आदिवासींच्या विकासासाठी झपाटलेला प्रयत्नवादी..!

जितीन साठे यांनी शेतकऱ्यांत भात पिकातील तंत्रज्ञानाचा प्रसार केला आहे.
जितीन साठे यांनी शेतकऱ्यांत भात पिकातील तंत्रज्ञानाचा प्रसार केला आहे.

सुधारणा, बदल, प्रगती याबाबी स्वत:हून होत नाहीत. कोणीतरी याकरिता प्रयत्न करावे लागतात. ते व्यक्तीगत असतील तर सर्वच जण प्राधान्य देतात. मात्र, सामाजिक असतील तर अपवादच असतो. २५ वर्षांपासून आदिवासी विकासाच्या ध्येयाने झपाटलेलं ‘जितीन साठे’ असेच एक प्रयत्नवादी नाव..   नाशिक विभागातील आदिवासी भागातील सुमारे शंभर ते सव्वाशे गावांत विविध विकास प्रकल्प सुरू आहेत. अशिक्षित आणि विकासापासून दुर्गम भागातील शेतकरी कुटूंबे, मुले, शाळा व महिला विकासातून सन्मानासाठी ‘बायफ’ संस्था कार्यरत आहे. याच माध्यमातून जितीन साठे आपल्या बायफमधील सहकाऱ्यांसोबत काम करत आहेत. केवळ नोकरीला नोकरी न समजता हजारो सामान्य आदिवासी, कष्टकरी शेतकरी कुटुंबातील महिलांच्या माध्यमातून ग्राम विकासाचे काम त्यांनी उभ केलेय. साठे यांच्या कामातील सकारात्मकेमुळे आदिवासी कुटुंबांना आणि महिलांना समाजिक सन्मान मिळू पाहत आहे. नगर जिल्ह्यामधील दुष्काळी पारनेर तालुक्यातील हंगा येथील जितीन साठे हे आदिवासी भागात ‘बायफ’ संस्थेच्या माध्यमातून पंचवीस वर्षांपासून अविरत काम करत आहेत. साठे यांनी १९९५ मध्ये ‘बायफ’चे विद्यमान अध्यक्ष गिरीष सोहनी व माजी अध्यक्ष डॉ. एन. जी. हेगडे, डॉ. ए. बी. पांडे यांच्या मार्गदर्शनाने उरूळिकांचन (पुणे) तसेच गुजरातमधील डांग व वासदा या आदिवासी भागात सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन जव्हार (जि. ठाणे) येथे आदिवासी भागात कामाला सुरुवात केली. जव्हार भागात वरिष्ठ अधिकारी सुधीर वागळे, अरुण गोखले, गुलाब राडे यांनी कामाची माहिती दिली. या भागातील ‘गरिबी, कुपोषण, उपासमारी कमी करण्यावर काम केले. १९९९ पासून अकोले तालुक्यात कामाला ‘बायफ’च्या माध्यमातून सुरुवात करत आदिवासी भागातील कुटूंब केंद्रस्थानी ठेवून त्यांना रोजगार, शेतीविषयक प्रशिक्षण, कौटुंबिक सुधारणा, शिक्षण, आरोग्य आदी बाबींवर काम केले. त्यामुळे अनेक अशिक्षित महिलांचे वेगवेगळे काम समाजासमोर आले आहे. २०१० पासून जितीन यांचे नाशिक विभागाचे समन्वय अधिकारी म्हणून ‘बायफ’मध्ये काम सुरू आहे. अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील शेवटच्या टोकाला असलेले घाटघर असो की पाचपट्टा, तिरडे, कोकणवाडी, मान्हेरे, कोंदणी, लाडगाव, कोंभाळणे, रतनवाडी, साम्रद असो. जितीन साठे यांच्या आदिवासी भागातील सकारात्मक कामामुळे ते प्रत्येक कुटूंबातील सदस्य झाले आहेत. आदिवासी भागात भाताचे सर्वाधिक पीक घेतले जाते. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीएवजी कमी खर्चात येणारे ‘एसआरटी’ तंत्रानुसार पीक घेण्यासाठी दोन वर्षांपासून काम सुरू केले आहे. यंदा सुमारे शंभर शेतकऱ्यांनी ही पद्धत अवलंबली.     राहिबाई, ममताबाईची, शांताबाई यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल अकोले तालुक्याच्या आदीदिवासी दुर्गम भागातील कोंभाळणेच्या बीजमाता राहिबाई पोपेरे आणि परसबाग व शेंद्रिय शेती संकल्पनेतून काम करणाऱ्या देवगावच्या ममताबाई भांगरे, आंबेवंगणच्या शांताबाई धांडे, सोनाबाई भांगरे, हिराबाई भांगरे, हिराबाई गभाले यांचे काम केवळ जितीन साठे व त्यांच्या टिमच्या प्रयत्नातूनच पुढे आले आहे. राहिबाई पोपेरे यांच्याकडे असलेल्या विविध देशी वाणांची साठे यांनी सर्वप्रथम नोंद घेतली व त्यांचे काम जगासमोर आले. राहीबाई यांना २०१५ मध्ये ‘बायफ’ने ‘आदर्श शेतकरी’ पुरस्काराने तर यंदा (२०१९) राष्ट्रपती रामानाथ कोविंद यांच्या हस्ते भारत सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाचा नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजीमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून राहीबाई यांना बियाणे संवर्धनासाठी बीज बँक बांधून दिली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी राहिबाईना ‘मदर ऑफ सीड्‌स’ या नावाने गौरविले आहे. जागतिक दर्ज्याच्या कांस फिल्म फेस्टिवल मध्ये राहीबाई यांच्या कार्यावर आधारित लघुपटाला जगातील तिसरे परितोषिक मिळाले. देवगाव येथील ममताबाई भांगरे यांनी बचतगटाच्या चळवळीतून सेंद्रिय शेती आणि परसबाग संकल्पना देश पातळीवर नेली आहे. त्यांनी नुकत्याच कोलकत्ता येथे झालेल्या पाचव्या अंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात सेंद्रिय शेतीमध्ये केलेल्या प्रयोगांचे सादरीकरण केले. त्याचे कामही राष्ट्रीय पातळीवर पोचले ते जितीन साठे यांच्यामुळे.     ‘बायफ’च्या माध्यमातून जितीन साठे यांनी राबवलेले उपक्रम

