पाणी साचलेल्या द्राक्षबागांसाठी उपाययोजना 

पाणी साचलेल्या बागांसाठी उपाययोजना 
पाणी साचलेल्या बागांसाठी उपाययोजना 

द्राक्ष लागवडीखाली असलेल्या क्षेत्रात गेल्या आठवड्यामध्ये दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. यामुळे खोलगट भागामध्ये असलेल्या बागांमध्ये पाणी जमा झाले. सांगलीसारख्या पूरस्थितीमध्ये द्राक्षबागा पूर्णपणे पाण्यात होत्या. काही बागेत कॅनोपीच्या वरपर्यंत, तर काही बागेत ओलांड्यापर्यंत सुमारे ४ ते ५ दिवस पाणी साचलेले होते. आता पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी काही ठिकाणी बागेत अद्याप पाणी साठून आहे. काही ठिकाणी वरचे पाणी ओसरले असले तरी मुळांच्या कक्षेमध्ये पाणी भरलेले आहे. या साऱ्या परिस्थितीचा वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीवर पुढील प्रकारे परिणाम होऊ शकतात.  १) पानांचे कार्य करणे बंद होणे   जी बाग पाण्यामध्ये जास्त काळ बुडली होती, अशा बागेमध्ये पाणी कमी झाल्यानंतर पानांवर माती व गाळाचा थर जमा झाल्याची स्थिती आहे. अशा बागांमध्ये पर्णरंध्रे बंद झाल्यामुळे श्वसन करण्यास असमर्थ ठरू शकतात. त्याचा फटका वेलींना बसू शकतो.  उपाययोजना  बागेमध्ये ट्रॅक्टर फिरवण्यायोग्य स्थिती असल्यास केवळ पाण्याची फवारणी त्वरीत करून घ्यावी. पानांवरील गाळाचा थर धुवून काढण्याकरिता आवश्यकतेनुसार २ ते ३ फवारण्या कराव्या लागतील. या पाण्याच्या फवारणीमुळे पर्णरंध्रे मोकळी होऊन पानांचे कार्य सुरू होईल.  २) पानगळ होणे  बागेत जास्त काळ पाणी साचून राहिल्यामुळे मुळांनी कार्य करणे बंद केले असेल अशा बागेतून पाणी बाहेर निघाल्यानंतर हळूहळू पानगळ होताना दिसून येईल. वेलीची पाने पाण्यामध्ये अधिक काळ राहिल्यामुळे कार्य रोखले जाऊन, पानांची देठाशी असलेली मजबूत पकड कमी झाली. अशा परिस्थितीत मुळांकडून फुटींच्या शेंड्याकडे होत असलेला अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होतो किंवा पूर्णपणे बंद झालेल्या परिस्थितीमध्ये पाने अकार्यक्षम होतात आणि पानगळ सुरू होते.  अशा वेळी बागेमध्ये कोणतीही उपाययोजना साथ देत नाही. मात्र, बागेतील परिस्थिती पाहून काही उपाययोजना केल्यास तीव्रतेचे प्रमाण कमी होऊ शकेल.  उपाययोजना  

  • साचलेले पाणी निघून गेल्यानंतर वेलीवर, ओलांडा व खोडांवर साचलेला गाळ, माती यांचा थर साध्या पाण्याच्या फवारणीद्वारे धुवून घ्यावेत. 
  • वेलीस नत्राची फवारणी व जमिनीतून उपलब्धता करावी. त्यामुळे शेंड्यावर नवीन फुटी निघतील. या फुटी ४-५ पाने होईपर्यंत वाढू द्याव्यात. म्हणजे या परिस्थितीत काडीवरील पानगळ काही अंशी थांबवता येईल. 
  • बागेत शेंड्याकडे १-२ डोळे मागे ठेवून फूट कापून घ्यावी. जमिनीतून नत्राचा पुरवठा सुरू झाल्यास नवीन फूट निघण्यास मदत होईल. 
  • ज्या बागेत अजूनही मुळाच्या कक्षेत पाणी आहे. बागेत ट्रॅक्टरद्वारे कार्य करणे शक्य नाही. अशा स्थितीमध्ये पानगळ थांबवणे अवघड आहे किंवा शक्य नाही. जेव्हा बागेमध्ये काम करण्यायोग्य स्थिती तयार होईल, त्यावेळी फळछाटणी सुरू करावी. यावेळी पानगळ झालेली असल्यामुळे डोळे फुगलेले असतील. 
  • मुळीच्या कक्षेत थोडेफार कोरडे वातावरण होत असताना मुळांचे कार्य सुलभ व्हावे याकरिता ह्यूमिक ॲसिड २ ते ३ किलो प्रति एकर या प्रमाणे द्यावे. 
  • ३) खुंटरोपे

    ही खुंटरोपेसुद्धा पाण्यात होती, अशा बागेत खुंटकाडीचीही पानगळ झालेली असेल. अशा बागेत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कलम करण्याचे टाळावे. कारण या परिस्थितीत काडीमध्ये रस नसेल, कलम यशस्वी होण्याची शक्यता कमी असेल, तेव्हा बागेतील परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर कलम करता येईल.  डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६०  (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com