सागरी अन्नसाखळीवर होतोय मानवी हस्तक्षेपाचा परिणाम

दुर्मिळ धातूंच्या शोधासाठी गेल्या काही वर्षामध्ये सागरी तळाशी होणाऱ्या खोदकामांचा परिणाम समुद्रातील अन्नसाखळीवर मोठ्या प्रमाणात होतो.
सागरी अन्नसाखळीवर होतोय मानवी हस्तक्षेपाचा परिणाम
सागरी अन्नसाखळीवर होतोय मानवी हस्तक्षेपाचा परिणाम

दुर्मिळ धातूंच्या शोधासाठी गेल्या काही वर्षामध्ये सागरी तळाशी होणाऱ्या खोदकामांचा परिणाम समुद्रातील अन्नसाखळीवर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे मॅक्स प्लॅंक सागरी सूक्ष्मजीवशास्त्र संस्थेच्या संशोधनात पुढे आले आहे. सध्या अशा खोदकामासंदर्भात स्पष्ट असे कोणतेही निकष, नियम वा निर्बंध नसल्याचा फायदा उचलला जात आहे. मात्र, या गोष्टीचा दीर्घकालीन परिणाम सागरी तळाशी असलेली कर्बाच्या साखळी व सूक्ष्मजीवांवर होत आहे. सागरी तळ ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत दूरची आणि दुर्लक्ष करण्याजोगी बाब असली तरी नैसर्गिकरित्या हा रहिवास आपल्या जीवनाशी जागतिक कार्बन साखळीच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे. या सागरी तळाशी असलेल्या विविध महत्त्वाच्या धातूंचे (पॉलीमेटॅलिक) आर्थिक मूल्य लक्षात आल्याने या रहिवासामध्ये माणसांद्वारे मोठे छेडछाड केली जात आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटामध्ये जर्मनीतील मॅक्स प्लॅंक सागरी सूक्ष्मजीवशास्त्र संस्थेतील शास्त्रज्ञ तान्जा स्ट्रॅटमॅन आणि स्कॉटलॅंड येथील हेरीयॉट- वॉट विद्यापीठातील डॅनियल डी जोंग यांच्यासह नेदरलॅंड येथील युट्रेच्ट विद्यापीठातील संशोधकांचा समावेश होता. या संशोधकांनी पेरू येथील सुमारे ३ हजार कि.मी. सागरी किनाऱ्यालगतच्या सागरी तळाशी असलेल्या अन्नसाखळीचा अभ्यास केला. त्यावर विविध खोदकामांचा होणारा परिणाम तपासला. सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून होणाऱ्या कर्बाच्या साखळीचा परिणाम मोठ्या सजीवांवर तुलनेने कमी होतो.

  • या आधी १९८९ मध्ये जर्मन संशोधकांनी सागरी तळाशी असलेल्या मॅंगेनीजयुक्त खडकांचा सुमारे ४०० मीटरपर्यंतचा थर सुमारे ३.५ कि.मी. अंतरापर्यंत नांगरांच्या साह्याने खरवडून त्याच्या होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला होता. या प्रकरणाला २६ वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला असला तरी त्याचे परिणाम अद्याप या विभागात दिसत असल्याचे स्ट्रॅटमॅन सांगतात. त्या अभ्यासामध्ये सूक्ष्मजीवांच्या संख्येवर आणि घनतेवरील परिणाम तपासला होता. आता या नव्या संशोधनामध्ये कार्बन साखळी आणि अन्नसाखळी यावरील परिणामांचा विचार केला आहे.
  • या प्रदेशातील परिस्थितिकीमध्ये एकूण कार्बनचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. त्याचा फटका अन्नसाखळीतील महत्त्वाच्या अशा सूक्ष्मजीवांच्या संख्येला बसला आहे.
  • वास्तविक सूक्ष्मजीव हे त्यांच्या वेगवान वाढीसाठी ओळखले जातात. त्यामुळे अशा कोणत्याही हस्तक्षेपानंतर होणाऱ्या परिणामातून सावरून त्यांची वाढ वेगाने होण्याची शक्यता गृहित धरण्यात आली होती. मात्र, कार्बन साखळीमध्ये एक तृतीअंशपेक्षा अधिक घट झाली असल्याचे समोर आले आहे.
  • अर्थात, काही सूक्ष्मजीवांची वाढ त्यांच्या मूळ पातळीवर आली असली तरी अन्य अनेक सूक्ष्मजीव त्यातून सुधारू शकलेले नाहीत. परिणामी येथील जैवविविधतेमध्ये घट झाली असल्याचे डी जोंग यांनी सांगितले.
  • सागरी तळ हे हवामान बदलासाठी संवेदनशील

  • खोदकाम केलेल्या सागरी तळातील प्राण्यांमुळे निर्माण झालेल्या कर्ब स्रोतामध्ये बदल झाला. सामान्यतः हे जीव सागरी तळाशी वाढणाऱ्या खडक चुऱ्यावर (detritus) वाढणाऱ्या वनस्पती , सूक्ष्मजीव, जिवाणूंवर खाद्यासाठी अवलंबून असतात. खोदकामामुळे या सूक्ष्मजीवांच्या संख्या किंवा घनतेमध्ये लक्षणीय घट झाली.
  • भविष्यातील हवामानांचा अंदाज लक्षात घेता सागरी तळाशी आणखी उलथापालथ होण्याची शक्यता तपासावी लागणार असल्याचे मत या विषयावर पीएच. डी. करत असलेल्या संशोधिका डी. जोंग यांनी व्यक्त केली.
  • सागरी तळाचा केवळ १५ सेंमी थर किंवा गाळ हलवला गेला तरी त्याचा होणारा परिणाम हा गुणनमात्रेमध्ये होतो. परिणामी त्यातून सुधारणा होण्याचा काळही लक्षणीयरित्या मोठा असतो.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com