ट्रॅक्‍टर देखभालीसह अवजारांची निवड महत्त्वाची

ट्रॅक्‍टर देखभालीसह अवजारांची निवड महत्त्वाची
ट्रॅक्‍टर देखभालीसह अवजारांची निवड महत्त्वाची

ट्रॅक्‍टरच्या निवडीच्या वेळी जमीनधारणा, मातीचा प्रकार, पीकपध्दती, हवामान स्थिती, कार्यक्षमता आणि दुरुस्ती किंमत, विकत घेतल्यानंतर मिळणारी सेवा सुविधा, योग्य गिअर प्रणाली या सर्व गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा.  ट्रॅक्‍टरची अश्वशक्ती ठरवताना असलेले पीक पद्धती, कोरडवाहू किंवा बागायती शेतीसाठी वापर या गोष्टींचा विचार करावा. एकूण जमीन धारणा क्षेत्राचा विचार करून ट्रॅक्‍टर अश्वशक्ती निवडताना खालील गोष्टींचा विचार करावा.  एक पीक पध्दती ( कोरडवाहू शेती)- १ अश्वशक्ती = २ हेक्‍टर,  उदा. १०० एकर =२० ते २५ अश्वशक्ती ट्रॅक्‍टर,  दुबार पीक पध्दती (ओलीताखालील शेती) - १अश्वशक्ती = १.५ हेक्‍टर,  उदा. १०० एकर = ३० ते ३५ अश्वशक्ती  डिझेल क्षमता ः  खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे विविध अश्वशक्तीच्या ट्रॅक्‍टरसाठी इंधनाची गरज प्रतितास याप्रमाणे देण्यात आली आहे. इंधन क्षमतेनुसार आवश्‍यक अशा ट्रॅक्‍टरच्या अश्वशक्तीची योग्य निवड करावी. 

अश्वशक्ती इंधनाची गरज 
२५ अश्वशक्ती २०५ ग्रॅम/ पीटीओ अश्वशक्ती/तास 
२५ ते ३५ अश्वशक्ती २०० ग्रॅम/ पीटीओ अश्वशक्ती/तास
३५ ते ५५ अश्वशक्ती १९५ ग्रॅम/ पीटीओ अश्वशक्ती/तास 
५५ अश्वशक्ती- ते अधिक १८५ग्रॅम/ पीटीओ अश्वशक्ती/तास

एकूण गिअरची संख्या ः  सारख्या अश्वशक्ती ट्रॅक्‍टरच्या ओढण्याच्या शक्तीच्या तुलनेत ज्या ट्रॅक्‍टरची ओढण्याची शक्ती कमी गिअरमध्ये जास्त वेगावर मिळत असेल तो ट्रॅक्‍टर निवडावा.  ट्रॅक्‍टरसाठी योग्य अवजार आणि योग्य वेग ः  १) अवजारांचा योग्य आकार आणि ट्रॅक्‍टरचा काम करण्याचा वेग योग्यरित्या निवडावा. जेणेकरून ट्रॅक्‍टरच्या संपूर्ण अश्वशक्तीचा वापर होईल.  २) ट्रॅक्‍टरने अवजार चालवित असताना शक्‍य तेवढ्या वरच्या गिअरमध्ये चालवावा. त्यामुळे ट्रॅक्‍टर इंजिननमधून धूर येणार नाही. जास्तीत जास्त गिअर्सची संख्या व दोन सलग गिअर्समधील वेगाचा कमी फरक असल्यास त्या ट्रॅक्‍टरला चांगले समजावे. उदा. जर ३० अश्वशक्ती ट्रॅक्‍टरला ११ दाती कल्टिव्हेटर ऐवजी ९ दाती कल्टिव्हेटर जोडला तर मिळणारी शक्ती २० टक्के वाया जाईल.  योग्य अवजारांचा वापर ः  १) ट्रॅक्‍टरच्या अश्वशक्तीनुसार योग्य जुळणाऱ्या अवजारांची निवड केल्यामुळे कामाच्या वेळेत बचत होईल, तसेच लवकर काम पूर्ण होईल.  २) प्रतितास २० ते ४० टक्के जास्त काम होईल.  ३) प्रतिहेक्‍टर १० ते १५ टक्के डिझेलची बचत होईल.  ४) ट्रॅक्‍टरच्या पूर्ण शक्तीपेक्षा कमी आकाराचे अवजार तसेच शक्तीपेक्षा मोठे अवजार न वापरता, योग्य त्या अवजारांची निवड केल्यास जास्तीत जास्त फायदा होतो. इंधनाची बचत होते.  