डीएचएम-६ चारा वाण ठरले दुष्काळात वरदान

डीएचएन-६ या वाणात जनावरांच्या वाढीसाठी व दूध वाढीसाठीही लागणारे पौष्टिक घटक अन्य चारापिकांपेक्षा जास्त प्रमाणात आहेत. त्याच्या लागवडीतून पशुखाद्यावरील जास्तीच्या खर्चात बचत होऊन दूध वाढण्यास मदत मिळेल. -डॉ. एस. बी. क्षीरसागर पशुधन अधिकारी, चापोली संपर्क- ९४०३७७३८४४
बालाजी वाघमोडे यांनी घेतलेले डीएचएन-६ चारापीक
बालाजी वाघमोडे यांनी घेतलेले डीएचएन-६ चारापीक

लातूर जिल्ह्यातील माकणी (ता. अहमदपूर) येथील बालाजी वाघमोडे यांनी आपल्या ४० एकर क्षेत्राला पाणी व्यवस्थापनाची उत्तम जोड देत दुष्काळातही शेती सुकर केली आहे. डीएचएन-६ या चारा पिकाची लागवड करून आपल्या दहा जनावरांना वर्षभर चारा पुरवला आहे. भीषण दुष्काळात काही शेतकऱ्यांना जनावरांची विक्री करणे भाग पडले. मात्र, वाघमोडे यांनी पाणी व चाऱ्याचे उत्तम व्यवस्थापन करीत जनावरांचे उत्कृष्ट संगोपन साधले आहे.  लातूर जिल्हा दर वर्षीप्रमाणे यंदाही दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. अहमदपूर तालुक्यातील माकणी येथील बालाजी वाघमोडेदेखील दुष्काळाशी लढत आपली ४० एकर शेती सुकर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बालाजी यांनी १९७८ मध्ये कला शाखेची पदवी घेतली. नोकरीच्या मागे न धावता शेतीकडे वळून त्यात अनेक सुधारणा केल्या.  बालाजी यांची शेती 

