फळबागेत आच्छादन, हलकी छाटणी आवश्यक...

फळबागेत ठिबक सिंचन आणि पाचटाचे आच्छादन करावे. मडका सिंचनाने पाणी द्यावे
फळबागेत ठिबक सिंचन आणि पाचटाचे आच्छादन करावे. मडका सिंचनाने पाणी द्यावे

फळबागेत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादन किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. झाडाची हलकीशी छाटणी करून पाने, फळांची संख्या कमी केल्यास याद्वारे होणारे पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन झाडे जगविता येतात. आच्छादनाचा वापर

  • जमिनीतील पाणी बाष्पीभवनाद्वारे झपाट्याने कमी होते. जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादन किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. ४० ते १०० मायक्रॉन जाडीच्या पॉलिथीन किंवा मॅट मल्चिंगचा आच्छादनासाठी वापर करून कमीत कमी पाण्यात फळबागा जगविता येतात.
  • आच्छादनाचा वापर बाष्पीभवन थांबविणे आणि तण नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. सेंद्रिय पदार्थांमध्ये तुरकाठ्या, सोयाबीन भुसा, धसकटे, वाळलेले गवत, भाताचे काड, कडीकचरा इत्यादीचा ७ ते ८ सेंमी जाडीचा थर झाडाजवळ केल्यास बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. झाडे जगण्यास व जमीन भेगाळण्याची तीव्रता कमी होण्यास मदत मिळते.
  • मडका सिंचन

  • फळझाडाच्या आळ्यात मडके पुरावे. कमी वयाच्या फळझाडासाठी १५ लिटर क्षमतेचे मडके वापरावे.
  • मडक्‍याच्या तळाशी लहान छिद्र पाडून त्यात कापसाची वात बसवून झाडाच्या मुळांच्या जवळ पाणी देता येते.
  • मडक्‍याच्या वापरामुळे झाडांच्या तंतूमय मुळांना पुरेसे पाणी उपलब्ध होऊन झाडे जिवंत राहतात.
  • मडक्‍यात पाणी भरून ठेवल्यावर त्यावर झाकण ठेवावे. झाडाचे वय आणि विस्तारानुसार आळ्यातील मडक्‍यांची संख्या ठरवावी.
  • ठिबक सिंचनाचा वापर

  • उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर आहे.
  • बाष्पीभवन टाळण्यासाठी ठिबक सिंचनाबरोबरीने आच्छादनाचा वापर करावा.
  • झाडाचा विस्तार लक्षात घेता ड्रीपर्सची संख्या ठरवावी. साधारपणपणे संत्रा, मोसंबीच्या एक वर्षाच्या झाडाला प्रतिदिन १४ लिटर पाणी द्यावे. दोन वर्षांच्या झाडाला दुप्पट प्रमाणात प्रतिझाड पाणी द्यावे.
  • ठिबकखाली आच्छादन केल्यास आंबिया बहराची फळगळदेखील कमी होण्यास मदत मिळते. बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहतो.
  • शेततळ्यातील पाण्याचा वापर

  • ज्या ठिकाणी शेततळ्यामध्ये पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी फळबागांना संरक्षित पाणी द्यावे.
  • शेततळ्यातील पाण्याचा अतिशय काटकसरीने वापर करावा. एक संरक्षक पाणी दिल्यास रब्बी, जिरायती पिकातील उत्पादन ५० ते ६० टक्के वाढल्याचे आढळून आले आहे.
  • साठविलेल्या पाण्याचा सिंचनासाठी वापर करताना सूक्ष्मसिंचन पद्धतीचा वापर करावा.
  • हायड्रोजेलचा वापर

  • प्रति फळझाडास ३० ते ५० ग्रॅम हायड्रोजेलचा वापर करून उपलब्ध पाण्यावर झाडे जगू शकतात.
  • चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत ५ ते १० किलो घेऊन त्यात ३० ते ५० ग्रॅम हायड्रोजेल व्यवस्थित मिसळावी. झाडाला ज्या ठिकाणी पाणी देण्यात येते त्या ठिकाणी १५ ते २० सेंमी रुंदी व १० ते १५ सेंमी खोलीचा चर घेऊन हे मिश्रण टाकून मातीने झाकावे. हायड्रोजेलमध्ये त्याच्या वजनाच्या १०० पट पाणी टिकवून धरण्याची क्षमता असते.
  • सलाइन बाटलीचा वापर

