शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यक

शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यक
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यक

तणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे पाहिले आहे. त्यावर मात किंवा नियंत्रण कसे करायचे, यासाठीच बहुतांश बुद्धी खर्च केली आहे. मात्र, शाश्वत शेतीसाठी तणे अत्यंत महत्त्वाचे संसाधन ठरणार आहेत. या दृष्टिकोनातून विचार केल्यास अनेक फायदे आपल्याला दिसून येतील. गरज आहे ती केवळ तणांचा योग्य वापर करणारे तंत्र विकसित करण्याची... तणामुळे पिकांचे नुकसान होते, ही सध्याची अगदी शास्त्रज्ञांपासून शेतकऱ्यापर्यंत पसरलेली प्रचलित विचारसरणी आहे. त्याविरुद्ध तण हे शेतीतील शेतकऱ्याला मदत करणारे सर्वात महत्त्वाचे संसाधन आहे असे विचार मी मांडले. साहजिकच अनेक शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला. भू-सूक्ष्मजीव शास्त्राच्या पायाभूत अभ्यासाने माझ्या तण विज्ञानाच्या अभ्यासाला चालना मिळाली. शेतीमध्ये पिकाच्या वाढीविषयक अनेक कामे जमिनीतील सूक्ष्मजीवाकडूनच पार पाडली जातात. या सूक्ष्मजीवांच्या पालनपोषणासाठी जमिनीत सेंद्रित कर्बाची गरज असते. तो गरजेपेक्षा कमी झाल्यास पिकाचे उत्पादन समाधानकारक मिळत नाही. मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष शून्य मशागतीत जागीच कुजविल्याने जमीन सुपीक झाली, उत्पादन वाढले. या यशस्वी वाटचालीनंतर असे लक्षात आले की जमिनीखालील अवशेष कुजवून आपण जमिनीला स्थिर सेंद्रिय कर्बाचा पुरवठा करतो. मात्र, या स्थिर सेंद्रिय कर्बाच्या जोडीला संपून जाणाऱ्या सेंद्रिय कर्बाचा पुरवठा केला तर सुपिकता व उत्पादकता आणखी वाढेल. सेंद्रिय कर्ब पुरवठा करण्याचा नेहमीचा खर्चिक मार्ग मला नको होता. पिकाच्या जमिनीखालील अवशेषाच्या कुजण्यातून जमीन सुपीक होत असेल तर हाच नियम तणांना का लावू नये? पिकाचे जमिनीवरील अवशेष हे जनावरांसाठी वैरण म्हणून वापरले जातात. त्याला व्यापारी अगर घरगुती मूल्य आहे. (उदा. धान्य कडधान्याच्या काडातून वैरणीची निर्मिती.) म्हणजेच अशा पिकांची लागवड जिथे होते, तिथे त्याचे सर्व सेंद्रिय घटक त्याच जमिनीत जाऊ शकत नाहीत. परिणामी संपून जाणाऱ्या सेंद्रिय कर्बाची टंचाई होते. तणांचे जमिनीवरील व जमिनीखालील सर्व अवशेष जमिनीत विलीन करणे शक्‍य आहे. पुन्हा तणांचे बी विकत आणावे लागत नाही. पेरणीसह कोणतीही निगा राखण्याचे काम अजिबात न करताही त्यांची भरमसाठ वाढ होते. तिथे ते वापरायचे त्याच जागी उपलब्ध होते. अशी अल्प खर्चाच्या शेतीच्या सर्व नियमांचे पालन करणारी तणाशिवाय अन्य कोणतीच वस्तू शेतीत सापडणार नाही. या प्राथमिक अभ्यासातून तण निर्मूलनाकडून सुमारे आठ वर्षांपूर्वी मी तण व्यवस्थापनाकडे वाटचाल सुरू केली. या वाटचालीत तणव्यवस्थापन ही एक अलिबाबाची गुहा असल्याचे लक्षात आले . यात जसजसे आत शिरत गेलो तसे अनेकानेक कृषिविचार रत्ने सापडत गेली. तण व्यवस्थापन या रत्नांचा खजिना सर्व शेतकऱ्यांसाठी खुला करत आहे. तण हे दुधारी अस्त्र आहे. दुर्लक्ष केले तर तुमचे पीक खाऊन टाकेल. उपयोग करून घेता आला तर सर्व फायदाच फायदा. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की त्यानुसार विचारचक्र बदलत जाते. मागील लेखात तणाबाबत प्रचलित विचारसरणी मांडली आहे. आताची विचारसरणी पूर्ण विरुद्ध दिशेने वाटचाल करीत आहे. आता मी म्हणतो, तणे रानात आली पाहिजेत. ती मुख्य पिकाला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने वाढविली पाहिजेत. मोठी, जून केली पाहिजेत. प्रसंगी थोडेफार बी पडले तरीही घाबरण्याचे कारण नाही. कारण आपल्याला तणांच्या मुळाचे, खोड, पानांचे खत करावयाचे आहे, त्यामुळे ती जितकी मोठी होतील तितके जास्त खत मिळणार आहे. उत्तम दर्जाचे खत मिळवण्यासाठी ती जूनी करणे भाग आहे. त्यासाठी त्याच्या वाढीसाठी रानात पिकाबरोबर योग्य जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. आजपर्यंत आपण फक्त आपल्या पोटासाठी व पैशासाठी शेती केली. जमिनी खराब होण्याचे हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. येथून पुढे आपल्या उपजीविकेबरोबरच जमिनीच्या पोट व उपजीविकेचाही विचार करावा लागणार आहे. जमिनीचे पोट म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या आपल्या डोळ्यांना अदृश्य सूक्ष्मजीवाचे व डोळ्यांना दिसणाऱ्या काही सजीवांचे पोट होय. प्रथम प्राधान्याने त्यांचे पोट भरले तरच ते तुमच्यासाठी काम करतील. त्यासाठी पिकाची लागवड आपल्यासाठी, त्याचे अवशेष व तणे जमिनीसाठी, अशी रचना बसवली पाहिजे. मुख्य पिकाबरोबर समांतर तण वाढविणे, मुख्य पिकात सुरवातीचा काही काळ तण वाढविणे व एखादा हंगाम पूर्णपणे जमिनीसाठी सोडून देणे, (पर्यावरणीय पड - याला इंग्रजीमध्ये इको फॅलो म्हणतात.) व पुढील हंगामात आपल्यासाठी पीक घेणे, असे काही मार्ग अवलंबावे लागतील. सेंद्रिय खतासाठी शेणखत ठरते अव्यापारेषू... आपल्यापैकी बहुतेक शेतकऱ्यांच्या मनात सेंद्रिय कर्बाची जोड केवळ शेणखताशी झालेली आहे. त्यांच्या मनात सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत कंपोस्ट यांचा वापर एवढेच येते. हे काम तणांकडून कसे शक्‍य आहे, अशी शंका नक्कीच येणार. तसेच या तणांचा वापर जनावरांसाठी वैरण म्हणून करण्याचा विचार नेहमीप्रमाणे येईल. मात्र, ही तणे कापायची, त्यांचा भारा बांधून गोठ्यावर नेणे, जनावरांना चारून शेण गोळा करणे, त्याचे खत बनवून परत वाहनात भरुन रानात नेणे, रानात पसरणे व मातीत कालविणे इतकी कामे करावी लागतात. त्यापेक्षा ती तणे जिथे वाढली, तिथेच त्याच अवस्थेत तणनाशकाने मारून टाकणे, तेथे ती कुजून त्याचे खत जमिनीला मिळेल. हे खऱ्या अर्थाने सोपे ठरणार आहे. भावी काळात मजूर टंचाईशी आपल्याला सामना करावयाचा आहे. तेव्हा सध्या मजूर टंचाई जाणवतेच आहे. भविष्यामध्ये ती आणखी वाढत जाणार आहे. मजूर टंचाई गृहित धरूनच भावी काळात पीक व्यवस्थापनाची आखणी आपल्याला करावी लागणार आहे. मागील लेखात उल्लेख केलेल्या अखिल भारतीय तणविज्ञान संस्थेच्या प्रमुखांसोबतच्या चर्चेत तणापासून सेंद्रिय खत करण्याचा कोणताही विषय त्यांच्या अजेंड्यावर नाही. तण व्यवस्थापनाचे फायदे ः मी तण हे शेतीतील सर्वात महत्त्वाचे संसाधन असे म्हटले आहे. याचे कारण त्यापासून सेंद्रिय खत मिळते इतकेच नाही. तणांचे शेतीत अगणित उपयोग आहेत.

