पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट दूर केले 

सीसीटीच्या भरावावर झालेली वृक्षलागवड
सीसीटीच्या भरावावर झालेली वृक्षलागवड

नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या मुदखेडला पाणीटंचाई जाणवू लागली. मात्र स्थानिक प्रशासन, लोकसहभागातून जलसंधारणाची विविध कामे उस्फूर्त करण्यात आली. जलयुक्त मुदखेड ही संकल्पना यशस्वी राबवण्यात आली. नगरपालिका हद्दीत झालेल्या या कामांनी वेगळीच दिशा दिली आहे.  नांदेड जिल्ह्यातील मुदखेड या तालुक्‍याच्या ठिकाणाला २०१७-१८ मध्ये प्रथमच पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवली. या शहराची लोकसंख्या सुमारे २३ हजार ५०० आहे. या लोकसंख्येला पुरेल एवढा पाणीपुरवठा नगरपालिका नियमितपणे करायची. पूर्वी या गावाला पाणीटंचाई कधी जाणवली नाही. परंतु २०१७-१८ मध्ये मात्र परिस्थिती तशी नव्हती. विदर्भात असलेले इसापूर धरण पावसाच्या पाण्याने दरवर्षी भरायचे. हे पाणी कालव्याद्वारे नांदेड जिल्ह्यात नियमितपणे यायचे. कालव्याला पाणी सुटले की सीता नदीत पाणी उतरायचे. नदीच्या काठी असलेल्या विहिरी पाण्याने डबडबून जायच्या. नदीच्या काठीच मुदखेड शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. परंतु अलीकडच्या काळात इसापूर धरण नियमितपणे भरत नाही. यामुळे नांदेड जिल्ह्याला पाण्याचे ‘रोटेशन’ कमी मिळू लागले. सन २०१७-१८ मध्ये तर दोन ते तीनच रोटेशन्स मिळाली. त्यामुळे विहिरींनी तळ गाठला. मुदखेडचे नागरिक हवालदील झाले. भविष्यातही या समस्येला तोंड द्यावे लागणार याची कल्पना ग्रामस्थांना आली. त्यातून सुरू झाले पाणीटंचाई दूर करण्याचे उपाय.  लोकसहभागातून सुरू झाली चळवळ 

  • स्थानिक तालुका प्रशासनासह मुदखेड शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी 
  • हजारो हात कामाला लागले. मुख्य पुढाकार घेतला तो मुदखेडचे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी. 
  • यंदा एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन झाल्यानंतर उपस्थित शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, व्यापारी यांच्यासमोर त्यांनी `जलयुक्त मुदखेड` ही संकल्पना मांडली. लोकसहभागातून, श्रमदानातून जेथे जेथे पाणी, माती अडवण्यात येईल, पाणी जिरवता येईल यासाठी त्यांनी ग्रामस्थांना हाक दिली. या कामांना वृक्ष लागवडीची जोड देण्याचे ठरले. गावच्या हद्दीत माथा ते पायथा जल व मृद संधारणाची कामे करून पावसाचे पाणी अडवले जाते. ते जिरवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवली जाते. या कामात शासकीय यंत्रणेबरोबरच स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट, सामाजिक तसेच खासगी संस्थांचेही योगदान अपेक्षित धरले. वास्तविक नगरपालिका हद्दीत लोकसंख्या मोठी असते. पाणीटंचाईत सामना त्यांना मोठ्या प्रमाणात करावा लागतो. मुदखेडच्या माध्यमातून नगरपालिका हद्दीत हे अभियान राबवण्यात आले हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनीही उपक्रमात उडी घेतली. 
  • प्रत्यक्ष कामांची अंमलबजावणी  अभियान जरी श्रमदानातून राबवले जाणार असले तरी यांत्रिक कामासाठी आर्थिक गरज लागणार होती. ही गरज लोकवर्गणीतून पूर्ण करण्यात आली. यात हजारो हात पुढे आले. सुमारे तीन लाख १५ हजार रुपयांचा निधी संकलित झाला. प्रशासन अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, विविध संघटना आदींनी खारीचा वाटा उचलला.  लोकसहभागातून झालेली कामे 

