पिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून करा उपाययोजना

पिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून करा उपाययोजना
पिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून करा उपाययोजना

पावसाळा सरल्यानंतर थंडी पडली की बऱ्याच बागांमध्ये लिंबूवर्गीय फळझाडे पिवळी पडायला सुरुवात होते. विशेषतः काळी, चिकणमातीचे प्रमाण अधिक असलेल्या बागांमध्ये ही समस्या वाढते. त्यावर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांमध्ये पाण्याचा निचरा करण्याला प्राधान्य द्यावे. उपचारांमध्ये आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांचा वापर किंवा बुडकूज भेट कलम यांचा वापर करावा. विदर्भ, मराठवाडा व मध्य प्रदेश, राजस्थान येथील संत्रा-मोसंबी बागा या प्रामुख्याने काळ्या, चिकण मातीच्या जमिनीखाली आहेत. त्यातही अनेक ठिकाणी ५-६ फूट किंवा त्याहूनही जास्त खोलीच्या आहेत. अशा जमिनीमध्ये पाण्याचा निचरा लवकर होत नाही. परिणामी संत्रा-मोसंबी झाडांच्या मुळांभोवती सतत ओल राहते. लिंबूवर्गीय फळझाडांच्या मुळांना प्राणवायूची गरज ही अन्य झाडांपेक्षा जास्त असते. प्रदीर्घ काळ जर ओलावा मातीच्या धारणक्षमतेपेक्षा अधिक राहिल्यास मुळांना आवश्यक तेवढी हवा मिळत नाही. परिणामी प्राणवायूअभावी त्यांची श्वसन क्रिया मंदावते किंवा पूर्णतः बंद पडते. अशा मुळांची कूज होण्यास सुरुवात होते. कूज झालेली मुळे अकार्यक्षम होतात. त्यामध्ये फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव होतो. अशा झाडांवरील पाने डिसेंबर-जानेवारी महिन्यात निस्तेज होऊन पिवळी पडू लागतात. जुन्या पानांची झपाट्याने पानगळ होते. काही झाडांच्या खोडावर डिंक पाझरताना दिसतो. काही नवीन लागवड केलेल्या २-३ वर्षे वयाच्या झाडांची बूडकुज होऊन खोडावरची गोलाकार किंवा अंशतः गोलाकार कुज होऊन साल कुजून जाते. परिणामी खोडावरील फ्लोएम पेशी नष्ट झाल्यामुळे झाडाच्या पानांमध्ये तयार झालेली शर्करायुक्त पोषणद्रव्ये मुळांना पोचवण्यात अडचणी येतात किंवा मिळत नाहीत. ती मातीतील पाणी व इतर मूलद्रव्ये पर्णसंभाराला पुरवण्यास असमर्थ होतात. अशा झाडांचे पर्णछत्र झपाट्याने कमी होते. परिणामी त्यांची उत्पादकता कमी होत जाते. उपाययोजना प्रतिबंधात्मक ः

  • मे-जून महिन्यात बागेभोवती उताराच्या दिशेने ४-५ फूट खोल व ३-४ फूट रुंदीचे चर खोदावेत. बागेमध्ये सखल भागात दोन ओळींमध्ये १ ते १.५ फूट खोल व तितक्याच रुंदीच्या नाल्या उताराच्या विरुद्ध दिशेने खोदाव्यात.
  • नवीन बागेमध्ये लागवड उंच गादीवाफ्यावर करावी. यामुळे पाण्याचा निचरा चांगला होईल.
  • उपचारात्मक ः १. मशागत - पिवळ्या पडत असलेल्या झाडांच्या आळ्यातील माती ६ इंचापर्यंत उकरून घ्यावी. हवा खेळती राहिल्यामुळे मुळांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. २. बुरशीनाशकांचा वापर 

