गौरी-गणपतीसाठी निशिगंध, घरच्या भाज्यांचा नैवेद्य

कुलकर्णी दांपत्याने फुलवलेला मोहक निशिगंध
कुलकर्णी दांपत्याने फुलवलेला मोहक निशिगंध

सोलापूर जिल्ह्यातील रोपळे बुद्रुक (ता. पंढरपूर) येथील सौ. मनिषा व संजय या कुलकर्णी दांपत्याने आपल्या लिंबाच्या बागेत गौरीच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्यांबरोबरच निशिगंधा फुलांचा मळा फुलवला आहे. गौरी- गणपती सणाच्या अनुषंगाने या फुलांना चांगला दर मिळू लागला आहे. साहजिकच फुलांचा सुगंध लक्ष्मीच्या रूपाने दरवळू लागला आहे. या दरवळीबरोबरच विषमुक्त भाजीपाला उत्पादनातून कुलकर्णी परिवार समाधानाने जीवन व्यतीत करतो आहे.   सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरपासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर पंढरपूर-बार्शी रस्त्यावर रोपळे बुद्रुक गाव लागते. ऊस हे इथले मुख्य पीक आहे. गावात सौ. मनिषा व संजय हे अत्यल्प भूधारक शेतकरी दांपत्य राहते. संजय हे पंढरपूर येथील कवठेकर प्रशालेत शिपाई पदावर सेवा करतात. गावचे पौराहित्य व नोकरी या जबाबदाऱ्या सांभाळत ते शेतीही पाहतात. त्यामुळेच की काय कमी देखभालीच्या कागदी लिंबाच्या पिकाला त्यांनी पसंती दिली. लिंबातील आंतरपिकाचा प्रयोग लिंबाचे उत्पन्न सुरू होण्यासाठी साधारण चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो. या काळात शेतीतील उत्पन्नाचे सातत्य राहण्यासाठी आंतरपीक घेण्याचे ठरविले. मात्र ते घेताना मुख्य पिकाच्या वाढीवर कोणता परिणाम वा त्रास होणारी नाही याचा विचार केला. अशा पिकाचा शोध घेत असताना निशिगंधाचा (गुलछडी) शोध लागला. नोकरीच्या निमित्ताने दररोजच पंढरपूरला जावेच लागत असल्यामुळे फुलांची विक्री करण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागणार नव्हते. म्हणून लिंबाच्या बागेत दोन ओळींच्या मधल्या जागेत निशिगंधाच्या कंदांची लागवड केली. त्यासाठी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील शेतकऱ्यांकडून कंद आणले. शेतीतील व्यवस्थापन गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये साई सरबती लिंबाच्या रोपांची लागवड केली. त्यानंतर नोहेंबरमध्ये टोकण पद्धतीने गव्हाचे आंतरपीक घेतले. त्याचे २१ क्विंटल उत्पादन मिळाले. गव्हाची काढणी झाल्यावर चालू वर्षी मेमध्ये निशिगंधाची लागवड केली. निशिगंधाच्या फुलांना चैत्र, वैषाख, ज्‍येष्ठ व आषाढ हे चार महिने सोडले तर उर्वरित आठ महिन्यांत फुलांचा चांगला उठाव होतो. दरही चांगले मिळतात असे कुलकर्णी यांनी सांगितले. निशिगंधाचे उत्पादन सुरू होण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे लागवड झाल्यानंतर त्याच्या बरोबरीने भाजीपाला पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

