गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीत उतरलेले "थ्री इडियटस' 

 शेतातील विविध कामांत नागपूर भागातील थ्री इडियटस कुशल होऊ लागले आहेत.
शेतातील विविध कामांत नागपूर भागातील थ्री इडियटस कुशल होऊ लागले आहेत.

नागपूर : प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार हिराणी यांच्या 'थ्री इडियटस' या कथानकाला साजेसे कथानक सध्या येथे आकार घेत आहे. रासायनिक अवशेषमुक्त शेती, गोरक्षण, माती संवर्धन अशा विविध ध्येयांनी झपाटलेले तीन मित्र एकत्र आले. उच्चशिक्षित अशा या तरुणांनी गलेलठ्ठ पगाराच्या आणि बड्या शहरांतील नोकऱ्यांवर पाणी सोडत चक्क नांगर हाती धरला. शेतीचा जराही अनुभव नसताना त्यातील व्यासंग वाढवण्याचा, शेतकऱ्यांकडून शिकत पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. शेती-मातीशी नाळ जोडू पाहणारे हे तिघे शेतीतील ध्येयवेडे (थ्री इडियटस) ठरले आहेत.    शेतीत येण्याची नव्या पिढीची इच्छा नाही. शेती खर्चिक व तोट्याची झाली आहे अशी वाक्ये वारंवार बोलली जातात. शेतीत समस्या जरूर आहेत. मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन त्यावर उपाय शोधून मार्ग काढणाऱ्यांची संख्याही कमी नाही. विदर्भातील तर अशा तीन नोकरदार मित्रांना चक्क शेतीचे वेड लागले. त्यांना खऱ्या अर्थाने ‘थ्री इडियटस’ ही पदवी लागू होते. आज रासायनिक अवशेषमुक्त शेतीचा ध्यास घेत पूर्णवेळ शेतीतील ‘करिअर’ घडवण्यास त्यांनी सुरवात केली आहे.  या तीन वेड्या तरुणांपैकी नागपूरच्या नंदनवन भागात राहणारे राजू मदनकर दिल्ली येथील अमेरिकन बॅंकेत नोकरीस होते. ‘क्रेडिट कार्ड’ संबंधित फसवणुकीची प्रकरणे हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. अडीच वर्षे नोकरी केल्यानंतर जूनमध्ये राजीनामा देत त्यांनी आपले गाव जवळ केले. तीघांपैकी दुसरे म्हणजे राजू यांचे मित्र गोपाल शर्मादेखील बंगळूर येथे नामवंत कंपनीत नोकरीस होते. ‘इंडस्ट्रियल इंजिनियरिंग’ची पदवी घेतलेल्या गोपाल यांनी सहा वर्षे नोकरीचा अनुभव घेतला. मात्र मन नोकरीत रमत नव्हते. त्यामुळे त्यांनीही ऑगस्टमध्ये आपले गाव गाठले. गेल्या दीड वर्षापासून शेती करण्यावर या दोघांमध्ये चर्चा होत होती. गोपाल यांना गायीसाठी शेती करायची होती, तर राजू यांना शेतीसाठी गाय हवी होती. दोघांचेही शेती करण्यावर एकमत झाले.  गोरक्षणाची लागली ओढ  ‘इंजिनियरिं’ क्षेत्रात असताना परीक्षा देण्यासाठी निघालेल्या गोपाल यांना रस्त्यावर गाईचा अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी उपचारासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर आपल्या नागपुरातील प्रतापनगर स्थित घरी आणले. गाईला चारापाणी केले. त्यातूनच गौरक्षणाची ओढ लागली. त्याच ओढीतून शेतीकडे वळण्याचा निर्णय पक्‍का केल्याचे गोपाल सांगतात.  इच्छा तेथे मार्ग  राजू यांची सव्वापाच एकर शेती असून, ती नागपूरपासून सुमारे ७० किलोमीटरवर आहे. त्या ठिकाणी ये-जा करण्यात वेळ जात असल्याने त्यांनी नागपूरनजीक शेतीचा शोध चालविला होता. त्यांच्या मित्राची जिल्ह्यातील कुसूमबी (ता. उमरेड) येथे १४ एकर शेती आहे. या दोघांनी त्या मित्राला भाडेतत्त्वावर शेती देण्याबाबत विचारणा केली. दोघांचा उत्साह पाहता त्या मित्राने तब्बल सहा वर्षांसाठी कोणतेही भाडेशुल्क न घेता शेती देण्यास सहमती दर्शविली. पहिलाच प्रयत्न असा सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरल्याने राजू व गोपाल यांचा उत्साह वाढीस लागला. राजू राहात असलेल्या नागपुरातील नंदनवन परिसरातून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर ही शेती असल्याने ये-जा करणे आणि देखरेखीसाठीदेखील ही शेती सोयीची ठरली.  शेती सुपीक करण्याचे प्रयत्न  सर्वप्रथम जमीन सुपीक करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी जीवामृताचा वापर सुरू केला. भारतातील अनेक ठिकाणच्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.