आदर्श नैसर्गिक शेतीसह जपली पीक विविधता 

मोसंबीत पाचट आच्छादन, हरभरा व लिली पीकपध्दती
मोसंबीत पाचट आच्छादन, हरभरा व लिली पीकपध्दती

नांदेड जिल्ह्यातील मालेगांव (ता. अर्धापूर) येथील बालाजी सावंत यांनी नैसर्गिक शेती पद्धतीचा अंगिकार केला आहे. स्वतः तयार केलेल्या निविष्ठां, घरचे बियाणे यांच्या वापरातून उत्पादन खर्च कमी केला आहे.  पारंपरिक पीकपद्धतीला फळबागा, फुलशेती यांची जोड देत उत्पन्नाचे विविध स्राेत निर्माण केले आहेत.    नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील बालाजी धोंडीबा सावंत यांची शेती आहे.  मालेगाव गावठाणाला लगत पूर्व आणि पश्चिम दिशेला अशी दोन ठिकाणी त्यांची जमीन आहे. सिंचनासाठी सामाईक विहीर तसेच चार बोअर्सची सुविधा आहे. सावंत यांना १९८० पासूनचा अनुभव आहे. पूर्वी ते रासायनिक शेती करायचे. परंतु खर्च आणि उत्पादन यांचा मेळ बसत नसायचा. शिवाय अनियंत्रित रासायनिक शेतीचे प्रतिकूल परिणाम दिसू लागले. माती, पर्यावरण व मानवी आरोग्य या बाबींचे महत्त्व लक्षात घेऊन सुमारे १८ वर्षांपासून सावंत यांनी रासायनिक निविष्ठांचा वापर पूर्णपणे बंद केला. देशी गोमूत्र व शेण, बायोगॅस स्लरी, जीवामृत, वनस्पतीजन्य कीडनाशकांचा वापर सुरू केला.  सुमारे ३२ वर्षांपासून बायोगॅसचा वापर  सावंत यांच्याकडे दोन गीर गायी, एक लाल कंधारी, एक गावरान गाय, तीन म्हशी, बैल, गोऱ्हे अशी लहान मोठी मिळून सुमारे १० जनावरे आहेत. त्यामुळे शेणतखत उपलब्ध होते. सुमार ३२ वर्षांपासून बायोगॅससाठी त्याचा वापर होतो. सावंत कुटुंबीयांचा स्वयंपाक याच जैविक इंधनावर होतो. शिवाय स्लरी खत म्हणून उपयोगात येते.  घरगुती निविष्ठांच्या वापरावर भर  सावंत यांच्याकडे देशी वंशाच्या गायी आहेत. शेण, गोमूत्र, ताक, गूळ, चणापीठ, वृक्षांखालील माती आदीं घटक विशिष्ठ प्रमाणात पाण्यात मिसळून द्रव जीवामृत तयार केले जाते. शेण वाळवून जीवामृत शिंपडून घन जीवामृत तयार केले जाते. शिवाय निंबोळी अर्क, गोमूत्र, हिरवी मिरची, लसूण यांचाही वापर पीक संरक्षणासाठी केला जातो. काही घटक फवारणीद्वारे तर काही ठिबकद्वारे वापरले जातात.  जमिनीची सुपीकता वाढली  रासायनिक निविष्ठांचा वापर बंद केल्यानंतर तसेच जीवामृताचा वापर सुरू केल्यानंतर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. जमीन भुसभुशीत झाली आहे. गांडुळांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढू लागली आहे.  पाण्याचे महत्त्‍व जाणले  गेल्या काही वर्षांपासून या भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. सावंत पाण्याचे हे महत्त्व जाणून आहेत. ठिबक आणि तुषार सिंचनाद्वारे ते फळबागा, फुलझाडे, अन्य पिके फुलवतात. दीड एकर मोसंबी बाग आहे. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी होते. या परिस्थितीत बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी बागेत उसाच्या पाचटाचा आच्छादन म्हणून वापर होतो.  