विना नांगरण, तण व्यवस्थापनातून शेतीचे तंत्र

पारंपरिक शेतीमध्ये भरपूर मशागत आणि तणांच्या नियंत्रणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न याच्या जोरावर अधिक उत्पादनाची आशा केली जाते. मात्र, विनानांगरणी आणि तणांचे योग्य व्यवस्थापन या द्वारे अधिक चांगली शेती करणे शक्य असून, उत्पादनही चांगले मिळते. हे तंत्र पिकानुसार प्रत्यक्षात कसे उतरवता येईल, याचा विचार या लेखात करू.
विना नांगरण, तण व्यवस्थापनातून शेतीचे तंत्र
विना नांगरण, तण व्यवस्थापनातून शेतीचे तंत्र

सध्या रब्बी हंगामाला सुरुवात होत आहे. चालू वर्षी अति पावसामुळे राज्यात खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप पिकाची काढणी झाल्यानंतर दीर्घकाळ पाऊस चालू राहिला. परिणामी, वापसा नसल्याने रब्बी हंगामासाठी जमिनीची पूर्व मशागत करण्यामध्ये अडचणी आल्या. उघडीप मिळून रानाला वापसा येईपर्यंत तणांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली होती. या तणांमुळेही पूर्व मशागतीमध्ये अडथळे येत आहेत. या अडचणीवर मात करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत. तण माणसांच्या किंवा यंत्राच्या साह्याने कापून रोटाव्हेटरने मातीमध्ये मिसळून रब्बी पिकांसाठी रान तयार करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यात हे तणांचे जिवंत भाग जमिनीमध्ये कुजण्याच्या क्रियेचाही पुढील पिकांना त्रास होऊ शकतो, अशा अडचणी मांडल्या जातात. या बेसुमार वाढलेल्या तणांची आपत्ती न मानता त्यांचे योग्य व्यवस्थापन कसे करता येईल, हे आपण पाहू. अशी परिस्थिती शेतात असल्यास तणे तणनाशकाने मारून टाकावीत. १०-१२ दिवस शांत बसावे. त्यानंतर थेट ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्राने पेरणी करावी. पेरणी करीत असता तणांच्या मुळाचे गड्डे पेरणी यंत्राच्या हातात काही प्रमाणात अडकतील, ते वसण काढण्याच्या कामासाठी एक दोन माणसे पेरणी यंत्रामागे उभी करावी लागतील. ही अडचण असली तरी संपूर्ण रानातील तण कापणे, बाहेर काढणे मशागत करणे या तुलनेमध्ये कमी त्रासदायक व खर्चिक असेल. त्यातही तणे मारण्याचे काम ३०-४० दिवस अगोदर करता आले, तर हा सर्व त्रास अजिबात होत नाही. मशागत केलेल्या रानापेक्षा उत्तम पेरणी शून्य मशागतीवर होऊ शकते.

