गटशेतीतून शेतमालाच्या ब्रॅँडिंगला मोठी संधी ः डॉ. भगवान कापसे

गटशेतीतून शेतमालाच्या ब्रॅँडिंगला मोठी संधी ः डॉ. भगवान कापसे
गटशेतीतून शेतमालाच्या ब्रॅँडिंगला मोठी संधी ः डॉ. भगवान कापसे

औरंगाबाद ः एकट्याने शेती करणे सध्या परवडणारे नाही, त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येत गटशेती करणे फायदेशीर ठरणार आहे. गटशेतीच्या माध्यमातून शेतीमालाचे ब्रॅँडिंग करण्यास मोठी संधी असल्याचे मत फळबागतज्ज्ञ, गटशेतीचे प्रवर्तक डॉ. भगवान कापसे यांनी शनिवारी (ता. २८) येथे व्यक्त केले. ॲग्रोवन आयोजित कृषी प्रदर्शनात ‘गटशेतीतून समृद्धी’ या विषयावरील चर्चासत्रात डाॅ. कापसे बोलत होते. यावेळी ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, प्रयोगशील शेतकरी भाऊराव आटोळे (अकोलादेव) व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. कापसे म्हणाले, ‘‘आज शेतीविषयीची नकारात्मक भावना वाढीस लागली आहे. सर्वच बाजूने शेतकरी भरडला जातो आहे. त्यात नैसर्गिक आपत्तीने संकटात भर पडत आहे. या सगळ्या प्रश्नासाठी एकाकी झगडण्यापेक्षा शेतकऱ्यांनी एकत्र येत गटशेती केल्यास फायदेशीर ठरू शकते. अनेक वर्षापासून मराठवाड्यांमध्ये गटशेतीसाठी आम्ही काम करत आहोत. गटशेती केवळ आर्थिक उत्पन्नाच्यादृष्टीने फायदेशीर नाही, तर सामाजिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही ती उपयुक्त ठरते. आम्ही वीस वर्षापूर्वी केशर आंबा लागवडीमध्ये गटशेतीचा प्रयोग केला. जिरडगावातील अनेक शेतकरी पुढे आल्याने केशर आंबा उत्पादनासह लंडनला निर्यातही शक्य झाली. प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही ती कामगिरी केली. गुणवत्ता दिली, तर ग्राहक मिळतोच, हा अनुभव आहे. गटशेतीतून उत्तम प्रकारे शेतमालाचे पॅकिंग, ब्रॅँडिंग करण्याची संधी मिळू शकते. शिवाय खर्चही वाचतो. बहुतांश शेतकरी पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत उत्तम काळजी घेत असले तरी केवळ विक्रीवेळी आपल्याच उत्पादनाकडे दुर्लक्ष करतो. काढणीपश्चात तंत्रज्ञानामध्ये योग्य वेळी काढणीसोबत प्रतवारी, स्वच्छता, आकर्षकपणे मांडणी, पॅकिंग याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात विक्रीवेळी दुर्लक्ष केले जाते. यासाठी त्यांनी कापूस, गहू या पिकामध्ये गटशेतीद्वारे केलेल्या प्रयोगांची माहिती दिली. श्री.आटोळे यांनीही अकोलादेव येथे सुरू असलेल्या गटशेती प्रयोगांची माहिती दिली. ॲग्रोवनचे मुख्य उपसंपादक अमित गद्रे यांनी सूत्रसंचालन केले.   या युवा शेतकऱ्यांचा झाला सन्मान या कार्यक्रमात ॲग्रोवनच्या वतीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना युवा शेतकरी सन्मान पुरस्काराने सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. या शेतकऱ्यांमध्ये कय्युम शेख (शेकटा, जि.औरंगाबाद), संजय पवार (मुर्शिदाबाद), भरत आहेर (टोणेगाव, जि. औरंगाबाद), अमोल बलांडे (बोरगाव अर्ज, जि.औरंगाबाद), शारदा कागदे (लाखेगाव, औरंगाबाद), दीपक चव्हाण (सुल्तानपूर, औरंगाबाद), साईनाथ चव्हाण (वजनापूर, जि.औरंगाबाद), हरी ठोंबरे (गाढे जळगाव, औरंगाबाद), जया साब्दे (औरंगाबाद), लक्ष्मी खंडागळे (अब्दीमंडी) यांचा समावेश होता.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com