वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील बदलापासून सातत्याने उद्भवणारे रोगांचे उद्रेक अ
यशोगाथा
मुगाच्या लादी, चमकी देशी जातीचे संवर्धन, गाळपेऱ्यात उंचावले अर्थकारण
आदिवासी बांधवांसाठी हक्काचे पीक
अनेक आदिवासी बांधवांच्या जमिनी धरणात गेल्या. त्यामुळे वर्षभर मोलमजुरी करणे हा अनेकांसाठी मुख्य उदरनिर्वाहाचा पर्याय असतो. मात्र गाळपेरे उघडे झाल्यावर अनेक आदिवासी बांधवांच्या मदतीस येते ते उन्हाळी मुगाचे पीक. त्यातूनच आपले अर्थकारण उंचावणे त्यांना शक्य झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात दारणा धरणात अनेकांच्या जमिनी गेल्या. अनेक जण अल्पभूधारक तर काही भूमिहीन झाले. मात्र ५० वर्षांपासून हे शेतकरी ‘बॅकवॉटर’ परिसरात पाणी ओसरल्यानंतर गाळपेऱ्यात मुगाची शेती करतात. सुमारे पन्नास वर्षांहून अधिक काळ मुगाचे देशी बियाणे त्यांनी संवर्धित केले आहे. उन्हाळी हंगामात त्याचे यशस्वी उत्पादन घेत अन्य शेतीला या मुगातून त्यांनी आर्थिक आधार दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हा अतिपावसाचा व भाताचा पट्टा म्हणून ओळखला जातो. तालुक्यात दारणा धरण झाल्यानंतर अनेकांच्या वडिलोपार्जित जमिनी धरणात गेल्या. अनेक जण अल्पभूधारक तर काही भूमिहीन झाले. तरीही येथील शेतकऱ्यांनी गाळपेऱ्यातील जमिनी अनेक वर्षांपासून आखून घेतल्या आहेत. यासाठी पाणीपट्टी व जमिनीच्या पट्ट्या जलसंपदा विभागात भरल्या जातात. जानेवारीच्या अखेरीस धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने जमीन उघडी पडते. या सुपीक जमिनीवर पंधराशे एकरहून अधिक क्षेत्रावर शेती होते. त्यात मूग हे मुख्य पीक असते.
मुगाची पारंपरिक शेती
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी परिसरातील उभाडे गावातील एका शेतकऱ्याने मूग पेरला. हळूहळू भागात हे पीक प्रचलित झाल्याचे जुन्या पिढीचे शेतकरी सांगतात. परिसरातील बेळगाव तऱ्हाळे, धामणी, धामणगाव, उभाडे, पिंपळगाव मोर, गंभीरवाडी, मोगरे, उंबरकोन ही गावे उन्हाळी मुगाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत.
पारंपरिक देशी बियाणे संवर्धन
मुगाच्या प्रामुख्याने ‘लादी’ व ‘चमकी’ अशा दोन जातींची लावण होते. लांब शेंगेच्या जातीचे नाव ‘लादी’ तर आखूड शेंगेच्या जातीला ‘चमकी’ नावाने ओळखले जाते. पुढील वर्षासाठी हेच बियाणे जपून ठेवले जाते.
पीक नियोजन
- अत्यंत कमी खर्चात व्यवस्थापन.
- मार्च महिन्यात पेरणीला सुरवात.
- बीजप्रक्रियेसाठी राख किंवा बुरशीनाशकाचा वापर
- प्रति एकरी १० ते १५ किलो बियाणे वापरले जाते.
- पेरणीच्या प्रमुख पुढील तीन पद्धतींचा वापर होतो.
- ट्रॅक्टरद्वारे यंत्राने पेरणी
- बैलजोडीने पांभरीने पेरणी
- फोकून पेरणी
- गरजेनुसार निंदणी
- गाळपेऱ्यात ओलावा टिकून असतो. त्यामुळे सिंचनाची वेगळी सोय करावी लागत नाही.
- उन्हाळी मुगाला किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. मात्र काही शेतकरी प्रतिबंधात्मक नीमतेल किंवा करंजतेलाची फवारणी करतात.
