शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी कौशल्य विकास अभियान 

अमित गद्रे
अमित गद्रे

राज्य शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाला विदर्भ, मराठवाड्यातून जोरदार सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता किफायतशीर आणि शाश्वत शेतीचा खात्रीशीर पर्याय उपलब्ध झाला आहे, अशी माहिती ॲग्रोवनचे मुख्य उपसंपादक अमित गद्रे यांनी दिली.  ॲग्रोवन कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील असंख्य शेतकऱ्यांना कौशल्य विकास अभियानाची माहिती मिळाली. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच अभियानाच्या दालनात नोंदणी अर्ज भरून देण्यासाठी शेतकरी उत्साहाने सहभागी होत आहेत. प्रदर्शनातील चर्चासत्रात या अभियानाची विस्तृत माहिती देण्यात आली.  श्री. गद्रे म्हणाले, की ‘‘तीन लाख शेतकऱ्यांना नियोजनपूर्वक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारे अभियान प्रथमच राज्यात राबविले जात आहे. त्यात ‘महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी’च्या पुढाकाराने ‘एसआयआयएलसी’ आणि ‘पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया’ या नामांकित संस्था सहभागी झाल्या आहेत. कृषी उद्योजकता प्रशिक्षणाची संधी यामुळे गावागावातील शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे.”  शेतकऱ्यांना १८७३ महसूल मंडळात तज्‍ज्ञांकडून शास्त्रीय प्रशिक्षण मिळणार आहे. गटबांधणी, कायदेशीर नोंदणी, लागवड ते बाजारपेठेपर्यंत प्रशिक्षणाची सुविधा, बाजारपेठा, प्रक्रिया व पूरक व्यवसाय, आधुनिक शेती अशी तंत्रशुद्ध माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल. राज्यातील युवा शेतकऱ्यांसाठी देखील कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जाणार आहे. अभियानातील या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना प्रमाणपत्र मिळेल. याशिवाय दोन वर्षांचा अपघाती विमा आणि बॅंकांकडून बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या योजनांचे लाभ तसेच प्रशिक्षणानंतर चाचणी परीक्षा उत्तीर्ण होताच पाचशे रुपयांचा परतावादेखील मिळतो, अशीही माहिती श्री. गद्रे यांनी या वेळी दिली.  चर्चासत्रात अभियानाची माहिती मिळताच अभियानाचे प्रतिनिधी अमित मांजरे यांच्याकडे नोंदणी अर्ज भरून देण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. चर्चासत्राचे सूत्रसंचलन एग्रोवनचे प्रतिनिधी संतोष मुंढे यांनी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com