agriculture story in marathi, agrowon awards, nipani, usmanabad, award winner farmer | Agrowon

AGROWON_AWARDS : बांबूच्या यशस्वी व्यावसायिक शेतीचा उभारला आदर्श

सुदर्शन सुतार
रविवार, 28 एप्रिल 2019

ॲग्रोवन मराठवाड्याचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार
 - राजशेखर पाटील -
निपाणी, उस्मानाबाद

ॲग्रोवन मराठवाड्याचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार
 - राजशेखर पाटील -
निपाणी, उस्मानाबाद

बांबूच्या यशस्वी व्यावसायिक शेतीचा उभारला आदर्श 
उस्मानाबादसारख्या दुष्काळी जिल्ह्यातील निपाणी येथील आपल्या शेतात तब्बल अडीच लाख बांबू झाडांची लागवड करून व्यावसायिक यशस्वी उत्पन्न घेण्याचा प्रयोग राजशेखर पाटील यांनी केला आहे. दुष्काळी भागासाठी बांबूच्या माध्यमातून पीकबदल अत्यंत वरदान ठरणार असल्याचे ते सांगतात. जोडीला बहुविध व फळबागांची समृद्ध शेती करून त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांपुढे आदर्श तयार केला आहे. 
  
उस्मानाबाद हा दुष्काळी जिल्हा आहे. साहजिकच जिल्ह्यातील निपाणी गावातील शेतीही दुष्काळाच्या झळा सोसणारी आहे. याच गावातील राजशेखर मुरलीधर पाटील यांनी परिस्थितीपुढे हार न मानता दुष्काळावर मात करायचे ठरवले. राज्यातील नेहमीची, हंगामी किंवा लोकप्रिय व्यावसायिक पिके न निवडता बांबूसारखे वेगळे पीक निवडले. आपली जमीन मध्यम-हलकी आहे हे ओळखून त्यात अत्यंत कमी पाणी व मजुरीबळ वापरून, अत्यंत कमी खर्चात बांबूची शेती व्यावसायिक पद्धतीने केली. त्यामागे संयम, धडपड, अभ्यासूवृत्ती, चिकाटी, धैर्य व बाजारपेठांचा अभ्यास असे विविध गुण त्यांच्या मदतीस धावले. आज राजशेखर यांच्या शेतात तब्बल अडीच लाख बांबूची झाडे डौलाने उभी आहेत ही अत्यंत कौतुकास्पद बाब म्हणायला हवी. त्याला जोड म्हणून शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी बहुविध व विशेषतः फळबागांची समृद्ध शेती राजशेखर यांनी विकसित केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यात बार्शी-लातूर मार्गावर कोलेगावपासून आत सुमारे १२ किलोमीटरवर निपाणी गाव लागते. पाणी नसणारे म्हणून निपाणी अशी गावाची ओळख सांगितली जाते. याच गावात राजशेखर यांची ५४ एकर शेती आहे. ते कृषी विषयातील पदवीधारक आहेत. साहजिकच शेतीतील तांत्रिक ज्ञानाचा आधार त्यांना आहे. 

पाणी विषयाचा जपलेला व्यासंग 
पाणी, वृक्षलागवड हे राजशेखर यांचे आवडते विषय आहेत. आपल्या दुष्काळी भागात विविध पिके घेण्यावर अत्यंत मर्यादा येतात याची त्यांना जाणीव होती. सन १९९२ च्या सुमारास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सान्निध्यात येऊन त्यांच्यासोबत ‘वॉटरशेड मॅनेजमेंट’ अभियानात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. अनेक वर्षे त्या अभियानात त्यांनी स्वतःला वाहून घेतले. प्रसंगी घराकडे किंवा आपल्या शेतीकडे वेळ देणे त्यांना शक्य झाले नाही. लातूर जिल्ह्यात आठ-दहा गावांत नाला खोली- सरळीकरण, बांधबंदिस्ती ते शेततलाव अशी कामे यशस्वी केल्यानंतर मात्र २००० च्या दरम्यान ते गावी परतले ते शेती करण्यासाठीच. 

सामाजिक वृत्तीचे राजशेखर 
घरच्या शेतीत टोमॅटो, वांगी आदी भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. पाण्याचा प्रश्‍न कायम सतावत होताच. मात्र सामाजिक वृत्ती, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा गुण असलेल्या राजशेखर यांनी आत्तापर्यंत अन्य ठिकाणी घेतलेल्या कामांचा अनुभव आपल्या गावाच्या भल्यासाठी उपयोगात आणला. त्यांच्या पुढाकारातून गावात नाला खोली-रुंदीकरण कामे झाली. लोकांनी मोठी साथ दिली. 

स्वतःच्या शेतीचा विकास 
हे करीत असताना राजशेखर यांनी आपली शेती विकसित करण्यास सुरवात केली. पपई, खरबूज असे प्रयोग केले. सलग १८ एकरांवर लावलेल्या पपईने एके वर्षी अत्यंत समाधानकारक पैसे दिले. उत्साह अजून वाढला. शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी बहुविध पीक पद्धतीचा व त्यातही फळबागांना प्राधान्य देत विस्तार साधला. 

राजशेखर यांची आजची शेती 

 • केशर आंबा- सुमारे साडेपाच हजार झाडे 
 • चिकू, आवळा, जांभूळ- प्रत्येकी एक हजार झाडे 
 • नीलगिरी- दीड लाख झाडे 
 • विविध झाडांनी समृद्ध शेतीला वनशेतीचे रूप दिले. 

