पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे व्यवस्थापन

-मनोज (डावीकडे) व योगेश हे पाटील बंधू केळीच्या बागेत.
-मनोज (डावीकडे) व योगेश हे पाटील बंधू केळीच्या बागेत.

कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज या पाटील या बंधूंनी आपल्या जमिनीचा पोत कायम राखण्याचा प्रयत्न करीत श्रीमंती या केळी वाणाची शेती यशस्वी केली आहे. खरिपात मूग, त्यानंतर केळी, केळीची काढणी आटोपल्यानंतर हरभरा व त्यानंतर कापूस अशी मजबूत फेरपालट ते करतात. शेणखताचाही भरपूर वापर होतो. व्यापारी बांधावर येऊन दर्जेदार केळी खरेदी करून जातात हे देखील त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 

जळगाल जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्याचे मुख्य पीक कापूस आहे. तालुक्यातील कलाली येथे योगेश व मनोज या पाटील बंधूची सुमारे २० एकरांपर्यंत शेती आहे. काही वर्षांपूर्वी ही शेती पूर्ण कोरडवाहू होती. वडील सुरेश यांनी कूपनलिकेची व्यवस्था केली. पाण्याचा स्राेत उपलब्ध झाल्यानंतर मग बागायती पिके घेण्यास सुरवात केली.  शेतीचे व्यवस्थापन 

  • सर्व जमीन एकाच ठिकाणी असल्याचा मोठा फायदा पाटील बंधूंना मिळतो. त्यांची काळी कसदार जमीन आहे. वडिलांचे २०१० मध्ये निधन झाले. त्यानंतर योगेश व मनोज हे शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात. 
  • योगेश यांनी कला शाखेतून पदवी घेत बीएड देखील केले आहे. त्यांचे केळी हेच मुख्य पीक आहे. 
  • आता पाटील बंधूंना केळी पिकात चांगला अनुभव तयार झाला आहे. श्रीमंती हे वाण त्यांच्याकडे असते. 
  • पाच बाय पाच फूट अंतरावर झाडांची लागवड असून सद्यःस्थितीत सुमारे पंधरा हजार झाडांची देखभाल केली जात आहे. काळ्या कसदार जमिनीत केळी हवी तशी येत नाही असा समज आहे. अशा क्षेत्रात जमिनीचा पोत राखला पाहीजे यासाठी पाटील बंधूंनी व्यवस्थापन सुधारण्यावर भर दिला. 
  • पीक फेरपालट ठरते महत्त्वाची  खरिपात मूग, मग केळी, त्यानंतर हरभरा, त्यानंतर कापूस अशी सर्वसाधारणपणे दरवर्षीची पीक फेरपालट पद्धत आहे. केळीची नोव्हेंबरमध्येच लागवड होते. जेथे लागवड करायची असते त्या क्षेत्रात खरिपात मूग घेतला जातो. मूग हे द्विदलवर्गीय पीक असल्याने त्याचा फायदा पुढील पिकाला होतो. मूग काढणी झाल्यानंतर त्याचे अवशेष जमिनीत ट्रॅक्‍टरचलित यंत्राच्या साह्याने गाडले जातात. कंद चोपडा तालुक्‍यातील वढोदा भागातून आपल्या नातेवाइकांकडून आणले जातात. तेथे ते मोफत मिळतात. मात्र कंद खोदण्यासह वाहतूक खर्चासाठी प्रती रोप तीन रुपये खर्च येतो. जमीन भुसभुशीत करून त्यात  केळी लागवड केली जाते. लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. लागवडीनंतर दोन वेळेस रासायनिक खतांचे जमिनीतून डोस, त्यानंतर काढणीपर्यंत ठिबकद्वारे विद्राव्य खते दिली जातात.  वेळापत्रकानुसार काम  कांदेबाग केळीला अनेकदा अति थंडीचा फटका बसण्याची शक्‍यता असते. यामुळे खत, फवारणी व पाण्याचे व्यवस्थापन यासंबंधी पाटील यांनी वेळापत्रक तयार केले आहे. कृषितज्ज्ञांच्या संपर्कात ते असतात. बागेत उष्ण वारे शिरू नयेत यासाठी त्याभोवती जानेवारीच्या अखेरीस मका पिकाची लागवड करतात. ऊंच वाढलेला मका मग बागेचे संरक्षण करतो. थंडीच्या दिवसांमध्ये पाण्याचा काटेकोर वापर होतो. शक्‍य त्या वेळेस रात्रीच्या वेळी थंडीमध्ये केळीचे सिंचन करतात. नवव्या महिन्यापासून केळीमध्ये काढणी सुरू होते. मागील दोन वर्षे वर्षभरा ९० टक्के काढणी पूर्ण करण्याची किमया साधली. एरवी केळी कंदांच्या बागेत ९० टक्के काढणी पूर्ण करून घेणे अन्य शेतकऱ्यांना शक्‍य होत नाही. मात्र पाटील बंधू चोख व्यवस्थापन करून ते शक्‍य करतात. केळी काढणी नोव्हेंबर अखेरीस पूर्ण झाल्यानंतर ठिबकवर हरभरा पेरणी होते. हे देखील द्विदलवर्गीय पीक असल्याने जमिनीची सुपीकता टिकवण्यास त्याचा फायदा होतो.  दर्जेदार उत्पादन  केळीच्या सुमारे १० हजार झाडांच्या व्यवस्थापनासाठी किमान दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. श्रीमंती वाणाच्या झाडाला आठ ते नऊ फण्या व्यवस्थितपणे पक्व होतात. एका केळीची लांबी किमान सात इंच असते. साधारण २० किलो प्रतिघड अशी रास मिळवितात. श्रीमंती केळी खाण्यासाठी चवदार, अवीट गोडीची आहे. योगेश सांगतात की अंमळनेर भागात व्यापाऱ्यांची संख्या चांगली आहे. तेथील ठरलेले व्यापारी जागेवर गाडी घेऊन येतात. मालाचे वजन करून, लोड करून घेऊन जातात. त्यामुळे विक्रीची समस्या राहात नाही. अलिकडील वर्षांत १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतो आहे.  यंदा उतीसंवर्धित केळीची लागवड  यंदा श्रीमंती वाणाव्यतिरिक्त उतीसंवर्धित पाच हजार झाडांचे व्यवस्थापन केले आहे. लागवड मागील मार्चमध्ये कली आहे. या केळीची निसवण झाली आहे. काढणी पुढील महिन्यात सुरू होईल. पुढील महिन्यात जळगाव, चोपडा, पाचोरा व जामनेरात फारशी केळी काढणीसाठी उपलब्ध नसणार. अर्थातच ही केळी उपलब्ध होणार असल्याने दर चांगले मिळतील अशी पाटील यांना आशा आहे.  अन्य नियोजन  सुमारे १० एकर क्षेत्रांत पूर्वहंगामी कापसाची लागवड जूनमध्ये केली जाते. संपूर्ण क्षेत्रात ठिबक असल्याने त्याचा काटेकोर वापर करून घेतला जातो. कापसाचे एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवितात. कांदा, गहू ही देखील पाटील यांची महत्त्वाची पिके आहेत. दोन बैलजोड्या, दोन म्हशी व दोन गायींचे संगोपन होते. दरवर्षी सुमारे १५ ट्रॉली शेणखत मिळते. त्याचा भरपूर वापर शेतीत केला जातो.  संपर्क- योगेश पाटील-७५८८६१४१३२  मनोज पाटील-९४०३३९०६१९ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com