२ किंवा त्या आसपास आहे. काही जमिनीत तर हे प्रमाण त्यापेक्षाही कमी असल्याचे राजू यांना आढळले. त्यामुळे त्याचे प्रमाण वाढविण्यावर दोघा मित्रांनी भर दिला. त्याचबरोबर कडधान्य लागवड, त्यातून नत्र स्थिरीकरण, जैविक आच्छादन, यांसारख्या उपाययोजना प्राथमिक टप्प्यात सुरू आहेत. पीक काढणीनंतर शेतीतील अवशेषांचा वापर करण्यास सुरवात केली. परिसरातील अनेक शेतकऱ्यांना त्याची उपयुक्तता सांगण्यास सुरवात केली. त्यांच्या मातीतील सेंद्रिय कर्ब वाढावा यासाठीही जागृती केली जाणार आहे.  पंचगव्याचा वापर  दोघा मित्रांच्या शेताजवळ काठीयावाडी गोपालक खुल्या जागेत राहतात. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गायी आहेत. सकाळी त्यांच्याकडील गोमूत्र तसेच शेण गोळा करण्याचे काम दोघे मित्र करतात.  शेतीत पंचगव्याचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला आहे. रासायनिक अवशेषमुक्‍त शेतीची संकल्पना या माध्यमातून साकारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.  गव्हाची शेती  भाडेतत्त्वावरील १४ एकरांपैकी दीड एकरावर झेंडूचा प्रयोग केला. झेंडू काढणीनंतर रोटाव्हेटर वापरल्यानंतर जमीन गहू लागवडीसाठी तयार करण्यात आली. उर्वरित क्षेत्रावर मिरची, वांगी, तूर आदी पिके फुलवली आहेत. उन्हाळ्यात भाजीपाला घेण्याचे प्रस्तावित आहे. पाण्यासाठी बोअरवेलचा पर्याय आहे. त्याचा उपयोग गव्हासाठी होतो आहे.  शेतकरी झाले मार्गदर्शक  थंडी वाढली, संध्याकाळी तांबडा रंग आकाशात पसरल्यास सकाळी धुआरी निश्‍चित पडणार असे निरीक्षण जुनेजाणते शेतकरी नोंदवितात. धुआरी वाढली म्हणजे पिकांत किडी-रोगांचा प्रादुर्भाव होणार असा त्याचा संबंध आहे. गाय, बैलांच्या हंबरण्यातील वेगळेपणा, त्यामागील कारणे अशा अनेक महत्त्वाच्या बाबींसाठी गावातील प्रयोगशील, अनुभवी शेतकऱ्यांचा सल्ला दोघा मित्रांना उपयोगी ठरत आहे.  हाती पकडला वखर  वखराला बैल जुंपल्यानंतर "चल रे चल रे' असे शब्दप्रयोग या मित्रांकडून व्हायचे. त्यामुळे बैल जागचे हलत नव्हते. त्यामुळे आमचे शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना हसे आवरत नसायचे. अशा प्रकारे बैलांना हाकारले तर बैल कधीच जागेवरून हलणार नाहीत, असे काहीजण सांगत. मग ग्रामस्थांच्या मदतीतून बैलांना हाताळणे जमू लागले. बैलचलित वखर कसा चालवावा, तास (ओळी) संपल्यानंतर त्यांना कसे वळवावे, वखर कसा थांबवावा या साऱ्या बाबी शिकल्यानंतर शेती कामांत परिपूर्णता येऊ लागल्याचे राजू सांगतात. बैलजोडी सध्या भाडेतत्त्वावर घेतली जाते.  सेंद्रिय मालाची विक्री व्यवस्था  सेंद्रिय शेतीमालाच्या विक्रीसाठी स्वतःचीच विक्री व्यवस्था उभारणार असल्याचे राजू यांनी सांगितले. नागपूर येथे ‘आउटलेट’ सुरू करून ग्राहकांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  तिसरा मित्रही जोडला जातोय  राजू आणि गोपाळ यांनी तर नोकरी सोडून शेती कसण्यास सुरवात केली. आता त्यांचा तिसरा मित्र अनिकेत शेटे हादेखील त्यांच्यासोबत लवकरच जुळणार आहे. ते सध्या दिल्ली येथे प्रसिद्ध कंपनीत नोकरी करत आहेत. त्यांची यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे शेती आहे. राजू, गोपाल यांच्या साथीने त्यांनाही रासायनिक अवशेषमुक्त शेतीत उतरायचे आहे. एकीकडे शेती परवडत नसल्याचे सतत बोलले जाते. त्या पार्श्‍वभूमीवर या तिघा मित्रांनी मात्र फायदेशीर आणि कमी खर्चाच्या शेतीची संकल्पना मांडत त्या दृष्टीने केलेले वाटचाल प्रेरणादायी आहे. शेतीमध्ये युवा आणि सुशिक्षित युवकांनी पुढे यावे हा विचारही त्यांच्या शेतीतील सहभागातून पूर्णत्वास गेला आहे. या मंथनातून निश्‍चितच नवे सकारात्मक काही बाहेर येईल, अशी आशा नक्की करूयात!  संपर्क- राजू मदनकर - ८०५५०५५५१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com