२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक विक्री व्यवस्था

नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्र येत२५ एकरांत शेडनेट हाउसेस उभारली. त्याद्वारे ढोबळी मिरची, काकडी व फरसबी आदींचेउत्पादन घेत बारमाही पीक पद्धती व त्यातून ताजा उत्पन्नस्रोत तयार केला.
शेडनेट, मल्चिंग, ठिबक सिंचनाद्वारे म्हाळुंगी भागातील शेतकरी सुधारित तंत्राने शेती करीत आहेत.
शेडनेट, मल्चिंग, ठिबक सिंचनाद्वारे म्हाळुंगी भागातील शेतकरी सुधारित तंत्राने शेती करीत आहेत.

नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्र येत २५ एकरांत शेडनेट हाउसेस उभारली. त्याद्वारे ढोबळी मिरची, काकडी व फरसबी आदींचे उत्पादन घेत बारमाही पीक पद्धती व त्यातून ताजा उत्पन्नस्रोत तयार केला. शेतकरी कंपनीची स्थापना करून सामूहिक विक्री व्यवस्थाही उभी केली.   नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील पश्‍चिम भागात बहुतांश आदिवासी शेतकरी राहतात. या भागात पावसाचे प्रमाण अधिक असते. भात हे इथले मुख्य पीक असते. इथल्या म्हाळुंगी गावपरिसरात भात शेती अल्प असून बाजरी, हरभरा, टोमॅटो, गहू, सोयाबीन आदी पिके घेतली जातात. गटाला मिळाली चालना गावातील युवराज डामसे या युवा शेतकऱ्याने २०१४ मध्ये पदवीचे शिक्षण घेतले. वीस गुंठे क्षेत्रावर शेडनेट उभारून ढोबळी मिरची व अन्य भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. मात्र काही कारणांमुळे विक्री व्यवस्था साधता आली नाही. नुकसान झाले. हतबल युवराज कृषी विभागाकडे धावले. त्यांची धडपड पाहून उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आणि ‘आत्मा’चे समन्वयक बाळनाथ सोनवणे यांनी गट स्थापन करण्याचा सल्ला देत गावाला भेटही दिली. आदिवासी विकास विभागाचे सतीश ठुबे यांनीही पुढाकार घेतला. यातून प्रेरणा व आत्मविश्‍वास मिळून युवराज यांनी पंचवीस शेतकऱ्यांना एकत्र केले. त्यातून २०१८ मध्ये शेतकरी गटाची स्थापना झाली. गटाची आदिवासी विकास योजनेतील गटशेती प्रोत्साहन व सबलीकरण योजनेसाठी निवड झाली. अजून बळकटी मिळाली. डिसेंबर २०२० मध्ये म्हाळुंगी आदिवासी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीची स्थापनाही झाली. शेडनेट उभारणी खरीप मुख्य पिके व पावसाळा संपल्यावर या भागात पुढील पिकांचे पर्याय राहात नाहीत. शेडनेट हाउस उभारल्यास रब्बीत ढोबळी मिरची व पुढे उन्हाळ्यासाठी काकडी घेता येईल असा विचार झाला. त्यातून प्रत्येकाने पंचवीस शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक एकर प्रमाणे पंचवीस एकरांत शेडनेट उभारण्याचे प्रयत्न सुरू केले. कृषी विभाग ५० टक्के, तर प्रत्येकी २५ टक्के आदिवासी विभाग व शेतकरी वाटा यातून भांडवल उभारणी सुरू झाली. एक एकर शेडनेट उभारणीसाठी २६ लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित होता. यात शेतकरी वाटा सहा लाखांपेक्षा अधिक होता. आदिवासी आर्थिकदृष्ट्या कमजोर असल्याने ‘एकमेकां साह्य करू’ ही संकल्पना वापरली. एकाचे अनुदान जमा झाल्यानंतर ते पैसे दुसऱ्याला देत पुढील शेडनेट उभारणी व्हायची. असे करत पंचवीस एकरांत शेडनेट उभारणी पूर्ण करत वेगळा आदर्श निर्माण केला. तंत्रज्ञान व उत्पादन युवराज म्हणाले, की आम्ही आदिवासी शेतकरी असल्याने शेडनेटमधील सुधारित तंत्रज्ञान अलीकडे आत्मसात होत आहे. गटाच्या माध्यमातून ठिबक सिंचन, मल्चिंगचा वापर होत आहे. गटशेती सबलीकरण योजनेतून ट्रॅक्टर, रोटावेटर, पॉवर टिलर, बेड व सरी पाडण्याचे यंत्र, पेरणीयंत्र, नांगर, ट्रॉली, प्लॅस्टिक क्रेट, टॅंकर अशा सुविधा मिळाल्या. अवजारे बॅंकेमुळे श्रम, वेळेत बचत करणे सोपे झाले. एकरी सरासरी पंधरा टन मिरचीचे तर एकरी ३० टनांपर्यंत काकडीचे उत्पादन घेत आहोत. यापुढे उत्पादनात वाढ होईल. खुल्या क्षेत्रातही भाजीपाला उत्पादन घेत आहोत. सामूहिक विक्री सामूहिक विक्री व्यवस्था उभी केल्याने अडचणींवर मात करता आली. युवराज म्हणाले, की पावसाळा काळात काही वेलवर्गीय पिकांना प्रति किलो ८० रुपयांपर्यंत दर मिळतात. ही संधी घेऊन शेडनेटमध्ये काही दिवसांपूर्वी त्याची लागवड सदस्यांनी केली. आता प्लॉट सुरू होत आहेत. हाती चांगले उत्पन्न पडेल. सदस्यांकडून एकच प्रकारचा भाजीपाला घेतल्याने मोठ्या प्रमाणात विक्री करणे सोपे झाले. खात्यावर पैसे जमा

