काऱ्हाटीच्या रानमळ्यात पाण्याचा सुकाळ

काऱ्हाटी (जि.पुणे) ः खोलीकरण झालेल्या ओढ्यात पावसामुळे झालेला पाणीसाठा.
काऱ्हाटी (जि.पुणे) ः खोलीकरण झालेल्या ओढ्यात पावसामुळे झालेला पाणीसाठा.

काही महिन्यांपूर्वी प्यायलाच पाणी नव्हते. जनावरे जगवणे मुश्‍किल झाले होते. जनावरांना चाराही विकत आणावा लागत होता. मात्र हे चित्र आता बदलले आहे. सकाळ रिलीफ फंडातून सहा महिन्यांपूर्वी ओढा खोलीकरणाचे काम झाल्याने पाण्याचा सुकाळ झाला आहे, असे काऱ्हाटी रानमळा (ता. बारामती, जि. पुणे) येथील शेतकऱ्यांनी सांगितले.  पानसरेवाडीच्या शिवेपासून सुरू होणारा कण्हेरओढा गेल्या काही वर्षांपासून स्वतःचे अस्तित्व विसरला होता. इथे ओढा आहे हे सांगावे लागत होते इतका उथळ झाला होता. त्यामुळे पावसाचे आलेले पाणी वरचेवर वाहून जात होते. परिणामी, विहिरी व कूपनलिकांना पाणी नव्हते. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते.

ओढा खोलीकरणापूर्वी या भागासाठी टॅंकरद्वारे पाणी घ्यावे लागत होते. मात्र, सकाळ रिलीफ फंड, शरयू फाउंडेशनने पोकलॅन यंत्र मोफत उपलब्ध करून दिले. लोकवर्गणीच्या जोडीला अजित पवार यांच्याकडून निधी मिळाल्याने सुमारे अडीच किलोमीटर लांबीच्या ओढ्याचे पात्र खोल व रुंद झाले. ओढ्याचे पुनरुज्जीवन झाल्याने पाऊस झाला की पाणी मुरू लागले. त्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढली, अशी माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली. नुकत्याच झालेल्या पावसामुळे खोलीकरण केलेल्या ओढ्यात पाणीसाठा झाला आहे. पात्राच्या दुतर्फा सुमारे अर्धा किलोमीटरच्या अंतरावरील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पात्रालगतच्या विहिरी पूर्ण भरल्या आहेत. सहा महिन्यांपासून जनावरांच्या चाऱ्याची पिके व अन्य पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. ओढा खोलीकरणाचे काम झाले नसते तर आज पाणीटंचाईला आम्हाला सामोरे जावे लागले असते, अशी माहिती राजेंद्र राऊत, सचिन शिंदे यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com