agriculture stories in marathi, trichocards for cotton pink boll worm | Agrowon

गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्डस

चिन्ना बाबू नाईक, विश्लेष नगरारे, बाबासाहेब फंड, नंदिनी गोकटे-नरखेडकर, विजय वाघमारे
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

सध्या कापूस पीक हे फुलोरा ते बोंडे लागण्याच्या अवस्थेत (६०-८० दिवस) आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती तसेच मराठवाड्यातील नांदेड, परभणी भागात मागील काही दिवसांत जोरदार तर उर्वरित भागातही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ अपेक्षित आहे. त्याआधी रस शोषक किडींचा असलेला प्रादुर्भाव या पावसामुळे बऱ्यापैकी धुवून गेला आहे. पूर्व हंगामी कपाशीचा अपवाद वगळता अन्य भागात आतापर्यंत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावही अतिशय तुरळक प्रमाणावर होता. मात्र, सध्याची कपाशी पिकाची अवस्था ही गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल आहे.

सध्या कापूस पीक हे फुलोरा ते बोंडे लागण्याच्या अवस्थेत (६०-८० दिवस) आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती तसेच मराठवाड्यातील नांदेड, परभणी भागात मागील काही दिवसांत जोरदार तर उर्वरित भागातही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ अपेक्षित आहे. त्याआधी रस शोषक किडींचा असलेला प्रादुर्भाव या पावसामुळे बऱ्यापैकी धुवून गेला आहे. पूर्व हंगामी कपाशीचा अपवाद वगळता अन्य भागात आतापर्यंत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावही अतिशय तुरळक प्रमाणावर होता. मात्र, सध्याची कपाशी पिकाची अवस्था ही गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल आहे.

संस्थेच्या प्रक्षेत्रावरील कामगंध सापळ्यांच्या निरीक्षणात मागील दोन आठवड्यांपासून ३-४ पतंग प्रति सापळा प्रति आठवडा याप्रमाणे गुलाबी बोंड अळीचे नर पतंग अडकलेले दिसत आहेत. ही संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असली तरी मादी पतंगांकडून शेतातील कपाशीवर अंडी घातली जात असल्याचे यावरून आपल्याला समजते. नागपूर येथील केंद्रिय कापूस संशोधन संस्थेच्या एकात्मिक नियंत्रण प्रणालीच्या अनुषंगाने फुलोरा ते बोंडे लागण्याच्या अवस्थेत (पीक ५० दिवसांचे झाल्यापासून पुढे) ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या मित्र कीटकाचे शेतात प्रसारण करण्याची शिफारस आहे. या जैविक नियंत्रणाच्या उपाययोजनेमुळे प्रारंभिक अवस्थेतच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होते. गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामाचा यशस्वी वापर करण्याविषयी आपण माहिती घेऊ. त्याच प्रमाणे जैविक नियंत्रण करणाऱ्या या मित्र कीटकाची पैदास करण्याची सोपी व कमी खर्चिक पद्धतही देत आहोत. या शास्त्रीय माहितीच्या आधारे जैविक घटकांची पैदास प्रयोगशाळा लघुतत्त्वावर ग्रामीण भागात सुरू करणे शक्य आहे.

ट्रायकोग्रामाच्या विविध प्रजाती (Hymenoptera: Trichogrammatidae)

