तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता 

तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता 
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता 

पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि मनुष्यबळाची मागणी करणारे काम ठरते. तणनाशकांचे प्रकार, त्यांची कार्यपद्धती याविषयी शेतकऱ्यांनी जाणून घेणे आवश्यक असून, त्यामुळे फवारणीची कार्यक्षमता वाढवणे शक्य होते.  विशिष्ट तणांची वाढ थांबविणे अगर अन्य तणांवर परिणाम न करणे अशी तणनाशकाची कार्यपद्धती असते. तणांची वाढ थांबवत असता पिकावर कोणताही परिणाम न करण्याच्या गुणधर्माशी निवडकता अवलंबून असते. तणनाशकाची कार्यपद्धती व निवडकता अनेक गोष्टीवर अवलंबून असते.  तणनाशकांचे कायिक व रासायनिक गुणधर्म  एकाच रासायनिक गटातील तणनाशकांचे गुणधर्म वेगवेगळे असू शकतात. उदा. पाण्यात, तेलात विरघळणे, पानावर चिकटून राहणे, वेगवेगळे विद्युतभार असणे अशा गुणधर्मांचा त्याच्या कार्यपद्धतीशी संबंध येतो.  फवारणीची वेळ ः १. जे तणनाशक बी उगवण्यास प्रतिबंध करते; परंतु त्याच बीपासून तयार केलेले रोप लावल्यास त्याला कोणतीही इजा करीत नाही, अशी तणनाशके रोपे लागवडीपूर्वी जमिनीवर फवारली जातात. त्यानंतर रोपांची लागवड केली जाते.  २. पीक व तण उगविण्यापूर्वी जमिनीवर फवारणींची तणनाशके (प्री इमर्जन्स गट).  ३. तण व पीक उगविल्यानंतर ठरावीक पिकाच्या वाढीच्या अवस्थेत मारण्याची तणनाशके (पोस्ट इमर्जन्स).  फवारणीच्या जागेनुसार ः १. पानावर  २. जमिनीवर  सूर्यप्रकाशात वाफ होऊन उडून जाणारी तणनाशके जमिनीवर फवारून जमिनीत अवजाराच्या सहाय्याने मिसळतात. संपूर्ण जमिनीवर फवारणी, पिकाच्या दोन ओळींत खास नोझल वापरून पट्टा पद्धतीने फवारणी अगर नोझलला टोपी (शिल्ड) लावून ठरावीक जागेवर फवारणी, असे फवारणीचे काही प्रकार आहेत.  फवारणीची तीव्रता ः  एखादे तणनाशक कमी तीव्रतेत निवडक म्हणून काम करते, तर जास्त तीव्रतेत तसे काम करीत नाही. तणाचा प्रकार, तणाचे वय यानुसार तीव्रता कमी- जास्त करावी लागते.  तणाची शरीर रचना ः तणांची पाने जाड व मेणाचा थर असल्यास, अशा पृष्ठभागातून तणनाशकाचे शोषण कमी होते, तर तणांची पाने पातळ असल्यास पृष्ठभागातून शोषण जास्त होते.  तणाचे वय ः  तणाच्या जून पानातून कोवळ्या पानाच्या तुलनेत शोषण कमी होते. हरळी, लव्हाळासारखी बहुवार्षिक तणे त्याच्या भर वाढीच्या अवस्थेत तणनाशकाच्या फवारणीला प्रतिसाद देतात. सर्वसामान्यपणे हंगामी तणांबाबत ४-६ पानांच्या अवस्थेत तणनाशकांस सर्वांत चांगला प्रतिसाद मिळतो.  मशागत  मशागतीमुळे मातीच्या खालील थरातील तणाचे बी वरील थरात येते. त्याची सुप्तावस्था मोडली जाऊन अशी तणे उगवतात व मारता येतात. मशागतीमुळे बहुवार्षिक तणांचे अवशेष, गाठी, कंद वर येऊन वाळतात. यामुळे तणात कमकुवतपणा येतो. तणनाशकाला जलद बळी पडतात.  