agriculture story in marathi, Agriculture college has taken initiative to control corn fall army worm & started integrated approach of IPM at mass level. | Agrowon

लष्करी अळीच्या सामूहिक नियंत्रण कार्यक्रमाचा आदर्श, नाशिक जिल्ह्यातील २० गावांत  यशस्वी अंमलबजावणी  सहाशेहून अधिक शेतकरी झाले जागरूक  

मुकुंद पिंगळे, संतोष मुंढे
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

माझ्या शेतात अळीने नुकसान केले होते. मात्र त्याविषयी अधिक माहिती नव्हती. एकात्मीक कीड नियंत्रण विषयावरील बैठकीत पूर्ण माहिती मिळाली. अळीचे नियंत्रण कसे करावे या बाबतचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. शेतात कामगंध तसेच प्रकाश सापळे लावण्यात आल्याने किडीचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे केवळ रासायनिक फवारणीपेक्षा एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्र आत्मसात करणे शक्य झाले. 
- भगीरथ गरुड, मका उत्पादक, लोणवाडी ता. निफाड 

अमेरिकन लष्करी अळीने मका पिकात संपूर्ण राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. अळीचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने तातडीची पाऊले उचलली. महाविद्यालयातील कीटकशास्त्र विषयातील प्राध्यापकांनी आपल्या सुमारे १३२ विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून त्यांच्या मदतीने तीन तालुक्यातील २० गावांत ‘आयपीएम स्कूल’ नावाने एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापन प्रकल्प राबवला. त्यातून सहाशे ते आठशे शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व प्रबोधन झालेच. शिवाय त्यांच्या शेतात प्रात्यक्षिके राबवून पुढील कीड नियंत्रणाचा मार्गही सुकर करण्यात आला. 

अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) या अळीने राज्यातील मुख्य मका व सोबत ऊस, ज्वारी, बाजरी आदी पिकांतही आक्रमण केले आहे. या अळीने मका उत्पादकांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. नाशिक जिल्हाही त्यास अपवाद नाही. अनेक शेतकऱ्यांना अळीच्या गंभीर प्रादुर्भावामुळे मक्याचे प्लॉटच काढून टाकणे भाग पडले. नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने ही गंभीर स्थिती लक्षात घेतली. केवळ मार्गदर्शन करण्यापुरते न राहाता शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवून या अळीचे आक्रमण थोपवण्यासाठी पावले उचलली. 

प्रत्यक्ष कृती कार्यक्रम- 

नाशिक जिल्हा- मका पीक दृष्टिक्षेपात - 

 • जिल्ह्यातील एकूण मका लागवड- २ लाख, ९ हजार, ८५६ हेक्टर 
 • अळीमुळे प्रादुर्भाव झालेले क्षेत्र- -४९ हजार ९९३ हेक्टर 
 • बाधित शेतकरी :-३६ हजार ६७५ 
 • जिल्ह्यातील प्रादुर्भावग्रस्त गावे- ७६६ 

जिल्ह्यातील तीन तालुके व त्यातील २० गावे कार्यक्रमासाठी निश्‍चित केली. ती अशी. 

 •  चांदवड- वडनेर भैरव, पिंपळनारे, धोंडगव्हाणवाडी, बहादुरी 
 •  निफाड- बेहेड, कारसुळ, लोणवाडी, दावचवाडी, पालखेड मिरची, पचकेश्वर, नांदुर्डी, वनसगाव, शिवडी, उगाव खेडे 
 •  दिंडॊरी- तिसगाव, सोनजांब, खेडगाव, जऊळके वणी 

