तणनियंत्रण पद्धतींचा विकास 

तणनियंत्रण पद्धतींचा विकास 
तणनियंत्रण पद्धतींचा विकास 

हाताने तण उपटून टाकण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज तणनाशकांच्या अपरिमित वापरापर्यंत येऊन पोचला आहे. लेखक डॉ. व्ही. एस. राव यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ वीड सायन्स या पुस्तकातील महत्त्वाच्या बाबी आपण पाहत आहोत.  तणनियंत्रणाचे प्रमुख तीन मार्ग आहेत.  १) यांत्रिक २) जैविक ३) रासायनिक.  याचीच आणखी वेगळ्या प्रकारे विभागणी केली जाते.  त्यात १) तणे उगवण्यापूर्वी २) उगवल्यानंतर यांचा समावेश आहे.  तणे उगवण्यापूर्वीचे किंवा वाढ रोखण्याचे उपाय ः 

  • जास्त वेगाने वाढणारे पिकाचे वाण निवडणे. 
  • खते टाकत असताना ती पिकाजवळ पडतील, मधील रिकाम्या जागेत पडणार नाहीत, याची काळजी घेणे. 
  • पाणी व्यवस्थापन पिकांची वाढ जोमदार होईल, असे ठेवणे. 
  • पिकाची योग्य फेरपालट. 
  • पिकाची संख्या योग्य ठेवणे. 
  • पिकाऊ व पडीक रानात तणाचे बी तयार होणार नाही, याची काळजी घेणे. 
  • तणांच्या बियांची बाहेरून आवक होणार नाही, याची काळजी घेणे. त्यासाठी तणमुक्त बियांचा वापर महत्त्वाचा. 
  • आपल्या रानातील बी जपत असताना त्यात तणांचे बी राहू नये, यासाठी बिजोत्पादनाच्या रानातील तणनियंत्रणासाठी अधिक काळजी घ्यावी लागते. 
  • बियांचा आकार, वजन, घनता यानुसार भेसळ वेगळी करणारी यंत्रे बाजारात उपलब्ध झाली आहेत. त्यांचा वापर करणे, मळणीच्या वेळी त्या स्थानी किंवा यंत्रामध्ये अन्य बी येणार नाही, याकडे लक्ष देणे. 
  • प्रामुख्याने तणाचे बी कालव्याचे काठ, चाऱ्या, पाट यांच्या जवळ तयार होते. शेतकरी रान स्वच्छ ठेवत असला तरी अशी ठिकाणे स्वच्छ केली जात नाहीत. त्यामुळे पाण्यातून शेतामध्ये तणाचे बी मोठ्या प्रमाणात शिरकाव करू शकतात. 
  • प्रमाणित बियांचा वापर ः  बियांचे प्रमाणीकरण करीत असताना त्यामध्ये अन्य प्रकारच्या बियांचे भेसळ प्रमाण ठरलेले असते. यासाठी बीज प्रमाणीकरणाचे काही कायदे ठरवले आहेत.  जैविक तणनियंत्रण ः ही तणनियंत्रणासाठी नैसर्गिक पद्धत असून, त्याचा फारसा वापर आपल्याकडे होत नाही. तणांवर प्राधान्याने येणाऱ्या किडी आणि रोगांचा तणांच्या नियंत्रणासाठी वापर केला जातो. परदेशामध्ये या क्षेत्रामध्ये मोठे काम झाले आहे. आपल्याकडे केवळ काँग्रेस गवताच्या नियंत्रणासाठी मागवलेल्या मेक्सिकन भुंग्याचे उदाहरण यासाठी दिले जाते.  रासायनिक तण नियंत्रण ः  तणांच्या नियंत्रणासाठी रसायनांच्या वापराला ८५ वर्षांपूर्वी सुरवात झाल्याचा उल्लेख या १९८४ मध्ये प्रकाशित पुस्तकामध्ये आहे. म्हणजे त्या हिशेबाने शंभरी पार झाली. १८९६ साली बोर्डो मिश्रण वापरामुळे शास्त्रज्ञ जगतामध्ये रासायनिक तणनियंत्रणाबाबत जागृती निर्माण केली. काही ताम्रुयुक्त क्षार द्विदल तणे मारण्यासाठी निवडक म्हणून वापरता येतात, हे लक्षात आले. १८९६ ते १९१० या काळात या कामासाठी गंधकाम्ल, आयर्न सल्फेट, कॉपर नायट्रेट, अमोनियम व पोटॅशियम क्षार, सोडियम नायट्रेट अशी काही रसायने तणनाशक म्हणून वापरली गेली. मार्टीन व बॉनेट (फ्रान्स), बॉली (अमेरिका) व शिल्ट्स (जर्मनी) या शास्त्रज्ञांचा त्यात मोलाचा सहभाग होता. या पुढील ३०-३५ वर्षांच्या काळात शुद्ध बियाणे, वाढीचा जास्त वेग असणाऱ्या पिकांच्या जाती, ट्रॅक्टरचा शेतीत प्रवेश व फवारणीच्या योग्य साधनांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे रासायनिक तणनियंत्रण काहीसे मागे पडले. १९४२ मध्ये झिमरमन व हिचकॉट यांनी २, ४-डी चा वापर वाढ नियंत्रक म्हणून करून पाहिले. पुढे १९४४ मध्ये मार्थ आणि मिचेल (अमेरिका) या शास्त्रज्ञांना २, ४-डी हे निवडक तणनाशक म्हणून वापरण्याचे श्रेय जाते. येथे कार्बनी तणनाशकांच्या वापराला सुरवात झाली.  रासायनिक तणनियंत्रणाचे फायदे ः  १) ओळीत पेरलेल्या पिकाला आंतरमशागत शक्य नसल्यास तणनाशक वापरणे सोईस्कर ठरते.  २) पीक व तणे उगवण्यापूर्वीच मारण्याच्या तणनाशकाने पूर्वीच्या पद्धतीच्या तुलनेमध्ये लवकर तणनियंत्रण करता येते.  ३) चहा, कॉफी यासारख्या बहुवार्षित पिकात मशागतीतून मुळे दुखावली जाण्याचा धोका असतो. अशा ठिकाणी तणनाशक अधिक उपयुक्त ठरते.  ४) तणनाशकामुळे शून्य मशागत पद्धतीत पूर्वमशागत करावी लागत नाही. (या विषयावर कित्येक वर्षे संशोधन, अभ्यास झालेला असावा. त्याचा उल्लेख इथे आढळतो.) ही पद्धत मी २००५ या वर्षापासून वापरत आहे.  ५) तणनाशकाच्या वापारमुळे जी तणे इतर पद्धतीने नियंत्रण करणे अवघड असते, ते काम सहजपणे करणे शक्य होते.  ६) त्या काळात मनुष्यबळाची समस्या फारशी नसल्याने त्याचा उल्लेख या फायद्यामध्ये केला नाही. मात्र, आज तणनाशकांचा वापर वाढत जाण्यामागे सर्वांत महत्त्वाचे हेच कारण ठरले आहे.  ः प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८  (लेखक कोल्हापूर येथील प्रगतशील शेतकरी आहेत.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com