बांबू शेतीतील ‘टर्निंग पॉइंट’ 
उत्पन्नवाढीचे अजून पर्याय शोधण्यात व्यस्त असताना इंटरनेटच्या माध्यमातून जपानमधील बांबू शेतीबद्दल समजले. चक्क जपानला जाऊन तेथील शंभर एकर बांबू असलेल्या शेतकऱ्याची भेट घेत त्याचे बांबू बनही पाहिले. या पिकाचे अर्थकारण, बाजारपेठ, हवामान, जमीन असा सूक्ष्म अभ्यास करून पूर्ण विचारांती बांबूची शेती करण्याचे ठरवले. 

बांबूची शेती 
साधारण २००५ च्या सुमारास बांबूची सुमारे ४० हजार रोपे शेताच्या बांधांवर लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील तापमानाला हे पीक अनुकूल प्रतिसादही देऊ लागले. आजूबाजूचे लोक बांबूची मागणी करू लागले. साधारण २०१० मध्ये बांधावरच्या या बांबूने लाखाचे उत्पन्न दिले तेव्हा बांबूच्या शेतीचे गणित कळले. मग राजशेखर यांनी मागे वळून पाहिले नाही. 

विकसित केलेली बांबू शेती 

 • निसर्ग शेतीचा ध्यास घेत बांबू शेती विकसित केली. जपानमधील कायटो बांबूच्या शेतीचा प्रभाव आहे. 
 • सर्वत्र घनदाट पद्धतीने बांबूचे वन विकसित. 
 • भारतात आढळणाऱ्या बांबूच्या १६० प्रकारांपैकी १० ते २० प्रकार राजशेखर यांच्या बनात पाहण्यास मिळतात. 
 • त्रिपुरा, मिझोराम, कर्नाटक आदी भागांतील तसेच देशी व परदेशी प्रकारांचा संग्रह. 
 • मानवेल, मानगा, मेसकाठी, कटांगा, कनक, ब्रॅंडीसी, टुल्डा, ऑलीवेरी, व्हल्गॅरीस, मल्टिपेल्क्‍स अशी त्यांची विविधता. 
 • सध्या बांबूची एकूण अडीच लाख झाडे. हे क्षेत्र सुमारे ३० एकरांचे असले तरी झाडे विखुरली असल्याने ५४ एकरांपर्यंतही ते व्यापलेले. 
 • यातील ४० हजार झाडे सतरा वर्षांपूर्वीची तर उर्वरित दोन ते पाच वर्षे वयाची. 
 • मध्यम-हलक्‍या प्रतीच्या जमिनीत साडेचार बाय साडेचार फूट या अतिसघन पद्धतीने लागवड. 
 • संपूर्ण लागवड ठिबकवर. 
 • लागवडीनंतर पहिली तीन वर्षे उत्पादनासाठी प्रतीक्षा. 
 • त्यानंतर प्रत्येक दीड वर्षाने उत्पादन. 
 • एकरी सुमारे दोन हजार झाडे बसतात. प्रत्येक झाड दीड वर्षाला सुमारे चार काठी किंवा त्याहून अधिक उत्पादन देऊ शकते. म्हणजे एकरी सुमारे आठ हजार काठ्या उत्पादन मिळू शकते. 
 • एखाद्या वर्षी पाणी न मिळाल्यास झाड सुप्तावस्थेत जाते. मात्र जळून जात नाही. पाणी दिल्यास 
 • पुन्हा वाढीची जोम पकडते. 
 • बांबू लागवडीसाठी शासकीय परवानगी, वाहतूक परवाना यांची गरज नाही. 

मार्केट मिळविले 
राजशेखर यांच्या म्हणण्यानुसार प्रतिरोपापासून २० ते १०० पर्यंत काठ्या मिळतात. ४० हजार झाडांपासून सुमारे दहा लाख काठ्या तयार होतात. सहा फूट लांबीच्या काठीला ३० रुपये तर ४० फूट लांबीच्या काठीला २०० ते २५० रुपये दर मिळतो. सरासरी प्रतिकाठी दर २० ते ५० रुपये मिळतो. 

बांधावर खरेदी 
मोठी मागणी असल्याने परिसरातील भाजीपाला व्यावसायिक बांबू घेऊन जातात. सतरा वर्षांच्या अनुभवात राजशेखर यांनी आपल्या बांबूशेतीचे ३५० पर्यंत व्हिडिओज यू ट्यूब चॅनेलवर अपलोड केले आहेत. त्याद्वारे मोठे नाव झाल्याने व्यापारी थेट खरेदीसाठी बांधावर येतात. चंद्रपूर, यवतमाळसह अन्य राज्यांतील काही पेपर कंपन्यादेखील राजशेखर यांच्याकडून बांबू घेतात. सरकारचा बांबूसाठीचा दर साडेचार हजार रुपये प्रतिटन आहे. त्यापेक्षा अधिकचा दर व्यापाऱ्यांकडून घेणेही राजशेखर यांना शक्य होते. आइस्क्रीम व्यावसायिकदेखील कांडी, चमचे यासाठी खरेदी करतात. 

 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...
दराबाबतचा दुटप्पीपणा घाऊक आणि किरकोळ बाजारांतील कांद्याचे वाढते दर...
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...