agriculture stories in marathi, Unity of family makes loan free farming | Agrowon

कुटुंबातील एकविचाराने कर्जरहित शेतीचा आदर्श

विकास जाधव
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

कुटुंबात एकविचार असेल तर यश मिळवणे सोपे असते. याच उत्तम उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील साप (ता. कोरेगाव) येथील जालिंदर व भगवान शंकर कदम यांचे देता येईल. या बंधूंनी कोणतेही कर्ज न घेता टप्पाटप्प्याने शेती बागायत केली. आता त्यांची मुलेही वडीलधाऱ्यांच्या पायावर पाय देत एकवाक्यतेने व आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. कुटुंबीयांच्या यशामध्ये हळद, ऊस या पिकांचा मोठा वाटा आहे.

सातारा जिल्ह्यातील साप (ता. कोरेगाव) येथील जालिंदर शंकर कदम यांची शेती आहे. सुरवातीला कोरडवाहू असलेल्या या शेतीमध्ये आपल्या जालिंदर व भगवान या मुलांसोबत शेती करत. १९८७ साली धोम धरणाचा कालवा गेल्यामुळे गावात पाण्याची उपलब्धता झाली. आवर्तनासोबत विहिरीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यामुळे गावात बागायत क्षेत्रामध्ये वाढ झाली. जालिंदर व भगवान यांनीही धडाडीने आपल्या २५ एकर शेतीचे सपाटीकरण केले. लहान-मोठे प्लॅाट तयार केले. वडिलांच्या मनामध्ये कर्ज काढण्याविषयी भीती असल्याने त्यांचा मान राखत कोणतेही कर्ज न काढता केवळ शेतीच्या उत्पन्नातून हळूहळू शेती बागायत करत नेली. २००७ मध्ये सर्व शेती सिंचनाखाली आणली. २००५ मध्ये जालिंदर यांचे चिरंजीव उदय, सूरज आणि भगवान यांचे चिंरजीव अनिष हेही शेतीमध्ये उतरले. या मुलांनीही आपल्या आजोबांची शिकवण लक्षात ठेवत, कोणत्याही कर्जाशिवाय शेतीसाठी आधुनिक औजारे, ट्रॅक्टर व जीप, बंगला उभा केला.

हळद पिकांचा आधार

आजोबा जालिंदर कदम यांनी १९९२ मध्ये प्रथम हळद पीक घेतले. हे पिक फायदेशीर वाटल्याने आजतागायत हे पीक त्यांच्या शेतात कायम झाले आहे. आता पिढीनूसार लागवडीच्या तंत्रात अनेक बदल झाले असून, पूर्वीच्या तुलनेमध्ये उत्पादनातही वाढ झाली असल्याचे उदय सांगतात. सुरवातीच्या काळात हे पीक वाकुरी पद्धतीने केले जाई. त्यानंतर ते सरीवर केले जाई. आता गादीवाफ्यावर लागवड होते. वाकुरी व सरीवर सुमारे २० ते २२ क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळत असे. मात्र, गादीवाफ्यावरील लागवडीमध्ये एकरी ३८ ते ४० क्विंटल हळदीचे उत्पादन मिळत आहे. २० वर्षांपेक्षा अधिक काळ हळद पिकांने साथ दिली आहे. उसापेक्षाही अधिक फायदेशीर असल्याने हे पीक कुटुंबाचा आर्थिक आधार झाले आहे.

