agriculture story in marathi, agri. B. Tech young farmer has started mashroom production business & getting good returns from it. | Agrowon

अॅग्री बीटेक’ तरुणाचा धिंगरी मशरूम व्यवसाय

एकनाथ पवार
शनिवार, 4 जानेवारी 2020

 ‘ॲग्रिकल्चर बीटेक’ची पदवी घेतलेल्या अनंत पारकर (फोंडाघाट, जि. सिंधुदुर्ग) या तरुणाने धिंगरी अळिंबी निर्मिती व्यवसाय सुरू केला आहे. कोकणातील बाजारपेठेतील संधी व मागणी ओळखून प्रभावी मार्केटिंग व ‘सोशल मीडिया’चा वापर करीत या अळिंबीला चांगली बाजारपेठ तयार करण्यास सुरुवात केली आहे.

 ‘ॲग्रिकल्चर बीटेक’ची पदवी घेतलेल्या अनंत पारकर (फोंडाघाट, जि. सिंधुदुर्ग) या तरुणाने धिंगरी अळिंबी निर्मिती व्यवसाय सुरू केला आहे. कोकणातील बाजारपेठेतील संधी व मागणी ओळखून प्रभावी मार्केटिंग व ‘सोशल मीडिया’चा वापर करीत या अळिंबीला चांगली बाजारपेठ तयार करण्यास सुरुवात केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट हे शहर पूर्वी जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ मानली जात होती. दळणवळणाची सुविधा कमी असल्याने घाटपायथ्याला असलेल्या या शहरातून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेतील व्यापारी गरजेनुसार माल घेऊन जात. त्यामुळे या बाजारपेठेला ऐतिहासिक नावलौकिक आहे. येथील शेतकऱ्यांचे भात हे मुख्य पीक आहे. शहरातील जुना बाजार येथे अनंत पारकर हा युवा शेतकरी आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. त्याने ‘ॲग्रिकल्चर बीटेक’पर्यंतचे शिक्षण माणकीपालवण (ता. चिपळूण) येथून पूर्ण केले. त्या दरम्यान बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांशी त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर अनेक विषयांवरील चर्चेत झाले. त्यातून अळिंबी व्यवसायाला असलेला वाव पुढे आला.

अळिंबी व्यवसायाचा श्रीगणेशा
‘बीटेक’च्या अखेरच्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये कार्यानुभवाचे पाठ घ्यावे लागतात. अनंतने आपल्याच भागातील आंब्यावर प्रकिया करणाऱ्या कंपनीची निवड केली. तेथील अनुभव घेत असताना घरी आल्यावर तो अळिंबी उत्पादनाचाच विचार करायचा. या कालावधीत त्याने पुणे जिल्ह्यातील एका खासगी कंपनीत एक दिवसाचे त्यासंबंधीचे प्रशिक्षण घेतले. येताना अळिंबीचे बीज घेऊनच तो परतला. दिवसभर तो कंपनीत काम करायचा. सायंकाळी घरी आल्यानंतर अळिंबी व्‍यवसायातील कच्चा माल असलेले गवत वाळविणे, त्याचे निर्जंतुकीकरण, बेड तयार करणे ही कामे तो करीत असे.

व्यवसायाचा सेटअप
कोणतीही मोठी गुंतवणूक न करता अनंतने स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या साहित्याच्या आधारेच व्यवसाय सुरू केला आहे. भाताचे गवत, प्लॅस्टिक पिशव्या, स्पॉन, आवश्‍यक तापमान स्थिर ठेवण्यासाठी तुषार सिंचन अशी नियोजनबद्ध तयारी केली आहे. कोणतीही मोठी इमारत न बांधता घरातील पडवीचा वापर केला आहे.

पहिले उत्पादन आणि मार्केटिंगचा अनुभव
शिक्षण, मेहनत व मन लावून काम करण्याच्या वृत्तीतून सुमारे २५ दिवसांनंतर अळिंबीची पहिली बॅच उत्पादित झाली. कमी प्रमाणात बॅग्ज असल्याने दोन-तीन किलोपर्यंतच उत्पादन मिळाले. एकदा कंपनीत कामावर जाण्यापूर्वी सकाळी अनंतने मित्राच्या फुलांच्या दुकानात तयार केलेली २०० ग्रॅमची पाकिटे विक्रीसाठी ठेवली. सायंकाळी काम करून परत आल्यानंतर पाहतो तर दिवसभरात एकाच पाकिटाची विक्री झाली होती. तो मनातून नाराज झाला. शिल्लक राहिलेली सर्व पाकिटे घेऊन तो बाजारपेठेत प्रत्येक व्यापाऱ्याकडे गेला. अवघ्या तास- दीड तासात त्याच्याकडील सर्व पाकिटे संपली. या अनुभवामुळे त्याच्यात एक आत्मविश्‍वास निर्माण झाला. आपण स्वतःच विक्री व्‍यवस्था सक्षम बनविली तर बाजारपेठ चांगली तयार करता येईल याची खात्री झाली.

मार्केटिंगसाठी संघर्ष
ऑयस्टर अर्थात धिंगरी अळिंबीचे उत्पादन केले जाते. दर्जेदार आणि रुचकर अळिंबीच्या विक्री व्यवस्थेची निकड भासू लागली. सुरुवातीला स्थानिक बाजारपेठेत विक्री व्हायची. परंतु उत्पादन वाढल्यानंतर जवळच्या कणकवली बाजारपेठेत विक्रीसाठी अनंत जाऊ लागला. शंभर, २०० ग्रॅम जनाची आकर्षक पॅकिंग्ज तयार करून घरोघरी विक्री करण्यावर भर दिला. सुरुवातीला खूप कटू अनुभव आले. काहीजणांना ही अळिंबी माहित नसल्याने ही संकल्पना समजावून द्यावी लागायची. काहीजण ही अळिंबी फारशी खात नसल्याचेही जाणवले. हळूहळू बाजारपेठेतील संधी लक्षात आली. कोणत्या बिल्डिंगमध्ये किती लोक आवडीने खाऊ शकतील, जे खातात त्यांची मागणी कधी असते याचा अभ्यास केला. त्यादृष्टीने ग्राहकांचे नेटवर्क तयार करण्यास सुरुवात केली.

आठवडी बाजार, सोशल मीडियाचा वापर
बीटेकची पदवी अनंत कवटाळून बसला नाही. त्याने आपला माल आठवडी बाजारात उभा राहून विक्री केला. याशिवाय कणकवली बाजारपेठेत रस्त्यावर उभे राहूनही तो माल विकतो. त्याच्या या स्वभावामुळे त्याला मार्केटिंगचा चांगला अनुभव आला. आता तर स्वतःसह आणखी दोन-तीन मित्रांनी उत्पादित केलेल्या मालविक्रीची जबाबदारीही त्याने स्व अंगावर घेतली आहे. मार्केटिंगच्या हेतूने त्यांनी व्हॉटसॲप ग्रुप तयार केला आहे. फेसबुकचा वापरही ते प्रभावीपणे करतात. या माध्यमांचा विक्रीसाठी चांगला उपयोग होत आहे. सफेद, निळ्या, गुलाबी आणि राखाडी (ग्रे) या चार रंगांमध्ये अळिंबीचे उत्पादन घेतले जाते.
त्यास कणकवली, मालवण, राजापूर, वैभववाडी, कुडाळ, देवगड या बाजारपेठांमध्ये चांगली मागणी आहे.

कोकण मशरूम क्लब
तरुणांनी अळिंबी उत्पादनाकडे वळावे या हेतूने अनंत व त्याच्या मित्रांनी एकत्र येत कोकण मशरूम क्लब हा व्हॉटसॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

अतिवृष्टीतील नुकसानीवर उपाय
कोकण असल्याने जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये प्रचंड अतिवृष्टी होते. या कालावधीत आवश्‍यक तापमान राखता आले नाही. त्यामुळे तयार केलेल्या अनेक बेडसमधून बीज उगवण झालीच नाही. त्यामुळे ते फेकून द्यावे लागले. परंतु त्यावरदेखील मार्ग काढला. बेडस ठेवलेल्या जागेत अधिक क्षमतेचे बल्ब लावून खोलीतील तापमान वाढविण्यावर भर दिला. त्यानंतर मात्र नुकसान झाले नाही.

यंत्र तयार केले दीड हजारात
अळिंबी उत्पादनात कच्चा माल म्हणून गवताचा वापर होतो. गवताचे तुकडे केल्यानंतर ते ऑटोक्लेव्ह या यंत्रांत निर्जतुकीकरणासाठी ठेवण्यात येतात. या यंत्राची बाजारातील किंमत काही हजारांपुढे आहे, मात्र एका बॅरेलचा वापर करून त्यामध्ये जाळी तयार करून हे यंत्र आपण केवळ दीड हजार रुपयांत तयार केल्याचे अनंत सांगतो.

व्यवसायातून स्थिरता
कोकणातील ग्राहकांची मानसिकता ओळखून अनंतने सुरू केलेला व्यवसाय आता स्थिरतकडे वाटचाल सुरू करू लागला आहे. आई गुलाब, वडील गुरूनाथ हेदेखील त्याला व्यवसायात मदत करतात. पारकर कुटुंबीय घरगुती कुक्कुटपालनाचा व्यवसायदेखील करतात. त्याचे स्वरूप लहान असले तरी घरगुती खर्च त्यातून भागतो.

अर्थकारण

  • दर आठवड्याला सुमारे ३० किलोपर्यंत तर महिन्याला सुमारे १२० किलो उत्पादन
  • सरासरी मिळणारा दर-३०० ते ३५० रुपये प्रति किलो
  • मासिक उत्पन्न- खर्च वजा जाता- सुमारे २५ हजार रुपये

संपर्क- अनंत पारकर- ७७७५८०७७५८


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार...निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ...
पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भावसातारा जिल्ह्यातील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील...
अजून एक ‘बारामती पॅटर्न’कार्यालय आम्हाला घरच्यासारखे वागवते, कर्मचारी...
‘तारीख पे तारीख’ किती दिवस?देशाचे पंतप्रधान दमदार भाषणात जनतेला आश्‍वासन...
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
थंडीत वाढ होण्याची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ...
तुरीला दराची झळाळीनांदेड : तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक...
इथे १५ मिनिटांत सोडवला जातो प्रश्‍न !पुणे : ‘‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही...
राज्यात साखरेचा महापूरपुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर...
तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना घातली...माळेगाव, जि. पुणे ः भरडधान्य उत्पादन,...
अद्याप ४१२ लाख टन ऊसगाळप बाकीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४...
कामे व्यवस्थित करा, अन्यथा पगारातून...पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)...
सरकारचा पसारा आवरासरकार कोणत्याही देशातला एक महत्त्वाचा घटक असतो....