कार्यक्षमता वाढवण्यासाठी तणनाशकांसोबत मिसळण्याची द्रव्ये 

कार्यक्षमता वाढवण्यासाठी तणनाशकांसोबत मिसळण्याची द्रव्ये 
कार्यक्षमता वाढवण्यासाठी तणनाशकांसोबत मिसळण्याची द्रव्ये 

बहुतेक शेतकरी बंधू पावसाळ्यात पावसाची शक्‍यता असल्यास तणनाशक किंवा कीडनाशक पावसाने धुऊन जाऊ नये म्हणून त्यात पानाला चिकटविणारे व पानावर पसरविणाऱ्या द्रव्यांचा वापर करतात. असे अनेक पदार्थ आता बाजारात वेगवेगळ्या नावांनी उपलब्ध आहेत. पावसाळा आला की असे घटक रसायनांमध्ये मिसळले पाहिजेत, इतकीच आपल्याला माहिती आहे. मात्र लेखक डॉ. व्ही. एस. राव यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ वीड सायन्स या पुस्तकामध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.  विजातीय विद्युतभार एकमेकांकडे आकर्षित होतात, तर सजातीय विद्युतभार एकमेकांपासून दूर जातात, हा पदार्थ विज्ञानशास्त्राचा नियम आहे. तण नाशकाच्या फवारणी संबंधातही या विद्युतभाराचा संबंध येतो. तणनाशकाला विद्युतभार असतो, तसे द्रावणालाही विद्युतभार असतो. तणनाशके विजातीय द्रावणात विरघळतात, तर सजातीय द्रावणात विरघळत नाहीत. तणनाशक फवारणीनंतर त्याचे शोषण व्यवस्थित होण्यामध्ये या विद्युतभाराचा संबंध येतो. हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू. काही तणांच्या पानावर एक मेणकट आवरण असते. अशा पानावर तणनाशक फवारणी केल्यास थेंब थेंब चपटा होऊन पानावर चिकटून राहण्याऐवजी त्याचा आकार गोल होऊन तो ओघळून खाली पडतो. हा एक सजातीय विद्युतभाराचा प्रकार आहे. या वेळी रसायन पानावर चिकटून राहण्यासाठी काही खास रसायने मिसळण्याची शिफारस आहे. त्याला इंग्रजीत ‘सरफॅक्‍टंट’ अगर ‘स्टीकर ॲन्ड स्प्रेडर’ असे, तर मराठीत चिकटविणारी व पसरवणारी द्रव्ये असे म्हणतात. ही द्रव्ये मिसळल्याने कीडनाशकांचे थेंब चपटे होऊन ते पानावर पसरून चिकटून बसतात. सन १९८४ मध्ये आपल्याकडे अशा रसायनांच्या वापराला सुरुवात झाली होती की नाही, ते आता आठवत नाही. आता बाजारात अशी भरपूर रसायने उपलब्ध आहेत.  अशा रसायनांचे वर उल्लेखलेल्या फायद्यापेक्षाही अधिक फायदे आहेत. ही द्रव्ये फवारणीमध्ये वापरलेल्या रसायनांचे पानामध्ये जास्त शोषण होण्यासाठी मदत करतात. रसायनांची कार्यक्षमता वाढवितात. अशी कार्यक्षमता वाढवण्यासाठी केवळ पावसाळ्यातच नव्हे, तर वर्षभर फवारणीच्या वेळी मिसळली पाहिजे, असा संदर्भ पुस्तकात मिळतो. हा विषय पुस्तकात खूप सविस्तरपणे मांडला आहे. कोणत्या रसायनांच्या फवारणीसोबत कोणते चिकट किंवा पसरवणारे द्रव्य मिसळावे, हे त्यातून ठरवता येईल. आपण फवारणीसाठी एचटीपी पंपाची निवड करून फवारणी लवकर संपविण्याचा प्रयत्न करतो. अशा फवारणीमध्ये रसायने पातळ असल्यास पानावरून ओघळून जाण्याचे प्रमाण अधिक राहू शकते. हे कमी करण्यासाठी फवारणी द्रावण घट्ट करणारी काही रसायने असल्याचेही यात संदर्भ आढळतात. मात्र आपल्याकडे अशी काही माहिती माझ्यातरी वाचनात नाही. त्याचे कारण म्हणजे एकतर आपल्याकडील प्रति व्यक्ती जमीनधारणा कमी असून, वेगाने फवारणी करून रसायने वाया घालणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. विशेषतः तणनाशकांच्या फवारणी ही नॅपसॅक पंपाने (पाठीवर बांधून हातपंपाद्वारे) काळजीपूर्वक करण्याचीच प्रथा आहे.  पाण्यात विरघळविणारे पदार्थ (इमल्सिफायर) ः बहुतेक तणनाशके तेलकट असतात. त्याचे पाण्यात द्रावण होण्यासाठी अशी द्रव्ये त्यात मिसळूनच बाजारात उत्पादने आणली जातात. बाजारातील बाटलीवर ‘ईसी’ असे रसायनांच्या शास्त्रीय नावांपुढे लिहिलेले असते, त्याचा अर्थ - इमल्सिफायेबल कॉन्संर्व्हेट.  पानात शोषण क्रिया वाढविणारे पदार्थ ः या पदार्थांच्या रसायनासह मिश्रणामुळे पानाचा जाड, मेणकट थर भेदून रसायने पानांद्वारे मोठ्या प्रमाणात आतपर्यंत शोषली जाण्यास मदत होते.  