AGROWON_AWARDS : दीडशे एकर शेतीचे रुपडे पालटणारे प्रशांत महाजन

 दीडशे एकर शेतीचे रुपडे पालटणारे प्रशांत महाजन
दीडशे एकर शेतीचे रुपडे पालटणारे प्रशांत महाजन

अॅग्रोवन उत्तर महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार - श्री. प्रशांत महाजन -   तांदलवाडी, जि. जळगाव

प्रशांत महाजन (वय ३७ वर्षे) तांदलवाडी परिसरातील तरुण प्रयोगशील शेतकरी असून, मागील १७ वर्षांपासून आधुनिक पद्धतीने शेती करतात. त्यांच्याकडे विविध पिकांची शेती होत असली तरी केळी या पिकातील महाजन मास्टर समजले जातात. विविध अडचणींमुळे आतबट्ट्याची ठरत असलेल्या केळीच्या पारंपरिक शेतीला नवे वळण देत व आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत केळी शेतीचे रुपडेच त्यांनी पालटले आहे. आता फिलिपिन्स धर्तीवरील अत्याधुनिक पॅकहाउस उभारून तंत्रज्ञानातील पुढील पाऊल त्यांनी उचलले आहे.    परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करत समूहशक्तीची मूठ बांधून केळीच्या निर्यातीत उडी घेतली. केळी प्रक्रिया उद्योगासह हळद, कापूस, ऊस, मका, गहू, हरभरा इ. पिकांचे उत्पादन यशस्वीरीत्या घेत आहेत. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षांपासून ते वडिलोपार्जित एकत्रित कुटुंबाची १५० एकर शेती सांभाळतात. केळीच्या उतिसंवर्धित रोपांची लागवड, ड्रीप  ॲटोमेशन, गादीवाफा, आच्छादनाचा वापर, केळी निर्यातीसाठी फ्रूटकेअर तंत्रज्ञानाचा वापर, निर्यातीच्या दृष्टीने स्वतःचे पॅकहाउस आणि प्रीकूलिंग युनिटची उभारणी त्यांनी विभागांतर्गत केलेली आहे.  पाटील यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 

