agriculture story in marathi, at the age of 61 yrs, farmer Barmecha is doing experimental farming with organic way. | Agrowon

वयाच्या ६१ व्या वर्षीही प्रयोगशील शेतीची आवड

संदीप नवले
गुरुवार, 12 मार्च 2020

पुणे जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण व दुष्काळी शिरूर येथील शिरीषकुमार बरमेचा यांनी वयाच्या ६१ व्या वर्षीही प्रयोगशील शेतीत स्वतःला झोकून दिले आहे. शेतीची अत्यंत आवड जोपासलेल्या बरमेचा यांनी बहुवीध पीक पद्धतीचा अंगीकार करून सेंद्रिय पद्धतीने अन्ननिर्मितीचा वसा हाती धरला आहे.

पुणे जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण व दुष्काळी शिरूर येथील शिरीषकुमार बरमेचा यांनी वयाच्या ६१ व्या वर्षीही प्रयोगशील शेतीत स्वतःला झोकून दिले आहे. शेतीची अत्यंत आवड जोपासलेल्या बरमेचा यांनी बहुवीध पीक पद्धतीचा अंगीकार करून सेंद्रिय पद्धतीने अन्ननिर्मितीचा वसा हाती धरला आहे.

पुणे जिल्ह्यात शिरूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. कायम दुष्काळी अशीच या तालुक्याची ओळख आहे. तालुक्याच्या पश्चिमेकडे सुमारे एक ते दीड किलोमीटरवर शिरीषकुमार बरमेचा यांची अकरा एकर शेती आहे. साधारणपणे ६१ वर्षे वय असलेले शिरीषकुमार पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर वडिलोपार्जित असलेला सिमेंट व बांधकामाशी संबंधित व्यवसाय करीत होते. सुमारे ४० ते ४५ वर्षे त्यांनी नेटाने हा व्यवसाय जोपासला. मात्र तो सुरू असताना शेतीची असलेली नाळ कायम होती. मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी आपला व्यवसाय मुलगा कुमार यांच्याकडे सोपविला. त्यानंतर पूर्णपणे शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ऊस हे पीक घेतले. मात्र भागातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन हे पीक थांबवण्याचा निर्णय घेतला. बाजारात फळपिके व धान्यांना असलेली मागणी, बहुवीध पीक पद्धतीचे महत्त्व व पाण्याची उपलब्धता या बाबी लक्षात घेऊन पीकपद्धतीची घडी तयार केली.

पीकपद्धती व व्यवस्थापन
आपल्या ११ एकर शेतीत शेवगा हे मुख्य पीक चार एकरांत घेतले आहे. गहू अडीच एकर, पेरू अर्धा एकर तर दोन एकर ज्वारी आहे. आरोग्यदायी अन्नाचे महत्त्व लक्षात घेऊन रासायनिक कीडनाशके व खते यांचा वापर पूर्ण बंद केला आहे. सध्या एक खिलार गाय आहे. त्यावर आधारीत शेणखत उपलब्ध होते. शिवाय गोमूत्र, बेसनपीठ, गूळ, वडाखालील माती यांचा वापर करून जीवामृत तयार करण्यात येते. एक टॅंक उभारून मोटर, फिल्टर व पाइपलाइन्सच्या आधारे ठिबकद्वारे द्रवरूप स्लरी थेट झाडांजवळ सोडण्याची व्यवस्था केली आहे.

शेवगा वाणात विविधता
रोहित, ओडीसी, पीकेएम २ या तीन प्रकारच्या वाणांच्या शेवग्याची लागवड केली आहे. त्यामुळे कोणत्या वाणातून अधिक उत्पादन मिळते याचा अभ्यास करता आला. तीनही जाती उत्पादनासाठी चांगल्या असल्याचाही अनुभव आला. शेवग्याचे एकरी १० टनांपर्यंत उत्पादन मिळते. वर्षभर तो विक्रीसाठी उपलब्ध राहतो. सध्या ३० रुपये प्रति किलो दराने त्याची विक्री होत आहे. दोन वर्षापूर्वी शेवग्यात सुमारे शंभर सफरचंदाची झाडे लावली होती. सध्या त्यातील ५० झाडे वाढीच्या अवस्थेत आहेत. दोन महिन्यांपूर्वी तैवान पिंक या पेरू वाणाच्या ३२० झाडांची स्वतंत्र लागवड केली आहे. शेवग्याची विक्री शक्यतो शिरूर येथेच होते.

तीन प्रकारचा गहू
शिरीषकुमार यांनी अडीच एकरांत सरबती, बन्सी व खपली अशा तीन प्रकारच्या गव्हाची पेरणी केली आहे. गेल्या वर्षी पाणीटंचाईमुळे त्यांना गव्हाचे पीक घेता आले नाही. यंदा मात्र पीक परिस्थिती चांगली असून एकरी १६ पोती (प्रति एक क्विंटलचे) उत्पादन हाती येईल अशी त्यांना अपेक्षा आहे.

