मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी शेतकऱ्यांचे मन
यशोगाथा
जवारी मिरचीने मिळवला किलोला ७०० रुपये उच्चांकी भाव
कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज भागातील जवारी अर्थात देशी मिरची प्रसिद्ध आहे. लाल व चवीला तिखट असलेल्या या मिरचीला ग्राहकांकडून नेहमीच चांगली पसंती असते. यंदा अवकाळी पावसामुळे या मिरचीचे मोठे नुकसान झाले. साहजिकच गडहिंग्लज बाजार समितीत आवक घटली आहे. दरवर्षी किलोला ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दर घेणाऱ्या या मिरचीचे कमाल दर यंदा ७०० रुपयांपर्यंत उच्चांकी पोचले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज भागातील जवारी अर्थात देशी मिरची प्रसिद्ध आहे. लाल व चवीला तिखट असलेल्या या मिरचीला ग्राहकांकडून नेहमीच चांगली पसंती असते. यंदा अवकाळी पावसामुळे या मिरचीचे मोठे नुकसान झाले. साहजिकच गडहिंग्लज बाजार समितीत आवक घटली आहे. दरवर्षी किलोला ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दर घेणाऱ्या या मिरचीचे कमाल दर यंदा ७०० रुपयांपर्यंत उच्चांकी पोचले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या गडहिंग्लज येथील बाजार समिती मिरचीच्या सौद्यासाठी प्रसिद्ध आहे. या भागातील जवारी मिरची प्रसिद्ध आहे. तालुक्यातील बसर्गे, माद्याळ कसबा नूल, जरळी, मुगळी, बड्याचीवाडी, हेब्बाळ कसबा नूल, निलजी, मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) या भागात या मिरचीचे क्षेत्र पाहण्यास मिळते. शिवाय आजरा तालुक्यातील बहिरेवाडी, हुक्केरी, भैरापूर आदी गावांतही लागवड होते. निचरा होणाऱ्या जमिनीत शेतकरी हे नगदी पीक म्हणून घेतात.
ऑक्टोबरपासून सौद्यास सुरुवात
साधारणत: ऑक्टोबरपासून सौद्यास सुरवात होते. हंगामात दर तीन ते चार दिवसांनी तोडणी होऊन ती तीन ते चार दिवस वाळवून सौद्याला आणली जाते. अनेक शेतकरी आठवड्यातून एकदा पोती घेऊन येतात. यामुळे ताजा पैसा उपलब्ध होतो. एक एकर क्षेत्र असेल तर दोन महिन्यांपर्यंत उत्पादन सुरू राहाते. अर्थात त्या त्या हंगामातील क्षेत्र, हवामान व उत्पादन यावर मिरचीची आवक अवलंबून असते.
आवक व सौदे
गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्यातून दोन दिवस म्हणजे शनिवारी व बुधवारी जवारी मिरचीचे सौदे होतात. एका दिवशी साधारण २५० ते ३०० पोती किंवा १०० क्विंटलपर्यंत मिरची सौद्याला येते. एकूण सौद्यांचा विचार करता सुमारे ४०० टन मिरचीची खरेदी-विक्री बाजार समितीत होते. याशिवाय स्थानिक स्तरावर घरगुती स्वरूपात विक्रीचा आकडा वेगळा आहे. यंदाच्या हंगामात पावसाने नुकसान झाल्याने मिरचीच्या एकूण आवकेवर निश्चित परिणाम होणार आहे. एरवी साधारणत: वीस ते पंचवीस किलो वजनाच्या पोत्यातून मिरची आणली जाते. या भागातील शेतकरी अल्पभूधारक असल्याने अनेक जण गाडीला एक- दोन पोती बांधूनच बाजारात सौद्याला येतात. सकाळी साधारणत: दहाच्या दरम्यान सौदे काढले जातात. मिरचीच्या आवकेवर एक ते दोन तासाच्या कालावधीत विविध अडत्यांच्या दुकानात सौदे काढण्यात येतात. त्यानंतर वजन करून घेऊन शेतकऱ्यांना संध्याकाळपर्यंत रक्कम दिली जाते.
जवारी मिरचीसाठी यंदा झगडावे लागणार
जवारी मिरचीची वैशिष्ट्यपूर्ण तिखट चव ग्राहकांच्या जिभेवर चांगलीच रुळली आहे. दर अधिक असला तरी स्थानिक पातळीवरही या मिरचीला पसंती देणाऱ्यांची संख्या कमी नाही. या मिरचीला सर्वाधिक मागणी असते ती मुंबई व कोल्हापुरातून. एकूण उत्पादनाच्या सुमारे सत्तर टक्क्याच्या आसपास पुरवठा या दोन शहरांना होत असावा असे जाणकरांना वाटते. यंदा सुरुवातीपासून जोरदार पाऊस झाल्याचा फटका बसून हंगामाच्या सुरुवातीपासूनच दरात तेजी आली आहे. मागणी एवढा पुरवठा होइल की नाही याबाबत व्यापाऱ्यांत संभ्रम आहे. यामुळे पुढील तीन महिन्यात मागणी कशी पुरवायची या चिंतेत व्यापारी आहेत.