आंबेबहाराचे उत्पादन घेण्यात येते. त्याचे दरवर्षी सरासरी १० ते १५ टन उत्पादन मिळते. नांदेड तसेच नागपूर येथील बाजारपेठेत विक्री होते. हूर जातीच्या आंब्याची एकरभरात सुमारे ३५ झाडे आहेत. आढी लावून नैसर्गिकरित्या पिकविलेल्या आंब्यांना चोखंदळ ग्राहकांची मोठी मागणी असते. घरूनच बहतांश विक्री होते. दरवर्षी साधारण ४० ते ५० हजार रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळते. सध्या लिंबाची सहा झाडे आहेत. यंदा अजून ५०० झाडांची लागवड केली आहे.  दररोज उत्पन्न देणारी फूलशेती  गावापासून नांदेड शहरातील फूल बाजारपेठ सुमारे दहा किलोमीटरवर आहे. ही संधी ओळखून गुलाब ३० गुंठे, बिजली १० गुंठे, लिली ५० गुंठे, गलांडा १० गुंठे आदी फुलझाडांची लागवड केली आहे. तोडणीची कामे घरातील मंडळीच करतात. लिली फुलांच्या जुड्या बांधल्या जातात. गुलाब, गलांडा ही फुले पिशवीत भरून मोटर सायकलवरद्वारे बाजारपेठेत दररोज विक्रीस नेली जातात. सावंत कुटुंबीयांना या फूलशेतीतून बारमाही किंवा ताजे उत्पन्न मिळत राहते. पाण्याची उपलब्धता तसेच हवामानातील बदलानुसार फुलांचे उत्पादन अवलंबून असते. प्रतिकिलो सरासरी १० ते १०० रुपये तर बिजलीला प्रतिकिलो सरासरी पाच रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत दर मिळतो. लिलीला प्रतिजुडी सरासरी ५ रुपये दर मिळतो. फुलांच्या हारांमध्ये फीलर म्हणून वापरण्यासाठी तुळशीच्या झाडांची लागवड केली आहे.  भाजीपाला, मसाला पिके  पालक, मेथी, शेवगा, टोमॅटो, कांदापात, लसूण, हळद, मिरची आदी पिकांच्या उत्पादनातून सावंत यांनी पीक विविधता जपली आहे. यंदा हळदीच्या सेलम वाणाची ३० गुंठे क्षेत्रावर लागवड केली आहे.  सेंद्रिय शेतमाला विक्रीचा स्टॅाल  सावंत हे कृषी विभागातर्फे स्थापन करण्यात आलेल्या ओमशांती सेंद्रिय शेती गटाचे सचिव आहेत. शेतकरी गटाचे अध्यक्ष भगवान इंगोले यांच्यासह गटातील अन्य शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या उत्पादनाना बाजारपेठ देण्यासाठी मालेगाव येथे स्टॅाल सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला कांदा, लसूण, विविध भाजीपाला, फळे आदी माल ठेवण्यात येतो. अनेक ग्राहक, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी आवर्जून या शेतमालाची खरेदी करतात.  कुटुंबाचे शेतातच वास्तव्य  .  पूर्वी सावंत कुटुंबीय गावामध्ये राहायचे. त्यांची गावाच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला शेती आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पूर्व दिशेला असलेल्या शेतात वास्तव्यास आहेत. सावंत यांच्या पत्नी लक्ष्मीबाई, मुलगे अमोल, धनंजय, सुना अनिता, सोनाली असे सर्वजण एकमेकांना आधार देत शेतात राबतात. लागवड, मशागत, काढणीपर्यंतच्या सर्व कामांची जबाबदारी वाटून घेतात. शेतीतील खर्चाचा हिशोब ठेवण्याची पद्धत आहे. त्याच्या नोंदवह्या त्यांच्याकडे आहेत. भाजीपाला, फुलांची विक्री यात देखील घरातील सदस्यांचा पुढाकार असतो. त्यातून मजुरांवरील अवलंबित्व कमी करून उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होत आहे. 

संपर्क- बालाजी सावंत-९४२१७६५६०६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com