 • ट्रायकोग्रामाच्या प्रजाती ह्या शत्रू किडींच्या अंड्यांवर उपजीविका करतात. गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रायकोग्रामाच्या ट्रायकोग्रामा बॅक्ट्री (नागराज), ट्रायकोग्रामा ब्राझीलीएन्सीस (अश्मीएड) आणि ट्रायकोग्रामा किलोनिस (ईशी) या तीन प्रमुख प्रजाती आहेत. यापैकी ट्रायकोग्रामा बॅक्ट्री ही गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी सर्वात जास्त प्रभावी आहे.
 • ट्रायकोग्रामाची प्रौढ मादी गुलाबी बोंड अळीची अंडी शोधून, त्यात छिद्र पाडून आपली २-३ अंडी घालतात.
 • ट्रायकोग्रामाच्या अंड्यांतून २४ तासांत अळ्या बाहेर पडतात. त्यांची अतिशय जलद गतीने वाढ पूर्ण होते. अशा प्रकारे परजीवीकरण झालेली गुलाबी बोंड अळीची अंडी ३-४ दिवसांत काळी पडतात.
 • त्यानंतर ट्रायकोग्रामाच्या अळ्या कोषावस्थेत जातात.
 • चार-पाच दिवसांनी कोषांतून तयार झालेले ट्रायकोग्रामाचे प्रौढ गुलाबी बोंड अळीच्या अंड्याच्या कवचाला गोलाकार छिद्र पाडून बाहेर निघतात.
 • या मित्र किडीचा जीवनक्रम साधारणतः ८-९ दिवसांत पूर्ण होतो.
 • संस्थेतील संशोधनामध्ये ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या मित्र कीटकांच्या वापरामुळे प्रोफेनोफॉस या कीटकनाशकाच्या बरोबरीने गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण मिळत असल्याचे सिद्ध झाले आहे.

ट्रायकोग्रामा बॅक्ट्री पैदास करण्याची पद्धती -

 • फॉर्मलीन (०.१ %) द्रावणाने निर्जंतुक केलेला २.५ किलो ज्वारीचा भरडा एका प्लॅस्टिकच्या टबमध्ये घ्यावा.
 • त्यात स्टेप्टोमायसीन सल्फेट (०.००५%), यीस्ट पावडर १० ग्रॅम, शेंगदाण्याचा चुरा २५० ग्रॅम व गंधक पावडर ५ ग्रॅम इ. घटक मिसळून सर्व घटकांचे व्यवस्थित मिश्रण करून घ्यावे.
 • वरील मिश्रणामध्ये कोर्सिरा सेफॅलोनिकाची ०.५ ग्रॅम अंडी टाकून ४० दिवसांपर्यंत तसेच ठेवावीत.
 • ४० दिवसांनी निघालेले कोर्सिराचे पतंग पकडून त्यांना अंडी घालण्यासाठीच्या कक्षामध्ये नर:मादी (१ :१) प्रमाणात सोडावे.
 • या काळात जीवनसत्त्व ई विरघळविलेल्या २०% मधाच्या द्रावणामध्ये बुडविलेला कापसाचा बोळा पतंगांना अन्न म्हणून पुरवावा.
 • अंडी कक्षातून कोर्सिरा मादीने घातलेली अंडी दररोज गोळा करून त्यांवर ४५ मिनिटे अतिनिल किरणांची (UV) प्रक्रिया करावी.
 • छिद्रण यंत्राच्या सहाय्याने ४ सेंमी बाय २ सेंमी आकाराचे ८ समान भाग केलेल्या १५ सेंमी बाय १० सेंमी आकाराच्या कार्डवर UV प्रक्रिया केलेली कोर्सिराची १ cc म्हणजेच १६ ते १८ हजार अंडी गोंद लावून चिकटवून घ्यावीत.
 • अंडी चिटकवलेल्या कार्डवर परजीवीकरण करण्यासाठी ट्रायकोग्रामा बॅक्ट्रीच्या प्रौढ मादी ८:१ (यजमान कीटक : परजीवी कीटक) याप्रमाणात २४ तासांसाठी सोडाव्यात.
 • परजीवीकरण केलेल्या कार्डवरील अंडी ३-४ दिवसांत काळपट होतात. अंडी काळपट होणे, हे यशस्वी परजीवीकरण झाल्याचे लक्षण आहे.
 • अशा प्रकारे तयार केलेले ट्रायकोकार्ड परजीवीकरण झाल्यानंतर ६ दिवसांनी शेतात प्रसारण करण्यासाठी वापरावेत.

ट्रायकोग्रामा मित्र कीटकाची वैशिष्ट्ये ः

 • अनेक पतंगवर्गीय शत्रू किडींचे प्रभावी नियंत्रण.
 • अंडी अवस्थेतच शत्रू किडीचा नायनाट.
 • उच्च परजीवीकरण क्षमता.
 • तापमानातील चढ उतारास सहनशील असल्यामुळे वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात जैविक नियंत्रणासाठी उपयुक्त.
 • भक्ष्य किडी शोधण्याची उत्तम क्षमता.

कीड नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामाची प्रसारण मात्रा : एकरी ६० हजार परजीवीकरण झालेली कोर्सिराची अंडी.
कार्डची संख्या : ३-४ कार्डस
(१८ ते २० हजार अंडी असलेले एक कार्ड प्रति एकर प्रति प्रसारण असे ३-४ वेळेस करावे.)

प्रसारणाची वेळ : तीन वेळेस, कपाशीच्या वाढीच्या दोन अवस्थेत (फुलोरा आणि बोंड लागणे.)
पहिले प्रसारण : फुलोरा अवस्थेत (पेरणीनंतर ५०-६० दिवस)
दुसरे व तिसरे प्रसारण : बोंड तयार होण्याच्या अवस्थेत १५ दिवसांच्या अंतराने. (पेरणीनंतर ७५-९० दिवस)

जैविक कीड नियंत्रणाचे फायदे ः

 • कीड नियंत्रणाचे पर्यावरणपूरक साधन.
 • एकात्मिक कीड नियंत्रण व कीटकनाशक प्रतिकार क्षमता व्यवस्थापन यासाठी अतिशय उपयुक्त पर्याय.
 • कीटकनाशकाचा वापर कमी करणे शक्य.
 • उत्पादन खर्चामध्ये बचत करता येते.

ट्रायकोकार्ड उपलब्धता

मागणी, विनंतीनुसार खालील ठिकाणी ट्रायकोकार्ड खालील दोन ठिकाणी तयार करून मिळतात.
१. भा.कृ.अनु.प. - राष्ट्रीय कृषी उपयोगी कीटक संसाधन ब्युरो, बंगळूरू
(ICAR-National Bureau of Agricultural Insect Resources, Bengaluru)
संपर्क ः ०८०-२३५११९८२/९८
ई - मेल : directornbaii@gmail.com

२. कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, नागपूर
फोन नं. ०७१२- २५२२६२१/२५४००५९

(केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.)


फोटो गॅलरी

इतर नगदी पिके
ऊस पिकासाठी योग्य ठिबक सिंचन पद्धतउसासाठी योग्य ठिबक सिंचन ठिबक सिंचन पद्धती...
सुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...
सुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये...
उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म...जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके...
उसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रारासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
ऊस पीक सल्ला१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत...
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ...सध्या कापूस पीक हे फुलोरा ते बोंडे लागण्याच्या...
कपाशीतील बोंड सडणे विकृतीचे व्यवस्थापनमागील दोन वर्षांपासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
नारळ बागेत मसाला पिकांची लागवड    नारळ बागेमध्ये नारळाच्या...
गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...
आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...
ऊस बियाणे निर्मितीसाठी ‘सुपरकेन नर्सरी...अलीकडे प्रो ट्रे किंवा पिशव्यांमध्ये उसाची रोपे...
दुष्काळाशी लढा देत हळदीची उत्कृष्ट शेतीअमळनेर (जि. जळगाव) येथील अश्पाक मुनीर पिंजारी व...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खरीप कांदा लागवड तंत्रज्ञानविशेषतः विदर्भात रब्बी हंगामातील कांद्याचे...
खरीप नियोजन : कपाशीतील असमतोल वाढ,...गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी लागवड समस्यांत वाढ...
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
ऊस पीक व्यवस्थापन सध्याच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवणे, पाण्याचा...