जातिवंत अश्‍व, शेती साहित्यासाठी  प्रसिद्ध सारंगखेडचा बाजार 

सारंगखेडा यात्रा- आश्‍वासक उलाढाल यात्रेत मागील वर्षी सुमारे दोन हजार अश्‍व दाखल झाले. दीड हजारांची विक्री झाली. शेतीपयोगी साहित्यासह घोड्यांच्या विक्रीतून मागील वर्षी दहा कोटी रुपयांची उलाढाल झाली. यंदा तीन हजार अश्‍व दाखल झाले असून, २७ डिसेंबरपर्यंत १३०० घोड्यांची विक्री झाली. यातून अंदाजे तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली. यंदा एकूण सुमारे १२ कोटी रूपयांची उलाढाल होण्याचा अंदाज यात्रा संयोजकांनी व्यक्त केला.
सारंगखेडा अश्वबाजारात आकर्षण ठरलेला घोडा व कृषी प्रदर्शन
सारंगखेडा अश्वबाजारात आकर्षण ठरलेला घोडा व कृषी प्रदर्शन

अश्‍वबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील एकमुखी दत्त यांची यात्रा सर्वत्र प्रसिद्ध आहे. विविध राज्यांतील उमदे, देखणे घोडे हे यात्रेचे मुख्य आकर्षण असते. या व्यतिरिक्त शेतीपयोगी विविध साहित्याची देखील मोठी रेलचेल पाहण्यास मिळते. जोडीला कृषिप्रदर्शनासही मोठा प्रतिसाद लाभतो. महत्त्वाचे हिवाळी पर्यटनस्थळ म्हणून सारंगखेडा पुढे येत आहे. ग्रामीण कला, संस्कृती आणि शेती अर्थव्यवस्थेला चालना देणारा उत्सव म्हणून या यात्रेकडे पाहिले जाऊ लागले आहे.  सारंगखेडा हे गाव धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर वसले आहे. तापी नदीकाठी वसलेल्या व सुमारे १२ हजार लोकसंख्या असलेल्या या गावाची शेतीप्रधान अशीच ओळख आहे. कापूस, पपई व हंगामी पिके शिवारात दिसतात. तापी नदीआधारे सिंचनाचे भक्कम स्रोत असल्याने बऱ्यापैकी सुबत्ताही आहे.  यात्रेची परंपरा  सारंगखेडची एकमुखी दत्त यात्रा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. मागील दोन वर्षे यात्रेत पर्यटन विभागाचा सहभाग वाढला आहे. दत्तजयंतीच्या पाच ते १० दिवसांपूर्वीच सुरुवात होणारी ही यात्रा दत्त जयंतीनंतर सुमारे १५ दिवस चालते. यंदा सात जानेवारीपर्यंत ती सुरू राहील. सन १८३२ मध्ये भरवाडे (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील नंदाराम मक्कन पाटील यांनी एकमुखी दत्त यांचे मंदिर बांधले. तेव्हापासून यात्रेला सुमारे ३५० वर्षांची परंपरा आहे.  अश्‍व हेच यात्रेचे आकर्षण  यात्रेच्या अनुषंगाने अश्‍वबाजार आयोजित करण्याची परंपरा कायम आहे. पूर्वी आखाती देश, अगदी अफगणिस्तान, पाकिस्तानातील घोडे पूर्वी विक्रीसाठी यायचे. यंदा दक्षिण महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, केरळ आदी राज्यांमधील घोडे दाखल झाले आहेत. सुमारे दीडशे व्यापारी दाखल झाले आहेत. घोड्यांसाठी मंडपाची मोफत व्यवस्था आहे. त्यानजीक पाच एकरांत अश्‍वबाजार भरतो. तेथे अश्‍वांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. त्यांची किंमत १० हजार रुपयांपासून एक कोटी रुपयांपर्यंत असते.  कोटीच्या पुढील किमतीचा घोडा  यंदा उज्जैन (मध्य प्रदेश) येथील मानसिंग राजपूत यांचा नुकरा जातीचा सुलतान हा पांढराशुभ्र, देखणा, उंच घोडा यात्रेत चर्चेत आहे. त्याची एक कोटी ११ लाख रुपये किंमत घोडेमालकाने निश्‍चित केली आहे. त्याला रोज पाच लिटर दूध, काजू, बदाम, अंडी असा खुराक खाऊ घातला जातो. पाच हजार रुपये दररोज त्याच्या खुराकसाठी खर्च होतात. त्याचे वय साडेचार वर्षे असून उंची ६५ इंच आहे.  