दुष्काळात ३५ एकरांवरील फळबाग वाचविण्याचा निर्धार

 येथील पांडुरंग डोंगरे यांनी द्राक्षबागेत उसाच्या पाचटांचे मल्चिंग केले आहे
येथील पांडुरंग डोंगरे यांनी द्राक्षबागेत उसाच्या पाचटांचे मल्चिंग केले आहे

शाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक शेती पद्धतीला फळबागांची जोड दिली. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता दिवसागणिक कमी होत आहे; पण यामुळे खचून न जाता कोणत्याही परिस्थितीत येत्या पावसाळ्यापर्यंत ३५ एकर फळबाग वाचवायची ही जिद्द धरली आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. संपूर्ण फळबागांमध्ये उसाच्या पाचटीचे मल्चिंग केले असून, उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करत असल्याचे जालना जिल्ह्यातील कर्जत (ता. अंबड) येथील शेतकरी पांडुरंग निवृत्तीराव डोंगरे यांनी सांगितले. पांडुरंग डोंगरे यांची कर्जत शिवारात ९० एकर शेती आहे. पारंपरिक पिकांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर, बाजरी, ज्वारी या पिकांचे उत्पादन घेत. मात्र, या पीकपद्धतीत खात्रीशीर उत्पादन मिळत नसल्याने डोंगरे फळबागेकडे वळाले. त्यांनी एकूण ३५ एकर क्षेत्रामध्ये मोसंबी, डाळिंब, द्राक्षे, ड्रॅगन फ्रूट अशी फळबाग केलेली आहे. यंदाच्या पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस झाला. ओढे, नाले न वाहिल्याने विहिरींची पाणीपातळी वाढली नाही. संरक्षित सिंचनासाठी शेततळ्याची सुविधा निर्माण केलेली आहे. परंतु या शेततळ्यातील पाणीदेखील कमी पडू शकते. पावसाळ्याला अजून सहा ते सात महिने कालावधी असून, तोपर्यंत फळबाग जगविणे जिकिरीचे होणार आहे. सध्या उत्पादनापेक्षाही बाग जगवण्यावर लक्ष केंद्रित केले असून, २ हजार मोसंबी झाडावरील ७० ते ८० टन फळे काढून टाकली. द्राक्ष बागेतील घडदेखील तोडून टाकले आहेत. फळबागा वाचविण्यासाठी कृषी विद्यापीठाने सांगितलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहोत. बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी संपूर्ण बागेत उसाच्या पाचटाचे आच्छादन टाकले आहे. पाच ते आठ दिवसाला ट्रॅक्टरद्वारे पाण्याची फवारणी करत आहोत. झाडांना अन्नद्रव्ये त्वरित मिळण्यासाठी विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी केली जाते. बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी केओलिनचाही वापर करत आहोत. फळझाडे जगली तरच चांगला पाऊस झाल्यानंतर उत्पादन घेता येईल, या विश्वासावर सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करत असल्याचे पांडुरंग डोंगरे यांनी सांगितले. दुष्काळ आहे म्हणून हार मानलेली नाही. उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून लढा सुरू आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com