काळ्या द्राक्षांच्या शेतीत तोडकरांचा हातखंडा 

काळ्या द्राक्षांची शेती तोडकर यांच्या मते निसर्गाची चांगली साथ मिळाली, तर एकरी सरासरी १० ते १२ टनांपर्यंत उत्पादन मिळते. सुरुवातीला प्रतिचार किलो द्राक्षांचा दर ३०० ते साडेतीनशे रुपयांपर्यंत असतो. पुढे बाजारात आवक वाढत जाईल, तसा तो कमी होत २७०, २०० रुपयांवर येऊन ठेपतो. दोन लाख रुपये एकरी उत्पादन खर्च, तर निव्वळ उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंत मिळते.
गुणवत्तापूर्ण द्राक्ष घड न्याहाळताना श्रीकांत तोडकर
गुणवत्तापूर्ण द्राक्ष घड न्याहाळताना श्रीकांत तोडकर

सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील तोडकर बंधूंनी दर्जेदार काळ्या द्राक्षांच्या शेतीत आपला हातखंडा तयार केला आहे. निर्यातीपेक्षा देशांतर्गत बाजारपेठेवर भर देत आपल्या उत्कृष्ट प्रतीच्या द्राक्षांना किलोला ६५ ते ७० रुपयांपर्यंत दर मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. तीन भावांच्या कुटुंबाची एकी टिकवून शेतीतील श्रम व मजुरांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.  सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका ऊसशेतीसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. भाजीपाला शेतीबरोबरच अन्य पिकांचे प्रयोग करण्यातही येथील शेतकरी अग्रेसर असतात. द्राक्ष म्हटले, की नाशिक व सांगली जिल्ह्यातील तासगावचा पट्टा चटकन डोळ्यांसमोर येतो. परंतु, वाळवा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनीदेखील द्राक्षशेतीत आपली वेगळी छाप तयार केली आहे. अनेक वर्षांपासून त्यांनी या शेतीत सातत्य ठेवत तालुक्यातील शेतीच्या अर्थकारणात भर घातली आहे.  तोडकर बंधूंची द्राक्षशेती  वाळवा येथील जगन्नाथ, श्रीकांत व सुनील तोडकर हे बंधू द्राक्षशेतीत आघाडीवर आहेत. पाऊस आणि रोगराईला आमंत्रण देणारी भरपूर आर्द्र्रता, तरीही निसर्गाच्या अवकृपेवर मात करून द्राक्ष उत्पादन घेण्यात तोडकर बंधूंचा हातखंडा राहिला आहे.  वडिलांकडून मिळाला शेतीचा मंत्र  तोडकर बंधूंचे वडील विश्वनाथ यांच्याकडे पूर्वी शेतीचा भार होता. सन १९८७ च्या सुमारास त्यांची एक एकर द्राक्षशेती होती. त्या वेळी घरची शेती अवघी चार एकर होती. पुढे मग वडिलांचा द्राक्षशेतीचा वारसा तोडकर बंधूंनी कायम ठेवला. या बंधूंपैकी जगन्नाथ गावातील हुतात्मा सहकारी साखर कारखान्यात नोकरीला लागले. तर, श्रीकांत व सुनील यांनी शिक्षणानंतर शेती करण्यास सुरुवात केली. गावात त्या वेळी काही प्रयोगशील द्राक्ष बागायतदार होते. त्यांच्या सल्ल्याने तोडकर यांची द्राक्षशेती बहरू लागली. त्यातील बारकावे आत्मसात होत गेले.  द्राक्षशेतीचा विस्तार  वडिलांनी लावलेली द्राक्षबाग थॉमसन जातीची होती. मात्र, काळाची गरज ओळखून शरद सीडलेस या काळ्या वाणाच्या लागवडीकडे तोडकर बंधू वळले. आमच्या भागात जवळपास सर्व शेतकरी काळ्या रंगांचीच द्राक्षे घेतात. आर्द्रता अधिक असल्याने व्हाइट वाणांना रंग चांगला विकसित होत नसल्याचे श्रीकांत तोडकर म्हणाले. अनेक वर्षांच्या द्राक्षशेतीतील तपश्‍चर्येतून नफाही वेळोवेळी मिळाला. त्यातून वेळोवेळी बारा एकर जमीन खरेदी केली. त्यातही द्राक्षबागच फुलवली. प्रत्येक वर्षी बाग यशस्वी करण्याचा प्रयत्न राहतो. बाग ‘फेल’ गेली, असे अभावानेच झाले असावे.  कुटुंब राबतंय शेतीत  तोडकर कुटुंबाला सुरुवातीपासून शेतीचा वारसा आहे. तीन बंधू, तसेच घरातील महिला सदस्य, मुले असे सर्व जण शेतीत राबतात. पूर्वीदेखील कुटुंबातील सदस्यांवरच शेतीची जबाबदारी होती. आता शेतीचा व्याप वाढल्याने हंगामी व कायमस्वरूपी मजूरही तैनात केले आहेत.  