  • सर्वांचा माल एके ठिकाणी संकलित.
  • दर चार ते सात दिवसांनी सुमारे ८ ते १० टन भाजीपाला मुंबई, पुणे, अहमदाबाद येथे विक्रीस.पाठवण्यात येतो..
  • पैसे गटाच्या खात्यावर व त्यानंतर वैयक्तीक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा.
  • मागील दोन वर्षांत लॉकडाउनच्या संकटामुळे काकडीची प्रति किलो ७ ते ८ रुपये तर ढोबळी मिरचीची सरासरी १० ते १३ रुपये दराने विक्री.
  • गटातील शेतकऱ्यांनी सहा महिने मुंबईत जाऊन थेट विक्रीचाही प्रयत्न केला. ताजा माल असल्याने मागणी व दरही चांगला मिळत होता. मात्र स्थानिक विक्रेते, परप्रांतीयांच्या विरोधामुळे त्रास होऊन थेट विक्री बंद करावी लागली.
  • खुल्या क्षेत्रावर रब्बी पिके निघाल्यानंतर ब्रोकोली, चायनीज कोबी, आइसबर्ग अशा विविध परदेशी भाजीपाला पिकांची पाच- दहा गुंठ्यांत लागवड. त्यातून अतिरिक्त उत्पन्न.
  • एकत्र आल्याचे फायदे

  • खते, बियाणे, कीडनाशके व अन्य निविष्ठांची एकत्र खरेदी केल्याने दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत बचत.
  • व्यावसायिक पिकांवर भर दिल्याने उत्पन्नात वाढ. पूर्वी वर्षभरात जिथे एक ते दीड लाख रुपये मिळायचे तिथे उत्पन्न तीन ते साडेतीन लाखांपर्यंत पोहोचले आहे.
  • कंपनीतर्फे पाच टन क्षमतेचे पॅक हाउस उभारण्याचे प्रस्तावित
  • मासिक पाचशे रुपये व अन्य बचतीतून पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम संकलित. त्याचा सदस्यांना आधार. गरजेनंतर पुन्हा गटाकडे पैसे जमा करण्यात येतात.
  • कृषी विभागातर्फे शेतीशाळा, मार्गदर्शन शिबिरे.
  • भागात डोंगराळ क्षेत्र अधिक. त्यामुळे गटाद्वारे ३० हेक्टरवर आंबा लागवडीचे नियोजन सुरू.
  • संपर्क- युवराज डामसे, ७६२०१२७०६९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com