असा राबवला प्रकल्प- 
पहिला टप्पा- पूर्वनियोजन, विद्यार्थी प्रशिक्षण 

महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाचे तज्ज्ञ व सहायक प्राध्यापक तुषार उगले यांनी संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना व रूपरेषा तयार केली. मागील वर्षीही लष्करी अळीचा प्रादुर्भाव होताच. त्याचा सारा अभ्यास करून यंदाच्या खरिपातही प्रादुर्भाव होणार ही शक्यता गृहीत धरली. त्यानुसार मे महिन्यातच पूर्वनियोजन सुरू केले. 
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची युवा ऊर्जा वापरण्यास मोठी संधी होती. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (रावे) विद्यार्थ्यांना गावे व शेतकरी वाटप करण्याचे ठरले. अळीचे नियंत्रण करण्यासंबंधीचे प्रशिक्षण या विद्यार्थ्यांनाही देण्यात आले. यामध्ये प्रा. उगले यांच्यासह कीटकशास्त्र विभागातील अशॊक मोची, कांचन शेटे यांनी मार्गदर्शन केले. लष्करी अळीचा प्रसार, तिचा जीवनक्रम, विविध अवस्थांची ओळख, नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना आदी माहिती देण्यात आली. खासगी कंपनीच्या प्रतिनिधींची मदत घेऊन त्यांचेही लेक्चर आयोजित केले.  कार्यक्रमाला ‘आयपीएम स्कूल’ (एकात्मिक कीड व्यवस्थापन) असे नाव देण्यात आले. 

दुसरा टप्पा – साहित्य उपलब्धता 
माहितीपत्रके 

शेतकऱ्यांना तांत्रिक माहितीपत्रके देण्याची गरज होती. मात्र, त्यासाठी बराच खर्च लागणार होता. नाशिक येथील अनंतवर्षा फाउंडेशनचे अनंत व सौ. वर्षा या बनसोडे दांपत्याने भित्तीपत्रके, घडीपत्रिका आदी स्वरूपाच्या साहित्यासाठी खर्च उचलला. अळीच्या सर्वेक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कामगंध सापळे व त्यासाठी ल्यूर्सची गरज होती. नाशिक येथील उद्योजक महेश सोनकुळ यांनी ही या बाबी मोफत पुरवण्याची जबाबदारी उचलली. 

तिसरा टप्पा- प्रकल्पाचे कामकाज 
१) यंदा नाशिक भागात पाऊस उशिरा सुरू झाला. त्यामुळे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून मका लागवड सुरु झाली. द्राक्षपट्ट्यातील मका उत्पादकांसाठी बैठका व चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. यासाठी महाविद्यालयाच्या कृषी विस्तार विभागाच्या प्रा. परमेश्वरी पवार, प्रा. नेहल भोकनळ, प्रा. विक्रम कोरडे यांचे सहकार्य लाभले. 

२) वीस गावे कार्यक्रमात निश्‍चित केली होती. प्रत्येक गावात पाच असे वीस गावांमध्ये शंभर सापळे लावण्यात येणार होते. त्यासाठी गावातील प्रत्येक समूहातील एक विद्यार्थी गटप्रमुख म्हणून नेमला. कामाच्या जबाबदाऱ्या व कार्यपद्धती समजावून त्यांना समजून देण्यात आली. 
त्यानुसार विद्यार्थ्यांनी सापळे उभारण्यास व शेतकऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. 

३)गावनिहाय व सापळानिहाय अळी प्रादुर्भावाची शास्त्रीय निरीक्षणे घेण्यात येऊ लागली. दर चार दिवसांनी सापळ्यात अडकलेल्या पतंगांची संख्या मोजण्यात येऊ लागली. त्यांच्या नोंदी ठेवण्यात आल्या. काही ठिकाणी सापळ्यात सहा, सात काही ठिकाणी १० तर काही ठिकाणी १५ ते ३० पर्यंतही पतंग अडकल्याचे आढळले. 

४) प्रत्येक सापळा कोणत्या क्षेत्रात लावला आहे त्याची निश्चिती होण्यासाठी ‘जीपीएस’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यासाठी विशिष्ट ॲपचा वापर करण्यात आला. प्रत्येक भागातील सापळ्यात सापडलेले पतंग, त्या वेळची हवामान स्थिती हा अभ्यासही करण्यात येणार आहे. त्यासाठी परिसरातील संशोधन संस्था हवामान केंद्रांकडील तपशीलाचा आधार घेण्यात येणार आहे. 

