काजू, आंबा, कोकम प्रक्रिया उद्योगाची यशस्वी वाटचाल

ताम्हणकर यांचा काजूगर निर्मितीचा कारखाना
ताम्हणकर यांचा काजूगर निर्मितीचा कारखाना

नाधवडे (जि. सिंधुदुर्ग) येथील भालचंद्र भिकाजी ताम्हणकर यांनी काजू, आंबा व रातांबे यांच्यावर प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादने तयार केली. अनेक वर्षांपासून उद्योगात सातत्य ठेवत त्याचा यांत्रिक स्वरूपात विस्तार केला. ब्रॅंडची ओळख तयार केली. रोजगारनिर्मिती केली. उत्तम व्यवस्थापनातून गुणात्मक दर्जा ठेवत त्यांनी मुंबई येथील बाजारपेठ हस्तगत केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यातील नाधवडे हे तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वैभववाडीपासून नऊ किलोमीटरवरील गाव आहे. भात, नाचणी, ऊस नारळ, काजू, आंबा अशी पिके घेतली जातात. येथील भालचंद्र व वृषाली हे ताम्हणकर दांपत्य अनेक वर्ष मुंबईत होते. सन १९९५ त्यांनी नाधवडे येथे जमीन खरेदी करून छोटेखानी घर बांधले. कोकणातील काजूचे महत्त्व व प्रक्रिया उत्पादनाला म्हणजे काजूगराला असलेली मागणी ओळखली. त्यानुसार १९९६ मध्ये घरगुती, लहान स्वरूपात काजू प्रकिया उद्योग सुरू केला. पती-पत्नी अशा दोघांनीही मेहनतीने व्यवसायात लक्ष घातले. अडचणी येत राहिल्या. मात्र त्यावर मात करीत ते पुढे जात राहिले. पालवी महोत्सव ठरला दिशादर्शक काजू प्रकियेसोबत फणसपोळी, आंबा पोळी, तळलेले गरे, कोकम आमसूल तयार करून विविध बाजारपेठांत विक्री करण्याचे काम सुरू होते. सन २००९ पर्यंत व्यावसायिक अनुभवाची शिदोरी चांगलीच जमा झाली होती. दरम्यान दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकम कृषी विद्यापीठातर्फे आयोजित पालवी महोत्सव दिशादर्शक ठरला. त्यात ताम्हणकर दांपत्याला आंबा तसेच रातांब्यावर (कोकम) आधारीत उत्पादनांचे महत्त्व, मागणी, बाजारपेठ, प्रशिक्षण आदीबाबत अधिक माहिती मिळाली. याचवेळी व्यवसाय विस्तारीकरणाचे विचार घोळू लागले. सन २०१६ मध्ये तब्बल २५ लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक प्रकिया युनिट खरेदी केले. आंबा व रातांबे प्रकिया उद्योग काजू प्रकिया उद्योगात स्थिरस्थावर झालेल्या ताम्हणकर यांनी २०१६ मध्येच आंबा व कोकम प्रकिया युनिट सुरू केले. नावीन्याची ओढ असलेल्या या दांपत्याने गणेशोत्सवासाठी काजू मोदक तयार केले. पहिल्या वर्षी गणशेभक्तांंकडून मोदकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावर्षी मोठ्या प्रमाणात ते तयार केले. नैसर्गिक चव आणि दर्जा यामुळे दोन हजार मोदक पाकिटांची हातोहात विक्री झाली. ताम्हणकर यांची उत्पादने