  • मात्र, अशा स्थितीचा सामना करण्यासाठी काही कामांचे पूर्व नियोजन थोडे आधीपासूनच केल्यास अधिक फायदेशीर ठरेल.
  • खरिपापूर्वी पेरणी यंत्रांच्या मापाचे सारे एकदाच पाडून रानाची रचना करून घ्यावी.
  • रब्बी पिकाच्या पेरणीआधी ३०-४० दिवस तणनाशकाची फवारणी जमिनीवर करून घ्यावी. अशा साऱ्यात व्यवस्थित कामे करता येतात.
  • त्यानंतर साऱ्यामध्ये पेरणी यंत्र सहजतेने चालवता येते. ही साऱ्याची रचना एकदाच केली की कायमस्वरूपी ठेवून पुढील पिके घेता येतात.
  • कायमस्वरूपी रचना तयार करणे शक्य ः सारे पाडण्याचे काम बागायती शेतीमध्ये करावे लागेल. जिरायती शेतीमध्ये त्याची गरज नाही. यापेक्षा ज्या शेतकऱ्यांकडे ठिबकची व्यवस्था आहे, त्यांनी एकदाच रानाची मशागत करून तळात १५० सेंमी व वरील बाजूस १२० सेंमीचे ‘सगुणा भात तंत्र’ पद्धतीने गादीवाफे तयार करून घ्यावेत. त्यावर ठिबकच्या दोन नळ्या अंथरून ठेवाव्यात. एकदा ही रानाची रचना तयार केली की या रचनेवर पुढे वर्षानुवर्षे पीक घेता येते. प्रत्येक पिकासाठी परत परत पूर्व मशागतीची गरज नाही. या रचनेत १२० सेंमीच्या गादी वाफ्यावर लहान अगर मध्यम उंचीचे पीक चार ओळीत तर मोठे पीक तीन ओळीत घेता येते. सगुणा भात तंत्रात टोकणी करण्यासाठी खुणा करण्याच्या यंत्राचा वापर करून कमीत कमी मजुरामध्ये टोकण करता येणे शक्‍य आहे. या तंत्रात ठिबक संच गोळा करणे किंवा पुन्हा पसरवणे ही कामे करावी लागत नाहीत. ज्यांना बी.बी.एफ. यंत्राने गादी वाफ्यावर पेरणी करावयाची आहे, त्यांना ठिबक संच गोळा करणे व पसरण्याचे काम करावे लागते. आपल्याकडील पिकाखालील क्षेत्र, मनुष्य बळाची उपलब्धता याचा विचार करून पेरणीची पद्धत ठरवावी. ज्यांना तुषार पद्धतीने पाणी देणे शक्‍य आहे, त्यांच्यासाठीही सपाट रानावर अगर गादी वाफ्यावर पिके घेणे शक्‍य आहे. गहू लागवडीचे नवे तंत्र ः गहू हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे धान्य पीक आहे. हे पीक घेण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात. अलीकडे कंबाईन हार्वेस्टरने (संयुक्त कापणी मळणी यंत्राने) खरीप भाताची कापणी झाल्यानंतर शून्य मशागत यंत्राने काडात पेरणी यंत्राने गहू पिकाची पेरणी केली जाते. महाराष्ट्रातील जमीन धारणा कमी असल्यामुळे ही मोठी यंत्रे चालणार नाहीत. त्याचप्रमाणे आपल्याकडे खरिपानंतर गव्हाच्या पेरणीसाठी मशागत करून पेरणी करण्याची प्रथा आहे. त्याच प्रमाणे काडाचा उपयोग वैरण म्हणून होत असल्याने काड जाळले जात नाही.

