बांबू शेती शेतकऱ्यांना समृद्ध करणारी

राजशेखर पाटील, योगेश शिंदे
राजशेखर पाटील, योगेश शिंदे

बांबू शेतीमध्ये प्रचंड मोठे अर्थकारण दडलेले असून, अन्य कोणत्याही पिकांपेक्षा शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची ताकद या पिकात आहे. भविष्यात पर्यावरण उत्पादनांचा निर्मितीसाठी बांबूंची गरज वाढत जाणार आहे. त्यामुळे विक्रीची चिंता न बागळता बांबू शेतीकडे वळण्याचा सल्ला बांबू उत्पादक शेतकरी आणि उद्योजकांनी दिला. सकाळ-अॅग्रोवन तर्फे औरंगाबाद येथे आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये रविवारी (ता.३०) आयोजित ‘बांबू शेती आणि उत्पादन’ या विषयावरील परिसंवादामध्ये निपाणी (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील बांबू उत्पादक शेतकरी राजशेखर पाटील आणि उद्योजक योगेश शिंदे हे बोलत होते. राजशेखर पाटील म्हणाले, ‘‘सुरवातीला ५४ एकर फळबागेला संरक्षक कुंपण म्हणून ४० हजार बांबू रोपांची लागवड केली. त्या वेळी केवळ वनभिंत तयार करण्यापलीकडे दुसरा विचार नव्हता. बांबू लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांनी हेटाळणी सुरू केली. परंतु गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही शेती पिकांपासून समाधानकारक उत्पादन मिळेनासे झाले. फळपिकांचे उत्पादन मिळत नव्हते. दरम्यानच्या काळात बांबूच्या १० लाख काठ्या तयार झाल्या होत्या. टोमॅटो, द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांकडून बांबू काठ्यांना मोठी मागणी येऊ लागली. पहिल्याच वर्षी २० लाख रुपयांच्या बांबू काठ्या विकल्या गेल्या. आणि बांबूच्या अर्थकारणाने मी स्वतः चकित होऊन गेलो. बांबू लागवडीसाठी विविध जातींचा अभ्यास सुरू केला. खरेतर बांबू लागवडीला कोणतीही जमीन चालते. एकदा लागवड केली की कमीत कमी ६० वर्षे बघायचे काम नाही. चांगले पाणी आणि खत व्यवस्थापन केल्यास बांबू काठ्यांची वाढ झपाट्याने होते. ४ ते २०० काठ्यांचे बांबूचे बेट तयार होते. एक बेट किमान १० हजार रुपयांचे उत्पन्न देते. एक एकरातून किमान १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. बांबू लागवड करणारा शेतकरी ४ ते ५ वर्षांत श्रीमंत होतो. बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी विक्रीची चिंता बाळगू नये. नापिकीमुळे होत असलेल्या शेतकरी आत्महत्या थांबवण्याची क्षमता बांबू शेतीत आहे. आधी बांधावर लागवड करून बांबू शेतीची सुरवात करावी. बांबू शेतीमुळे वातावरणात मुबलक प्रमाणात आॅक्सिजन उपलब्ध होतो. त्यामुळे आर्थिक आणि आरोग्याच्यादृष्टीने समृध्द करणाऱ्या बांबू शेतीकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे. योगेश शिंदे म्हणाले, ‘‘बांबू लागवडी व उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक असला तरी केवळ चार टक्के इतक्याच उत्पादनापासून विविध वस्तू किंवा बांबू प्रोडक्ट बनवले जातात. पर्यावरण स्नेही असल्यामुळे बांबू उत्पादनांची मागणी वाढत जाणार असून, सध्या भारतातून १८ देशामध्ये बांबू प्रोडक्ट निर्यात होतात. बांबूपासून सुमारे १८०० वस्तू तयार केल्या जातात. बांबूचा कोणताही भाग वाया जात नाही. बांबूच्या टूथ ब्रशलाही मागणी वाढत आहे. थोडक्यात बांबूची प्रचंड गरज आहे. बांबूकडे व्यावसायिक उत्पादन म्हणून पहावे. शाश्वत उत्पन्नाचे साधन तसेच मृदा जलसंधारण अशा दुहेरी उद्देशाने राज्यातील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचा विचार करायला हरकत नाही. ’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com