसे द्राक्ष पिकांचे तापमान कमी-कमी होत गेल्याचे आढळले.. याचा अर्थ असा आहे, पिकांवरील पर्णभार म्हणजे फांद्यांची व पानांची संख्या अधिक असल्यास त्यातील तापमान कमी-कमी होत जाते. आर्द्रता वाढून बुरशीजन्य रोगाला निमंत्रण देते. यामुळे द्राक्षाच्या वेलीवरील फांद्यांची संख्या योग्य प्रमाणात ठेवणे आवश्यक असते. यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो.
  • प्रयोग ३ ः

  • सन २०१०-११ मध्ये रब्बी हंगामातील ज्वारी पिकाच्या तापमानाचा अभ्यास करण्यात आला. या रब्बी हंगामामध्ये सुमारे २३ ज्वारीच्या वाणांचा विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये तापमान घेण्यात आले. त्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटरच्या साह्याने तापमानाच्या नोंदी घेण्यात आल्या. या प्रयोगाच्या निष्कर्षांमध्ये...
  • कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामामध्ये, ज्वारीच्या पेरणीपासून ते पोंगा निघण्याच्या अवस्थेपर्यंत आणि त्याहून काही काळ पुढे पिकाचे तापमान हे हवेतील तापमानापेक्षा कमी राहिले. याचे कारण मॉन्सून अखेरच्या काळात झालेल्या पावसामुळे जमिनीमध्ये पुरेशी ओल हे असते.
  • मात्र, त्या पुढील काळामध्ये पोटऱ्याची अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, हुरड्याची अवस्था आणि परिपक्वता अवस्था अथवा काढणीच्या काळापर्यंत पिकाचे तापमान हे हवेतील तापमानापेक्षा अधिक राहिले. यामुळे काही वेळा अल्प प्रमाणात, तर काही वेळा अधिक प्रमाणामध्ये पीक पाण्याच्या ताणास बळी पडते. अंतिमतः पीक उत्पादनामध्ये घट येते.
  • डॉ प्रल्हाद जायभाये, ०७९८०६८४१८९ (कृषी हवामान शास्त्रज्ञ तथा प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, जालना अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com