उदा. ट्रॉलीच्या बाबतीत सांगायचे झाले तर, एखाद्या ट्रॅक्‍टरची क्षमता ५ टन क्षमतेच्या ट्रॉलीला ओढण्याची आहे आणि त्याऐवजी ट्रॅक्‍टर जर ३ टन क्षमतेच्या ट्रॉलीला ओढत असेल, तर ४० टक्के ट्रॅक्‍टरचा वापर कमी होतो आणि २० टक्के डिझेलचा प्रतिटन वापर अधिक होत आहे.  ट्रॅक्‍टरची योग्य देखभाल आणि दुरुस्ती ः  अव्यवस्थित देखभालीचा ट्रॅक्‍टर, व्यवस्थित देखभाल न केलेले अवजार, चुकीच्या अवजारांची निवड केल्यास २५ टक्के जास्त डिझेल वाया जाते. ट्रॅक्‍टर सोबत देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचा वापर करून ट्रॅक्‍टरची योग्य निगा राखावी. यामुळे कार्यक्षमता टिकून राहील तसेच इंधनामध्ये बचत होईल. इंजिन दुरुस्तीचे लक्षण जसे की, कॉम्पेशन प्रेशर, इंजेक्‍टर प्रेशर, व्हॉल्व्ह, क्‍लिअरन्स, थर्मोस्टॅट व्हॉल्व्ह, सायलेन्सर स्थिती, हवा इ. स्वच्छ करण्याची पध्दत.  इंधन प्रणाली ः  १) योग्य काळजी घेतली तर मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होते.  २) डिझेलची साठवण स्वच्छ टाकीत करावी.  ३) डिझेल टाकी ट्रॅक्‍टरचे काम संपल्यानंतर लगेच भरावी.  ४) डिझेलचे फिल्टर कंपनीने माहिती पुस्तिकेमध्ये निर्देशित केल्याप्रमाणे बदलावेत.  ५) डिझेल गळती होणार नाही याची काळजी घ्यावी.  ल्युब्रीकेशन प्रणाली ः  १) योग्य ग्रेडचे इंजिन ऑईल आणि गिअर बॉक्समधील ऑईल वापरावे.  २) इंजिन ऑईल आणि ऑईल फिल्टर योग्य कालावधीनंतर बदलावेत.  विद्युत प्रणाली ः  १) ट्रॅक्‍टरची प्रणाली जर वापरात असेल तर ट्रॅक्‍टरचे इंजिन चालू ठेवावे.  २) बॅटरीतील इलेक्‍ट्रोलाईटची पातळी ट्रॅक्‍टर वापराच्या दर ५० तासांनी तपासावी.  ३) दोन्ही बॅटरी केबल्सची ठरावीक कालावधीनंतर तपासणी करावी.  ४) ॲम्पीयर मीटरचे चार्जिंग व्यवस्थित होत असल्याची खात्री करावी.  ५) जेव्हा ट्रॅक्‍टर वापरात नसेल तेव्हा इंजिन व विद्युत प्रणालीचे कार्य बंद ठेवावे.  क्‍लच प्रणाली ः  १) ट्रॅक्‍टर चालू असताना क्‍लच पॅडलवर पाय ठेवू नये, त्यामुळे क्‍लच प्लेटचे घर्षण लवकर होते. ज्यामुळे ट्रॅक्‍टरची कार्यश्रमता कमी होऊन इंधन जास्त लागते.  टायरमधील हवेचा दाब ः  १) रस्त्यावर वाहतूक करताना ः पुढच्या चाकामधील हवेचा दाब २४ ते २८ पीएसआय आणि मागील चाकामध्ये १४ ते १८ पीएसआय हवेचा दाब ठेवावा किंवा कंपनीच्या निर्देशानुसार ठेवावा.  २) शेतामध्ये काम करताना ः पुढच्या चाकामधील हवेचा दाब २२ ते २४ पीएसआय आणि मागच्या चाकामध्ये १२ ते १४ पीएसआय हवेचा दाब ठेवावा किंवा कंपनीच्या निर्देशानुसार ठेवावा.  अवजारांची जुळणी ः  १) ट्रॅक्‍टरच्या अश्वशक्तीनुसार अवजाराचा आकार निवडावा. ट्रॅक्‍टरचा वेग जमिनीच्या प्रकारानुसार ठेवावा.  २) सायलेन्सरमधून अधिक धूर येणार नाही अशा गिअरमध्ये ट्रॅक्‍टर चालवावा.  ट्रॅक्‍टरला ट्रॉली जोडणी ः  १) ट्रॉली ट्रॅक्‍टरला समांतर सरळ रेषेत जोडावी.  एक वर्षानंतरची देखभाल किंवा १०००- १२०० तासानंतरची देखभाल ः  १) सर्व प्रकारचे ऑईल तपासावे. यामध्ये प्रामुख्याने इंजिन ऑईल, गिअर बॉक्‍स, हायड्रोलिक, एयरक्लिनर आणि स्टेअरिंग गरजेनुसार बदलावे.  २) कॉम्पेशन प्रेशर तपासावे. आवश्यक असेल तर इंजिन ओव्हर ऑईलिंग करावे.  ३) ब्रेक लायनिंग तपासावे.  ४) पुढील व मागच्या ऍक्‍सलचे बेअरिंग स्वच्छ करून पुन्हा बसवावेत.  ५. बॉश पंप आणि नोझल्स तपासावेत.  ६. व्हॉल्व्ह सेटिंग तपासावेत.  ७. स्टार्टर डायनोमा आणि कटाऊट तपासावेत.  ८) सर्व बेरींग स्वच्छ करून ग्रिसिंग करावे.  ट्रॅक्‍टरचे व्यवस्थापन ः  १) ट्रॅक्‍टरचा वापर करताना चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे किंवा नाही याची खात्री करावी. सर्व चाकांचे नट बोल्ट्‌स तपासून आवश्‍यकतेनुसार आवळून घ्यावेत.  २) गिअर बॉक्‍समधील तेलाची पातळी तपासावी. ब्रेक लायनिंग स्वच्छ व व्यवस्थित बसवावे. योग्य व्यवस्थापनातून ट्रॅक्‍टरची कार्यक्षमता वाढविता येते तसेच इंधनामध्ये बचत करणे शक्‍य आहे.  ३) ट्रॅक्‍टरची निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये विनातक्रार काम करणे शक्‍य होते. ‍सततचा वापर व त्याच्या विविध भागांची होणारी झीज यामुळे सिलेंडर लायनर, कनेक्‍टिंग रॉड बेअरिंग्ज, मेन बेअरिंग्ज व पिस्टन रिंग बदलाव्या लागतात. क्रॅंक शाफ्ट ग्राइंडिंग करून घ्यावा लागतो. तसेच व्हॉल्व्ह व व्हॉल्व्ह सीटसुद्धा बदलावे लागते.  ४) एकूण ४००० तास काम केल्यानंतर इंजिनच्या कॉम्प्रेसरमध्ये घसारा येतो. पूर्ण शक्ती तयार करण्यामध्ये इंजिन अपयशी ठरते, तसेच सिलेंडर लायनर व पिस्टन रिंग बदलाव्या लागतात.  ५) व्हॉल्व्ह, व्हॉल्व्ह सीट रिफेस करून घ्यावे लागते. याशिवाय ऑइल सील, रेडिएटर होस पाइप तसेच बुशिंगसुद्धा गरजेप्रमाणे बदलावे लागतात. कनेक्‍टिंग रॉडच्या बेरिंगमधील क्‍लिअरन्स (फट) तपासून ठीक करावी लागते.  ६) साधारणतः जेव्हा ट्रॅक्‍टरच्या कामाचे ८००० तास पूर्ण होतात, तेव्हा क्रॅंकशाफ्ट व कॅमशाफ्टची तपासणी करावी. त्या वेळी कमी मापाचे बेअरिंग वापरावे लागतात. शक्‍यतो दुसऱ्या ओव्हरऑइलिंगच्या वेळेस पिस्टन व सिलिंडर लायनर बदलावेत.  ७) इंजिन ओव्हरऑईलिंग करताना पिस्टनच्या डोक्‍यावरील रिंग वरील खाचामधील तसेच व्हॉल्व्ह व व्हॉल्व्ह दांडीवरचा कार्बन व काळी चिकट तेलकट घाण स्वच्छ करावी. सर्व भाग केरोसीनमध्ये स्वच्छ धुऊन काढावेत.  ८) इंजिन हेड जोडताना नवीन गॅसकेटचा वापर करावा. सिलिंडर गॅसकेटमध्ये गळती राहिल्यास तयार होणाऱ्या शक्तीचा अपव्यय होतो किंवा सिलिंडरमध्ये पाणी घुसण्याची किंवा दोहोंची शक्‍यता वाढते.  ९) बहुतांश भाग प्रमाणाबाहेर खराब होईपर्यंत ट्रॅक्‍टरची दुरुस्ती लांबवू नये, अन्यथा अचानक होणाऱ्या मोडतोडीमुळे त्याहूनही जास्त खर्चाला सामोरे जावे लागते.  १०) सुगी सुरू होण्यापूर्वीच काही महत्त्वाचे सुट्टे भाग विकत घेऊन ठेवावेत. म्हणजे सुगीच्या काळात सुट्या भागांच्या कमतरतेमुळे होणारा वेळेचा अपव्ययही टाळता येईल.  संपर्क ः वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४  (विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी)  कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com