हळदीचे नियोजन

 • प्रत्येक वर्षी साधारणपणे दोन ते तीन एकर हळदीचे पीक घेतले जाते.
 • मशागतीनंतर एकरी पाच ट्रेलर शेणखत व दोन ट्रेलर मळी जमिनीत एकजीव केली जाते.
 • एक ते दहा मे या कालावधीत लागवड.
 • साडे चार फुटी गादीवाफ्यावर दोन ओळीत एक फूट व दोन गड्ड्यातील अंतर दीड फूट ठेऊन लागवड केली जाते.
 • लागवडीसाठी साधारणपणे एकरी १२ क्विंटल हळद लागते.
 • सिंचनासाठी ठिबक पद्धतीचा, तर खतांसाठि विद्राव्य खतांचा वापर करतात.
 • लागवडीनंतर साधारणपणे २० दिवसांनी बाळ भरणी व त्यांनतर टप्प्याटप्प्याने दोन भरणी केल्या जातात.
 • भरणीसाठी छोट्या ट्रॅक्टरचा वापर केला जातो.
 • जनावरांच्या चाऱ्यासाठी मक्याचे आंतरपीक घेतले जाते.
 • उत्पादनवाढीसाठी दर चार वर्षानी बियाणांमध्ये बदल केला जातो.
 • नऊ महिन्याच्या कालावधीनंतर हळद ट्रॅक्टरद्वारे काढली जाते.
 • बॉयलर व कुकरद्वारे शिजवून शेतातच सुकवली जाते. त्यासाठी शेडनेटचा वापर करत असल्यामुळे हळदीतील पाणी निघणे, गोळा करणे सोपे होते.

अर्थशास्त्र

 • कदम कुटुंबीय साधारणपणे दोन ते तीन एकर हळदीचे पीक घेतात. यातून त्यांना एकरी ३८ ते ४० क्विंटल उत्पादन मिळते. बियाणे घरचे असेल तर लागवडीपासून काढणीपर्यत एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च येतो. सर्व हळदीची सांगली शेती उत्पन्न बाजार समितीत विक्री केली जाते. साधारणपणे साडे सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत असल्याचे उदय सांगतात. खर्च वजा सव्वा ते दीड लाख रुपये शिल्लक राहतात.
 • अन्य पिकांमध्ये कदम कुटुंबीयांकडे दरवर्षी साधारणपणे दहा एकर ऊस असतो. यामध्ये पाच एकर नवीन लागवड, तर पाच एकरपर्यंत खोडवा असतो. उसाची लागवड पट्टा पद्धतीने केली जाते. या पट्ट्यामध्ये जनावरांसाठी चारा पिके घेतली जातात. उसाचे एकरी ६० टन उत्पादन मिळते.
 • सध्या लहान मोठी १५ जनावरे व हौशीने सांभाळलेली अडीच लाख रुपयांची बैलजोडी आहे. काही कामांसाठी अद्यापही बैलाचा वापर केला जातो.
 • दोन ट्रॅक्टरसह विविध अवजारे आणि हळद काढणी यंत्रही स्वतःचे आहे. परिणामी शेतीतील सर्व कामे वेळेवर करणे शक्य होते.

कामाची विभागणी ः

उदय हे पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि मजूराची हाताळणी याकडे लक्ष देतात. तर सुरज यांच्याकडे सर्व ट्रॅक्टर, बैल जोडीची जबाबदारी आहे. सर्वात लहान अनिष यांच्याकडे जनावरे, गोठा व्यवस्थापन व दुग्ध व्यवसाय यांची जबाबदारी आहे. अर्थात, आवश्यकतेनुसार एकमेकांला मदत केली जाते. आजही घरातील वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले जाते. आजोबा आणि वडिलांप्रमाणे मुलांनीही कर्ज न घेता विकास करण्याची पद्धत कायम ठेवली आहे. शेतीमध्ये कृषी सहायक अर्जुन भोसले, अनिल ढोले यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे उदय कदम सांगतात.

