‘व्हर्जिन कोकोनट ऑइल’ अन सुकवलेली पावडर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील अभिजित अनंत महाजन यांनी व्हर्जिन कोकोनट ऑइल (ओल्या खोबऱ्यापासूनचे तेल) व डेसिकेटेड कोकोनट पावडर (ओल्या खोबऱ्यांपासून निर्जलीयुक्त पावडर) निर्मिती उद्योग सुरू केला आहे. दोन्ही उत्पादनांच्या संकल्पना तशा नव्या असल्या तरी महाजन यांनी प्रयत्नपूर्वक ध्यासातून व चिकाटीने त्यास बाजारपेठ देण्यास सुरवात केली आहे. भविष्यात हा उद्योग विस्तारण्यास संधी असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे.
व्हर्जिन कोकोनट ऑइल व ओल्या खोबऱ्याची सुकवलेली पावडर
व्हर्जिन कोकोनट ऑइल व ओल्या खोबऱ्याची सुकवलेली पावडर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील अभिजित अनंत महाजन यांनी व्हर्जिन कोकोनट ऑइल (ओल्या खोबऱ्यापासूनचे तेल) व डेसिकेटेड कोकोनट पावडर (ओल्या खोबऱ्यांपासून निर्जलीयुक्त पावडर) निर्मिती उद्योग सुरू केला आहे. दोन्ही उत्पादनांच्या संकल्पना तशा नव्या असल्या तरी महाजन यांनी प्रयत्नपूर्वक ध्यासातून व चिकाटीने त्यास बाजारपेठ देण्यास सुरवात केली आहे. भविष्यात हा उद्योग विस्तारण्यास संधी असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्रकिनारपट्टी लाभलेला वेंगुर्ला हा महत्त्वाचा आणि निसर्गसंपन्न तालुका आहे. याच शहरातील महाजनवाडी येथे अभिजित महाजन यांचे घर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. सुमारे २२ वर्षे नोकरी करून ते आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर झाले. परंतु गावचीच अधिक ओढ होती. तेथेच शेती किंवा व्यवसाय करावा असे मनोमन वाटू लागले. गावीच करिअर घडवायचे तर मालकीची जमीन हवी या कारणाने वेंगुर्ला-बेळगाव या राज्यमार्गावरील आडेली (ता. वेंगुर्ला) येथे सात एकर जमीन खरेदी केली. गावी शेतीला सुरवात गावी परतल्यानंतर हापूस आंबा, नारळ आदींची लागवड केली. संपूर्ण अभ्यास करून साडेचारहजार ६०० चौरस फुटाचे शेड उभारून २००७ मध्ये काजू प्रकिया सुरू केली. सन २०१६ पर्यंत प्रकल्प चालविला. त्यातून आडेली परिसरातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला. नावीन्याची ओढ महाजन अभ्यासू आणि प्रयोगशील आहेत. विविध पुस्तके वाचण्याचा त्यांना छंद आहे. एकदा डॉ. ब्रूस फिफ यांचे ‘दी कोकोनट ऑइल मिरॅकल’ हे पुस्तक हाती पडले. नावीन्याची ओढ असल्याने त्याचे पान न पान अभ्यासले. व्हर्जिन कोकोनट ऑईलचे औषधी गुणधर्म, दुर्धर आजारांवर त्याचा गुणकारीपणा याबाबत उत्सुकता आणि कुतूहल निर्माण झाले. तेलाची बाजारपेठ व जगभरातील मागणीही अभ्यासली. प्रकल्पापूर्वीचा अभ्यास १)व्हर्जिन कोकोनट ऑइल (ओल्या खोबऱ्यापासून तेल निर्मिती) बाबत राज्यातही माहिती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तज्ज्ञांशीही चर्चा केली. परंतु असा प्रकल्प राज्यात आढळला नाही. केरळ राज्यातील -कासारगोड येथील नारळ संशोधन केंद्र, नारळ विकास मंडळ व नारळ उद्योगाकडे पाठपुरावा करून चिकाटीने माहिती घेतली. २)कोकणात सुक्या खोबऱ्यांपासून तेलनिर्मिती प्रकल्प आहेत. पारंपरिक पद्धतीने तेल काढणारे असे घाणे कोकणात आजही पाहण्यास मिळतात. मात्र आडेलीत ‘व्हर्जिन कोकोनट ऑइल’ प्रकल्प सुरू करण्यास महाजन यांनी पुढाकार घेतला. काजू प्रकल्पाची जागा तयार होतीच. आवश्‍यक यंत्रांसाठी ते तब्बल तेरा वेळा केरळात गेले. प्रकल्प नवा असल्याने या भागात कामगार मिळणे देखील शक्य नव्हते. मग आपल्याच भागातील तीन कामगारांना केरळमध्ये प्रशिक्षण दिले. प्रकल्प कार्यान्वित

  • अखेर अत्यंत मेहनतीतून केरळमधून यंत्रे खरेदी
  • नारळ फोडणे, खोबऱ्याचा कीस काढणे, रस काढणे, त्यातील अनावश्यक पाणी बाजूला करणे आदींसाठीच्या यंत्रांचा समावेश
  • केरळ येथील कुशल कारागिरांकडून यंत्रांची उभारणी.
