प्रदर्शनातून मिळाले नव्या पर्यायाचे ज्ञान

औरंगाबाद- प्रदर्शन बघण्यासाठी एकत्रितपणे आलेल्या बचत गटांच्या महिला.
औरंगाबाद- प्रदर्शन बघण्यासाठी एकत्रितपणे आलेल्या बचत गटांच्या महिला.

सकाळ-अॅग्रोवन परिवाराच्या वतीने औरंगाबादला कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्यामुळे बचत गटांच्या महिला शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांसाठी नेमक्या कोणत्या संधी आहेत, याची जाण झाली. प्रदर्शनात सहभागी झालेल्या जवखेडा (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील महिला बचत गटांच्या सदस्यांनी बचतीसोबतच करता येणे शक्य असलेल्या पूरक उद्योग व संबंधित साधने प्रत्यक्ष पाहिली. यामुळे आपला दिवस सार्थकी लागल्याची भावना व्यक्त करत, इथून घेतलेल्या माहितीच्या आधारे आमच्या बचत गटांची वाटचाल नव्याने सुरू करू हे सांगितले. या महिला शेळीपालन व इतर छोटे मोठे उद्योग करून दुष्काळी परिस्थितीत कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करताहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याअंतर्गत जवखेडा येथील माउली बचत गट, श्रीकृष्ण बचत गट, दुर्गामाता बचत गट, लक्ष्मी माता बचत गटाच्या महिला सदस्यांनी शनिवारी (ता.२९ ) सकाळ ॲग्रोवन कृषी प्रदर्शनाला भेट दिली. माउली बचत गटाच्या वेणूबाई कोरे म्हणाल्या, ‘‘आम्ही गेल्या काही वर्षांपासून महिला बचत गट स्थापन करून बचत करतो. आम्ही शेळीपालन व इतर छोट्या छोट्या उद्योगांतून कुटुंबाला आधार देण्याचे काम करीत आहोत. आमच्या कुटुंबालाही दुष्काळाच्या झळा बसत असल्या तरी आम्ही करत असलेल्या छोट्या मोठ्या कामाने झळांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. नव्याने बचत गटात आलेल्या आमच्या गावातील महिलांना आम्ही प्रदर्शनाचे महत्त्व समजून सांगितले, त्यामुळे गावातील तीन ते चार महिला बचत गटांच्या सदस्य आमच्यासोबत औरंगाबादला कृषी प्रदर्शन पाहायला आल्या. हे प्रदर्शन पाहताना आम्हाला कुरडया, पापड, शेवया तयार करण्याची मशीन जास्त भावली. आमच्या घरगुती प्रयत्नांना लघुउद्योगाची जोड देणे शक्य असल्याचे या प्रदर्शनातून कळले. प्रदर्शनात मिळालेल्या ज्ञान व विविध पर्यायामुळे आम्हाला आजचा दिवस सार्थकी लागल्याचा आनंद होतोय. महिलांना सहजशक्य असलेल्या अशा पर्यायांकडे आम्ही वळणार असून, त्यातून दुष्काळी स्थितीत आमच्या कुटुंबाला आधार देणे शक्य होईल. ’’ लक्ष्मी माता बचत गटाच्या नंदिनी मातेरे म्हणाल्या, ‘‘आम्ही अलीकडेच बचत करायला लागलो. गावात आधीपासून कार्यरत बचतगटाच्या महिलांबरोबर प्रदर्शन पाहण्यास आलो आहोत. ॲग्रोवनच्या प्रदर्शनात खूप काही नवीन पाहायला, शिकायला मिळाले. येथे आल्यानंतर कितीतरी कामे आपल्यालाही सहज करता येतील, हा आत्मविश्वास मिळाला आहे.’’ जवखेडा येथील इंदुबाई मातेरे, प्रतीक्षा जाधव, नर्मदा मातेरे यांच्यासह इतर महिला बचत गटांच्या सदस्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास बरेच काही सांगून जात होता. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com