- सुमारे ७२ ते ७५ दिवसांनी पीक काढणीसाठी येते. काही शेतकरी मूग वाळल्यानंतर थेट झाड उपटून घेतात. त्यानंतर शेंगा कडक सूर्यप्रकाशात कडक वाळवल्या जातात. खळ्यावर बैलजोडी किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने मळणी होते.
- मूग चाळून, माती खडे निवडून रंग, आकार यानुसार प्रतवारी होते.
- तयार मूग पोत्यांमध्ये साठवले जातात.
काढणीची व्यवहार पद्धत
स्थानिक मजुरांसोबत तोडणीचा व्यवहार ठरलेला असतो. काही ठिकाणी दररोज पैसे दिले जातात. तर काही या बदल्यात मूगही दिला जातो.
प्रातिनिधिक अनुभव
चालू वर्षी उन्हाळी मुगाचे पीक चांगले आल्याने शेतकरी समाधानी आहेत. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत या पिकाने त्यांना आर्थिक आधार दिला आहे. बेळगाव तऱ्हाळे येथील हिरामण आव्हाड हे मुंबई महापालिकेची नोकरी सांभाळून शेती करतात. त्यांचे सुमारे साडेबारा एकर क्षेत्र आहे. ते दरवर्षी सुमारे एक एकरांत मूग घेतात. ते म्हणाले की एकरी दीड क्विंटल ते पाच क्विंटलपर्यंत आम्हा शेतकऱ्यांना उत्पादन मिळते. अलीकडील काळात त्याला प्रति किलो ६५ ते ७० रुपये दर मिळतो आहे. या पिकाला उत्पादन खर्च एकरी पाच हजार रुपयांपर्यंत येतो. बियाणे एकतर घरचे असते. शिवाय घरातील बहुतांश व्यक्तीच शेतीत व्यस्त असतात. खते, कीडनाशके यांचा वापर अल्प असतो. एकरी पाच क्विंटल उत्पादन व ६० रुपये प्रति किलो दर मिळाला तरी खर्च वजा जाता २५ हजार रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो.
विक्री
तालुक्यात घोटी ही मोठी बाजारपेठ आहे. येथे महाराष्ट्रासह गुजरात राज्यातील शेतकरीदेखील
खरेदी-विक्रीसाठी येतात. येथील व्यवहारातून शेतकऱ्यांना रोख पैसे मिळतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येत असले तरी मुगाचा बाजार म्हणावा तसा विकसित झालेला नाही. हा येथील शेतकऱ्यांसाठी अडचणीचा विषय आहे.
भुश्शाचा उपयोग
मुगाचा भुस्साही जनावरांसाठी प्रथिनांचा उत्तम स्रोत असतो. ऐन उन्हाळ्यात चाऱ्याचा उद्भवतो. अशावेळी
त्याची उपयुक्तता अधिक वाढते. त्यातून चाराटंचाईवरही मात करता येते. पावसाळ्यात या भागात संततधार पाऊस असतो. बाहेर चाऱ्यासाठी जाण्याची संधी नसते. अशावेळी हे साठवलेले भूस वैरणीसाठी महत्त्वाचे ठरते.
उन्हाळी मुगाचे शेतकऱ्यांना फायदे
- कमी उत्पादन खर्चात घेतले जाणारे पीक
- पशुधनासाठी वैरण म्हणून भुसा उपलब्ध
- दैनंदिन आहारात वापरण्यासाठी डाळीचा स्रोत
- अन्य बागायती शेतीला पूरक आधार
गाळ पेऱ्यात होणारी अन्य पिके
गाळ पेऱ्यात अन्य कडधान्य व भाजीपाला पिकेही घेतली जातात. यात मसूर, मटकी, हरभरा, बाजरी, काळा गावठी वाटाणा, चवळी, उडीद, काकडी, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी यांचा समावेश असतो.
मात्र मुगाच्या तुलनेत हे क्षेत्र कमी असते.
संपर्क-
हिरामण आव्हाड -९९२११७०८९९
त्रंबक आव्हाड -९९७५७६९७७६
फोटो गॅलरी
- 1 of 64
- ››