दरात उच्चांकी उसळी
सध्या सुरुवात असल्याने प्रत्येक सौद्याला पन्नास ते शंभर पोत्यांच्या आसपास आवक होत आहे. दराने मात्र उच्चांक गाठला आहे. किलोस पाचशे, सहाशे ते कमाल सातशे रुपयांपर्यंतचा दर मिरची उत्पादकांना मिळत आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यात ज्या शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून उत्पादन घेतले त्यांना दराचा फायदा मिळेल, अशी शक्यता आहे. घसरलेली आवक पाहून व्यापारी जास्त प्रमाणात मिरची घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याने दर आठशे रुपयांपर्यंत पोचू शकतील असे अंदाज आहेत. एकूण यंदाचा हंगाम पाहिल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्क्याच्या वर आवक होणार नाही हे स्पष्ट झाल्याने हंगाम संपेपर्यंत दर विक्रमी रहातील. कदाचित घाऊक दर आठशे रुपयांपर्यंत तर किरकोळ दर एक हजार रुपये किलो इतके उच्चांकी रहातील असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे.
जवारी मिरचीविषयी
- गडहिंग्लज तालुक्याचा भाग कर्नाटक राज्याला लागून असल्याने मिरचीचे अन्य संकरित वाणही बाजार समितीत येत असतात.
- मात्र साधारणत: एक फुटापर्यंतची लांबी, दिसायला आकर्षक, लाल व तिखट चवीची ही जवारी मिरची सर्वांमध्ये भाव खाऊन जाते.
- मध्यम ते खोल निचरा होणाऱ्या जमिनीत तसेच जिरायती व बागायती भागात घेण्यात येते.
- खरीप हा मुख्य हंगाम.
जवारी मिरची उत्पादकांचे अनुभव
गेल्या आठ वर्षांपासून मी जवारी मिरची सातत्याने घेतो. बाजारपेठेत संकेश्वरी नावाने ती ओळखण्यात येते. यंदा पंधरा गुंठे मिरची केली होती. दरवर्षी तेवढ्या क्षेत्रात सुमारे १०० किलो उत्पादन मिळते. ही मिरची थोड्याच क्षेत्रावर घेण्यात येते. या पिकावर किडी रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे फवारण्यांवरील खर्च वाढत असतो. यंदाही मेहनतीने पीक चांगले आणण्याचा प्रयत्न केला आहे. मागील बुधवारी (ता. १९) झालेल्या सौद्यात माझ्या मिरचीस किलोस ७०० रुपये दर मिळाला. हा दर ८०० रुपयांपर्यंत मिळेल अशी अपेक्षा होती. दरवर्षी किलोला ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दर मला मिळतो. पंधरा गुंठ्यात सुमारे ३५ हजार रुपयांचे उत्पन्न हाती लागते. याचे बी घरचेच असते. त्यामुळे दरवर्षी वेगळा खर्च करावा लागत नाही.
मारुती हुली, निलजी, ता. गडहिंग्लज
संपर्क- ९४२३८२६२९५
प्रतिक्रिया
यंदा पावसामुळे मिरचीच्या दर्जावर परिणाम झाला आहे. त्यामुळे चांगली मिरची कमी प्रमाणात येईल अशी शक्यता आहे. बाजारात साधारणपणे पूर्ण पांढरी, डागी व उत्कृष्ट अशा दर्जात मिरची येते. सध्या तिसऱ्या दर्जाच्या मिरचीस किलोला ८० ते १०० रुपये, डागी मिरचीस १५० ते २५० रुपये तर चांगल्या दर्जाच्या मिरचीस सातत्याने ३०० ते ४५० रुपये दर मिळत आहे.
-राजन जाधव, मिरची व्यापारी, गडहिंग्लज बाजार समिती
यंदा पावसामुळे आवक घटली आहे. यामुळे दरांत वाढ आहे. बाजार समितीच्या आवारात यंदा मिरचीची आवक कमी असल्याने दरही चांगले राहतील, अशी शक्यता आहे.
-शैलेंद्र देसाई, पर्यवेक्षक, गडहिंग्लज बाजार समिती
संपर्क- ९२२६५९६९५९
फोटो गॅलरी
- 1 of 64
- ››