  • ऊस- २० एकर 
  • सोयाबीन व तूर- १५ एकर 
  • चारापिके- पाच एकर 
  • पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य  शेती नफ्यात आणायची असेल, तर आधी पाण्याचे भक्कम स्त्रोत निर्माण करणे गरजेचे असते, हे वाघमोडे यांनी जाणले. त्यांची ४० एकर जमीन तीन तुकड्यांत असल्याने पाणी व्यवस्थापन करणे अवघड जात होते. मग तीन विहिरी व पाच कूपनलिका यांच्या जोरावर पाइपलाइनचे जाळे निर्माण करीत संपूर्ण ४० एकरांपर्यंत पाणी पोचविले आहे. घराशेजारी ३५ फूट खोल विहीर घेतली. त्याला पाणीही लागले. शेजारीच दोन कूपनलिकाही घेतल्या असून, त्यातील पाण्याची विहिरीत साठवण होते. घरापासून दोन हजार फूट अंतरावर असलेल्या दहा एकर जमिनीपर्यंत पाइपलाइन केली. त्यामुळे हे संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली आले. खरबवाडी तलावाच्या पूर्व दिशेला ६० फूट खोल विहीर घेतली आहे. शेजारीच तीन कूपनलिका घेतल्या असून, त्यातील पाण्याची विहिरीत साठवण केली जाते. विहिरीवरून जवळील असलेल्या दहा एकर जमिनीपर्यंत एक हजार फूट पाइपलाइन केली आहे. तसेच, तेथून घराजवळील विहिरीपर्यंत जवळपास तीन किलोमीटर पाइपलाइन करून दोन विहिरी एकमेकाला जोडल्या आहेत. त्यामुळे आवश्यकतेनुसार पाणी विहिरीत घेतले जाते.  खरबवाडी तलावाच्या दक्षिण दिशेला ६० फूट खोल विहीर घेतली आहे. या विहिरीवरून तीन इंचाची दोन हजार फूट, तर चार इंचाची अडीच हजार फूट लांब पाइपलाइन केली आहे. या विहिरीमुळे उर्वरित २० एकर जमीन सिंचनाखाली आली आहे. विहिरीत पाणी कमी पडत असेल तेव्हा तलावातील पाण्याची विहिरीत साठवण केली जाते. यासाठी तलावावरून विहिरीपर्यंत एक हजार फूट पाइपलाइन केली आहे.  पाण्याबरोबर जनावरे व चाऱ्याचे नियोजन  बालाजी यांच्याकडे आठ म्हशी व दोन संकरित गायी आहेत. ते दुग्धव्यवसायासह म्हैस खरेदी-विक्री व्यवसायही करतात. मात्र, अलीकडील काळात चाऱ्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे जनावरांचे संगोपन करणे सोपे राहिलेले नाही. उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील उपसंचालक डॉ. विश्वास साळुंके अशा वेळी बालाजी यांच्या मदतीस धावले. त्यांनी डीएचएन-६ (धारवाड हायब्रीड नेपीयर) या गवतवर्गीय चारापिकाच्या वाणाविषयी उपयुक्त माहिती दिली. त्याचे महत्त्व पटलेल्या बालाजी यांनी दोन ठिकाणी प्रत्येकी अर्धा एकर याप्रमाणे एकूण एक एकरावर लागवड केली.  लागवड नियोजन  सन २०१५ मध्ये घेतलेले डीएचएन -६ पीक आज वर्षभर हिरवा चारा देऊ लागले आहे. दुष्काळात जनावरांसाठी ते वरदान ठरला आहे. साधारण तीन फुटी सरीत त्याची लागवड आहे. लागवडीपूर्वी शेणखताचा वापर त्यात केला आहे. वेळच्या वेळी रासायनिक खते दिली आहेत. साधारण दोन महिन्यांनी एक अशा रीतीने वर्षभरात सुमारे सहा कापण्या होतात. प्रत्येक कापणीनंतर युरियाचा डोस देण्यात येतो. पावसाचा ताण पडल्याच्या काळात, तसेच उन्हाळ्यात दहा ते १५ दिवसांनी पाणी देण्यात येते. कापणीनंतर आवश्यकता असल्यास खुरपणी करून जमीन तणमुक्त ठेवली जाते.  उत्पन्न  सध्या दररोज म्हशीचे दहा लिटर, तर गायीचे १५ लिटर दूध संकलित होते. गावातील डेअरीला विक्री होते. त्यातून महिन्याला दहा ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. वर्षाला साधारण २० ते २५ ट्रॉली शेणखत मिळते. दर वर्षी सहा एकरांवर त्याचा वापर होतो. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते. मुऱ्हा, जाफराबादी जातीच्या साधारण तीन-चार महिन्यांच्या गाभण म्हैस विकत घेण्यात येतात. सुमारे सहा महिने संगोपन करून त्यांची विक्री सरासरी ८० ते ९० हजार रुपयांपर्यंत उदगीर येथील बाजारात केली जाते. एका म्हशीपासून सहा महिन्यांत ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो.  डीएचएन-६ वाणाची वैशिष्ट्ये 

  • वाढ जोमाने होते. पाने रुंद व हिरवीगार राहतात. जसजसे फुटवे वाढतील तसतसा लुसलुशीत चारा मिळतो. 
  • रसाचे प्रमाण मुबलक. गोड चवदार. 
  • पीक साधारण १२ ते १५ फूट उंचीपर्यंत वाढू शकते. 
  • ऑक्झॅलेटचे प्रमाण हत्तीगवताच्या प्रमाणापेक्षा कमी 
  • गोड, रसयुक्त चाऱ्यातून जनावरांना मुबलक ऊर्जा मिळते. ही ऊर्जा दूध उत्पादन व बैलांसाठीही उपयुक्त ठरते. 
  • वैरण कापल्यानंतर ३ ते ४ दिवसांपर्यंत यामध्ये रसाचे प्रमाण टिकून राहते. 
  • अन्य चारा पिके  डीएचएन-६ वाणाबरोबरच एक एकरात मका, २० एकरांवरील उसाचे वाड, सोयाबीन व तुरीच्या गुळीची साठवण केली जाते. एक एकरवर बाजरीचीही लागवड असते. दोन एकरांत कडब्यासाठी ज्वारी असते.  ॲॅग्रोवनमुळे नवी माहिती मिळते  बालाजी सांगतात, की मुलगा प्रशांत माझ्यासोबत शेती करतो. ॲग्रोवनमध्ये पशुधनाचे संगोपन व चारा व्यवस्थापनावरील लेख वाचून नवनवीन माहिती मिळते. शेतीतील उत्पन्नावर त्यांनी आपल्या एका मुलाला संगणक अभियंता बनवले. तर, दुसरा मुलगा वन खात्यात कार्यरत आहे.

    संपर्क- बालाजी वाघमोडे- ९७६४५१२३०६   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com