आठवड्याचे हवामान : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्‍यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाची शक्‍यता
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाची शक्‍यता

महाराष्ट्रातील दक्षिण व उत्तर कोकण तसेच सह्याद्री पर्वतरांगा व घाट भागावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मध्य महाराष्ट्र, पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाडा व विदर्भावर १०१२ हेप्टापास्कल आणि तितकाच हवेचा दाब संपूर्ण भारतावर राहील. संपूर्ण भारतात अवकाळी व अवेळी पावसाचा जोर राहील. मंगळवार, बुधवार (ता. १०, ११) रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहील. अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नांदेड, लातूर, जालना, जळगाव, परभणी सह अन्य जिल्ह्यांत पावसाचा जोर जास्त असण्याची शक्‍यता आहे. उर्वरित जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण थोडे कमी राहण्याची शक्‍यता आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर व पुणे जिल्ह्यांतही ढगाळ हवामानासह पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिमी चक्रावाताचा प्रभाव व हिंदी महासागरावर जमलेल्या ढगांचे वाऱ्याद्वारे वहन होऊन दोन्हीकडील वारे एकत्र मिसळल्यास अल्पशा प्रमाणात गारपिटीची शक्‍यताही राहील. हवामान बदलाचे प्रभावामुळे उन्हाळी हंगामातील हवामान प्रभावित होईल. पश्‍चिमी चक्रावाताचा प्रभाव जाणवेल. कमाल व किमान तापमानात हळुवारपणे वाढ होत जाईल. बाष्पीभवनाचा वेग वाढेल, पिकांची पाण्याची गरज वाढेल. उत्तर भारत ः काश्‍मीर, हिमालयाचे पर्वतरांगांचे भागावर बर्फवृष्टी तर पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजराथ सह दिल्ली व उत्तरप्रदेश भागातही या आठवड्यात पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे उत्तर भारतात या आठवड्यात पाऊस होईल. दक्षिण भारत ः दक्षिण भारतावरील हवेचा दाब १०१० ते १०१२ हेप्टापास्कल इतका कमी झाल्यामुळे कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू व केरळ या भागांतही पावसाची शक्‍यता आहे. हवामान ढगाळ राहील. कोकण ः रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान वाढ होऊन ३२ अंश सेल्सिअस राहील. रायगड जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस तर रत्नागिरी जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस आणि ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे व रायगड जिल्ह्यात ८० ते ८३ टक्के राहील तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ती ८७ ते ९० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व रायगड जिल्ह्यांत ३४ ते ३५ टक्के, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ४० ते ४१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ किलोमीटर राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. उत्तर महाराष्ट्र ः जळगाव जिल्ह्यात १० मार्च रोजी १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, दिनांक ११ मार्चला अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. तसेच नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. धुळे व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील तर नंदुरबार व नाशिक जिल्ह्यांत १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ९३ टक्के तर उर्वरित धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ८२ ते ८९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. मराठवाडा ः मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत दिनांक ८ ते ११ मार्च दरम्यान आकाश ढगाळ राहील. दिनांक १० व ११ मार्च रोजी अल्पशा गारपिटीसह पावसाची शक्‍यता आहे. उस्मानाबाद, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील, तर उर्वरित जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० किलोमीटर राहील. लातूर व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, बीड जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, नांदेड जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस व लातूर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ५३ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम विदर्भ ः अमरावती जिल्ह्यात बुधवारी (ता. ११) १२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यात ७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. मंगळवारी (ता. १०) अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४ ते ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. बुलडाणा जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून तर अकोला जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. तसेच वाशिम जिल्ह्यात आग्नेयेकडून तर अमरावती जिल्ह्यांत नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० किलोमीटर राहील. बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ८२ टक्के राहील. मात्र दुपारची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ५० टक्के राहील. मध्य विदर्भ ः बुधवारी (ता. ११) यवतमाळ जिल्ह्यात १४ मी.मी., नागपूर जिल्ह्यात ६ मी.मी. व वर्धा जिल्ह्यात ४ मी.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग यवतमाळ जिल्ह्यात १० कि.मी. तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ५ कि.मी. राहील. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस व किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस व वर्धा व नागपूर जिल्ह्यात १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८४ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४५ टक्के राहील. पूर्व विदर्भ ः बुधवारी (ता. ११) चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत अनुक्रमे १२, १५ व १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. भंडारा जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. गोंदिया जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ४ किलोमीटर तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात ताशी ६ किमी राहील. गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस व गडचिरोली जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस आणि गडचिरोली जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ४५ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः मंगळवारी (ता. १०) सोलापूर जिल्ह्यात ५ मि.मी. तर पुणे जिल्ह्यात ३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता कमी आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते १० किलोमीटर राहील. कोल्हापूर व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर उर्वरित सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, कोल्हापूर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस आणि सातारा व सोलापूर जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ४५ टक्के राहील. कृषी सल्ला ः

  • या आठवड्यात पावसाची शक्‍यता असल्यामुळे गव्हाची काढणी, मळणीची कामे स्थगित करावी. धान्य उघड्यावर ठेवू नये. हळद ताडपत्रीने झाकावी.
  • ऊस पिकात आंतरपिके घ्यावीत.
  • उसाच्या पाचटाचे तुकडे ट्रॅक्‍टरचलित यंत्राने बारीक करून सरीत दाबावेत. प्रति टन पाचटावर १० किलो युरिया अधिक १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व १ किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणू संवर्धनाचे द्रावण करून शिंपडावे.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com