  • जव्हार व अकोले येथील आदिवासी भागातील फळबाग लागवड, फळ रोपवाटिका उपक्रमात २५०० कुटुंबाचा सहभाग
  • सुधारित शेती व भाजीपाला लागवड तंत्रज्ञान यांचा खेडोपाडी वापर ५-६ हजार कुटुंबांचा सहभाग
  • रोजगार निर्मितीसाठी परसातील कुकुट पालन, परसबाग उपक्रमात सहा हजार कुटुंबाचा सहभाग
  • तीस ते चाळीस गावांत जल आणि मृद संधारण व शेतीसाठी यशस्वी वापर
  • जलश्रोत विकास, त्यायोगे अधिक प्रमाणात जमीन ओळीताखाली आणने ५०-६० गावांत ३००० जलश्रोतांची निर्मिती
  • ५ ते ६ हजार आदिवासी कुटुंबाकडे स्वच्छ स्वयंपाकगृह निर्मिती, शुद्ध पिण्याचे पाणी आरोग्य शिबिरांतून मार्गदर्शन
  • सेंद्रिय शेती उपक्रमात सेंद्रिय भाजीपाला लागवडीत तीन ते चार हजार आदिवासी महिला मार्गदर्शन
  • सौरदिवे, युनिटच्या माध्यमाने ग्रामीण, दुर्गम भागात विजेचा प्रश्न सोडवण्यावर भर. साधारण दोन ते आडीच हजार कुटुंबांना मदत
  • शैक्षणिक उपक्रमात आदर्श शाळा उपक्रम सुमारे १५ आदिवासी भागातील शाळांचा सहभाग
  • महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमाने सुमारे तीन हजार आदिवासी महिलाना मार्गदर्शन आणि शेती उपक्रम सुधारण्यासाठी व विक्री व्यवस्थापन अंडी उबवण केंद्र यांची स्थापना.
  • तीन सहकारी संस्थाची उभारणी. त्यातून सुमारे ७०-८० आदिवासी गावांना शेती साठी लागणार्यां दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा व शेती विषयक मार्गदर्शन होत आहे.
  •  ‘बायफ’ या आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या संस्थेने संधी दिल्यामुळे मला आदिवासी भागातील अनेक शेतकरी कुटूंबे, महिलांसाठी काम करता आले. शेतीचे तंत्रज्ञान आणि सामाजिक माहितीपासूनही कोसो दूर असलेल्या महिलांना वेगवेगळ्या बाबींवर माहिती मिळवून देत सन्मान मिळावा, यासाठी माझा व बायफ टीमचा प्रयत्न गेली पंचवीस वर्षांपासून सुरू आहे.’’ बायफ संस्थेचे वरिष्ठ अधिकारी डॉ. किशोर चपळगावकर, डॉ. शशांक पाटील, डॉ. सुहास शुक्ला, अनिल बोरडे, विजय देशपांडे, व्ही. बी. द्यास, प्रदीप खोसे यांच्यासह वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळाले.’’ संपर्क- जितीन साठे ९४२३०२०१३६, ७५८८०९४०१६  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com