विष तणामध्ये भिनणे  पाने, हिरवे खोडाचे भाग व मुळे यातून तणनाशक प्रवेश करू शकते. पुढे आंतरप्रवाही असेल तर तणाच्या दुहेरी नलिका (पानातून मुळाकडे व मुळाकडून पानाकडे) मधून सर्वांगात भिनते. तणनाशक स्पर्शजन्य गटातील असेल तर वरील भागावर ज्या ठिकाणी पडते तितक्‍याच भागाचा नाश केला जातो.  तणनाशक पचविण्याची शक्ती  तणनाशक व तणांच्या प्रकारानुसार विष अंगात भिनण्याचे प्रमाण कमी- जास्त असते. एखादे तण लगेच मरते, तर काही वेळा तणे थोडा काळ मरगळ दाखवितात. त्यानंतर परत त्यांची वाढ पूर्ववत होऊ लागते.  पर्यावरणातील घटकांचे परिणाम ः  आर्द्रता, ओलावा, सूर्यप्रकाशाची तीव्रता व वारा यांचा तणनाशकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.  आपण तणनाशकाची फवारणी करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे १० ते १५ लिटर पाणी घेऊन ठरावीक मिलि. तणनाशक त्यात मिसळून फवारणी करतो. मात्र, फवारणीपूर्वी वरील काही शास्त्रीय गोष्टी जाणून घेल्यास तणनाशकांचा वापर अधिक कार्यक्षमतेने करता येईल. यातून तण नियंत्रणाच्या खर्चात काही प्रमाणात बचत साधता येईल.  तणनाशकांचे वर्गीकरण ः १९४६ मध्ये २, ४-डी या तणनाशकाच्या शोधानंतर तणनाशके वापरून तण नियंत्रणाच्या नव्या पर्वाला कृषी क्षेत्रामध्ये सुरवात झाली. युरोप, अमेरिकेत औद्योगीकरणाला वेग आला होता. परिणामी शेतीसाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली होती. यामुळे कमीत कमी मनुष्यबळात शेती करण्यासाठी तणनाशकांचे महत्त्व वाढत गेले. नवनवीन तणनाशकांच्या शोधाला प्रचंड वेग आला, तो आजतागायत सुरूच आहे. पुढील ३०-३५ वर्षांच्या काळात तिकडे २५० प्रकारची तणनाशके शोधली गेल्याची नोंद झाली. त्यांचे रासायनिक गट व कार्यपद्धतीनुसार वर्गीकरण करण्यात आले. पुस्तकात त्यांचे १८ प्रकारांत वर्गीकरण दिले आहे.  सर्वसामान्य शेतकऱ्यांना वरील माहिती तांत्रिक व क्लिष्ट वाटू शकते. मात्र, अभ्यासू शेतकऱ्यांनी तणनाशकांच्या काटेकोर वापरासाठी त्यातील तांत्रिक माहिती जाणून घेतली पाहिजे असे वाटते. पुस्तकात कार्बनी गटातील सर्व तणनाशकांची रासायनिक सूत्रे आकृती स्वरूपात दाखविली आहेत. त्यापैकी मुख्य तणनाशकांची सूत्रे मुद्दाम देत आहे. ज्या ज्या वेळी तणनाशकांविषयी मी माहिती देतो किंवा महत्त्व अधोरेखित करतो, त्या वेळी अनेक शेतकऱ्यांचा फक्त एकच प्रश्‍न असतो, याचे जमिनीवर व सूक्ष्मजीवांवर काय परिणाम होणार? ही कार्बनिक रसायने कमी- जास्त वेळात पिकाच्या पुढील काळात विघटन होऊन नष्ट होऊन जातात. यावर पुढील काही भागांत आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com