  • गव्हाची पेरणी टोकण, पेरणी यंत्र किंवा विस्कटून केली जाते. यात सपाट जमिनीवर विस्कटून पेरणी करण्यामुळे चांगले उत्पादन येत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
  • खरीप पीक साऱ्यावर असेल तर साऱ्यात बी विस्कटावे. कोळपणी केल्याप्रमाणे वरील मातीच्या थरात मिसळून पाणी द्यावे. साऱ्याचे बोद मोडू नयेत. कुठे मोडले असल्यास फक्त दुरुस्त करून घ्यावेत.
  • खरीप पीक सरी वरंब्यावर असेल तर कापणीनंतर त्याचे बुडखा व मुळाचे जाळे तसेच ठेवावे. सरीत सपाट रानाच्या तुलनेत ५० ते ६० टक्के बी विस्कटावे. पॉवर टीलरला मावतील तीतके दात ठेवून बाकांचे दात काढून टाकून बी सरीत मातीत व सऱ्यावर मिसळून द्यावे. सरीला पाणी द्यावे. वरंबा कोरडा राहत असल्यामुळे रिकामा राहतो व सरीत फक्त पीक राहते. ५० ते ६० टक्के रानात पीक व शिल्लक रान रिकामे असे चित्र दिसते. परिणामी उत्पादनात ४० ते ५० टक्के घट येईल, असे वाटत असले तरी नेहमीइतकेच उत्पादन मिळते.
  • उसानंतर गहू घेण्यासाठी वरील पद्धत वापरता येते. लगेच गहू सरीत विस्कटून मातीत मिसळून पाणी द्यावे. उगवलेले खोडवे १-२ वेळा रापून वैरण म्हणून वापरावे. मागील वर्षी मला या पद्धतीने कोळपणी, भांगलणी, तणनाशकाची फवारणी अजिबात न करता पेरणीबरोबर एकदाच रासायनिक खताचा हप्ता देऊन गव्हाचे उत्तम उत्पादन मिळाले होते. ठिबक सिंचनवर १२० सेंमीच्या गादी वाफ्यावर चार ओळीत टोकण केल्यास विक्रमी उत्पादन काढता येईल. शून्य मशागत पद्धतीत मातीत बी कालविण्यासाठी केलेली गरजेपुरती मशागत चालते. शून्य मशागतीवरील पेरणी यंत्रे आपल्याकडे उपलब्ध नाहीत म्हणून अडण्याचे कारण नाही.
  • ज्वारी लागवडीचे नवे तंत्र ः रब्बी ज्वारी हे महाराष्ट्रातले एक प्रमुख धान्य पीक आहे. सोलापूरसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात ज्वारी पीक प्रामुख्याने कोरडवाहू व काही प्रमाणात संरक्षित पाण्यात घेतले जाते. यात खरिपात पीक घेऊन व खरीप पड टाकून रब्बीत ज्वारी घेणे असे दोन प्रकार आहेत. खरिपात पावसाची योग्य साथ मिळाल्यास मूग, उडीद, सोयाबीन सारखी कडधान्ये घेऊन रब्बी ज्वारी घेतली जाते. या भागात पाऊस बेभरवशाचा असल्याने असे क्षेत्र मर्यादित आहे. प्रामुख्याने खरिपात कुळवाच्या पाळ्या मारून रान स्वच्छ ठेवले जाते. रब्बी पीक पेरणीपर्यंत अशा ५-६ पाळ्या माराव्या लागतात. पाळी मारून सैल झालेली माती एखादा मोठा पाऊस झाल्यास मोठ्या प्रमाणावर धूप होऊन नुकसान होते. मात्र, यावर उपाय नसल्याने शेतकरी हतबल आहेत. हे तंत्र तणनाशके वापरामध्ये येण्यापूर्वी विकसित झालेले असून, आजही तसेच चालू आहे. आता कुळवाच्या पाळ्या न मारता रान पड टाकावे. पेरणी हंगामापूर्वी ४०-४५ दिवस (सप्टेंबर १-२ आठवडा) ग्लयफोसेट + २-४ डी मारून संपूर्ण तण मारावे. १५ दिवसांनी कोठे चुकले असल्यास परत एकदा तितकीच फवारणी करावी. ऑक्‍टोबर महिन्यात शून्य मशागतीवर थेट ज्वारी बैल अगर टॅक्‍टरच्या पेरणी यंत्राने पेरता येते. पाळी मारलेली नसल्याने धूप १०० टक्के रोखता येते. मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष व खरिपात वाढलेले तण मारल्यानंतर ते कुजते. त्याचे सेंद्रिय खत उपलब्ध झाल्यामुळे उत्पादन चांगले येते. कोरडवाहूत २००-३०० किलो प्रतिएकर उत्पादन मिळाले तरी ते चांगले समजले जाते. वातावरण चांगले मिळाल्यास १०-१२ क्विंटल उत्पादन येते. गादी वाफ्यावर ठिबक करून ज्वारी केल्यास २५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाल्याची उदाहरणे आहेत. असे झाल्यास ज्वारी हे एक नगदी पीक होऊ शकते. सध्या ज्वारीला चांगली मागणी असून, दरही चांगला आहे. याचा विचार करता ज्वारीत उत्पादन वाढीला भरपूर वाव आहे. अगदी बागायतीमध्ये योग्य अभ्यासाद्वारे ज्वारी घेतल्यास धान्यांसोबतच कडब्याचेही मोठे उत्पादन मिळू शकते

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com