अर्थकारण उंचावणारी बेहरे यांची भाजीपाला पीकपद्धती

अर्थकारण उंचावणारी बेहरे यांची भाजीपाला पीकपद्धती
अर्थकारण उंचावणारी बेहरे यांची भाजीपाला पीकपद्धती

कुटुंबाच्या जेमतेम अर्धा एकरातून दैनंदिन गरजांची पूर्तता होत नव्हती. आईचे आजारपण व झालेले निधन, वडिलांना झालेला अर्धांगवायू अशी संकटांची मालिका. तरीही न खचता कुऱ्हा (जि. अमरावती) येथील प्रवीण बेहरे यांनी केवळ भाजीपाला पिकांचे उत्कृष्ट नियोजन साधत त्यांची बारमाही शेती केली. आज नऊ एकरांपर्यंत क्षेत्राचा विस्तार करीत त्यांनी शेतीचे अर्थकारण सक्षम करण्यात यश संपादन केले आहे.  अमरावती जिल्ह्यात कुऱ्हा येथील प्रवीण बेहरे यांना वडील पुंडलीकराव यांच्याकडून शेतीचा वारसा मिळाला. कुटुंबाची केवळ अर्धा एकर शेती होती. अपर वर्धा प्रकल्पातील कॅनॉलच्या माध्यमातून सिंचनाची सोय असली तरी या शिवारात तूर, कपाशी यासारखीच पिके घेतली जात होती. उत्पादकता जेमतेमच होती. कुटुंबात प्रवीणसह तीन भाऊ, आई असा परिवार होता. आईला दुर्धर आजारापासून वाचवण्यासाठी मोठा खर्च केला. मात्र २००९ मध्ये आईचे निधन झाले. हा घरच्यांसाठी मोठा धक्का होता. होते. घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी प्रसंगी वडील, प्रवीणसह घरातील अन्य सदस्यांना इतरांकडे मजुरी कामावर जाण्याची वेळ आली. करारावर केली शेती मजुरीच्या कामांतून जुळलेल्या पैशाच्या बळावर शेती घेणे तर शक्‍य नव्हते. भाडेतत्त्वावर इतरांची शेती कसायला घेत त्यातून उत्पन्न वाढवण्याचा पर्याय असल्याचे प्रवीण यांच्या लक्षात आले. त्यानुसार २०००५- ०६ मध्ये भागीदारीत शेती कसण्यासाठी घेतली. यात कारले, टोमॅटो यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड केली. पहिल्या प्रयत्नात आश्‍वासक फायदा झाल्यानंतर या प्रयत्नात तीन वर्षे सातत्य ठेवले. प्रत्येकवर्षी चांगले पैसे जुळू लागले. त्या बळावर टप्प्याटप्प्याने शेती खरेदी करीत प्रवीण ९ एकर शेतीचे मालक झाले. त्यांचा आत्मविश्‍वासही चांगलाच वाढला होता. आज लहान भाऊ अमोल यांच्यासोबत ते शेतीत राबतात. प्रवीण यांचे एमएबीएड पर्यंत शिक्षण झाले आहे. मात्र शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन त्यांनी तयार केले आहे. वडील सुमारे चार वर्षांपासून अर्धांगवायुमुळे अंथरुणाला खिळून आहेत. मात्र बेहरे बंधूंनी परिस्थितीपुढे हार न मानता शेतीत सकारात्मकता आणली आहे. भाजीपाला पिकांची बारमाही पद्धती नऊ एकरांपैकी साडेचार एकर एके ठिकाणी तर अन्य क्षेत्र दुसऱ्या ठिकाणी आहे. दोन्ही शिवारांत विहिरीचा पर्याय आहे. अपर वर्धा प्रकल्पाच्या कॅनॉलव्दारे मार्चपर्यंतच पाण्याची उपलब्धता होते. विहिरीचीही जोड आहे. त्यामुळे भाजीपाला शेती बारमाही किंवा बऱ्यापैकी १० महिने तरी करता येते. संपूर्ण नऊ एकरांत टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, वांगी ही प्रमुख पिके घेण्यात येतात. या पिकांचे वर्षभर ‘रोटेशन’ असते. प्रत्येक पीक तसे १० महिने घेण्यात येते. एकदा लागवड केल्यानंतर पुढील १५ ते २० दिवसांनी त्याच पिकाची अन्य क्षेत्रात लागवड होते. त्यामुळे एखाद्या लागवडीच्या मालाला कमी दर मिळाल्यास पुढील लागवडीतील दरांमधून दरांतील तफावत भरून काढता येते. दरवर्षी सहा एकरांवर फ्लॉवर तर तीन एकरांत कोबी असतो. वांग्याची लागवड मात्र नोव्हेंबरच्या सुमारास एकदाच होते. फ्लॉवरचे एकरी २० टनांपर्यंत, कोबीचे २५ टनांच्या आसपास तर टोमॅटोचे एकरी ४० टनांच्या पुढे उत्पादन मिळते. बाजारपेठेच्या मागणीनुसार लागवडीच्या काही टप्प्यांमध्ये वाणांमध्ये बदल केला जातो. टोमॅटोने दिला फायदा कुऱ्हा शिवारात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु एक ते दीड एकरापर्यंतच त्यांचे लागवड क्षेत्र राहते. प्रवीण यांनी मागील वर्षी तीन एकरांवर लागवड केली. त्यांना ३५० ते ४०० रुपये प्रति क्रेट दर मिळाले. एकूण क्षेत्रातून सुमारे ८००० क्रेटपर्यंत उत्पादन मिळाले. तर सुमारे २५ ते ३० लाख रूपयांचे एकूण उत्पन्नही मिळवून दिले. या पिकात दरवर्षी एकरी ७५ ते ८० हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. वेल बांधण्यासाठी लागणाऱ्या सुतळी, तार, बांबू यासाठी खर्च अधिक असतो. यावर्षी सुमारे पाच एकरांपर्यंत टोमॅटो पिकाचा विस्तार करण्यात आला. एप्रिल, मे महिन्यात टोमॅटोला चांगली मागणी राहते. ही बाब लक्षात घेऊन त्यानुसार लागवडीचे नियोजन करण्यावर भर दिला आहे. बाजारपेठांचे पर्याय बेहरे यांना विक्रीसाठी अमरावती, आर्वी, कुऱ्हा, चांदूररेल्वे, तिवसा असे बाजारपेठांचे विविध पर्याय खुले आहेत. कुऱ्हा या आपल्या गावच्या बाजारपेठेतही बेहरे यांचे भाजीपाला विक्रीचे दुकान आहे. त्याची जबाबदारी बंधू अमोल पाहतात. त्यातून दिवसाकाठी अडीच ते तीन हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. दैनंदिन खर्चासाठी त्याचा विनियोग होतो. प्रवीण यांच्यासह कुऱ्हा गावातील बहूतांश शेतकरी भाजीपाला पिके घेतात. त्यातून गावशिवारात भाजीपाला लागवड वाढीस लागून गावचे अर्थकारण उंचावण्यासही मदत झाली आहे. प्रवीण सांगतात की, एकेकाळी वडील मजुरी करायचे. आता मात्र परिस्थितीत बदल झाला आहे. बेहरे सांगतात की पारंपरिक पिकांपेक्षा नगदी असलेली भाजीपाला पिके अधिक परवडतात. अर्थात त्यासाठी लागणारे आवश्‍यक मनुष्यबळही आमच्याकडे आहे. वर्षाला काही लाख रुपयांचा नफा नऊ एकरांत मिळत असल्याने अर्थकारण उंचावणे आम्हाला शक्य झाले आहे. जमिनीची सुपीकता भाजीपाला पिके घेत असलेल्या जमिनीचा पोत राखणे गरजेचे राहते. त्यामुळे एकरी चार ट्रॉली शेणखताचा वापर दरवर्षी केला जातो. गावातूनच त्याची चार हजार रुपये प्रति ट्रॉलीप्रमाणे खरेदी होते. सोबतीला ट्रॅक्‍टरचा वापर होतो. तसेच ८०० रुपये प्रति एकर दराप्रमाणे ट्रॅक्‍टर भाडेतत्त्वावरही घेतला जातो. भाजीपाला वाहतूकीकरीता वाहन खरेदी केले आहे. संपर्क- प्रवीण बेहरे - ९९२३४२६७९४  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com