  1. तणांच्या मुळाकडून जमिनीची मशागत.
  2. तणांच्या मुळांद्वारे पाण्याचे संवर्धन होते.
  3. तणामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे संवर्धन होते.
  4. तणामुळे जास्त पाऊस काळात (यंदाचा पावसाळा) जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा लवकर होतो, तर कमी पाऊस, दुष्काळ (मागील वर्षाचा पावसाळा) जल संवर्धन होते. दोन्ही विपरित परिस्थितीत पिकाचे संरक्षण होते, असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
  5. पिकाला गरजेप्रमाणे अन्नपुरवठा करणारी जिवाणू सृष्टी हवेच्या सान्निध्यातच काम करते. तण व्यवस्थापनातूनच फक्त असा गरजेचा हवा पुरवठा होऊ शकतो.
  6. अतिरिक्त अन्नपुरवठा तणांनी फस्त केल्यामुळे पिकाला संतुलित अन्नपुरवठा होतो. यामुळे पिकावर रोग किडी कमी येतात. फवारण्या कमी होतात.
  7. जागेलाच कुजण्याच्या क्रियेतून निर्माण होणारी संजीवके पिकाच्या वाढीसाठी वृद्धिकारक म्हणनू काम करतात.
  8. जागेला कुजण्याच्या क्रियेतून निर्माण होणारी सेंद्रिय आम्ले जमिनीचा सामू उदासीन करतात.
  9. पिकाच्या उत्पादनाच्या दर्जात आमूलाग्र सुधारणा होण्यात मदत होते.
  10. पशुपालनातून उपलब्ध झालेला सेंद्रिय कर्ब २-४ प्रकारच्या वैरणीतून तर हिरवळीच्या खतातून तयार झालेला सेंद्रिय कर्ब एकाच प्रकारच्या वनस्पतीपासून (उदा. ताग, धैंचा - मोनोकल्चर) तयार झालेला असतो. तर तणापासून तयार झालेले सेंद्रिय कर्ब अनेक वनस्पतींपासून तयार झालेला असतो. त्यामुळे या सेंद्रिय खताचा दर्जा सर्वोत्तम असतो.
  11. नवीन संशोधनानुसार सेंद्रिय खतासाठी एकदल वनस्पती अधिक उपुयक्त असल्याचे सांगितले जाते. रानातील तणांमध्ये कितीतरी एकदल वनस्पती व गवतवर्गीय वनस्पती आढळतात.
  12. जमिनी सुपीक होत जातील, तसे तणांच्या जातीत आपोआप बदल होत जातो. जमिनीला व पिकाला काय पाहिजे ते आपल्यापेक्षा निसर्गाला जास्त चांगले कळते.
  13. हे सर्व फायदे अगदी फुकटात पदरात पाडून घेता येतात.
  14. हे सर्व पायाभूत आहे. जगातील कोणत्याही पिकासाठी, कोणत्याही भौगोलिक क्षेत्रासाठी तितकेच उपयोगी आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत थोडाफार फरक करून उपयोजित तंत्र विकसित करणे हे कुशलतेचे काम आहे. मला जो मर्यादित अभ्यास करावयास मिळाला, त्यातून तयार केलेले पीकवार तंत्र किंवा विचार पुढील भागांमध्ये मांडणार आहे. हे विचार शाश्‍वत शेतीसाठी महत्त्वाचे ठरतील, असे वाटते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com