  • सध्या काजूगर, आंबा रस, पल्प व कोकम सरबत, आगळ या मुख्य उत्पादनांवर भर.
  • त्याशिवाय काजू मोदक, फणसपोळी अशी उत्पादने गरजेनुसार तयार केली जातात. तळलेले गरे नातेवाइकांकडून बनवून घेण्यात येतात.
  • कच्चा माल परिसरातील शेतकऱ्यांकडून घेण्यात येतो. त्यामुळे त्या शेतकऱ्यांसाठीही विक्रीची सुविधा तयार होते.
  • उत्पादनांत कोणतीही कृत्रिम प्रिझरव्हेटीव्हज घालण्यात येत नाही. त्यामुळे त्यांची चव नैसर्गिक व अवीट असते. त्यामुळेच ग्राहकांकडून चांगली मागणी असते.
  • ताम्हणकर फूडस या ब्रॅंडने विक्री.
  • मुंबई शहरातील कल्याण या उपनगरात १५ ते २० वर्षांपासून विश्‍वास प्रस्थापित केलेला नेहमीचा व्यापारी आहे. त्यालाच सर्व उत्पादनांची बहुतांश विक्री होते.
  • उत्तम गृहिणी ते अभ्यासू व्यवस्थापक ताम्हणकर यांच्या यशस्वी वाटचालीत पत्नी वृषाली यांचा सिंहाचा वाटा आहे. उत्तम गृहिणी ते अभ्यासू व्यवस्थापक अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. घरातील कामे सांभाळून त्या उद्योगातही कष्ट करतात. काजू ग्रेडिंगचे काम त्यांच्या नजरेखाली होते. दर्जाच्या बाबतीत त्या कोणतीच तडजोड करीत नाहीत. रोजगारनिर्मिती स्थानिक सुमारे ८ ते १२ जणांना उद्योगाच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कुशल कामगार या परिसरात मिळत नसले तरी उपलब्ध कामगारांना प्रशिक्षित करून त्यांना कामांत कुशल बनविण्यात येते. या उद्योगात एक ते दोन महिन्यांसाठी म्हणजे हंगामी प्रक्रिया होत असली तरी वर्षातील उर्वरित महिने बाजारपेठ, विक्री आदी कामे सुरू असतात. रसविक्रेत्याकडून प्रेरणा मुंबईतील एका रुग्णालयात ताम्हणकर यांचे नातेवाईक उपचार घेत होते. त्यांची विचारपूस करण्यासाठी येणारे लोक मोसंबी घेऊन येत. काही वेळा मोसंबीची संख्या प्रमाणापेक्षा वाढायची. त्यामुळे ताम्हणकर रुग्णालयालगत असलेल्या एका रसवाल्यांकडे गेले. त्याने ठराविक रक्कम घेऊन रस काढून देण्याचे मान्य केले. त्या वेळी ताम्हणकर यांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. आपणही ठरावीक रक्कम घेऊन काजू बागायतदारांना आपल्या कारखान्यात बी फोडून दिली तर दोघांचाही फायदा होऊ शकेल अशी संकल्पना त्यांच्या मनात आली. ती त्यांनी प्रत्यक्षात उतरविली. सध्या ते परिसरातील काजू बागायतदारांना पाच टनांपेक्षा अधिक बी फोडून देण्याचे काम करतात. प्रति किलो तीस रुपये त्यासाठी मिळतात. जमेची बाजू म्हणजे यामध्ये खेळते भांडवल फारसे लागत नाही. उद्योगातील प्रक्रिया क्षमता व आकडेवारी (प्रातिनिधिक)

  • हंगामात सुमारे २० टन काजू बीवर प्रकिया
  • काजू बी खरेदीसाठी लागणारी रक्कम- २५ लाख रुपये
  • त्यासाठी मजुरी खर्च- १ लाख, ८० हजार रुपये
  • अन्य खर्च धरून एकूण खर्च- २७ लाख, ७५ हजार रु.
  • एक टन काजूपासून मिळणारे काजूगर- २२५ किलो
  • वीस टन काजूपासून सरासरी साडेचार टन काजूगर
  • काजूगराच्या एकूण २२ ग्रेडस
  • प्रति किलो दर- ६०० रुपयांपासून ते ९०० रुपये (ग्रेडनुसार)
  • सालीचा, खारा, मसाला, पाकळी, कणी असे प्रकार
  • प्रति किलो उत्पन्न- ५० ते ७० रुपये
  • आंबा

  • हंगामात पाच आंब्यावर प्रकिया
  • प्रति किलो २५ रुपयांप्रमाणे खरेदी
  • आंबा खरेदी, मजुरी व अन्य खर्च- २ लाख रु.
  • पाच टनांपासून अडीच टन रस निर्मिती
  • प्रति किलो १४० रुपये दराने विक्री
  • कोकम

  • दोन टन रातांब्यावर प्रक्रिया केल्यास सहाशे लिटर कोकम सरबत तर आगळ तयार केल्यास एक हजार लिटर
  • प्रति किलो २५ रुपये दराने रातांबे खरेदी
  • दर- अमसूल- १८० रुपये प्रति किलो
  • सरबत- ११० लिटर प्रति लिटर
  • आगळ- १०० रुपये प्रति लिटर
  • एकूण उद्योगातील भांडवल- २५ लाख रुपये यांत्रिकी व शेड तसेच कच्चा माल व अन्य खर्च धरून एकूण ५५ लाख रुपयांपर्यंत
  • संपर्क- भालचंद्र ताम्हणकर- ९४२२८१२४९८, ९७६६५४५७९२  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com