  • वाळलेल्या फांद्यांची छाटणी करून, झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • झाडांना प्रत्येकी १८:१८:१० मिश्रखत ५०० ग्रॅम प्रमाणात द्यावे.
  • झाडाच्या खोडावर डिंक पाझरताना दिसत असल्यास,
  • मेटॅलॅक्झील एम (४%) अधिक मँकोझेब (६४%) (संयुक्त बुरशीनाशक) २.७५ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे प्रत्येक झाडाला ४-५ लिटर या प्रमाणात आळ्यामध्ये आळवणी करावी.
  • ३. बूडकुज भेट कलम (इनार्च ग्राफ्टिंग)  बागेतील सखल भागात पाणी तुंबून राहिल्यामुळे काही झाडांच्या खोडांचा जमिनीलगतचा भाग कुजून जातो. अशी झाडे पिवळी पडून कालांतराने मरून जातात. अशी झाडे कुठल्याच उपचाराला प्रतिसाद देत नाहीत. अशा परिस्थितीत झाडांना वाचवण्याचा एकमेव उपाय म्हणजे बूडकुज दुरुस्ती भेट कलम (इनार्च ग्राफ्टिंग) होय. बूडकुज किंवा मूळकुज झालेल्या झाडांची मूळ प्रणाली नष्ट झाल्यामुळे अशा झाडांना अंशतः किंवा जवळपास पूर्णतः पाणी व मूलद्रव्ये मातीतून घेता येत नाहीत. या झाडांना तातडीने नवीन मूळ प्रणाली मिळावी म्हणून मूळकुज भेट कलम केले जाते. अशा झाडांच्या खोडाभोवती ३-४ इंच दूर (खोडाचा २-३ इंच व्यास असणाऱ्या झाडांना २-३ इंच व त्यापेक्षा मोठ्या झाडांना ३-४ इंचावर) जंबेरी किंवा रंगपूर लिंबाची एक वर्ष वयाची रोपे लावावीत. साधारणतः ८-१० दिवसांनी ही रोपे जोम धरल्यानंतर संत्रा किंवा मोसंबी झाडाच्या खोडावरील सुदृढ साल असलेल्या जागेवर या रोपांच्या त्या उंचीवरील भागावर तिरका काप देऊन छाटणी करावी, जेणेकरून तिरका कापलेला भाग झाडाच्या खोडावर बसवता येईल. धारदार चाकूने झाडाच्या खोडावर त्या उंचीवर साधारण एक इंच उभी चीर द्यावी. चाकूच्या बोथट बाजूने चीर दिलेली साल ढिली करून रोपाचे तिरका काप दिलेले टोक त्या सालीमध्ये घट्ट घुसवावे. त्यावर साल घट्ट दाबून त्याभोवती पातळ १०० मायक्रॉन जाडीची साधारण १.५ सेंटिमीटर रुंदीची प्लास्टिक पट्टी गुंडाळावी. रोपावरील सर्व पाने व फुटवे काढून टाकावेत. २१ दिवसानंतर या पट्ट्या काढून घ्याव्यात. जर खुंटाचे रोप झाडाच्या खोडापासून अलग झाले नाही तर कलम यशस्वी झालेले दिसते. बऱ्याच वेळा हे कलम यशस्वी होत नाही म्हणूनच एका झाडावर २-४ रोपांचे कलम बांधावे. त्यातील किमान १-२ कलमे यशस्वी झाल्यास झाडाचे पुनरुज्जीवन होते. खुंटावर पाने/फुटवे वाढू देऊ नयेत. अशा झाडांवर या कलम केलेल्या रोपाच्या खोडाचा व्यास झपाट्याने वाढतो. १ ते १.५ वर्षातच झाडाच्या मोठ्या फांद्यांइतका ४-५ इंचाचा होतो. अशी पुनरुज्जीवित झाडे पुढे १५-२० वर्षे चांगले उत्पादन देतात. डॉ. अंबादास हुच्चे, ७५८८००६११८ (राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com