ट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्याचा कीड नियंत्रणासाठी वापर

ट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्याचा कीड नियंत्रणासाठी वापर 
ट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्याचा कीड नियंत्रणासाठी वापर 

कीड नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा वापर फायदेशीर असून, त्यातील महत्त्वाच्या ट्रायकोकार्ड आणि कामगंध सापळ्याविषयी माहिती घेऊ.  ट्रायकोकार्ड ः  पोस्टकार्डसारख्या आकाराच्या (२० बाय १० से.मी.) कागदावर धान्यामध्ये जाळी करणाऱ्या पतंगाची २० हजार अंडी चिटकवलेली असतात, त्याला ट्रायकोकार्ड असे म्हणतात. 

  • ट्रायकोग्रामा हा गांधील माशीसारखा दिसणारा परोपजीवी कीटक असून, त्याचा आकार लहान (०.४-०.७ मि.मी.) असतो. तो शेतात फिरून पिकांचे नुकसान करणाऱ्या अळ्यांचे अंडे शोधून त्यात स्वत:चे अंडे टाकतो. 
  • ट्रायकोग्रामा जीवनक्रम ८ ते १० दिवसात पूर्ण होतो. 
  • ट्रायकोग्रामाची अंडी अवस्था १६-२४ तास असते. त्यानंतर अळी बाहेर पडून किडीच्या अंड्यातील घटकावर जगते. त्यामुळे किडीची उत्पत्ती होऊ शकत नाही. अळी अवस्था २-३ दिवस असते. 
  • ७ व्या किंवा ८ व्या दिवशी ट्रायकोग्रामा प्रौढ किडीच्या अंड्यातून बाहेर पडतो. 
  • प्रौढ पुढे २-३ दिवस शेतात फिरून अळीवर्गीय किडीच्या अंड्याचा शोध घेऊन त्यात आपली अंडी घालतो. 
  • ट्रायकोग्रामा प्रजाती -  ट्रायकोग्रामा चिलोनिस, ट्रायकोग्रामा बॅक्ट्री, ट्रायकोग्रामा जापोनिकम व ट्रायकोग्रामा प्रिटिऑसम उपयोगी ठरतात. हे कार्ड कापूस, ज्वारी, मका, उस, टोमॅटो, भेंडी, वांगे या पिकांमध्ये पेरणीपासून ४०-४५ दिवसांनी २-३ कार्ड प्रति एकरी वापरावे.  महत्त्वाची टीप - 

  • ट्रायकोकार्डवरील पॅरासिटीझमचे प्रमाण ८०-९० टक्के असले पाहिजे. हे कार्ड तयार झाल्यापासून ३५-४० दिवसापर्यंत वापरावे. ट्रायकोकार्ड खरेदी करतेवेळी परोपजीवी कीटक बाहेर पडण्याची तारीख बघून घ्यावी. मुदतीपूर्वीच वापरावे. ट्रायकोकार्डवरील आखलेल्या दहा पट्ट्या कात्रीने हळुवार कापून हे १० तुकडे पानाच्या खालील बाजूस सकाळी किंवा संध्याकाळी स्टेपल करावे. शेतात ट्रायकोकार्डचा वापर केल्यानंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. कार्ड वापरल्यामुळे पतंगवर्गीय किडींचा अंडी अवस्थेतच नाश होतो. 
  • ट्रायकोकार्ड प्रखर सूर्यप्रकाश, कीटकनाशके, मुंग्या आणि पालीपासून दूर ठेवा. 
  • ट्रायकोकार्ड हे कृषी विद्यापीठ किंवा शासन मान्य लॅब यांच्याकडून विकत घ्यावे 
  • कामगंध सापळे (फेरोमोन्स सापळे) ः  यामध्ये कीटकांच्या मिलनादरम्यानच्या गंधासारखा कृत्रिम गंध वापरला जातो. त्याकडे नर पतंग आकर्षित होऊन सापळ्यात अडकतात.  सापळ्याची रचना ः  या सापळ्याच्या वरील बाजूला एक छप्पर असून, त्याखाली एका खाचेमध्ये लिंग प्रलोभन (सेप्टा) बसवले जाते. त्याचे पाऊस व सूर्यप्रकाशापासून संरक्षण होते. लिंग प्रलोभन पॅकेटमधून काढल्यानंतर २०-२५ दिवसापर्यंत टिकतो.  सापळा वापरण्याची पद्धत - 

  • पिकाच्या उंचीपेक्षा २ ते ३ फूट उंचीच्या मजबूत काठ्या शेतात लावून घ्याव्यात. त्यावर प्लॅस्टिक पिशवीचे टोक जमिनीकडे येईल, अशा प्रकारे काठीला बांधावा. अत्यंत स्वच्छ हाताने त्यात लिंग प्रलोभन (सेप्टा) बसवावे. 
  • सापळ्यात अडकलेले पतंग ठराविक काळाने नष्ट करावेत. 
  • पाने खाणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणासाठी २-५ व मास ट्रॅपिंगसाठी १५ कामगंध सापळे हेक्टरी लावावेत. 
  • अळीसाठी वापरण्यात येणारे फेरोमोन ल्युर 

    कीटकांचे नाव  ल्युर 
    लष्करी अळी एफ ए डब्ल्यू ल्युर 
    शेंडे व फळ पोखरणारी अळी लुसिनल्युर 
    ठिबक्यांची बोंडअळी व्हिटल्युर 
    हिरवी घाटेअळी हेक्झाल्युर 
    गुलाबी बोंडअळी पेक्टिनोल्युर 
    तंबाखूवरील पाने खाणारी अळी स्पोडोल्युर 

    एस. सी. बोकन (पीएच.डी. स्कॉलर), ९९२१७५२०००  डॉ. बी. व्ही. भेदे (सहायक प्राध्यापक), ७५८८०८२०२८  (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com