  • एकूण खर्च सुमारे ४५ ते ५० लाख रुपये (जागेव्यतिरिक्त). अद्याप कोणतेही सरकारी अनुदान घेतले नाही.
  • दृष्टीक्षेपात प्रकल्प

  • कच्चा माल (नारळ) शेतकऱ्यांकडून खरेदी होतो. केरळच्या धर्तीवर किलोवर खरेदीचा पायंडा पाडला. जिल्हयात किंवा जिल्ह्याबाहेर अशी खरेदी होत नाही. महाजन यांनी हे धाडसी पाऊल टाकले. बाजारभावाप्रमाणे दर मिळत असल्याने नारळ उत्पादकांनाही हमखास बाजारपेठ मिळाली. आडपडदा न ठेवता व्यवहारात पारदर्शकता आली.
  • सध्या व्हर्जिन कोकोनट ऑइल व डेसिकेडेट कोकोनट पावडर (ओल्या खोबऱ्याची सुकवलेली पावडर) यांची निर्मिती
  • दिवसाला पंधराशे ते दोनहजार लिटर तेल तर पावडरीचे प्रति महिना सहा टनाप्रमाणे उत्पादन
  • दहा किलो नारळावर प्रकिया केल्यानंतर सुमारे एक लिटर तेल मिळते.
  • साडेचार किलो नारळांपासून एक किलो पावडर निर्मिती.
  • दर- तेल- प्रति लिटर ७०० रुपये, पावडर- प्रति किलो २०० रू.
  • मार्केट देण्याची धडपड महाजन म्हणाले की हे तेल सेवन केले जाते. त्यात लॉरिक ॲसिड सुमारे ४५ टक्के असते. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होतो. तेल आरोग्यासाठी गुणकारी आहे. पावडरीला बेकरी, मिठाई उद्योगांकडून मागणी असते. दोन्ही उत्पादने नव्या संकल्पनेतील असल्याने मार्केट मिळवण्यासाठी खूप प्रयास घ्यावे लागले. त्यांच्या वापराचे फायदे पटवून देण्यात ताकद खर्ची पडली. मात्र विपणनाचे कौशल्य असलेल्या महाजन यांनी पूर्ण क्षमतेने आव्हान पेलले. एकीकडे उत्पादननिर्मिती तर दुसरीकडे विक्री व्यवस्था यामध्ये दमछाक व्हायची. आवश्यक तितकी मागणी नसल्याने प्रकल्प महिन्यातील काही दिवस चालवावा लागायचा. दोन वर्षांनंतर बसली घडी अखेर अथक प्रयत्न, ध्यास व चिकाटीचे फळ दोन वर्षांनंतर मिळू लागले. व्यवसायात चांगला जम बसू लागला आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य भागांमधून मागणी आहे. थेट विक्रीवरच भर आहे. मागणीच्या प्रमाणातच उत्पादन घेतले जाते. कामगारांनाही प्रशिक्षित करण्यात आले आहे. सध्या १७ जणांना रोजगार मिळाला आहे. शेतकऱ्यांचा व्हॉटस ॲप ग्रुप नारळाचे दर नेहमी बदलतात. त्यामुळे चर्चेची देवाणघेवाण व दर अपडेट करण्यासाठी महाजन यांनी शेतकऱ्यांचा व्हॉटस ॲप ग्रुप स्थापन केला आहे. शिवाय मालाची मागणी नोंदवणेही सोपे होते. एखाद्या शेतकऱ्यांचा माल आल्यानंतर त्याची गैरसोय नको म्हणून दर महिन्याला साठ ते सत्तर टन नारळ खरेदी होते. संपर्क- अभिजित महाजन- ९७२०६०००१, ९९६०३४७५४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com