कृषी पर्यटनातून मिळवली साम्रदने हुकमी अोळख

 साम्रद गाव परिसर निसर्गाने, दऱ्याखोऱ्यांनी समृद्ध झाला आहे.  येथील युवकांनी कृषी पर्यटनातून रोजगार शोधला आहे.
साम्रद गाव परिसर निसर्गाने, दऱ्याखोऱ्यांनी समृद्ध झाला आहे. येथील युवकांनी कृषी पर्यटनातून रोजगार शोधला आहे.

चहुबाजूंनी निसर्गाचे लेणे लाभलेले व सांधण दरीसाठी सर्वत्र लोकप्रिय असलेले नगर जिल्ह्यातील अती दुर्गम गाव म्हणजे साम्रद. रोजगारासाठी इथले ग्रामस्थ एकेकाळी दाही दिशा फिरायचे. आता परिस्थिती बदलली आहे. गावातल्या नव्या पिढीला कृषी पर्यटनाचा हुकमी पर्याय सापडला. पर्यटकांसाठी निवासाची सोय, तंबूंची व्यवस्था, गाईड, घरच्या शेतमालाचा वापर करून जेवणाचा आनंद आदी विविध माध्यमांतून त्यांनी रोजगारवृद्धी केली. गावचे उत्पन्न वाढवले. वृद्धांचे गाव अशी एकेकाळी असलेली अोळख आपल्या कर्तृत्वातून पुसून काढण्यास पर्यटनातून नवी अोळख तयार करण्यात ही पिढी यशस्वी झाली आहे. गावची जुनी अोळख पुसली नगर जिल्ह्यात साम्रद (ता. अकोले) हे सुमारे ८०० लोकवस्तीचे गाव चराची वाडी, गावठा, भिल्लवाडी या तीन वाड्यांत विभागलेले आहे. गावची शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे हा हंगाम संपल्यानंतर म्हणजे शेतीची कामे आटोपल्यानंतर रोजगाराच्या शोधात नारायणगाव, जुन्नर, नाशिक, शहापूर, ठाणे आदी भागात जाण्याची इथल्या ग्रामस्थांची पद्धत होती. मग गावात मागे उरायचे ते केवळ वृद्ध पुरुष आणि महिला. त्यामुळे वृध्दांचे गाव अशीच ओळख साम्रद गावची होती. चार महिने गावात व आठ महिने रोजगारासाठी बाहेर असे इथले जीवन होते. आता मात्र गावाने आपल्याला दिलेल्या नैसर्गिक लेण्याचा पुरेपूर वापर व्यवसायवृद्धीसाठी करायला सुरवात केली आहे. गावाच्या मागे सुमारे दोन किलोमीटरवर सांदण दरी आहे. आशिया खंडातील ही एकमेव वैशिष्ट्यपूर्ण दरी असावी असे जाणकार सांगतात. साहजिकच ट्रेकिंगसाठी इथे गर्दी वाढू लागली. ट्रेकर्स आपल्या सोबत तंबू आणत. आपल्याकडील जेवणाचे साहित्य संपले की ते साम्रद ग्रामस्थांशी संपर्क साधत. मग पुढील निवास, जेवण आदी व्यवस्था हे ग्रामस्थ करू लागले. बाराही महिने रोजगार उपलब्ध आज पर्यटन व्यवसायातून साम्रद गावातील ६० टक्के ग्रामस्थांना बाराही महिने रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यातून त्यांनी आपल्या कुटुंबाची प्रगती केलीच. शिवाय गावातील महिला व तरुणांसाठी रोजगार निर्मिती झाली आहे. दररोज तीनशे पाचशे, कधी हजार या संख्येने पर्यटक सांधण दरीचा आनंद लुटायला साम्रद गावात येतात. गावातील दीपक बांडे, नितीन रगडे, मच्छिन्द्र बांडे, तुषार भांगरे, लालू भांगरे राहण्याची, जेवणाची व परिसरात फिरण्यासाठीची व्यवस्था पाहतात. निवासाची व्यवस्था ग्रामस्थांच्या घरात किंवा तंबूत केली जाते. निसर्गाचा आनंद लुटण्यानंतर पर्यटक पुन्हा येण्याचा मानस उरी बाळगून गावचा निरोप घेतात. ‘गाईड’चा व्यवसाय झाला