ताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता, सुमारे १६९ बचत गटांचा सहभाग 

ताराराणी महोत्सवात महिला उद्योजकांनी ग्राहकांशी संवाद साधत आपले विक्री कौशल्य सिद्ध केले.
ताराराणी महोत्सवात महिला उद्योजकांनी ग्राहकांशी संवाद साधत आपले विक्री कौशल्य सिद्ध केले.

कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या वतीने कोल्हापूर येथे नुकताच जिल्हास्तरीय ताराराणी महोत्सव यशस्वी पार पडला. सुमारे १६९ बचत गटांच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकरी महिलांना आपल्या विविध उत्पादनांसाठी व्यासपीठ मिळवले. आपल्यातील उद्योजकतेची क्षमता सिद्ध करीत पाच दिवसांच्या कालावधीत ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळवित चाळीस लाख रुपयांची विक्री या महिला उद्योजकांनी साधली .     ग्रामीण भागातील उद्योजकतेचा विकास झाला पाहिजे. त्यांच्यासाठी बाजारपेठा विस्तृत झाल्या पाहिजेत असे वारंवार बोलले जाते. पण कोल्हापूर जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच पंचायत राज विभागाने प्रत्यक्ष कृतीतून ही बाब आचरणात आणली. त्या अनुषंगाने पाच ते नऊ जानेवारी या कालावधीत जिल्हास्तरीय 'ताराराणी महोत्सव २०१९'चे आयोजन कोल्हापूर येथील ‘प्रायव्हेट हायस्कूल’च्या मैदानावर यशस्वी पार पाडले. ग्रामीण बचत गटातील अल्पभूधारक महिलांना त्यातून वेगळी ऊर्जा व प्रेरणा मिळाली.  प्रदर्शन Video पहा... मार्केटिंगचे कसब दाखवणाऱ्या अंजनाताई  अहो दादा, आमच्या शेतातील घनसाळ तांदूळ बघा, कमी पॉलीश केलेला आहे. शिजताना घरभर सुगंध पसरणार. एकदा चव घेऊन बघाच अशी आग्रहाची प्रेमळ साद अंजनाताई घालत होत्या. महोत्सवाला भेट देणारे ग्राहक मग अंजनाताईंच्या स्टॉलकडे आपसूकच वळायचे. उत्तम शेतीबरोबरच मार्केटिंगचे उत्तम कसब देखील शेतकऱ्यांत दडलेले असते. अंजनाताईंकडे पाहिल्यावर त्याचा प्रत्यय येत होता. आपल्या मातीत पिकवलेला तांदूळ आणि मॉलमधून मिळणारा विविध व्यावसायिक तांदूळ यांच्यातील फरक त्या नेमकेपणाने मांडत होत्या. ग्राहकही मोठ्या विश्‍वासाने तांदळाची मनासारखी खरेदी करून दुसऱ्या स्टॉलकडे वळत होते.  उद्योजकतेचे कौशल्य पुढे आले  उत्पादनांच्या देवाणघेवाणी व्यतिरिक्त आपुलकीचा होणारा संवाद बचत गट आणि ग्राहकांतील नाते दृढ करीत होता. त्यातून ग्रामीण उद्योजिकांचे कौशल्य सिद्ध होत होते. कुणी ग्राहकाला कोल्हापुरी गुळाची चव दाखवत होते तर कुणी नावीन्यपूर्ण पदार्थांची खुमारी सांगण्यात व्यस्त होते. पदार्थांची विक्री झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर मिळणारे समाधान अशा महोत्सवाची निकड स्पष्ट करीत होते.  विविध पदार्थांची रेलचेल  स्ट्रॉबेरी, गूळ, काकवी, बेदाणे, मशरुम, हळद, कंदी पेढे, विविध प्रकारची लोणची-पापड आदी पदार्थांची रेलचेल येथे होतीच. शिवाय कोल्हापुरी साज, कोल्हापुरी चप्पल, व्हाइट मेटल ज्वेलरी, कापडी पिशव्या, सॉप्ट टॉइज, मातीची भांडी, नॅपकीन, घोंगडी, लाकडी खेळणी आदी विविध वस्तूही ठेवण्यात आल्या होत्या. जोडीला शाकाहारी, मांसाहारी जेवण, कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी चटणी असा मेन्यू खवैय्यांना आव्हान देत होता.  