आर्द्रता वाढविणारे पदार्थ ः रसायने व पानाच्या थरामध्ये आर्द्रता जास्त असल्यास शोषण जास्त चांगले होते. या कामासाठी काही पदार्थ वापरले जातात.  रासायनिक खत मिसळणे ः रसायनांची परिणामकारकता वाढण्यासाठी द्रावणात युरिया, अमोनियम सल्फेट शेतकरी वापरतात. आजपर्यंत ही पद्धत शेतकऱ्यांच्या स्वानुभवातून किंवा आपापसांतील चर्चेतून मिळालेल्या माहितीतून तयार झाली असावी, किंवा थेट पानांमध्ये शोषला जाणाऱ्या युरियासोबत आपण मिसळलेले रसायनही शोषले जाईल, अशी शेतकऱ्यांची भावना असावी, त्याला फारसा शास्त्रीय आधार नसावा, असे मला वाटत होते. परंतु पुस्तकात याचा थेट उल्लेख असून, द्रावणाच्या ५ टक्के युरिया अगर अमोनियम सल्फेट मिसळण्याची स्पष्ट शिफारस या पुस्तकात दिसते. अलीकडे समुद्रातील मिठागारातून मिळणारे काळे मीठही काही जण वापरतात. इथे दिलेले ५ टक्के प्रमाण महत्त्वाचे आहे.  निवडक तणे व पीक उगविल्यानंतर मारण्याच्या तणनाशकासाठी बाजारात दोन प्रकारची चिकट द्रव्ये उपलब्ध आहेत. तेलकट रसायने पाण्यात विरघळविण्यासाठी किंवा पाणीदार रसायने तेलात विरळवण्याच्या कामात ही विविध चिकट द्रव्ये मदत करतात. पानावर फवारणी करण्याच्या रसायनांमध्ये किंवा द्रावणामध्ये मिसळण्यासाठी बाजारात दोन प्रकारची चिकटद्रव्ये उपलब्ध दिसतात. त्यात आयोनिक व नॉन आयोनिक रसायने असे दोन गट आहेत. नॉन आयोनिक सिलिकॉन बेस सरफॅक्टंट असा उल्लेख बऱ्याच वेळा मी ऐकला होता. पण त्याचा नेमका अर्थ व कार्य काय असावे, याचा कधी शोध घेतला नव्हता. ही रसायने अनेक लहान लहान कण एकत्र येऊन तयार झालेली असतात. फवारणीच्या द्रावणामध्ये मिसळल्यानंतर हे कण एकमेकांपासून दूर जाणे म्हणजे आयोनिक होय. तर एकमेकांपासून दूर न जाणे म्हणजे नॉन आयोनिक असा मला यातून समजलेला थोडासा अर्थ. इंग्रजीत यांनाच ‘ॲडल्यूवंट’ असेही म्हणतात. काही कंपन्यांची अशी उत्पादने भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. या क्‍लिष्ट शास्त्रीय संज्ञा आणि विषयाचा आपल्याशी काय संबंध, असा प्रश्‍न वाचकाला पडणे स्वाभाविक आहे. त्याबाबत पुस्तकातील संदर्भ असा आहे. आयोनिक चिकट द्रव्ये थंड आणि मृदू (गोड) पाणी असेल तर काम करतात. नॉन आयोनिक कोमट व सवळ पाणी असली तरीही उत्तम काम करतात. आता आपल्याला प्रत्येक पंपासाठी चिकटद्रव्य वापरायचे असल्यास आपल्याकडील उपलब्ध पाणी कसे आहे, याचा विचार केला पाहिजे. त्यानुसार आपण यापैकी योग्य त्या चिकटद्रव्याची निवड केल्यास रसायनांची कार्यक्षमता वाढू शकते. परिणामी, फवारणीचा खर्च आणि कष्ट तेवढेच राहताना त्यातून अधिक चांगले निष्कर्ष मिळू शकतात. या बाबी आपण जाणून घेणे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.  फवारणीनंतर पानावर रसायने व्यवस्थित चिकटून राहावीत, या उद्देशाने चिकटद्रव्ये वापरली जातात. हे सत्य असले तरी याची एक मर्यादाही पुस्तकात दर्शवली आहे. प्रमाणापेक्षा जास्त मोठा फवारा पानावर पडत असल्यास रसायने ओघळून जाऊन नुकसान होते. त्यासोबतच रसायनांची कार्यक्षमताही घटते. असे दुहेरी नुकसान शेतकऱ्याच्या वाट्याला येते. हा संदर्भ लक्षात ठेवावा. बाजारात काही तणनाशकाबरोबर अमोनिअम सल्फेट व चिकट द्रव्याची बाटलीही दिली जाते. त्यामागे परिणामकारकता वाढविणे हाच उद्देश आहे. ग्लायफोसेटसारख्या अनिवडक गटातील तणनाशकांचा सध्या तरी फारसा पर्याय शेतकऱ्यांसमोर नाही. सतत यात तणनाशकाचा वापर केल्याने तणनाशकाची परिणामकारकता कमी कमी होत चालली आहे. या ठिकाणी प्रत्येक फवारणी वेळी अशी मिसळण्याची द्रव्ये आलटून पालटून वापरल्यास परिणामकारकता कमी होणे काही प्रमाणात तरी टाळता येईल, असे वाटते.  ः प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८,  (लेखक कोल्हापूर येथील प्रगतिशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com