जिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...

मी खचलेलो नाही लिमगुडे यांनी सलग दोन वर्षे चांगले उत्पन्न मिळवले. पण यंदा दुष्काळाने चांगलाच तडाखा दिला. यंदा चार ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल अशी आशा होती. त्यानुसार नियोजन केले होते. मात्र जुलैनंतर पाऊसच झाला नाही. आता उत्पादन घेणे हे मुख्य उद्दीष्ट नसून, सुमारे पावणेदोन ते दोनहजार झाडे जगवणे हेच मुख्य उद्दीष्ट असल्याचे ते म्हणाले. सुमारे १० टॅंकर पाण्याची गरज भासू शकेल. विहीर आणखी खोल करण्यासाठी आठ हजार रुपये प्रति फूट याप्रमाणे सव्वा लाख रुपयांची तजवीज आहे.मी खचलेलो नाही. पुढील हंगाम या प्रयत्नांतून निश्‍चित चांगला मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
प्रकाश लिमगुडे यांनी फुलवलेली पेरूची बाग
प्रकाश लिमगुडे यांनी फुलवलेली पेरूची बाग

पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील केंदूर येथील प्रकाश लिमगुडे चार वर्षांपासून जिद्दीने पेरू शेती करीत आहेत. बाजारपेठेत सर्वात पसंती मिळवणारा वाण निवडून दोन वर्षे यशस्वी उत्पादन व उत्पन्नही घेतले. यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या. भले उत्पादन हाती न लागो, पण धैर्याने दोन हजार झाडांचे यशस्वी संगोपन करण्याचे त्यांचे प्रयत्न त्यांच्या प्रयोगशीलतेचाच नमुना दाखवणारेच म्हणावे लागतील.   पुणे जिल्ह्यातील शिरूर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील केंदूर येथील प्रकाश लिमगुडे यांची सात एकर शेती आहे. उपलब्ध पाण्यावर पारंपरिक शेती करताना २०१४ मध्ये त्यांना पेरू पिकाद्वारे फळबाग शेतीची दिशा मिळाली. अफार्म संस्था आणि ‘आयटीसी’ कंपनी यांच्या सहकार्याने ‘सुनहरा कल' अभियानांतर्गत सुमारे सव्वा एकर क्षेत्रावर पेरु झाडे लावण्यासाठी मदत मिळाली. यात संस्थांच्या वतीने ७० टक्के तर शेतकरी सहभाग ३० टक्के निधीवर रोपांचा लाभ मिळाला.  आश्‍वासक उत्पादन  थिटेवाडी बंधाऱ्यावरून केलेल्या सामूहिक विहिरीतील पाण्यावर पेरू बागेचा श्रीगणेशा झाला. ठिबक सिंचनाद्वारे पाणी, खते, कीडनाशके यांचे नियोजन करीत हंगाम सुरु झाला. पहिलाच हंगाम (२०१५) असल्याने विशेष उत्पादनाची आशा नव्हती. सन २०१६ मध्ये मात्र सुमारे ८०० झाडांपासून लिमगुडे यांनी आठ टन उत्पादन घेतले. त्या वेळी एकूण तीन लाख ६५ हजार रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळवले. पुढील वर्षी अजून उत्पादन वाढवण्याची आशा होती. पण पाऊस, फूलगळ या कारणांमुळे उत्पादनावर थोडा परिणाम झाला. तरीही तीन लाख ४५ हजारांचे उत्पन्न मिळाले. आता आत्मविश्‍वास वाढला. हे पीक अजून चांगल्या प्रकारे यशस्वी करायचे ठरवले. त्यातूनच सुमारे ११५० रोपांची लागवड करीत नवी बाग फुलवायला सुरवात केली. विशेष म्हणजे अधिक उत्पादन देणारा, चकाकी असलेला, गरदार पेरूचा वाण निवडवला.  व्यापारी मिळवले जागेवर  पेरूसाठी यांनी बाजारपेठेचा अभ्यास लिमगुडे यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला. त्यांनी आळंदी, देहू, भोसरी, पिंपरी, चिंचवड, कोरेगाव भीमा, शिक्रापूर अशा परिसरातील किरकोळ विक्रेत्यांशी थेट भेट घेतली. बागेत येऊन फळांची तोडणी करावी आणि माल घेऊन जावे असा पर्याय त्यांना दिला. फळांचा दर्जाही चांगला होता. साहजिकच खरेदीदारांना ही बाब सोयीची वाटली. फळांच्या दर्जानुसार ३० रुपयांपासून ते ४०, ५० रुपये प्रति किलो दर मिळू लागला. जागेवरच व्यापारी मिळवल्याने तोडणी, वाहतूक, अडत, हमाली आणि मुख्य म्हणजे बाजार समितीमध्ये होणारी फसवणूक या बाबी टाळणे शक्य झाले. पैशांची मोठी बचत झाली. 