खंडाने द्राक्षशेती  वाळवा भागात काही जण आपल्या जमिनी खंडाने करावयास देतात. तोडकर बंधूंनी ही संधी घेतली. त्यांनी आठ एकर जमीन द्राक्षपिकासाठी खंडाने घेतली आहे. जमीन व पाण्याची सोय जमीनमालकाने करावयची. शेती करणाऱ्याने मंडप, लागवड, ठिबक आदी बाबींची उभारणी करावयाची असते. दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर बाग मालकाकडे सुपूर्त करायची, असा हा करार आहे.  द्राक्षशेतीतील ठळक बाबी  १) पालाकुट्टी गठ्ठ्यांचा वापर-  खते, पाणी किंवा अन्य कोणतेही व्यवस्थापन सुनियोजित करण्यावर तोडकर यांचा भर असतोच. पण सेंद्रिय पद्धतीच्या काही ठळक बाबींवर त्यांनी अधिक भर दिला आहे. यात मल्चिंगसाठी पाला कुट्टीचा वापर सांगता येईल. छंडीच्या काळात जमीन तडकते. भेगांमुळे पिकांची मुळे नीट काम करत नाहीत. अशा वेळी बोधावरील मल्चिंग चांगले काम करते. जमीन तडकू देत नाही. भुसभुशीत ठेवते. ठिबकच्या पाण्याचा ओलावा सतत मिळतो. उत्कृष्ट अशा कम्पोस्ट खताची निर्मिती होते. या मल्चिंगसाठी पालाकुट्टीटे गठ्ठे तोडकर विकत घेतात. प्रतिगठ्ठा २२ रुपयांना ते एका व्यक्तीकडून विकत घेतात. सुमारे पाच झाडांमागे एक गठ्ठा किंवा एकरी सुमारे ४०० ते ५०० गठ्ठे लागतात, असे श्रीकांत म्हणाले.  २) गुणवत्तेवर भर  राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांच्या शिफारशीप्रमाणे कीडनाशके, संतुलित खतमात्रा व जोडीला शेणखत यांचा वापर केला जातो. काही जमीन चुनखडीची व काही काळी आहे. जमिनीत क्षार साठून राहू नयेत म्हणून चर खोदून निचरा प्रणालीचा वापरही त्यांनी केला आहे.  ३) यांत्रिकीकरण- पूर्वी द्राक्ष बागेत हातपंप, इंधनचलित पंप आदींद्वारे कीडनाशक फवारणी व्हायची. तसेच डिपिंग मजुरांकरवी करावे लागे. आता नव्या तंत्राचे फवारणी यंत्र घेतले आहे. त्याद्वारे कीडनाशकांव्यतिरिक्त संजीवकांची फवारणी केली जाते. त्यासाठी दोन छोटे ट्रॅक्टर्स खरेदी केले आहेत. यामुळे श्रम व मजुरी खर्चात बचत झाली आहे.  ४) शेणखताचा वापर- एकाड एक वर्षी एकरी ९ ट्रॉली शेणखताचा वापर केला जातो. एकूण सुमारे १०० ते कमाल २०० ट्रॉली शेणखत खरेदी केली जाते. त्यावर खर्च केला जात असला, तरी त्यातून मिळणारे दर्जेदार उत्पादन अधिक दर मिळवून देत असल्याचे तोडकर सांगतात.  आर्थिक प्रगती व एकत्र कुटुंब  द्राक्षशेतीतूनच तोडकर बंधूंनी टुमदार बंगला साकारला आहे. नवीन शेती खरेदी केली. नव्या बागांची उभारणी केली. नदीवरून नवीन पाइपलाइन उभारली. तीन बंधूंचे एकूण १४ सदस्यांचे एकत्रित कुटुंब आज गुण्यागोविंदाने नांदते. नव्या पिढीतील सत्यजित व प्रवीण ही सुनील यांची मुले महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. तर, जगन्नाथ यांचा मुलगा राहुल, तर सुनील यांचा मुलगा अमोल शेतीत करिअर करीत आहेत.  नव्या पिढीपैकी एक जण ‘बीएस्सी हॉर्टिकल्चर’ झाला असून, एमबीए करतो आहे. वयाच्या साठीच्या जवळपास पोचलेले तोडकर बंधूदेखील आजही दिवसभर शेतात राबताना दिसतात.  उत्पादन, उत्पन्न  तोडकर यांच्या मते निसर्गाची चांगली साथ मिळाली, तर एकरी सरासरी १० ते १२ टनांपर्यंत उत्पादन मिळते. सुरुवातीला प्रतिचार किलो द्राक्षांचा दर ३०० ते साडेतीनशे रुपयांपर्यंत असतो. पुढे बाजारात आवक वाढत जाईल, तसा तो कमी होत २७०, २०० रुपयांवर येऊन ठेपतो. दोन लाख रुपये एकरी उत्पादन खर्च, तर निव्वळ उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंत मिळते.  व्यापाऱ्यांचा विश्वास  द्राक्ष बागायतदारांना विक्रीमध्ये व्यापाऱ्यांकडून अनेक वेळा फसवणुकीचा मोठा धोका असतो. परंतु, तोडकर गेली अनेक वर्षे तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी दक्षिणेकडील व्यापाऱ्यांना माल देतात.  वीस वर्षांत तर फसवणुकीचा अनुभव आला नसल्याचे श्रीकांत यांनी सांगितले. जागेवर येऊन व्यापारी खरेदी करीत असल्याने व दरही समाधानकारक असल्याने निर्यातीवर भर न दिल्याचे त्यांनी सांगितले.  संपर्क- श्रीकांत तोडकर-९९२१६८२२१६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com