agriculture story in marathi, agrowon, farmer Shri. Kalamkar is getting good returns from dairy farming rather than crop production. | Agrowon

शेतीपेक्षा दुग्धव्यवसायातून उभारी

गणेश कोरे
मंगळवार, 24 मार्च 2020

भाडेतत्त्वावर रोपवाटिका व्यवसाय सुरू असताना क्षेत्र कमी होत गेले. व्यवसाय कमी झाला. त्यात शेती केवळ तीन एकर. अशा वेळी दूरदृष्टी वापरून किशोर कळमकर (लवळे, जि. पुणे) यांनी दुग्धव्यवसायाकडे मोर्चा वळवला. स्वतः राबण्याची तयारी, दर निश्‍चित करून बसवलेली विक्री व्यवस्था व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन व्यवस्थापन या आधारे कळमकर यांनी आपला व्यवसाय ३० गायी व दररोज ३०० लिटर दूध संकलन व विक्रीच्या यशस्वी टप्प्यांपर्यंत नेला आहे.v

भाडेतत्त्वावर रोपवाटिका व्यवसाय सुरू असताना क्षेत्र कमी होत गेले. व्यवसाय कमी झाला. त्यात शेती केवळ तीन एकर. अशा वेळी दूरदृष्टी वापरून किशोर कळमकर (लवळे, जि. पुणे) यांनी दुग्धव्यवसायाकडे मोर्चा वळवला. स्वतः राबण्याची तयारी, दर निश्‍चित करून बसवलेली विक्री व्यवस्था व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन व्यवस्थापन या आधारे कळमकर यांनी आपला व्यवसाय ३० गायी व दररोज ३०० लिटर दूध संकलन व विक्रीच्या यशस्वी टप्प्यांपर्यंत नेला आहे.

पुणे जिल्ह्यातील लवळे (ता. मुळशी) येथील किशोर कळमकर यांची पारंपरिक तीन एकर शेती आहे. त्यात गहू, भात आणि हंगामी भाजीपाल्याचे उत्पादन ते घ्यायचे. पुण्याचे उपनगर वाकड येथे भाडेतत्त्वावरील जागेत किशोर भावासह रोपवाटिका व्यवसाय करायचे. मात्र, जागामालकांनी जमिनीची विक्री सुरू केल्याने व्यवसायावर दिवसेंदिवस मर्यादा येत गेली. दोघेही एकाच व्यवसायात असण्यापेक्षा उत्पन्नाचे पर्यायी साधन शोधण्याचा विचार सुरू होता. आपल्याकडे दोन गायी तरी असाव्यात असे वडील सांगत. त्यानुसार, दुग्धव्यवसायाचा अभ्यास सुरू होता. तीन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यानंतर याच व्यवसायात उतरण्याचे ठरवले.

व्यवसायाचा श्रीगणेशा
दुग्धव्यवसायाचा कोणताही अनुभव नव्हता. जिद्द व शिकण्याची इच्छा मात्र होती. गावातूनच दोन कालवडी खरेदी केल्या. आळेफाटा (जि. पुणे) येथे जनावरांचा बाजार भरतो अशी माहिती मिळाल्यानंतर तेथे शोध घेत प्रत्येकी ८० हजार रुपयांना दोन गायी खरेदी केल्या. पुढे चार गायी झाल्या. त्यांच्या व्यवस्थापनाचा अनुभव येत गेला. वर्षभरात ५० ते ६० लिटर दूध संकलन सुरू झाले. मावस भाऊ चंद्रकांत लोखंडे यांची वाकड येथे डेअरी आहे. त्यामुळे विक्रीची समस्या तशी नव्हती.

व्यवसाय विस्तार
गायींचे संगोपन, चारा व्यवस्थापन आणि विक्रीची घडी बसल्यावर व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार केला. दरम्यान लुपीन फाउंडेशनच्या ग्रामविकास योजनेंतर्गत पशुधन विकास कार्यक्रम सुरू होता. तेथील पशुवैद्यकीय अधिकारी सावबा शिंदे यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी मुक्त गोठा पद्धतीचे फायदे सांगितले. त्यांच्याच मार्गदर्शनातून १० गायी खरेदी करण्याचा आत्मविश्‍वास निर्माण झाला. दीड वर्षांपूर्वी पंजाब येथून ८ होल्स्टीन फ्रिजियन आणि दोन साहिवाल गायी खरेदी केल्या. पूर्ण झोकून देऊन कष्ट करण्याची तयारी, व्यवसायात वृद्धी करण्याची म्हणजेच प्रगती करण्याची वृत्ती यातून पुढील मार्ग सुकर झाला.