दुष्काळातही झाडे जगवणारच  लिमगुडे यांनी सलग दोन वर्षे चांगले उत्पन्न मिळवले. पण यंदा दुष्काळाने चांगलाच तडाखा दिला. यंदा चार ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल अशी आशा होती. त्यानुसार नियोजन केले होते. मात्र जुलैनंतर पाऊसच झाला नाही. जुनी व नवी अशा दोन्ही बागांसाठी पाणी पुरणार नाही म्हणून मेमध्ये तीन दिवसांत पाच लाख रुपये खर्चून ४३ फुटांचा घेर आणि ३० फूट खोलीची विहीर खोदली. मोटर बसवून बागेत पाणी देखील आणले. आता उत्पादन घेणे हे मुख्य उद्दीष्ट नसून, सुमारे पावणेदोन ते दोनहजार झाडे जगवणे हेच मुख्य उद्दीष्ट असल्याचे ते म्हणाले. सुमारे १० टॅंकर पाण्याची गरज भासू शकेल. विहीर आणखी खोल करण्यासाठी आठ हजार रुपये प्रति फूट याप्रमाणे सव्वा लाख रुपयांची तजवीज आहे. पण मी खचलेलो नाही. पुढील हंगाम या प्रयत्नांतून निश्‍चित चांगला मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पुढील वर्षी मोसंबी लावण्याचे नियोजन आहे. फळबागांद्वारे थेट आणि रोख विक्रीच्या नियोजनातून चांगली घडी बसू शकते असे लिमगुडे म्हणाले.  आंतरपिकांनी दिले उत्पन्न  पेरूबागेत घरासाठी भुईमूग, कांदा, चवळी, सोयाबीन, मूग, उडीद सारखी पिके घेतली. अतिरिक्त उत्पादनाची बाजारात विक्री केली. साहजिकच दुष्काळात ही बाब आधाराची ठरते असे लिमगुडे सांगतात.  जाचक अटींमुळे फळबाग योजनेपासून वंचित  नव्याने सव्वा दोन एकर बागेच्या अनुदानासाठी पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्ज केला. कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. मात्र प्रति शेतकऱ्याला केवळ २०० रोपे देण्याचे आदेश होते. मध्यस्थाद्वारे शासकीय रोपवाटिकेतून ११५० रोपे जास्त दराने खरेदी केली. यात नुकसान झालेच. शिवाय योजनेपासून वंचित राहावे लागले अशी खंत लिमगुडे यांनी व्यक्त केली.  नियमनमुक्तीचा असाही लाभ  नियमनमुक्तीआधी विक्रीवर बाजार समित्यांना सेस द्यावा लागे. मात्र लिमगुडे यांनी थेट खरेदीदारांनाच बागेत बोलावले. दोघांना सोयीस्कर या व्यवस्थेतून रोखीचा व्यवहार होऊ लागला.  परागीभवनासाठी मधुमक्षिकापालन  परागीभवनासाठी मधुमक्षिकापालन केले आहे. यासाठी प्रशिक्षण लिमगुडे यांनी घेतले आहे. सध्या बागेत १० पेट्या आहेत. गेल्या वर्षी ४२ पेट्या होत्या. सुमारे ५०० लिटर मध विक्री साधत चांगले उत्पन्न मिळवले. 

 प्रतिक्रिया  पिंपरी चिंचवड भागात वीस वर्षे फळांची विक्री करतो. पूर्वी आळंदी, थेऊर, देहूगाव, पाटस, बारामती, वडगाव मावळ येथे पेरू खरेदीला जायचो. दोन वर्षांपासून लिमगुडे यांच्याकडून पेरू घेत आहे. येथील पेरूची गुणवत्ता चांगली असल्याने माझा फायदा झालाच. शिवाय लिमगुडे यांनाही जागेवरच दर मिळू लागला. 

-शिवाजी नेटके, पेरू खरेदीदार  संपर्क - ७२६३९३७५९१   

संपर्क- प्रकाश लिमगुडे- ९२८४९६५३९६   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com