दुष्काळात आधार देईल विनानांगरणीची शेती

दुष्काळात आधार देईल विनानांगरणीची शेती
दुष्काळात आधार देईल विनानांगरणीची शेती

जलधारणा क्षमता, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी विना नांगरणी तंत्र शेतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा. यामुळे उत्पादन खर्चदेखील कमी होण्यास मदत होईल, असा सूर वक्त्यांनी व्यक्त केला. ॲग्रोवन कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. २८) आयोजित जमीन सुपीकता आणि शून्य मशागत तंत्र या विषयावरील या परिसंवादामध्ये प्रतापराव चिपळूणकर (कोल्हापूर), विकास कांडेकर, (पळसखेडे, ता. संगमनेर, जि. नगर), संजय महाजन (भोरटेक बुद्रुक, जि. जळगाव) हे शेतकरी सहभागी झाले होते. प्रतापराव चिपळूणकर म्हणाले, की मराठवाड्यातील कोरडवाहू, बागायती, हंगामी बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी शून्य मशागत तंत्र शेती पद्धती उपयुक्त आहे. पाऊस पडण्याचे दिवस कमी झाले आहेत. दोन पावसांच्या खंड काळात पीक वाचवता आले पाहिजे. मराठवाड्यात कोरडवाहू क्षेत्र अधिक, तसेच जमीन धारणाक्षेत्रदेखील अधिक आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर शेणखत, कंपोस्ट खताचा वापर करणे शक्य नाही. नुसती नांगरणी, कोळपणी करून शेती करणे शक्य नाही. सेंद्रिय कर्ब वाढवावा लागेल. कोळपणीने माती मोकळी होते. मोठ्या पावसात सुपीक थर वाहून जातो. त्यामुळे उत्पादकता कमी होते. जमिनीची धूप थोपविता आली तरच सुपीकता वाढेल. हरितक्रांतीचा सुर्वणकाळ होता, परंतु आता जमीन तीच असताना उत्पादन का कमी झाले याचा अभ्यास केला. त्या वेळी जमिनीतील सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला. दहा-बारा वर्षांपूर्वी जमीन चांगली पिकत होती. त्या वेळी सेंद्रिय कर्ब अधिक होता. जमीन सुपीकेतेसाठी सोपा, स्वस्त मार्ग काढला पाहिजे. शेणखत जमिनीबाहेर कुजविणे चुकीचे आहे. ते कुजण्याची क्रिया जमिनीतच झाली पाहिजे. कुजणारे पदार्थ विकत आणायचे काम पडू नये. पिकाचा जमिनीखालील भाग दर्जेदार सेंद्रिय खत तयार करण्यासाठी अत्यंत चांगला असतो. दुष्काळी भागात शून्य मशागत पद्धतीने शेती केली तर फायदा होतो. यातून शेतकऱ्यांच्या हाती काहीतरी लागेल. तण व्यवस्थापन महत्त्वाचे जमिनीची टक्केवारी ठरवून मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या पिकांचे नियोजन करावे. दीर्घ कालावधीच्या पिकांचे क्षेत्र शून्य मशागतीवर ठेवायचे. मशागतीची वेळ येईल त्या वेळी काकर मारून टोकण करायची. कोरडवाहू तूर, कपाशीचे बागायतीमध्ये रूपांतर करायचे. मधल्या पट्ट्यात तण वाढवायचे. पावसाळ्याच्या अखेरीस तण वखराने झोपून टाकायचे. पिकांवर तणांचे आक्रमण होऊ न देणे म्हणजे तण व्यवस्थापन. तण झोपविल्यामुळे त्याच्या मुळातील पाणी पिकाला मिळते. तण निर्मूलनाच्याऐवजी तण व्यवस्थापन करून संपूर्ण कोरडवाहू क्षेत्राचे बागायतीमध्ये रूपांतर करून उत्पादन घ्यायचे. यामुळे जमिनीची धूप थांबेल. जलसंधारण होईल असेही ते म्हणाले. उत्पादन वाढले संजय महाजन म्हणाले, की प्रतापराव चिपळूणकर यांची जमिनीची सुपीकता आणि विनानांगराची शेती ही दोन पुस्तके ॲग्रोवनच्या प्रदर्शनात विकत घेऊन अभ्यास केला. परंतु विनानांगरणी शेती करण्यास मन धजत नव्हते, परंतु एकदा कुटुंबातील लग्न असल्यामुळे मक्याच्या पडीक शेतात कापूस लागवड केली. त्या वेळी नांगरणी न केलेल्या शेतात एकरी १० क्विंटल उत्पादन मिळाले. तीन वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर बंद केला आहे. रासायनिक खते न देता ओल्या हळदीचे एकरी १०० क्विंटल उत्पादन मिळत आहे. मक्याचेही उत्पादन चांगले मिळत आहे. वांग्यासारखे पीक रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर न करता चांगले आले आहे. सेंद्रिय कर्बाचे जमिनीतील प्रमाण वाढविण्यासाठी बिना नांगणी तंत्राची शेती करणे आवश्यक आहे. वाढलेले इंधनाचे दर, मजूर आदी समस्यांमुळे शेतकऱ्यांना येत्या काळात या तंत्रज्ञानाकडे वळावे लागेल. कांडेकर यांचा अनुभव विकास कांडेकर म्हणाले, की खाचखळग्याच्या जमिनीचे सपाटीकरण केले. पहिले पीक टोमॅटो घेतले. परंतु त्यात अपयश आले. चिपळणूकर तंत्राचा अभ्यास केला. वीस गुंठे क्षेत्र पडीक ठेवले. विनामशागत तंत्राने टोमॅटोचे भरघोस उत्पादन मिळाले. दुष्काळातही विनामशागत शेती तंत्र फायदेशीर ठरत आहे. केवळ गांडुळे नव्हे, तर अनंत कोटी जिवाणू जमिनीत आहेत. येत्या काळात विनामशागत तंत्र शेतकऱ्यांना पुढे घेऊन जाणारे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com