वापरण्यात आलेले घटक 

 • कामगंध सापळे – प्रत्येक गावात ५ 
 • गरजेनुसार प्रकाश सापळे, पक्षीथांबे, जैविक व रासायनिक कीटकनाशके 

विद्यार्थ्यांचा राहिला मुख्य सहभाग 

 • विद्यार्थ्यांनी प्रत्येक गावात भित्तीपत्रके, घडीपत्रिका यांचे वितरण केले. 
 • प्रत्येक गावात शेतकरी माहिती कट्टा स्थापन केला. त्याद्वारे अ‍ॅग्रोवनमध्ये प्रकाशित झालेले एकात्मिक कीड व्यवस्थापन तसेच लष्करी अळी नियंत्रणासंबंधीचे लेख व कात्रणे यांच्या सहाय्याने शेतकऱ्यांना माहिती पुरविली. 
 • कामगंध सापळे, पक्षी थांबे, प्रकाश सापळे, निंबोळी अर्कनिर्मिती व फवारणी प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना करून दाखविली. 
 • किडीच्या विविध अवस्थांची ओळख प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना करून दिली. 
 • गंध सापळ्यात अडकणाऱ्या पतंगांची निरीक्षणे नियमित घेण्याबरोबर अडकणाऱ्या पतंगाच्या संख्येनुसार शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. 
 • जैविक व रासायनिक कीटकनाशकांचा संतुलीत वापर करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले. 
 • शेतकऱ्यांच्या सोयीनुसार संध्याकाळी गाव पातळीवर बैठकीचे आयोजन करणे व ‘प्रेझेंटेशन’च्या माध्यमातून तज्ञांद्वारे मार्गदर्शन 
 • मका पिकासह अन्य पिकांवर लष्करी अळीच्या संभाव्य प्रादुर्भावाची नोंद घेणे. 
 • मका पिकातील मित्रकीटक, परोपजीवी जिवाणू-बुरशी यांचा अभ्यास 
 • -हवामानात होणारे बदल व लष्करी अळीचा प्रादुर्भाव यातील परस्पर संबंध यावर काम 
 • अळी प्रादुर्भावाच्या तीव्रतेच्या नोंदी प्रत्येक आठवड्यात घेऊन त्या संबधित प्रकल्पातील समन्वयकांना कळविल्या. 

सोशल मीडियाचा प्रभावी वापर : 
कार्यक्रमांतर्गत गावांतील कामाचा दैनंदिन अहवाल, नोंदी व अन्य माहिती यांचे आदानप्रदान होण्यासाठी ‘IPM School for FAW’ (लष्करी अळीसाठी आयपीएम स्कूल) नावाने व्हॉटस ॲप ग्रुप तयार करण्यात आला. यामध्ये प्रत्येक गावातील समूहाचा गटप्रमुख, तज्ज्ञ व महाविद्यालयातील प्राध्यापक समाविष्ट आहेत. त्यामुळे दैनंदिन संवाद सुलभ झाला. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही तत्काळ होण्यास मदत झाली. 

कार्यक्रमातील निरीक्षणे 

 • मक्याच्या काही शेतांमध्ये लष्करी अळीचे नियंत्रण मित्रबुरशींद्वारे झाल्याचे आढळले. 
 • प्राथमिक निरीक्षणावरून ही बिव्हेरिया बॅसियाना किंवा नोमुरिया रिले बुरशी असावी असा अंदाज आहे असे सहायक प्राध्यापक तुषार उगले यांनी सांगितले. ॲपेंटीलीस मित्रकिटकाचीही नोंद झाल्याचे ते म्हणाले. सध्याच्या आद्रतायुक्त वातावरणात जैविक कीटकनाशकांच्या वापराला अधिक वाव असल्याचे दिसून आले. रासायनिक कीटकनाशकांचा वापर किडीच्या संवेदनशील अवस्थेत वापर केल्यास फायदा दिसून आला. 
 • सापळ्यात नर पतंग अडकल्याने मादीशी मिलन न झाल्यामुळे मादीकडून अंडी घालण्याची क्रिया मंदावते. सायंकाळी ६ ते रात्री १० या दरम्यान पतंग प्रकाश सापळ्यात अडकले. 
 • -पक्षी थांब्याच्या परिसरात अळीचा प्रादुर्भाव कमी दिसून आला. 
 • अळीच्या सुरवातीच्या अवस्थेत पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी घेतल्यास अधिक फायदा 
 • होतो. 

