शेतकऱ्यांना मिळाली हक्काची बाजारपेठ  तेरा वर्षांपासून नगर कृषी महोत्सवाचे सातत्य  यंदा दुष्काळावर उपाय सांगणारी प्रात्यक्षिके 

नगरचा कृषी महोत्सव व यंत्रांचे सादरीकरण
नगरचा कृषी महोत्सव व यंत्रांचे सादरीकरण

 कृषी विभागाच्या ‘आत्मा’अंतर्गत दरवर्षी राज्यात सर्वत्र कृषी महोत्सव घेतला जातो. त्याद्वारे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली. नगर मध्ये सुमारे तेरा वर्षांपासून आजगायत हा महोत्सव त्याच उत्साहात यशस्वीपणे भरवण्याचा प्रयत्न होतो. पूर्वी चाळीस लाखांपर्यंत असलेली उलाढाल आता दोन कोटीं रुपयांपर्यंत पोचली आहे. आधुनिक शेतीचे तंत्र, अवजारे, प्रात्यक्षिके यांचा लाभही या वेळी शेतकऱ्यांना घेता येतो.   राज्यात सर्वत्र "शेतकरी ते ग्राहक थेट विक्री' संकल्पना राबवली जात आहे. मात्र सुमारे १३ वर्षांपूर्वीच  नगर जिल्ह्याने या संकल्पनेचा श्रीगणेशा केला. नगरचे तत्कालीन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या पुढाकाराने २००६ मध्ये ‘महापीक बाजार' या नावाने महोत्सव सुरू झाला. सुरवातीची चार वर्षे तो जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारात भरायचा. सन २०१० नंतर महापीक बाजार हे नाव बदलले. सन २०१७ पासून कृषी महोत्सव नावाने उपक्रम राबवला जातो. सन २०१६ व २०१७ या दोन वर्षी काही कारणांमुळे महोत्सव होऊ शकला नाही. यंदाही दुष्काळी परिस्थितीचा परिणाम असला तरी शेतकऱ्यांत उत्साह टिकून आहे.  चर्चासत्रांद्वारे मार्गदर्शन  नगरच्या कृषी महोत्सवात शहरासह ग्रामीण भागातून ग्राहक येतातच. शिवाय जिल्हाभरातून शेतकऱ्यांची संख्याही मोठी असते. या वेळी एकात्मिक कीड नियंत्रण, जमीन आरोग्य व्यवस्थापन, दुष्काळातील फळबाग आणि चारा व्यवस्थापन यासह दूध, मत्स्य व्वसाय व अन्य विषयांवर दरवर्षी चर्चासत्र घेण्यात येऊन तज्ज्ञांकरवी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. महोत्सवात भारत संचार, रेशीम कार्यालय, कृषी विज्ञान केंद्रे, मत्स्य व्यवसाय, राज्य कृषी व पणन महामंडळ, राज्य बियाणे महामंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राज्य कृषी औद्योगीक महामंडळ यासह शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल उभारले जातात.  प्रात्यक्षिकांतून आवाहन  राज्यात यंदा दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे दुष्काळावर मात करण्यासंबंधीची प्रात्यक्षिके महोत्सवात कृषी विभागाने मांडली आहेत. मुरघास तयार करणारे यंत्र, अझोला, हायड्रोपोनिक्स चारानिर्मिती, नाडेप, बायोडायनामिक कंपोस्ट, गांडूळखत, ठिबक सिंचन, पाचटाचे आच्छादन, प्लॅस्टिक मल्चिंग, डिफ्युजर, बाटली, सलाइन, मडके सिंचन पद्धत, पायथा ते माथा मृद व जलसंधारण, शेततळे, जलयुक्त शिवार अभियान फायदे, कांदा चाळ, पॉलिहाउस, शेडनेट आदी प्रात्यक्षिकांचा यात समावेश आहे. ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक सुरेश जगताप, जिल्हा समन्वयक प्रवीण गोरे यांनी यासाठी पुढाकार घेतला.  महोत्सावातील ठळक बाबी 