  • खंडोबा माळावर चर 
  • नाला खोलीकरण 
  • नदी खोलीकरण 
  • शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरात जल व मृद संधारण, वृक्ष लागवड 
  • उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालय परिसरात जल व मृद संधारण 
  • तहसील कार्यालय परिसरात जल- मृद संधारणासह वृक्ष लागवड 
  • तलावातील गाळ काढणे 
  • खंडोबा माळावर चर  शहरात खंडोबा माळाच्या उत्तरेकडील लहान-मोठे नाले सीता नदीमध्ये उतरतात. यातील एका मोठ्या नाल्याचे एक किलोमीटर खोलीकरण करून गाळ काढण्यात आला. त्याची रुंदी २० फूट तर खोली पाच फूट ठेवण्यात आली. जागोजागी पाणी अडवण्यासाठी नाल्यात १० ते १५ फुटाचे अंतर ठेवण्यात आले. या कामाचा फायदा पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला व आजूबाजूंच्या विहिरीला झाला.  आयटीआय परिसरात चर  पाच एकर क्षेत्रावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसली आहे. येथील मोकळ्या जागेत उताराला आडवे चर खोदण्यात आले. दोन चरांच्या मधोमध खड्डे खोदून त्यात पावसाळ्यात वृक्ष लागवड करण्यात आली.  उर्ध्व पैनगंगा कार्यालय परिसर सुमारे साडेपाच हेक्टर क्षेत्रावरील या परिसरात कार्यालय, निवासस्थाने, रस्ते व मोकळ्या जागा आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी १५ फूट लांब, पाच फूट रुंद व एक मीटर खोल असे जवळपास १०० खोल सलग समतल चर (डीप सीसीटी) घेण्यात आले. पावसाळ्यात तेथे वृक्ष लागवड करण्यात आली. या कामामुळे परिसरातील बोअरचे पाणी वाढण्यास मदत झाली.  प्रशासकीय इमारत परिसर  तालुक्‍याच्या प्रशासकीय इमारत परिसरात तहसील, पंचायत समिती, दुय्यम निबंधक, उपकोषागार, गट शिक्षण अधिकारी, महिला व बालकल्याण, उपअधीक्षक, भूमी अभिलेख ही कार्यालये अाहेत. बरीच जागा मोकळीही आहे. या परिसरातील विहीर व बोअर्स दर उन्हाळ्यात कोरडे पडायचे. यामुळे पाणीटंचाईची गंभीर समस्या उद्‌भवायची. शिवाय लावलेली झाडेही वाळून जायची. या परिसरात उतारास आडवे विविध पद्धतीचे चर खोदण्यात आले. तसेच २०० खड्डे खोदून वृक्षलागवड करण्यात आली. उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या विहिरीत पहिल्याच पावसात ३० फूट पाणी उतरले. आता ही विहीर काठोकाठ भरली आहे. आजूबाजूच्या विहिरी, बोअर्सलाही या कामांचा फायदा झाला आहे. झाडे बहरली अाहेत.  सीता नदी खोलीकरण सीता नदी गाळाने भरून गेल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या विहिरीत पाणी लवकर उतरायचे नाही.  जलयुक्त मुदखेड अभियानामुळे प्रभावित झालेले शेतकरी प्रकाश बल्केवाड यांनी दीड लाख रुपये खर्चून नदीचे खोलीकरण केले. नदीतून निघालेला गाळ काठावर भराव म्हणून टाकल्याने पुराचा धोका टळला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी या कामामुळे वाढलेच. परंतु आजूबाजूच्या विहिरींना पण फायदा झाला.  मुदखेड तलावातून गाळ उपसा  मुदखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात गाळ जमा झाल्याने पाणी साठवण क्षमता घटली होती. गाळ उपसा करण्यासाठी व वाहतुकीसाठी माफक दरात उत्तम जनजावळे यांनी जेसीबी यंत्र व टिपर उपलब्ध करून दिला. माफक दरामुळे शेतकऱ्यांनी ५४७६ घनमीटर गाळ आपल्या शेतात वापरला. झालेल्या कामांमुळे पहिल्या पावसातच मुदखेड शहर परिसरात पाणी पातळीत वाढ झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. यामुळे उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.  आपल्याला लागणारे पाणी आपण अडवले, जिरवले याचा त्यांना अभिमान वाटत आहे.  नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी, भोकर दिपाली मोतियळे यांचेही या कामात महत्त्वाचे पाठबळ मिळाले.  संपर्क- सुरेश घोळवे-९८८१२९४६६५   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com