उत्पन्नाचे साधन पर्यटकांसाठी ‘गाईड’ म्हणून साम्रदचे युवक आघाडीवर असतात. त्यातून त्यांना उत्पन्नाचे साधन तयार झाले आहे. पर्यटकांना ते परिसरातील रतनगड, अलंग, कुलंग, मलंग, घाटघर, कोकणकडा, अमृतेशवर मंदिर आदी ठिकाणे दाखवतात. घरच्या महिला स्वादिष्ट जेवण तयार करतात. यापुढे जाऊन इथल्या तरुणांनी तंबू विकत घेतले. आज साम्रदमध्ये ५०० पेक्षा अधिक तंबू आहेत. एका व्यक्तीसाठी ५०० रुपयांपासून एक हजार रुपयापर्यंत भाडेशुल्क त्यातून मिळते. घरच्या शेतमालाचे मार्केटिंग, सतत उत्पन्न शाकाहारी व मांसाहारी जेवणाच्या पद्धतीनुसार दर आकारले जातात. आपल्या शेतात पिकविलेला सेंद्रिय पद्धतीच्या तांदळाचा भात, भाजीपाला पर्यटकांना खाऊ घातला जातो. घरात पाळलेल्या शेळ्या, कोंबड्या यांचा वापर करून चुलीवरील जेवण तयार केले जाते. त्यामुळे पर्यटक खूश होतात. पुढील खेपेस पर्यटकांचे मित्र, नातेवाईक देखील या ठिकाणी येतात. त्यामुळे सतत उत्पन्नाच्या संधी निर्माण होत असतात. शाळेच्या सहली, सरकारी विभाग, खासगी कंपन्यांचे लोक तसेच गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळ आदी राज्यांतूनही मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत असतात. गावात नांदतेय समृद्धी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून साम्रद हे आता समृद्ध गाव बनू पाहत आहे . गावातील घरे बदलू लागली आहेत. एकेकाळी सायकलदेखील नसलेल्या घरासमोर चार चाकी, दुचाकी गाड्या दिसू लागल्या आहेत. शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी, कोंबड्या असे पशुधन घरासमोर नांदताना दिसत आहे. गाव नवचैतन्याने बहरू लागले आहे. अभयारण्य असल्याने वनविभागही गावच्या विकासासाठी हातभार लावू लागला आहेत. गावातील मुले ‘बीएस्सी अॅग्री होऊन कृषी पर्यटनाकडे वळू लागले आहेत. तर महिला वारली पेंटिंग, शेवया, पापड्या आदी प्रक्रिया उद्योग करू लागल्या आहेत. आपल्या वनराईतील जांभळे, करवंदे, आंबे, आबळे यांच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळवू लागले आहेत. शालेय विद्यार्थीदेखील रानफुले गोळा करून त्याचे गुच्छ बनवण्याचे काम करतात. त्यातून ५० ते १०० रुपयांचे उत्पन्न हाती पडते. महिलांना, युवकांना प्रशिक्षण गावातील गुलाबबाई नामदेव बांडे, काळाबाई मारुती मुठे तसेच अन्य महिलांच्या पुढाकाराने रुख्मिणी महिला बचत गटाची स्थापना झाली आहे. त्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला निर्मिती सुरू झाली आहे. नारायणगावात दिवसाला १५० रुपये दराने मजुरीसाठी जाणाऱ्या महिला गावातच त्याहून अधिक उत्पन्न कमावू लागल्या आहेत. मुंबई येथील ट्रेकर नंदू चव्हाण यांनी साम्रद गावातील १५ तरुणांना या विषयातील प्रशिक्षण दिले. त्यानंतर राजस्थानातही एक महिन्याचे प्रशिक्षण देऊन पायावर उभे राहता येईल असे प्रशिक्षण मिळाल्याने सुमारे १५ तरुण ‘ट्रेकिंग’च्या माध्यमातून रोजगार मिळवित आहेत. प्रत्येकाकडे