  • गहू, ज्वारी, बाजरी, अकोले (जि. नगर) भागातील हातसडीचा तसेच इंद्रायणी, काळभात, जिरेसाळ, कोळपी, आंबेमोहर आदी तांदूळ, शेतकरी उत्पादक कंपन्यांकडील सर्व प्रकारच्या डाळी व भाजीपाला 
  • मध्यस्थांची साखळी कमी. त्यामुळे ग्राहक व शेतकऱ्यांना परवडणारे दर 
  • महिला बचत गटांकडील मसाले व उत्पादने 
  • पुरणपोळी, खानदेशी मांडे, कर्जतची शिपी आमटी 
  • शेतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा "आदर्श शेतकरी' पुरस्काराने गौरव. 
  • नगरचा महोत्सव- वर्षनिहाय उलाढाल व सहभागी शेतकरी  सन २०१० मध्ये एक कोटी २५ लाख रूपये उलाढाल झाली. यावेळी शेतकीर संख्या ४१० पर्यंत होती. सन २०१२ मध्ये ही उलाढाल एक कोटी ७५ लाख तर शेतकरी संख्या ५१० होती. सन २०१४  मध्ये दोन कोटी १५ लाख.उलाढाल तर शेतकरी संख्या ५१५ होती. सन २०१५ मध्ये एक कोटी ८० लाख रूपये उलाढालीसह  ५२० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. २०१८ मध्ये हीच उलाढाल एक कोटी ४० लाख पर्यंत तर यंदा (२०१९) ती एक कोटी २० लाख अपेक्षित आहे.  स्टॉलची संख्या २०० पासून ते २५० पर्यंत राहिली आहे.   शेतकरी प्रतिक्रिया  कृषी विभागाने आम्हा शेतकऱ्यांसाठी महोत्सवाचे व्यासपीठ उभे केले. थेट ग्राहकांना तांदळाची विक्री करताना आमचाही फायदा होतो.  -गंगाराम धिंदळे, शिरपुंजे, ता. अकोले जि. नगर  ९४२३१६२७४३    आमचे दर्जेदार धान्य व शेतीमालाला येथे ग्राहकांची चांगली पसंती मिळते.  -हरि नाना खेतमाळीस, शेतकरी, पारगाव सुद्रीक, ता. श्रीगोंदा, जि. नगर  ९५९५४३४३२७     आत्माअंतर्गत शेतकरी कंपनी अंतर्गत एकात्मिक शेतीचा प्रयोग राबवतो. पाच वर्षांपासून महोत्सवात सहभागी होत आहोत.  आण्णासाहेब होंडे, अध्यक्ष, जय श्रीराम शेतकरी गट, राघोहिवरे, ता. पाथर्डी, जि. नगर  ८८८८२५८९७५  ग्राहक म्हणतात... थेट शेतकऱ्यांकडून धान्य व साहित्य खरेदी केल्याने त्याची खात्री असते. त्यामुळे दरवर्षी महोत्सवातून खरेदीवर भर देतो. '  -गोदाराम थोरात, कर्जत, जि. नगर  असे उपक्रम सुरू राहणे गरजेचे आहे. त्यातून शेतकरी आणि ग्राहकाचे नाते घट्ट होईल.  - कान्होपात्रा प्रदीप ढाकणे, नगर  नगर जिल्ह्यात महापीक, अन्नसुरक्षा अभियान असे विविध उपक्रम राबवले. त्यातून शेतकऱ्यांना थेट विक्रीची संधी मिळावी यासाठी महापीक बाजार संकल्पना पुढे आली. त्याचाच विस्तार राज्यभर यशस्वी झाल्याचा आनंद आहे.  -विकास पाटील, तत्कालीन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नगर  ९४२२४३०२७८  कृषी महोत्सव आता नगरसह राज्यभरासाठी अविभाज्य भाग बनला आहे. शहरासह जिल्हाभरातील लोक महोत्सवाची वाट पाहतात.  - पंडित लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर  संपर्क- प्रवीण गोरे- ९४२१५५८८३४ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com