  • ठिबक सिंचनासाठी पाणी कार्यक्षमतेने वापरण्यासाठी आणि अगदी झाडाच्या मुळाजवळ देण्यासाठी सलाइन बाटलीचा वापर करावा.
  • सलाइन बाटलीमध्ये पाणी भरून फांदीच्या आधाराने झाडावर टांगून ठेवावे. बाटलीच्या नळीचे टोक झाडाच्या मुळांजवळ जमिनीच्या वरच्या थरात ठेवावे.
  • नवीन लागवड केलेल्या फळझाडास या पद्धतीने पाणी दिल्यास झाडे कमी पाण्यात जगविता येतात.
  • झाडाचा पानोळा/फळसंख्या कमी करणे

  • टंचाईच्या काळात झाडांच्या पर्णरंध्रांतून बाष्पीभवनाद्वारे पाण्याचा होणारा ऱ्हास कमी ठेवण्यासाठी कॅनाॅपीचे व्यवस्थापन करावे.
  • अधिकच्या फांद्या काढून फळफांद्या वाढविण्यावर भर द्यावा. झाडाची हलकीशी छाटणी करून पाने, फळांची संख्या कमी केल्यास याद्वारे होणारे पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन झाडे जगविता येतात.
  • मोसंबीवरील पाणसोट (वॉटरशूट) पूर्णतः काढल्यास झाडे सशक्त राहून पाण्याची बचत होते.
  • झाडावरील पानांमधून पाण्याचे उत्सर्जन होत असते. पानांवरील पर्णरंध्रे पाणी बाहेर टाकत असतात. त्यामुळे झाडांची वयानुरूप हलकी छाटणी करून पाने, फळांची संख्या कमी केल्यास पानांमधून निघून जाणारे पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
  • कमी ओलीत असणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून फळसंख्या मर्यादित ठेवावी.
  • छाटणी करताना फांद्या पिचू नयेत यासाठी धारदार सिकेटचा वापर करावा. मर्यादेपेक्षा जादा पानोळा छाटू नये.
  • पाण्याची फवारणी

  • फळबागेत दररोज सकाळ - संध्याकाळ अल्प प्रमाणात पाण्याची फवारणी केल्याने पानांचे तापमान कमी होण्यास मदत होते, त्यामुळे पानांतील पाण्याचे उत्सर्जन कमी होते.
  • फवारणी करताना पाण्याच्या बरोबर एक टक्का युरिया (१०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) आणि एक टक्का पालाश (१०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) याची फवारणी केल्यास प्रकाशसंश्‍लेषणाची क्रिया वाढीस लागते. त्यामुळे पर्णरंध्राच्या उघडीवर नियंत्रण होते. पेशींची जलसंधारण क्षमता वाढीस लागून बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी होऊन पाणी बचत होते.
  • फळपिकांचे वय लक्षात घेता कमीत कमी पाण्यात जगण्याची झाडाला सवय लावावी.
  • बोर्डो पेस्टचा वापर फळझाडांच्या खोडास बोर्डो पेस्टचा लेप (१ किलो मोरचूद + १ किलो कळीचा चुना + १० लिटर पाणी) लावावा. यामुळे सूर्यकिरणे परावर्तित होतात. तसेच, झाडाचे बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होण्यास मदत होते. बाष्परोधकांचा वापर

  • पर्णरंध्रातून होणारे पाण्याचे उत्सर्जन नियंत्रित करण्यासाठी व प्रकाश संश्‍लेषणाचा वेग योग्य तो राखण्यासाठी ५ ते ८ टक्के केओलीन (५०० ते ८०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी) या पर्णोत्सर्जानाची फवारणी वीस दिवसांच्या अंतराने करावी.
  • मोसंबी झाडावर ५ टक्के केओलिनची (५०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी) फवारणी करावी.
  • रोपावर शेडनेटची सावली

  • रोपवाटिकेतील कलमे तसेच नवीन लागवड केलेल्या कलमांचे प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी त्यावर शेडनेटची सावली करावी.
  • सावली केल्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होण्यास मदत मिळून कलमे, रोपे जिवंत राहण्यास मदत होईल.
  • खोडास गवत/ बारदाना बांधणे सध्याच्या काळात खोडावर प्रखर सूर्यप्रकाश पडत असल्यामुळे खोडास इजा पोचू शकते. तसेच, खोड तडकण्याचीदेखील शक्‍यता असते. त्यासाठी खोडाच्या संपूर्ण भागावर गवत किंवा बारदाना सुतळीच्या साहाय्याने घट्ट बांधावा.   पोटॅशियम नायट्रेटची फवारणी फळझाडांच्या पानांद्वारे होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी १ ते १.५ टक्के पोटॅशियम नायट्रेटची (१०० ते १५० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी) फवारणी करावी. संपर्क ः डॉ. संजय पाटील, ९८२२०७१८५४ (केसर आंबा गुणवत्ता केंद्र, हिमायत बाग, औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com