२५ एकर शेतीचे नियोजन

 • हळदीची या वर्षी ३ एकर क्षेत्रामध्ये लागवड आहे.
 • दीड एकर क्षेत्रामध्ये आले लागवड असून, त्यापासून एकरी ३० ते ३५ गाड्या (५०० किलो प्रति गाडी) उत्पादन मिळते. त्याला गतवर्षी ४००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला होता.
 • या वर्षी खरीपामध्ये ५ एकर क्षेत्रामध्ये सोयाबीनची लागवड केली होती. त्यातून ५० क्विंटल उत्पादन मिळाले असून, अद्याप त्याची विक्री केली नाही. सध्या सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल ३५०० रुपये असा आहे. त्यानंतर रब्बीमध्ये तिथे ज्वारीची लागवड केली आहे. त्यामुळे धान्यासोबतच कडब्याचे उत्पादन हाती येते.
 • ऊस नवीन लागवड ५ एकर असून, खोडवा ५ एकर आहे. लागवडीपासून एकरी ६० टनापर्यंत उत्पादन मिळते.

दूध व्यवसाय

गोठ्यामध्ये चार म्हशी, सहा गायी व दोन बैल आहेत. म्हशीचे साधारण १६ लिटर, तर गायीचे २८ ते ३० लिटर दूध निघते. त्याला फॅटनुसार प्रतिलिटर अनुक्रमे ३५ ते ४० रुपये आणि २५ रुपये दर मिळतो. जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन घरच्या शेतीमध्ये प्राधान्याने केले जाते.

उदय कदम, ९५६१६१४२६०


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
कमी पाण्यामध्ये सीताफळाचे किफायतशीर...सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल...
दर्जेदार वांगी उत्पादनात मानेंचा हातखंडाकसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील युवा...
देशी बियाण्यांची तयार केली सीड बॅंकभाजीपाला, फुलझाडे आणि विविध औषधी, सुगंधी...
कष्ट, अनुभवातून साकारली भाजीपाला पिकाची...मूळचे सावत्रा (ता. मेहकर, जि. बुलडाणा) गावचे...
पणज गावाने आणली केळी पिकातून सुबत्ताअकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव...
रोपवाटिका व्यवसायाने दिला सक्षम आधारदहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरी न मिळाल्याने...
औरंगाबादच्या मोसंबी कलमांची मध्य...महाराष्ट्रातील अत्यंत गोड, रसाळ मोसंबीने आता मध्य...
रोडे यांचे संत्र्याचे अत्याधुनिक...दर्जेदार संत्रा उत्पादनासोबतच संत्र्याचे ग्रेडिंग...
रासायनिक अवशेषमुक्त शेतीचा कृषी...नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या...
आवळा प्रक्रियेने दिली आर्थिक साथ (video...बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन औरंगाबाद येथील...
केरळमधील शेतकऱ्यांनी जपल्या २५६ भातजाती...संकरित बियाण्यांच्या आगमनानंतर उत्पादनाची तुलना...
ग्रामीण खाद्य पदार्थांना दिली नवी ओळखवनिता देविदास कोल्हे यांना पाककलेची आवड असल्याने...
डोंगर फोडून संघर्षातून उभारले फळबागेचे...कमी पावसाच्या प्रदेशात डोंगर फोडून फळबागांचे...
उसातील आंतरपिकांतून उंचावले शेतीचे... वढू बु. (ता. शिरूर) येथील अनिल भंडारे यांनी...
प्रक्रिया, थेट विक्री, चारा व्यवस्थेतून...प्रक्रिया, थेट विक्री, चारा व्यवस्थेतून...
मक्याला मागणी कायम, दरही टिकून जळगाव...जळगाव जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मक्‍याचे...
स्थानिकसह परराज्यांतील बटाट्यासाठी...पुणे येथील गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कुटुंबातील एकविचाराने कर्जरहित शेतीचा...सातारा जिल्ह्यातील साप (ता. कोरेगाव) येथील...
जवारी मिरचीने मिळवला किलोला ७०० रुपये...कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज भागातील जवारी...
खेकडापालन करा, घरबसल्या उत्पन्न कमवागोड्या पाण्यातील खेकडापालनाचा यशस्वी व्यवसाय...