कळमकर यांचा दुग्धव्यवसाय

 • मुक्त गोठा पद्धतीचा वापर.
 • सध्या गायींची एकूण संख्या ३०. यात २७ एचएफ गायी, तीन देशी.
 • गायींची संख्या वाढल्याने ६५ बाय ३५ फूट आकाराचा गोठा बांधला आहे.
 • -हेड टू हेड अशी गोठ्याची पद्धत. यामुळे चारा, खाद्य देणे, फिरण्याची मोकळीक या बाबी सोप्या होतात.
 • गोठा व्यवस्थापनासाठी दोन कामगार. (एक त्यातील दाम्पत्य). त्यांच्यासाठी शेतात घराची सुविधा
 • दररोज सकाळी व संध्याकाळी मशीनद्वारे दूध काढणी.
 • वर्षभरात दररोजचे एकूण दूधसंकलन- २०० ते कमाल ३०० लिटर
 • वाकड येथे अनेक डेअऱ्या आहेत. त्यांना दुधाचा पुरवठा.
 • वर्षभराचा ३२ रुपये प्रतिलिटर हा दर निश्‍चित केला आहे.
 • साधारण ४० ते ५० लिटर दुधाचे रतीब घातले जाते. त्याचा दर ४० ते ४५ रुपये आहे.
 • दुधाचे फॅट ४ तर एसएनएफ- ८.५
 • व्यवसायातून नफ्याचे प्रमाण सुमारे ३० टक्के

तीन एकरांत चारा व्यवस्थापन
आपल्या संपूर्ण म्हणजे तीनही एकरांत गायींसाठी चारा लागवड केली आहे. यात दीड एकर ऊस, एक एकर नेपिअर गवत व अर्धा एकरात मका आहे. सुक्या चाऱ्यासाठी गव्हाचा भुसा, कडबा, तुरीचा भुसा आदींची खरेदी होते. सुक्या चाऱ्याची वर्षभर साठवणूक केली जाते. गव्हाचा भुसा गावातूनच गोळा केला जातो. तर तुरीचा भुसा बुलढाणा, अमरावती येथून आणला जातो. सरकी, गव्हाचा भरडा आणि पशुखाद्य यांचीही गरजेनुसार खरेदी होते. आहारासाठी वर्षभराचा खर्च साधारण १० लाखांपर्यंत असतो. गायींना दर सहा महिन्यांनी लाळ्या खुरकूत, घटसर्प, जंतुनाशक आणि तापासाठी लसीकरण केले जाते. आहाराचे योग्य संतुलन राखल्याने गायी आजारी पडण्याचे प्रमाण फारच कमी आहे. तसेच मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब असल्याने गायींचे मानसिक व शारीरिक आरोग्यही चांगले राहते. त्यामुळेच दूध संकलनात सातत्य ठेवणे शक्य होते.

प्रक्रिया उद्योग सुरू करणार
भविष्यात केवळ दूधविक्रीवर अवलंबून न बसता गायींची संख्या व दूध संकलन वाढवून तूप, लोणी, दही, ताक, पनीर आदी पदार्थनिर्मिती करून स्वतःच्या ब्रॅण्डने विक्री करण्याचा किशोर यांचा मानस आहे.

प्रतिक्रिया
सध्या रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू आहे. तो बंधू पाहतात. शेतीपेक्षा दुग्धव्यवसायानेच आर्थिक सक्षम केले आहे. आम्हांला या व्यवसायात सुरुवातीला किमान १० लाख रुपयांचे भांडवल गुंतवावे लागले आहे. मात्र, स्वतः कष्ट करण्याच्या तयारीमुळे या व्यवसायात वृद्धी करणे शक्य झाले.

किशोर कळमकर- ९४२२३३०६२५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
एकी, प्रयोगशीलता, कष्टातून व्यावसायिक...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील सोगे संयुक्त...
व्यावसायिक चातुर्यातून ४० टन कलिंगडाची...कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत...
प्रक्रिया उत्पादनांवर 'साहिवाल क्लब'चा...दूध विक्रीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन तूप, पनीर...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
भारत - इस्राईल मैत्रीतून उजळणार...भारत आणि इस्राईल देशातील पंतप्रधानांच्या भेटीतून...
औरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्रीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी...
आरोग्य सुरक्षिततेचे नियम पाळून थेट...पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
दुष्काळात शेतीला साथ पोल्ट्री,...औरंगाबाद जिल्ह्यातील भांडेगाव येथील चव्हाण कुटुंब...
शेतीपेक्षा दुग्धव्यवसायातून उभारीभाडेतत्त्वावर रोपवाटिका व्यवसाय सुरू असताना...
काटेकोर पाणी व्यवस्थापनातून...''पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका कायम दुष्काळी...
ऑयस्टर मशरूम निर्मितीसह तयार केले...अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील अभियंता...
प्री कुलिंग, रिफर व्हॅनद्वारे...महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी देशभरात प्रसिद्ध आहे. या...
केळी, मका पिकांसह दुग्धव्यवसायात...दापोरी (जि. जळगाव) गावाने केळी, मका, कापूस...
आंबा, काजूसह भाज्यांची प्रयोगशील शेतीशिरगाव (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील माधव...
एक्सॉटिक’ भाज्यांची आधुनिक पिरॅमिड शेतीखानापूर (जि. पुणे) येथील कागदी बंधूंनी पिरॅमिड...
रोवा काठ्या कमी खर्चात अन श्रमात...भाजीपाला विशेषतः वेलवर्गीय पिकांमध्ये मांडवासाठी...
दुर्दम्य इच्छाशक्ती, अविरत परिश्रमांतून...अलकुड (एम) (जि. सांगली) येथील महेश पाटील यांनी...
काटेकोर व्यवस्थापन सांगणारा शेटेंचा...निघोज (जि. नगर) येथील माजी सैनिक नवनाथ भिमाजी...