ऊस पट्ट्यात जंबो पेरूचा यशस्वी प्रयोग

पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे अलिकडील काळात शक्य होत नाही. अशा वेळी वेगवेगळे प्रयोग, प्रयत्न व त्यातील सातत्य या बाबींच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो. -शहाजी शेळके
जिद्दीने व कष्टाने शहाजी शेळके यांनी तांबवेच्या ऊस पट्ट्यात पेरू लागवडीचा प्रयोग केला आहे.
जिद्दीने व कष्टाने शहाजी शेळके यांनी तांबवेच्या ऊस पट्ट्यात पेरू लागवडीचा प्रयोग केला आहे.

सांगली जिल्ह्यातील तांबवे (ता. वाळवा) या ऊस पट्ट्यात शहाजी यशवंत शेळके यांनी जंबो पेरू लागवडीचा प्रयोग केला आहे. साधारण दोन फळ हंगामांत त्यांना अनुक्रमे आठ टन व बारा टन असे उत्पादन मिळाले आहे. दरही नेहमीच्या पेरूच्या तुलनेत चांगले मिळाले आहेत. उसाच्या जोडीला जंबो पेरूची शेती आश्वासक ठरत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कासेगावपासून पूर्वेला तांबवे (जि. सांगली) गावचे शिवार लागते. गावाजवळून वाहणारी कृष्णा नदी, अथांग पसरलेले पाणी तांबव्याचा डोह म्हणून प्रसिद्ध आहे. उसाचा हा हुकमी पट्टा. रासायनिक खते व पाणी यांचा अति वापर, त्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक जमिनी क्षारपड किंवा नापीक होत आहेत. येथील शेतकरी प्रयोगशील वृत्तीचा असल्याने जिद्दीने ऊस, केळी यासारख्या पिकांचे प्रयोग करण्यात कायम व्यस्त असतो. प्रयोगशील शेळके तांबवे येथील शहाजी शेळके १९९० मध्ये शास्त्र शाखेतून पदवीधर झाले. वडिलोपार्जित त्यांच्या वाट्याला सात एकर जमीन आली. ऊस हे त्यांचेही मुख्य पीक. सतत काहीतरी वेगळे करण्याची त्यांची धडपड असते. त्यातूनच केळी लागवडीचा चांगला प्रयोग या भागात त्यांनी केला. केळी पिकविण्यासह रापनिंग चेंबरमध्ये पिकवून यशस्वी विक्री करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. जंबो पेरूचा प्रयोग केळी पिकातील यशापुरते थांबणारे शेळके नव्हते. अनेक ठिकाणी फिरून अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यातूनच त्यांना बाजारपेठेत जंबो पेरूबाबत माहिती मिळाली. या पेरूला दरही सर्वसाधारण पेरूपेक्षा थोडे जास्त मिळू शकतात याचीही माहिती झाली. हे पीक आपल्या भागासाठी आश्वासक ठरू शकते का याची चाचपणी झाली. हा पेरू छत्तीसगड भागातील अाहे. त्या दृष्टीने त्याची लागवड केलेल्या राज्यातील शेतकऱ्यांची माहिती घेतली. यात सासवड, कटगुणस, अौंध भागातील माहिती घेतली. तांबवे गावाजवळच कासेगाव आहे. तेथे शेळके व त्यांच्या मित्रांचा शेतकरी गट आहे. या पेरूविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट रायपूर (छत्तीसगड) देखील गाठले. पेरूचे व्यवस्थापन- ठळक बाबी