मोबाईल, मोटरसायकल, बॅटरी, तंबू व ट्रेकिंग साहित्य आहे. त्यांच्या जोडीला प्रत्येकी तीन तरुण अाहेत. या तरुणांचा समूह ‘ऑन लाईन’ व सोशल मीडिया’त सक्रिय आहे. त्यामुळे पर्यटकांशी सहज संपर्क होण्यास मदत होते. प्रतिक्रिया    गेल्या पाच वर्षांपासून साम्रदमध्ये हॉटेल व्यवसाय व ट्रेकिंगचा व्यवसाय करतो. घरातील १० सदस्य या व्यवसायावर अवलंबून आहेत. पूर्वी घरातील सर्वांना मजुरीसाठी नारायणगाव, जुन्नर येथे जावे लागे. पूर्वी माझ्याकडे सायकलदेखील नव्हती. आता पर्यटकांमुळे रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आज माझ्याकडे मोटरसायकल व चारचाकी अाहे. मुंबई, पुणे, नाशिक, नगर, ठाणे आदी शहरातूंन सतत पर्यटक संपर्क साधतात. त्यांना चुलीवरचे जेवण आवडते. रिव्हर फाॅल, सांधण दरी, काजवा महोत्सव, रानफुले यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. पावसाळ्यात मी त्यांची घरी राहण्याचीच व्यवस्था करतो. तर उन्हाळा व हिवाळ्यात तंबूद्वारे पर्यटकांची निवासाची सोय होते. -दीपक निवृत्ती बांडे - ८६०५८८८१०९ मी कृषी पदवीधर तरुण आहे. माझ्या शेतात कृषी पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचा मानस आहे. बैलगाडीतून सफारी, सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला शेतमाल उपलब्ध करून दिल्याने पर्यटक हौशीने येथे येतात. -नितीन दिलीप रगडे- ९७६५००८९३१ साम्रद गाव अतिदुर्गम अाहे. मात्र येथील ग्रामस्थांना आता गावातच रोजगार मिळू लागल्याने बाहेर मजुरीला जाण्याची वेळच येत नाही. - चंदर बांडे, ग्रामस्थ गावातील तरुण पदवीधर होऊन नोकरीच्या मागे न लागत आपल्याच शेतात कृषी पर्यटन व्यवसायातून स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. हजारो पर्यटक इथे येत असतात. शनिवारी, रविवारी तर येथे निसर्गप्रेमींची जणू यात्राच भरते. त्यामुळे पर्यटन व्यवसायासाठी मोठी संधी तयार झाली आहे. या भागातील रस्त्यांची मात्र दुरवस्था आहे. रस्ते चांगले झाले तर अजून पर्यटकांची संख्या वाढेल. वनविभागही याबाबत सतर्क आहे. -चंद्रकांत बांगर, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी पर्यटन क्षेत्राद्वारे रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करण्याबरोबरच महिलांनाही सक्षम करण्यासाठी ‘भंडारदरा टुरिझम’ सध्या कार्यरत आहे. पर्यटन व्यवसायासाठी लागणारे कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम आम्ही करतो. स्थानिक हस्तकला, लोककला तसेच स्थानिक खाद्यसंस्कृती याद्वारे व्यवसायाचा विकास साधता येतो. अकोले तालुक्याचा सुमारे ४० टक्के भाग दुर्गम असून पर्यटनाला मोठी संधी आहे. त्याद्वनारे विविध पर्यटन संकल्पना विकसित करून स्थानिकांची अर्थव्यवस्था सुधारण्याचे मोठे काम घडू शकते, असा विश्वास वाटतो. -विजया रवी ठोंबाडे भंडारदरा टुरिझम ८३९०६०७२०३     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com