उत्तर प्रदेशातील हुकुमसिंग अंजना यांचा चेतक नामक घोडा देशभरात विविध ठिकाणच्या अश्‍वदौड स्पर्धांमध्ये सहा वेळेस विजयी ठरला आहे. तो मारवार जातीचा असून रंग काळा आहे. त्याचे चारही पाय खुरानजीक पांढरे शुभ्र आहेत.  शेतीपयोगी साहित्याचेही आकर्षण  टिकाव, कुदळ, फावडे, विळा, हातोडा, वखर, नांगर, लोखंडी बैलगाडे आदींचेही या यात्रेत वेगळे आकर्षण असते. सुमारे सात एकरात हा शेतीपयोगी साहित्यासह भांडी विक्रीचा बाजार भरतो. पितळी, तांब्याची विविध भांडी, बैल यांच्या सजावटीचे साहित्यही विक्रीस असते. खानदेशातील अमळनेर, पारोळा, चाळीसगाव, नंदुरबार, तळोदा, शिरपूर, धुळे यासोबत मध्य प्रदेशातील मिळून दोन हजारांपेक्षा अधिक विक्रेते यात्रेत दाखल झाले आहेत.  अवजारांची विविधता  यात्रेत बैलजोडी चलित नांगर २००० रुपये, कोळपे वजनानुसार ८०० रूपये, वखर १८०० रुपयांपर्यंत, टिकाव ३०० रु., विळा १५० रु. असे दर आहेत. सुमारे २०० ते ५०० रुपयांचे विविध वजन व आकारातील हातोडे उपलब्ध आहेत. बैलजोडीचलित बहुउद्देशीय अवजार ३५०० रुपयांना उपलब्ध आहे. सारंगखेडातील स्थानिक कारागीर लोखंडी बैलगाड्यांची निर्मिती करतात. त्यांच्या किमती २० हजार रुपयांपासून पुढे आहेत. बैलांच्या सजावटीसाठीच्या झूल, घुंगरू, पैंजण, कमरपट्टा, मणिमाळ सोबत कासारा, गेठे तसेच घोड्यांच्या सजावटीसाठी साहित्य ठेवण्यात आले आहेत.  सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांची भेट  कृषी व ‘आत्मा’ विभागातर्फे दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने कृषी प्रदर्शन भरविले जाते. यंदा प्रदर्शन गावात बसस्थानकानजीक भरवले आहे. केळी, पपई, कापूस, ऊस, कमी पाण्याची पिके, उडीद, मूग, तूर याव्यतिरिक्त पीक अवशेषांचे महत्त्व, नैसर्गिक शेती, खते, पाणी व्यवस्थापन, बियाणे आदी सविस्तर माहिती या वेळी दिली जाते. कृषी विभागाचे कर्मचारी त्यासाठी नियुक्त केले आहेत. मागील वर्षी सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली होती. यंदाही तेवढेच शेतकरी तंत्रज्ञानाचा लाभ घेतील असा अंदाज आहे. जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांकही उपलब्ध करण्यात आले आहेत.  चेतक फेस्टिव्हल  यात्रेत ‘चेतक फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात येते. सारंगखेडा येथील जयपालसिंह रावल यासंबंधीच्या समितीचे प्रमुख आहेत. सारंगखेडा हे राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचे आजोळ असून, त्यांनी यात विशेष लक्ष घातले आहे. ‘फेस्टिव्हल’मध्ये अश्‍व पोस्टर स्पर्धा, अश्‍व नृत्य व दौड, हास्य कविसंमेलन, कबड्डी, शरीरसौष्ठव, सौंदर्य, लावणी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. परदेशातील पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता तापी नदीकाठी आठ एकरात ‘टेंट हाउस’ उभारले आहे. त्यात एकूण ६० टेंट आहेत. यातील ३० वातानुकूलित असून पंचतारांकीत सेवा देण्यात आली आहे.  संपर्क- रवींद्रभाई पाटील- ९४२३२६१६३०  उपाध्यक्ष, श्री दत्त मंदिर ट्रस्ट, सारंगखेडा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com