गावरान बाजरी व ज्वारी
घरी खाण्याच्या दृष्टीने खरीप हंगामात दोन एकरांत गावरान बाजरी घेतली आहे. एकरी सहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. बाजरीच्या काढणीनंतर धान्य व कडबा अशा दोन्ही कारणांसाठी तेवढ्याच क्षेत्रावर ज्वारी घेतली आहे. यातही हुरड्याच्या वाणांचा विचार प्राधान्याने करताना राजहंस, दूधमोगरा, सुरती यांची निवड केली. पुढील वर्षांसाठी त्यांचे बियाणे राखून ठेवले आहे. तसेच यंदा हुरडा निर्मितीची प्रक्रियाही समजावून घेतली. परिचितांना बोलावून हुरडा पार्टी आयोजित केली. सध्या धान्याच्या विक्रीसाठी शिरीषकुमार यांना व्यापाऱ्यांकडे जाण्याची गरज भासत नाही. आपल्या मित्र परिवारातच त्याचा खप होतो.

निंबोळी, करंज पेंडीची निर्मिती
सेंद्रिय पद्धतीवर भर असल्याने निविष्ठा म्हणून निंबोळी, करंजावर प्रक्रिया करून यांत्रिक पद्धतीने पेंडनिर्मितीही सुरू केली आहे. लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, लासूर स्टेशन येथून निंबोळ्या खरेदी करण्यात येतात. या प्रक्रिया केंद्राची दररोजची निर्मिती क्षमता दोन टन आहे. दरवर्षी पेंडींचा वापर पिकांना करण्यात येतो. गव्हाला एकरी आठ पोत्यांएवढा वापर होत असल्याचे शिरीषकुमार म्हणाले. पेंडनिर्मिती करताना त्यातून तेल हा घटकही उपलब्ध होतो. इमल्सिफायरचा वापर करून पाण्यातून फवारणीसाठी त्याचे द्रावण तयार करण्यात येते. महिन्यातून दोन वेळा त्याची फवारणी होते. रसशोषक किडी व अळीच्या प्रतिबंधासाठी त्याचा चांगला उपयोग होत असल्याचे शिरीषकुमार सांगतात. गरजेएवढा वापर झाल्यानंतर उर्वरित सुमारे ६० ते ७० टन पेंडीची विक्री होते. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते.

ॲग्रोवनने आणली शेतीत गोडी
शिरीषकुमार सांगतात की, शेतीत रस निर्माण होण्यामागे ॲग्रोवन हेच दैनिक कारणीभूत ठरले आहे. ॲग्रोवनच्या पहिल्या दिवसापासून आपण त्याचे वाचक असून, त्यातील यशकथा व लेखांनी माझे ज्ञान वृद्धिंगत केले आहे.
संपर्क- शिरीषकुमार बरमेचा- ९०२८८८८१३५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
औरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्रीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी...
आरोग्य सुरक्षिततेचे नियम पाळून थेट...पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
दुष्काळात शेतीला साथ पोल्ट्री,...औरंगाबाद जिल्ह्यातील भांडेगाव येथील चव्हाण कुटुंब...
शेतीपेक्षा दुग्धव्यवसायातून उभारीभाडेतत्त्वावर रोपवाटिका व्यवसाय सुरू असताना...
काटेकोर पाणी व्यवस्थापनातून...''पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका कायम दुष्काळी...
ऑयस्टर मशरूम निर्मितीसह तयार केले...अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील अभियंता...
प्री कुलिंग, रिफर व्हॅनद्वारे...महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी देशभरात प्रसिद्ध आहे. या...
केळी, मका पिकांसह दुग्धव्यवसायात...दापोरी (जि. जळगाव) गावाने केळी, मका, कापूस...
आंबा, काजूसह भाज्यांची प्रयोगशील शेतीशिरगाव (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील माधव...
एक्सॉटिक’ भाज्यांची आधुनिक पिरॅमिड शेतीखानापूर (जि. पुणे) येथील कागदी बंधूंनी पिरॅमिड...
रोवा काठ्या कमी खर्चात अन श्रमात...भाजीपाला विशेषतः वेलवर्गीय पिकांमध्ये मांडवासाठी...
दुर्दम्य इच्छाशक्ती, अविरत परिश्रमांतून...अलकुड (एम) (जि. सांगली) येथील महेश पाटील यांनी...
काटेकोर व्यवस्थापन सांगणारा शेटेंचा...निघोज (जि. नगर) येथील माजी सैनिक नवनाथ भिमाजी...
कुटुंबाच्या अर्थकारणात डाळिंबासह लिंबू...सात एकरांवरील डाळिंब हे मुख्य पीक असले तरी...
शेतमाल विक्रीसाठी सर्वसमावेशक धोरणजर्मनीमधील शेतमाल विक्री ही फिव्होजी मार्केटिंग...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासाचा वसालोटे-परशुराम (जि. रत्नागिरी) येथील श्री विवेकानंद...
सेंद्रिय शेतीला दिली प्रक्रिया...तेलगाव (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील बालासाहेब...
ज्वारीची बिस्किटे अमेरिकेत पाठविणारा...बारामती येथील महेश साळुंके यांनी बेकरी, केक व...
नागापूरमध्ये झाली धवलक्रांतीविविध कारणांमुळे विदर्भात दुग्ध व्यवसायाला उतरती...