भाज्यांची लागवड  जूनमध्ये निशिगंधाच्या ओळींमध्ये बाहेरील बाजूने भेंडी, गवार, वांगे, मेथी, शेपू, कोथिंबीर, पालक, चुका, आळू, चवळी, टोमॅटो, पुदीना, कांदा, मुळा, करडी, राजगिरा, आमटी, तांदुळसा व कडीपत्ता आदी भाज्यांची लागवड केली. चवळी व कडीपत्ता बांधावर तर उर्वरित भाज्या या निशिगंध व लिंबाच्या आळ्यात लावल्या. बांधावर लाल जास्वंद, पांढरी कन्हेरी, चिनी गुलाब, देशी गुलाब, तुळस, साधा (लाल) गुलाब, गुलाबी कण्हेरीच्या फुलांची लागवड केली आहे. इतरांच्या घरातही फुलांचा दरवळ कुलकर्णी यंचे शेत गावालगतच आहे. त्यामुळे निशिगंधा व्यतिरिक्त पूजा व अन्य कारणांसाठी लागणारी फुले लोक त्यांच्या घरूनच घेऊन जातात. आपल्यासह गावकऱ्यांच्या घरातही फुलांचा दरवळ राहावा हा त्यामागील हेतू असतो. गौरीच्या नैवेद्याला लागणारा भाजीपाला गौरी आवाहन व गौरी पूजन या दोन दिवसांत गौरींना सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. यामध्ये पहिल्या दिवशी गौरींना भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यात शेपूच्या भाजीला मान असतो. तर दुसऱ्या दिवशी गौरी गणपतीला तब्बल सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. यातील बटाटा, पडवळ, कोबी व फ्लाॅवर वगळता बहुतांश भाज्या कुलकर्णी यांच्या शेतात आपल्याला दिसतात. विक्री तंत्र व उत्पन्नाचे सातत्य जपले लिंबाच्या बागेतील निशिगंध सुमारे चार ते पाच वर्षे उत्पादन देत राहतो. त्याचबरोबर भाजीपालाही असतो. शेतातील मजुरी व अन्य खर्च भाजीपाला पिकातूंन भरून निघत असल्यामुळे कुलकर्णी दांपत्याने कायम भाज्यांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी एका मजूर दांपत्याच्या हाताला कायम काम दिले आहे. निशिगंधाच्या फुलांची दररोज तोडणी करावी लागते. सकाळी फुलांची तोडणी करून ती पंढरपूरच्या फुलांच्या बाजारपेठेत दुपारी पाठवली लागतात. सकाळी संजय मजुरांसह पंढरपूरला जातात. मजूर फुलांची विक्री करून एसटी बसने परत येतो. हा नित्याचा क्रम बनला आहे. संध्याकाळी ताजी भाजी काढून गावातील मंडईमध्येच विकली जाते. एका भाजीची काढणी झाल्यानंतर त्या जागेत दुसऱ्या भाजीची लागवड त्वरित केली जाते. त्यामुळे भाज्यांचा कधीही खंड पडत नाही. उत्पन्नात सातत्य राहते. नियोजनातील वैशिष्ट्ये

  • कुलकर्णी यांच्या घरासमोरच दररोज मंडई भरते. त्यामुळे सर्व भाज्या ताज्या स्वरूपात मंडईत विकल्या जातात.
  • रासायनिक कीडनाशकांचा वापर केला जात नसल्याने भाज्यांना बाजारपेठेत चांगला उठाव असतो.
  • संपूर्ण शेतीला ठिबकने पाणी देण्याची व्यवस्था
  • शेतीतील मजूर व पाण्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मनिषाताई सांभाळतात.
  • सध्या गौरी गणपतीचा सण सुरू आहे. कुलकर्णी यांच्या निशिगंधाच्या फुलांच्या एका ढिगाला
  • बुधवारी (ता. १२) बाजारात सुमारे २५० रुपये दर मिळाला. फुले टवटवीत ताजी असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून मागणी राहते. त्यामुळे दरही चांगले मिळतात.
  • कुलकर्णी यांची ३८ गुंठे शेती आहे. यातील आठ गुंठ्यात ‘मोबाईल’ क्षेत्रातील कंपन्यांचे मनोरे बसवल्याने केवळ तीस गुंठेच शेती वापरण्यासाठी मिळत आहे. निशिगंध व भाजीपाल्यातील उत्पन्न हे घरचे अर्थकारण उंचावण्यात मोलाची मदत करते आहे. गावालगतच मळा असल्याने निशिगंधाचा सुगंध गावात दरवळतो.
  • गौरी-गणपतीसाठी सजले फुलांचे मार्केट सध्या पंढरपूर येथील फूल बाजारात गौरी गणपती सणानिमीत्त फुलांच्या मागणीत वाढ झाल्याने फुलांचे दर गगनाला भिडले आहेत. येथील बाजारात फुलांचे दर वजन किंवा क्रेटच्या आधारे न ठरवता फुलांच्या ढिगांवर ठरवले जातात. बुधवारी (ता. १२) फुलांचे दर (ढीगांचे) याप्रमाणे होते.

  • शेवंती- १५० ते २००
  • निशिगंध-२०० ते २५० रू.
  • पांढरी शेवंती- २५० ते ३०० रू.
  • झेंडू १० ते २० रू.
  • गुलाब- २० ते २५ रू.
  • जुई -१५० ते २०० रू.
  • अडत व्यापारी सागर सागर माळी म्हणाले, की गौरीच्या सणात फुलांची आवक कमी झाल्यास या दरात आणखी वाढ होईल. या बाजारात सध्या पंढरपूर तालुक्यातील रोपळे, खर्डी, कोर्टी, कासेगाव, लक्ष्मी टाकळीसह मंगळवेढा व सांगोला तालुक्यांतील फुलांची आवक होते आहे.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com