  • छत्तीसगड येथून प्रति १६० रुपयांना प्रति नग अशी रोपे आणली. एकरी साधारण ५५० रोपे लागतात. सन २०१६ मधील फेब्रुवारीमध्ये लागवड केली. हे क्षेत्र ५५ गुंठे आहे.
  • मागील वर्षी एक एकरात पुन्हा नवी लागवड केली आहे.
  • रोप लावणीच्या वेळी शेणखत प्रति झाड तीस किलो, निंबोळी पेंड ५०० ग्रॅम, त्याचबरोबर
  • झिंक, फेरस, सिलिकॉन, गंधक, बोरॉन आदींचाही वापर केला.
  • लागवड अंतर- दोन प्रकार- दहा बाय आठ फूट व १२ बाय आठ फूट.
  • झाडे सशक्त झाल्यानंतरच उत्पादनाचा विचार केला जातो. सुमारे दोन वर्षांनंतर फळांचे नियोजन सुरू होते.
  • नवी लागवड असते त्या वेळी पेरूच्या दोन ओळींच्या मधल्या जागेत शेवंती फुलांची लागवड केली. त्याला किलोला चांगला दर मिळून काही उत्पन्न हाती आले.
  • गुणवत्ता

  • प्रत्येक झाडावर सुमारे वीस फळे याप्रमाणे त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवले जाते.
  • लिंबू आकाराची फळे झाल्यानंतर त्यावर नेट चढवली जाते. जेणे करून फळमाशी किंवा अन्य किडींचा उपद्रव त्यास होत नाही. फळाची गुणवत्ता टिकून राहते.
  • उन्हाळ्यात सनबर्निंग टाळण्यासाठी कागदाचे स्टेपल करण्यात येते.
  • मिली बग किडीचा त्रासही त्यामुळे रोखण्याचा प्रयत्न असतो.
  • एक फळ हंगाम संपला की काही कालावधी झाडांना विश्रांती देऊन पुढील हंगाम धरला जातो.
  • पोपटी रंग विकसित झाल्यानंतर फळे परिपक्व होतात. त्यावेळी तोडणी केली जाते.
  • एकदा लागवड केल्यानंतर सुमारे दहा वर्षे तरी उत्पादन घेता येते, असे शेळके म्हणाले.
  • पॅकिंग दहा ते पंधरा किलो वजनाच्या बॉक्‍समधून पेरू बाजारपेठेत पाठवला जातो. बॉक्समध्ये भरताना त्याला फोम (नेट) व त्यावर प्लॅस्टिकची पिशवी घातली जाते. त्यामुळे पेरूची गुणवत्ता टिकून राहते. उत्पादन, मार्केट व विक्री आत्तापर्यंत शेळके यांनी पेरूचे दोन हंगाम घेतले. पैकी पहिल्या हंगामात ५५ गुंठ्यांत ८ टन तर पुढील हंगामात १२ टन उत्पादन मिळाले. पहिल्या हंगामातील पेरूंची पुणे येथे विक्री केली. त्या वेळी बाजारात आवक जास्त असल्याने किलोला ५० रुपयांपर्यंतच दर मिळू शकला. पुढील हंगामात मात्र मुंबई बाजारपेठेत पाठवलेल्या पेरूला हाच दर ८०, ८५ व कमाल १०० रुपयांपर्यंत मिळाला. शेळके म्हणाले की, या पेरूचे वजन ३५० ग्रॅम, ६०० ग्रॅम ते कमाल एक ते सव्वा किलोपर्यंतदेखील मिळाले आहे. त्याची गोडीही इतर पेरूंपेक्षा वेगळी आहे. बियांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बाजारात त्याला चांगला दर मिळण्याची संधी आहे. जून ते सप्टेंबर तसेच उन्हाळ्यात पेरूला चांगला दर मिळतो. अर्थात आवकेवर दरामध्ये चढ-उतार होताे. शेळके यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • मध्यम प्रकारच्या, निचरा होणाऱ्या जमिनीत पेरू लागवडीचा प्रयोग
  • संपूर्ण क्षेत्राला ‘ड्रीप 
  • बागेत पॉली मल्चिंगसाठी पालाकुट्टीचा वापर
  • ऊस पट्ट्यात पेरू लागवडीचा वेगळा प्रयोग
  •   संपर्क- शहाजी शेळके- ९९२३०३०७५७  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com