बोलके अनुभव  आम्ही शाहूवाडी तालुक्‍यातील दुर्गम भागातील अल्पभूधारक महिला आहोत. आमचा जयभीम महिला बचत गट सन २००५ पासून कार्यरत आहे. गेल्या आठ वर्षांपासून विविध उत्पादने तयार करतो. महोत्सवात शुद्ध गव्हाच्या शेवयांची विक्री केली. ग्राहकांकडून त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. आता नव्याने मागणी येऊ लागली आहे. महोत्सव उत्तेजन देणारा ठरला आहे.  -शारदा पवार- ७६२०३०१२१४  संगीता कांबळे, जयभीम महिला बचत गट,  शाहूवाडी, जि. कोल्हापूर  आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या भात पट्ट्यातील आहोत. आमच्या मातीतील दप्तरी, घनसाळ, आंबेमोहोर आदी विविध तांदळांना नेहमीच मागणी असते. महोत्सवात तो थेट उपलब्ध झाल्याने ग्राहक खूश झाले. सुमारे पन्नास हजार रुपयांचा तांदूळ बघता बघता विकला गेला ही आमच्यासारख्या अल्पभूधारक महिलांसाठी सुखद घटना म्हणावी लागेल.  -अंजना देसाई-९६२३२७४६९१  रामकृष्ण स्वयंसहाय्यता समूह, हेदवडे, जि. कोल्हापूर  मातीची पारंपरिक भांडी तयार करण्याचा आमचा व्यवसाय आहे. गेल्या दोन वर्षांपासून घरगुती वापरासाठी लाल मातीपासूनचा ‘फ्रीज’ तयार करीत आहोत. त्याची उपयुक्तता ग्राहकांना पटली. अनेकांनी त्याचे कौतुक केले. सुधारणाही सुचविल्या. व्यवसाय वृद्धीसाठी हा अनुभव चांगला होता.  -सविता कुंभार-८३०८५१३४६७  शेणगाव ता. भुदरगड  महोत्सवात करवंद, चिंच, आवळा, कोकम आदी आरोग्यदायी ज्यूस सादर केले. ग्राहकांना त्याचा स्वाद पसंतीस उतरला. अनेकांनी या व्यवसायाची माहिती घेतली. ग्राहकांची गरज ओळखून उत्पादने बाजारात आणण्याची आमची धडपड आहे.  -सारिका बकरे- ९१३०३६५०३६  संचालक, सात्वीक फूडस, कोल्हापूर    कोल्हापूर जिल्ह्यातील दीडशेहून अधिक बचत गटांच्या हजारो महिलांना थेट ग्राहक मिळवून देणारे व्यासपीठ म्हणून ताराराणी महोत्सवाकडे पाहता येते. ग्रामीण महिलांनी नावीन्यपूर्ण उत्पादने या निमित्ताने महोत्सवात सादर केल्या. त्यातून त्यांचे विक्री कौशल्य सिद्ध झाले.  आत्मविश्‍वास उंचावला. त्यातून भविष्यातही ग्राहक व बाजारपेठा तयार होण्यास चालना मिळाली.  कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांतील काही बचतगटांनी देखील महोत्सवात सहभागी होत उत्साह वाढवला.  -सुषमा देसाई- ९८२२८०१३६६  प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा  कोल्हापूर  ताराराणी महोत्सवात- उलाढाल दृष्टीक्षेपात (सुमारे) 

  • एकूण सहभागी बचत गट -१६९ 
  • वस्तू विक्री - २१ लाख ९१ हजार रु. 
  • खाद्य विक्री - १८ लाख ३० हजार रु. 
  • एकूण विक्री- ४० लाख २१ हजार ५९७ रू. 
  • सर्वाधिक विक्री झालेले बचत गट 

  • अहिल्यादेवी, गाव अब्दुललाट- विविध चटण्या -२,४६, ७८० रू.  
  • धनसंपदा- गडहिंग्लज- मिरची, हळदपूड १,५८, ८५० रू.
  • आयन, वाकरे ता. करवीर- पापड, लोणची मसाले, पुरणपोळी, ताक- १,००, ६८० रू.  
  • श्री गुरुदेव बचत गट, धामोड, राधानगरी विविध प्रकारचे तांदूळ- ९२, ८०० रू. 
  • आयेशा बचत गट, चिंचवाड, विविध कपडे- ८५, ६८८ रू. 
  • काही गटांनीही मांसाहारी जेवण, हैदराबादी बिर्याणी, मत्सपदार्थ आदींच्या माध्यमातून ७५ हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतची कमाई महोत्सवात केली. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com