कार्यक्रमाचे फलित 

 • कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे ६०० ते ८०० शेतकऱ्यांचे लष्करी अळीविषयी प्रबोधन झाले. तर सुमारे १३२ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामांचा अनुभव मिळाला. 
 • कामगंध सापळ्यांचा वापर करण्याचे तंत्र शेतकरी शिकले. त्यातून फवारणी केव्हा करायाची याचाही अंदाज आला. त्यामुळेच पुढे एका शेतकऱ्याने स्वखर्चाने गंध सापळे घेऊन त्यांचा आपल्या शेतात वापर केला. 
 • एकात्मिक कीड व्यवस्थापन संकल्पना शेतकऱ्यांमध्ये रुजली. 
 • रासायनिक कीडनाशकांसोबतच जैविक घटकांच्या वापरावरही शेतकऱ्यांनी भर दिला. 

प्रतिक्रिया 
मका पिकावरील लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अक्षरशः बेजार झाले होते. यावर कामगंध सापळ्यांचा वापर व फायदे समजले. सापळ्यांचा वापरामुळे नेमके कोणते कीटक त्याकडे आकर्षित होतात याचा अभ्यास करता आला. सापळ्यामुळे अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे शक्य झाले. 
- संजय आवारे, मका उत्पादक, वडनेर भैरव, ता. चांदवड 
संपर्क- ९९२२८५२८१९ 
 

लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर व जैविक फवारण्या किती उपयुक्त आहेत त्याचे महत्त्व पटवून देण्याचे काम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यनी केले. 
त्यातून कमी खर्चात वापरात येणारे तंत्रज्ञान माहित झाले. 
-पंडितराव चौरे, मका उत्पादक , धोंडगव्हाण, ता. चांदवड 

संपर्क-तुषार उगले- ९४२०२३३४६६ 
(सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, के. के. कृषी महाविद्यालय, नाशिक) 

 
साडेसातशे एकरांत साडेसात हजार गंध सापळे 
उत्कृष्ट कापूस सुधार प्रकल्पांतर्गत कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण प्रभावी करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्या अनुषंगाने एकाच गावात साडेसातशे एकर कपाशी क्षेत्रावर कामगंध सापळे उभारून पतंगांना मोठ्या प्रमाणात अडकवण्याचा (‘मास ट्रॅपींग’) प्रयोग झाला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. सुरवातीला सापळ्यात तीन- चार संख्येने अडकणाऱ्या पतंगांची संख्या आता महिन्याला दहा-बाराच्या पुढे गेली आहे. 

कायमस्वरूपी नियंत्रणाकडे 
गुलाबी बोंड अळीचं दरवर्षी येणारं संकट पाहाता जालना- खरपूडी कृषी विज्ञान केंद्राने सजगता बाळगली. गेल्यावर्षी वखारी येथे चार ते पाच एकरांत लावलेल्या सापळ्यांपैकी काही सापळे उन्हाळ्यात पीक नसतांनाही कायम ठेवले. शिवाय बदनापूरच्या जिनिंग मिलमध्येही त्यांची उभारणी केली. वखारी येथील शेतातील सापळ्यातं उन्हाळ्यात गुलाबी बोंड अळीचा एकही पतंग आढळून आला नाही. परंतु, साधारणत: २८ जूनच्या सुमारास पाऊस झाल्यानंतर १२ जुलैपासूनच सापळ्यांमध्ये पतंग अडकायला सुरवात झाली. हा धोका ओळखून मग वखारी येथेच साठ एकरांत व वानडगाव येथेही एकाच वेळी 'मास ट्रॅपींग' चा प्रयोग राबविला. त्यानुसार १८ जुलैला गावशिवारा एकूण साडेसातशे एकरांवर प्रति एकरी दहा या प्रमाणात एकाच वेळी साडेसातहजार गंध सापळे लावण्यात आले. सुरवातीला त्यात तीन ते चार संख्येने पतंग अडकायचे. परंतु, पुढे ही संख्या दहा-बारांवर पोचली. आता गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाबाबत जागरूक झालेले वानडगावचे शेतकरी सापळे, त्यामधील ल्यूर्स व शिवारात होणाऱ्या किडींच्या हालचालीवर बारीक नजर ठेवून आहेत. गरजेनुसार ल्यूर बदलण्याचे कामही ते करताहेत. 