  • शंभर टक्के ठिबक सिंचन यंत्रणा. काळी जमीन लक्षात घेऊन त्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाहाचे नियोजन. 
  • प्रत्येक पिकाचे लागवडीपूर्वीच वेळापत्रक तयार करून त्या पिकाच्या विविध अवस्था व त्या वेळी लागणारी खते किंवा कीटकनाशके यांचे वेळेपूर्वीच व्यवस्थापन. 
  • सुमारे ३३ एकर क्षेत्राला संगणकीय ऑटोमेशन यंत्रणा बसवून पाण्याची काटकसर आणि चोख सिंचन व्यवस्थापन होऊन पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यावर भर दिला. त्यामुळे केळीची उत्पादनवाढ साधली शिवाय पाण्याच्या अकार्यक्षम वापरामुळे खालावलेले जमिनीचे आरोग्यही सुधारले. 
  • केळीची ५० एकरांवर लागवड. उतिसंवर्धित रोपे, गादीवाफा, आच्छादन, ठिबक सिंचनाचा वापर करून केळी उत्पादनात वाढ. 
  • केळीच्या निर्यातीच्या दृष्टीने स्वतःचे पॅकहाउस आणि ९० टन क्षमतेच्या प्रीकूलिंग युनिटची विभागांतर्गत उभारणी. 
  • एकाच क्षेत्रात केळी घेण्याएवजी पिकामध्ये सातत्याने फरपालट करण्यावर भर. 
  • दुय्यम दर्जाच्या म्हणजे ज्या केळीला किलोला दोन ते तीन रुपये दर मिळतो, अशी १५ टक्के केळी बाजूला काढून त्यापासून वेफर्स करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प पॅकहाउसमध्ये साकारला आहे. या वेफर्सना गुजरात, मध्य प्रदेशातील व्यापऱ्यांकडून मागणी. 
  • हळद आले पिकामध्ये अंतरमशागतीसाठी मेड इन इटली तंत्रज्ञानाच्या पॉवर विडरचा वापर. 
  • सहा बैलजोड्या, म्हशी, गायी, गीर जातीच्या जनावरांचे संगोपन. 
  • शेतामध्ये अढळणारे विविध मित्र पक्षी, प्राणी, जिवाणू, गांडूळ यांचे संगोपन संवर्धनाकडे जातीने लक्ष. 
  • रासायनिक खतांसोबत जैविक आणि सेंद्रिय खतांचा वापर करून इतर शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन. 
  • केळीचे ५० टन प्रतिएकर, हळद २० टन प्रतिएकर, मका ५ टन प्रतिएकर, कापूस १.५ टन प्रतिएकर याप्रमाणे उत्पादन. 
  • दोन गोबर गॅस युनिट. कुटुंब एकत्र असल्याने स्वयंपाकासाठी गोबर गॅसचा चांगला उपयोग. 
  • गट शेतीच्या माध्यमातून गावातील व परिसरातील तरुण शेतकऱ्यांना शेतावर भेटी देऊन मार्गदर्शन. कृषी विभागाच्या विविध उपक्रमाचा लाभ मिळवून देण्यासाठी अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन. 
  • गावातील सर्वज्ञ कृषी विज्ञान मंडळ व सहयोग कृषी विज्ञान मंडळामध्ये सक्रिय सहभाग. 
  • स्वतःबरोबर गावातील इतर केळी उत्पादकांची केळी खरेदी करून निर्यात करण्यास प्रशांत यांनी सुरवात केली आहे. येत्या काळात निर्यातदार कंपन्यांची मदत न घेता थेट निर्यातीचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. 
  • प्रशांत यांनी कृषी विभागाच्या साह्याने २०१३ मध्ये दहा दिवसांचा युरोप दौरा केला. यामध्ये जर्मनी, हॉलंड, फ्रांन्स व स्पेनमधील दुग्ध व्यवसाय, फूल, फळ शेतीचा अभ्यास केला. त्रिची (तामिळनाडू) येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र व अन्यत्र केळी परिषदांमध्ये हिरिरीने सहभाग. 
  • प्रशांत याच्या शेतीला आॅस्ट्रेलिया, तुर्की, फिलिपिन्स, अमेरिका, जपान, श्रीलंका, बहरिन आदी देशांमधील अभ्यासकांनी भेट दिली आहे. तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी ठिकाणच्या शेतकरी गटांनीही भेटीद्वारे प्रयोग अभ्यासले आहेत. 
  • त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. 
  • फिलिपिन्स धर्तीवरील अत्याधुनिक पॅकहाउस  प्रशांत यांनी आपले चुलत बंधू प्रेमानंद यांच्या साह्याने फिलिपिन्स देशातील तंत्रावर आधारित केळीसाठी सुरू केलेले अत्याधुनिक पॅकहाउस चांगलेच उपयोगी ठरू लागले आहे. शेतीमाल निर्यातदार कंपनीला या माध्यमातून ग्रेडिंग, पॅकिंग व पुरवठा अशी सेवा देण्यात येते. सध्या प्रतिदिन ४० टन अशी प्रक्रिया केळीवर होते. सुमारे १६ हजार चौरस फूट जागेत हे पॅकहाउस असून, त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च आला आहे. महाजन बंधू या निमित्ताने संबंधित कंपनीकडून ठरावीक रक्कम म्हणजे प्रतिक्विंटल सुमारे १०० रुपये दर आकारतात. केळी शेतीतील हे अतिरिक्त उत्पन्न ठरते. अर्थात याचा फायदा तांदलवाडी व परिसरातील शेतकऱ्यांनादेखील होतो. या रकमेचा वाटा त्यांनादेखील देण्यात येतो. निर्यातक्षम केळी असल्याने त्यांच्याही उत्पन्नात चांगली भर पडते. मागील हंगामात क्विंटलला कमाल १४५० रुपये असे दर या निर्यातक्षम केळी उत्पादकांना मिळाले. महाजन यांच्यासह या भागातील शेतकरी देखील ‘फ्रूटकेअर’ तंत्राचा वापर करतात. निर्यातीसाठी किमान सात ते आठ इंच लांबी व ४२ ते४५ कॅलिपर घेर अशी केळीची गुणवत्ता ठेवली जाते. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com