सीताफळाने दिली दुष्काळातही शेतकऱ्यांना साथ

श्याम गट्टाणी व संजय मोरे
श्याम गट्टाणी व संजय मोरे

औरंगाबाद : कधीकाळी दुर्लक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीताफळाने शेतकऱ्यांना दुष्काळातही साथ दिली आहे. येणारा काळ हा सीताफळासाठी सुवर्णयुग राहणार असल्याचे प्रतिपादन सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी यांनी केले. सकाळ-ॲग्रोवन परिवाराच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनच्या समारोपीय चर्चासत्रात ते बोलत होते. साडेतीनशे वर्षांपूर्वी पुरंदरच्या कोरडवाहू भागात दिसत असलेली सीताफळाची शेती आता सर्वदूर पसरलेली दिसत आहे. राज्यात २७ हजार हेक्टरवर असलेले सीताफळाचे क्षेत्र २०१७ -१८ च्या अहवालानुसार ७५ हजार हेक्‍टरवर पोचले आहे. मराठवाड्यात व लगतच्या खानदेशात या पिकाची रुजवात करण्याचे काम महानोर परिवाराने केले. त्यांनी रुजवलेले सीताफळ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्याही पसंतीस उतरले आहे. मराठवाड्यातील कायम अवर्षणग्रस्त पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये एकरी एक लाखापर्यंत मोलाची भर या पिकामुळे पडत आहे. नाशवंत असलेल्या या फळाला प्रक्रियेतून यशवंत करण्याच्या दृष्टीने उदयपूर व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे संशोधन झाले. त्यातून सीताफळाचा गर काढण्याच्या यंत्राचा जन्म झाला. तीन वर्षांपासून त्या सयंत्राच्या चाचणी सुरू आहेत. साठवणुकीचा प्रश्न मार्गी लावताना राज्यात ७० ठिकाणी साठवणूक केंद्र उभारण्यात आली आहेत. कमी पाण्यातही चांगले उत्पादन देण्याच्या क्षमतेमुळे सीताफळाने दुष्काळातही आपले स्थान टिकवून ठेवले आहे. सीताफळाच्या गराचा उपयोग बासुंदी, रबडी, कुल्फी आदी बनवण्यासाठी होत आहे. बालाघाटात सीताफळाच्या नैसर्गिक बागा मोठ्या प्रमाणात दिसून येतात. पहिले दोन वर्षे जपले की नंतर पावसावर येणारे हे पीक आहे. जनावरे खात नाहीत. माकड आदी वन्य प्राण्यांचाही फारसा धोका नाही. केवळ दीड महिन्याच्या काळात येणारे पीक आहे. आलेल्या प्रत्येक बागेची छाटणी, त्यानंतर पीक संरक्षणाकडे थोडे लक्ष देणे, मिली बगसाठी झाडाच्या खोडाला चिकटपट्टी लावणे, १५ ते २५ जूनदरम्यान पाऊस झाल्यास १५ जुलैपर्यंत फुलोरा, १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत दोन वेळा विरळणी, असे अत्यंत साधे व्यवस्थापन आहे. एका स्क्वेअर फुटात एक फळ हे गणित ठेवावे. डोळे मोठे येण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अधिक ठेवण्याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला दिला. ३०० दिवस सुटी आणि ६५ दिवस काम असणारे हे एकमेव फळपीक आहे. मनरेगाअंतर्गत हेक्टरी १ लाख ९ हजार रुपयाचे रुपयाचे अनुदान मिळते, तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत केवळ हेक्‍टरी ७५ हजार रुपये अनुदान मिळत असल्याचेही गट्टाणी यांनी सांगितले. संजय मोरे यांनी केले अनुभव कथन सीताफळ महासंघाचे राज्यध्यक्ष श्याम गट्टाणी यांच्या मार्गदर्शनपर चर्चासत्रानंतर संजय मोरे पाटील यांनी आपल्या सीताफळ शेतीचे अनुभव कथन केले. त्यांनी १००१ एकरावर सीताफळ लागवडीचा ध्यास घेतला आहे. आपल्या अनुभवातून सीताफळ शेतीतील फायद्याचे तंत्र त्यांनी समजावून सांगितले. गटाने शेती केल्यास सीताफळाचे विक्री व्यवस्थापन सोपे होते. बाजारपेठेतील अनेक संधी कशा मिळू शकतात, याचाही आढावा त्यांनी मांडला. अॅग्रोवनच्या वाचनातून त्यांच्या शेतीची झालेली घडण आणि त्यामुळे झालेला फायदा त्यांनी प्रकर्षाने अधोरेखित केला. ॲग्रोवन हे दैनिक नसून ग्रंथ असल्याचा उल्लेख त्यांनी केला 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com