या प्रयोगातील ठळक बाबी 

 • एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगंध सापळे लावण्याचा दिशादर्शक प्रयोग. 
 • सामूहिक उपाययोजनांमधून गेल्या खरीपात गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण मिळविल्याचा अनुभव 
 • गेल्या हंगामात कडेगाव येथे दहा एकरांवर तर वखारी येथे ६० एकरांवर प्रयोग. 
 • कृषी महाविद्यालय खरपूडी येथील विद्यार्थी, ‘बीसीआय’ प्रकल्पातील कर्मचारी व शेतकऱ्यांचे मिळाले सहकार्य 

संपर्क- अजय मिटकरी 
विषय विशेषज्ज्ञ, कीटकशास्त्र, केव्हीके, खरपूडी, जि. जालना. 
संपर्क- ७३५००१३१४७
 

चार एकरांत गंध सापळे लावले. त्यातून बोंड अळीच्या आक्रमणावर मोठं नियंत्रण आलं. कपाशी सध्या पाते अन्‌ बोंड अवस्थेत आहे. आतापर्यंत केवळ दोनच फवारण्या केल्या आहेत. 
-अंकुश नागवे-९५५२०५९९६४ 
वानडगाव, जि. जालना. 

लष्करी अळीचे नियंत्रण 
मराठवाड्यात मका पिकाखाली अडीच लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यात व त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात आहे. दोन्ही जिल्हे मका पिकाचे आगर मानले जातात. या भागातही अमेरिकन लष्करी अळीने थैमान घातले आहे. खरपूडी कृषी विज्ञान केंद्रातर्फे या अळीलाही रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जालना जिल्ह्या घनसावंगी तालुक्‍यांतर्गत दैठणा बु. येथील गोरख धांडे या युवा शेतकऱ्याने त्यासंबंधी केलेले नियोजन असे. गोरख यांची १५ एकर शेती आहे. सहा एकर कपाशी व चार एकर सोयाबीन आहे. यंदा पहिल्यांदाच खरिपात एक एकर मक्याची जोड दिली. पंधरवड्यातच लष्करी अळीने आक्रमण केल्याचे त्यांना कळले. केव्हीकेचे अजय मिटकरी यांनी किडीची ओळख, जीवनक्रम, नुकसान व नियंत्रणासाठी करावयाच्या उपायांची माहिती गोरख यांना दिली. केवळ माहिती देण्यापुरते मर्यादीत न राहता एकरात दोन कामगंध सापळे अळीसाठीच्या ल्युरसह दिले. थायामेथोक्झाम व लॅंबडा साहहॅलोथ्रीन या संयुक्त कीटकनाशकाचे ५ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणीचा सल्ला दिला. पुन्हा पंधरा दिवसांनी तीच फवारणी घेतली. सध्या अळीचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आहे. त्यातून मक्याचं उत्पादन चांगलं मिळेल अशी गोरख यांना आशा आहे. 

संपर्गोक- गोरख धांडे- ९६७३१६७५०५ 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
विदर्भ, मराठवाड्यात उद्यापासून पावसाची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण...
सूक्ष्म सिंचन अनुदानात वाढपुणे ः केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन...
मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
भाजपच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने...मुंबई ः या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे...
‘कथनी आणि करणी’त फरक पुन्हा उघडपुणे : आधीच अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या...
बाजाराचा अंदाज घेऊनच सोयाबीन विक्री करापुणे : सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
लातुरात सोयाबीनच्या भावात तीनशेची घसरणलातूर ः खाद्यतेल आयात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर...
आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक...मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
मॉन्सूनचा महाराष्ट्रातून निरोपपुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...
रब्बीसाठी बियाणे पुरवठादार म्हणून...अकोला ः येत्या रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न...
खाद्यतेल आयातशुल्कात मोठी कपातपुणे : काही केल्या खाद्यतेलाचे दर कमी होत नाही...
अतिवृष्टिग्रस्तांसाठी १० हजार कोटीमुंबई ः राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे...
‘सीसीआय’ करणार खुल्या बाजारातून कापूस...नागपूर ः आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणामी...
प्रयत्नशील व प्रयोगशीलतेचा पडूळ...लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी...
पंढरपुरात पूरस्थितीसोलापूर ः नीरा व भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेल्या...
कृषी प्रवेशप्रक्रिया ‘सीईटी’कडेच पुणे ः कृषी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी...
साडेतीन हजार कोटींसाठी साखर...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकविलेली...